सध्या जे जे स्कूल ऑफ आर्ट, रचना संसद या मुंबईतील कलामहाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे वार्षिक कलाप्रदर्शन भरले होते. आधुनिक युगातील विद्यार्थ्यांच्या नव्या कल्पना या प्रदर्शनांमध्ये पाहायला मिळाल्या. सर ज. जी. उपयोजित कलामहाविद्यालयातील राजस चौधरी याच्या ‘फिलिप्स’च्या कॅम्पेनला सुवर्ण पदक मिळाले. सोनल बुरटे हिच्या ‘नाम फाऊंडेशन’ला शासनाचे द्वितीय पदक मिळाले तर आकाश शिंदे याच्या एसटीच्या जाहिरातींना तिसरा पुरस्कार मिळाला.

सर ज.जी. उपयोजित कलामहाविद्यालयातील पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनी केलेले कृष्ण, पोपट, रेखा, श्रीराम लागू यांचे केलेले कागदी कोलाज देखणे होते. दासबोधची अक्षररचना, बलून, एमटीडीसीचा लोगो, विद्यार्थ्यांची रेखाटने, ग्राफिस डिझाइन, कावासकीची जाहिरात प्रदर्शनात उत्तम मांडली होती.

द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी केलोग्ज, माँजिनिसचे रंगीबेरंगी केलेले  डिझाइन बॉक्स, शॉपिंग बॅग्ज, ‘नूडल’ बारचे पोस्टर सुरेख झाल्या आहेत. मुलांचे आकर्षक ग्राफिक डिझाइन पाहायला मिळाले. व्हिजिटिंग कार्ड, लेटरहेड, इन्व्हलप्स यांच्या सुंदर डिझाइन येथे मांडल्या होत्या. ‘आपण नक्कीच बदलू शकतो’ हा संदेश अक्षर चित्रांतून देण्यात आला. वारली चित्रांची सुबकता येथे पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांच्या अक्षरकलाकृती व जलरंगांचे वेधक व्यक्तिचित्रे येथे पाहायला मिळाली.

तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या ‘लहान मुलांच्या कविता’ सुंदर होत्या. ‘मगनलाल ड्रेसवाला’च्या कल्पक जाहिराती, ‘तू विझत असताना’ची टायपोग्राफी, ‘इव्हिल’च्या जाहिराती मांडल्या होत्या. चतुर्थ वर्षांच्या विद्यार्थ्यांनी कल्पक कलाकृती साकारल्या. ‘मुली वाचवा’चा संदेश देण्यासाठी कुणाल बुटलेने ‘आईच मुलांना घडविते‘ हे दाखवून दिले आहे. ‘घटणारी मुलींची संख्या’ हा चिंतेचा विषय आहे. तेव्हा ‘शिवरायांची जिजाऊ’, ‘अंजनीचा सूत मारुती’, ‘कौसल्याचा रामबाई’ यातून मातांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. प्राण्यांच्या व्यंगचित्रांतून ‘ओरडू नका, स्पष्ट बोला’ हा संदेश देण्यात आला. कॅरम, सापशिडी, बुद्धिबळ या खेळांचे महत्त्व पोस्टरद्वारे दाखविले होते. खेळणाऱ्या मुलांचे सुंदर कोलाज वेधक होते. बाहेरचा प्रवास महागत असताना ‘एसटीचा प्रवास’ सामान्यांना परवडतो. यासाठी ‘माझ्या म्हातारपणाचा आधार ती- एसटी’ या सुंदर जाहिराती आकाश शिंदेने केल्या आहेत.

दुष्काळी भागातील तहानलेली लहान मुले, ओसाड जमिनीवर चिंतेत बसलेली शेतकरीण, पाण्याविना पहुडलेला बैल सोनल बुरटेने ‘नाम फाऊंडेशन’साठी चित्रित केले आहेत. दुष्काळाने झालेले शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान, त्यांच्या वेदना सोनलने टिपल्या आहेत.

‘सेफ्टी पीनने पूर्ण साडी सावरली जाते’ त्याप्रमाणेच ‘स्त्री ही संपूर्ण कुटुंबाला सांभाळत असते.’ असा संदेश गीतांजली बोरूडेने आपल्या ‘सेफ्टी पीन’च्या अक्षरांतून दिला आहे. गीतांजलीने सेफ्टी पीनने पूर्ण मराठींची अक्षररचना तयार केली आहे. सेफ्टी पिनच्या अक्षररचनांची ‘कॅग’च्या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. ‘पट्टीचे टपोरी’चे व्यंगचित्रे, कोळीण बायका यांची सुंदर व्यंगचित्रे मांडली होती. या प्रदर्शनात सुंदर छायाचित्रेही पाहायला मिळाली.

सर जेजे स्कूल ऑफ आर्टमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. राहुल पवार याला शासनाचे सुवर्णपदक मिळाले आहे. राहुल हा नांदेडमधील दुष्काळी भागातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याने शेतकऱ्याच्या वेदना चित्रांतून मांडल्या आहेत. दिक्षा आनंदाचे या विद्यार्थिनीला ‘सोफ्यावर बसलेल्या उघडय़ा माणसाच्या व्यक्तिचित्रणाला शासनाचा द्वितीय पुरस्कार मिळाला.  शुभम मालूच्या कलाकृतीला तृतीय पुरस्कार मिळाला.  मयूर पाळसकरलाही टेक्स्टाइल डिझाइनसाठी पुरस्कार मिळाला आहे.’

आजू लव्हाळेने कपडय़ांच्या तुकडय़ांपासून तयार केलेला ‘रिक्षावाला’ लक्षणीय झाला आहे. क्राफ्टच्या विद्यार्थ्यांनी उशी, पडदे, गादी यांच्या मोहक कलाकृती मांडल्या होत्या. कपडय़ांवरील विणकाम, बेसीन, नळ, पॉट, टी-शर्टवरील कार्टून डिझाइन, घर, ऑफिस, गार्डन यांची वास्तूरचना मांडली होती. जोखडातील माणूस, शेवाळ्यातील प्राणी, मूर्तिमंत महिला, पाऊल, पक्षी-प्राणी संग्रहालय, गांधी टोपीतील मराठी माणूस, पावसाळ्यातील निसर्ग, कोलाज चित्रे, स्थिरचित्रे, टुडी डिझाइन, आकर्षक अमूर्तचित्रे, हनुमानाला पकडणारा रावण यांची वेधक पेन्सील, जलरंग, तैलरंगातील चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळाली. ‘न्यूड’ चित्रे व शिल्पाकृती येथे पाहायला मिळाल्या.

‘स्वतंत्र भारतातही लोकांचे ओठ शिवले जातात’ हा संदेश ‘कपडा मशीनच्या’ कलाकृतीतून देण्यात आला आहे. प्रतीक जाधवच्या या कलाकृतीला पुरस्कार मिळाला आहे.

‘रचना संसद’चे कलाप्रदर्शन

दादर येथील रचना संसद कला महाविद्यालयात ‘विझ इम्पॅक्ट २०१९’ हे विद्यार्थ्यांचे कलाप्रदर्शन भरले होते. येथील प्रथम वर्ष, द्वितीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी छान कलाकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. केस गळलेल्या माणसांनी ‘इंदुलेखा’ तेल वापरून आपले भरगच्च केस वाढविले. या कॅम्पेनला पुरस्कार देण्यात आला. ‘अलाइड लेटरिंगचे पुस्तक कव्हर व ‘कोबी ते बास्केट’, ‘माइक, हातोडा, बुद्धिबळाचा वजीर, ‘फुलवेली ते यंत्रमानव’ व ‘पंखा ते सॅटेलाइट’ अशा समान वाटणाऱ्या चित्रांच्या विविध अवस्थांचे चित्रण केले आहे. ‘पेपर बोट चिक्की’च्या चित्रांना पुरस्कार मिळाला आहे.

कागदाच्या अक्षरांनी कोरलेले ‘रचना संसद’, ‘टाकाऊपासून टिकाऊ’ केलेले कोलाज वर्क, मडके, मातीच्या शिल्पाकृती येथे मांडल्या होत्या. मृणालने केलेले राखी, कंदील, गणपती, पतंग, कलश, पाने, गुढी यांच्या कागदाच्या कलाकृती येथे पाहायला मिळाल्या. मेंदीसाठी बांधलेले हात, हॉल्सची पेन्सिलचित्रे, ‘नॅशनल जिओग्राफीतील पक्षी, प्राणी, झाडे, डोंगर यांचे पोस्टर प्रदर्शनात पाहायला मिळाले. काडेपेटी, रबराने केलेली अक्षरचित्रे, एमडीएच मसाले, आईस्क्रीमचे पोस्टर यांची चित्रे मांडली होती.

डब्याखाली पैसे ठेवण्यापेक्षा ‘इंडिया पोस्ट’मध्ये पैसे सुरक्षित ठेवा. असा संदेश अर्चनाने दिला आहे. अभिनंदन, सुंदर, अधोगती यांची हाताने केलेली सूचना योग्य वाटते, महिलांच्या त्वचेची काळजी, जस्ट डायल, मातीतील कोरीव काम, लग्नमंडपाचा सजलेला हॉल यांच्या कलाकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या.

कौशकने केलेली ‘जीवसृष्टीचा शोध हा आपल्या आकलनापलीकडे आहे’ ही नॅशनल जिओग्राफीची जाहिरात, ‘गोली नही, आवाज का गोला’ ही ‘हॉल्स’ची जाहिरात लक्षणीय झाली आहे. रचना संसदने ‘कलाविष्कारांचे आधुनिकीकरण’ यावरच हे प्रदर्शन मांडले होते. जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल, जेके पेपर प्रिंट, नवनीत क्राफ्ट पेपर, इको फ्रेंडली क्राफ्ट पेपर, बेस्ट बस, सूर्या बल्ब, गुडनाइट, पेटीएम, पारले यांच्या कल्पक जाहिराती प्रदर्शनात मांडल्या होत्या. मुंबईची दहीहंडी, नाशिकच्या संक्रांतीतील पतंग, पंढरपूर यात्रा पाहायची असेल तर ‘एसटी’शिवाय पर्याय नाही, असा संदेश श्रेयसने ‘एसटी’च्या कॅम्पेनमध्ये दिला आहे. ‘गरीब मुलांना शाळेत पाठवायला मदत करून बालमजुरी थांबवा’ असा संदेश सकिनाने दिला आहे.

अ‍ॅमेझॉन, होनर आईस्क्रीम, जीवनसाथी डॉटकॉम, हॉवेल बल्ब यांच्या सुंदर जाहिराती केल्या होत्या. कॅलिग्राफी केलेले कपडे, रुकसार, अपर्णाची फॅशन फोटोग्राफी सुंदर होती. मधुश्रीने माशांचे वेगळे फोटो टिपले होते. ईशाने वारकरी, ढोलकी, वीणा यांची लयबद्ध चित्रे रेखाटली होती. रचना संसदच्या कॉम्प्युटर ग्राफिक विभागाने आधुनिक कलाकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या.

ठाणे स्कूल ऑफ आर्ट

ठाणे स्कूल ऑफ आर्टमध्येही कलाप्रदर्शन भरले होते. येथेही  विद्यार्थ्यांनी सुंदर कलाकृ ती मांडल्या होत्या.  या प्रदर्शनात प्राजक्ता कडवला प्रथम, अनघा कदमला द्वितीय व समीधा चौधरीला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.

कलामहाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची आधुनिक विचारसरणी, कल्पकता व सामाजिक भान येथे पाहायला मिळाली. यातून भावी उदयोन्मुख चांगले कलाकार  तयार होतील. चित्रकारांनी समाजातील गंभीर प्रश्नांना कलाकृ तीतून वाचा फोडल्याने जनजागृती होण्यास नक्कीच मदत होईल. ही कला प्रदर्शने आपल्याला सुखावून जातील व नव्या कलाकारांना  प्रेरणादायी ठरतील.

प्रशांत मानकर

mankarprashant04@gmail.com