फोर्ट परिसरातील ‘एशियाटिक सोसायटी’ म्हणजेच ‘टाऊन हॉल’समोर असलेले ‘हॉर्निमन सर्कल’ सर्वाच्याच परिचयाचं आहे. १८४३ साली बांधून पूर्ण झालेले हे मुंबई शहरातील प्लानिंग करून बांधण्यात आलेलं पहिलं गार्डन. पण हॉर्निमन सर्कल हे त्याचं मूळ नाव नव्हे. या जागेचं मूळ नाव आहे ‘एल्फिन्स्टन सर्कल’. पण मग या जागेला ‘हॉर्निमन सर्कल’ हे नाव कसं पडलं? बेंजिमिन हॉर्निमन हा जन्माने आयरिश असलेला ब्रिटिश पत्रकार. आपल्या तरुण वयातच तो भारताच्या प्रेमात पडला आणि तिथेच जाऊन आपलं करिअर घडवायचं असं त्याने ठरवलं. तो भारतात आला आणि कोलकाता (तेव्हाचे कलकत्ता) येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘द स्टेट्समन’ या वृत्तपत्राचा संपादक झाला. पुढे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि वकील फिरोझशाह मेहता यांनी सन १९१० साली भारतीयांची बाजू योग्य रीतीने समाजमाध्यमातून लोकांसमोर यावी यासाठी ‘द बॉम्बे क्रॉनिकल’ नावाचे इंग्रजी वृत्तपत्र सुरू केले. त्या वेळी ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी फिरोझशाह मेहता यांना हॉर्निमन यांचे नाव सुचविले. आणि ‘द बॉम्बे क्रॉनिकल’चे पहिले संपादक होण्याचा मान बेंजिमिन हॉर्निमन यांना मिळाला. हॉर्निमन यांनी माणुसकीच्या नात्याने केलेली पत्रकारिता आणि लेखणीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढय़ासाठी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून १९४८ साली त्यांच्या निधनानंतर ‘एल्फिन्स्टन सर्कल’चे नामकरण ‘हॉर्निमन सर्कल’ असे करण्यात आले.

हा इतिहास सांगायचं कारण म्हणजे आज ज्या जागेविषयी आपण जाणून घेणार आहोत त्या जागेचा पत्ता या नावाशिवाय पूर्ण होत नाही. ‘हॉर्निमन सर्कल’च्या आजूबाजूला ब्रिटिशकालीन पद्धतीने बांधलेल्या अनेक इमारती आहेत. त्याच परिसरातील बँक स्ट्रीटवरील विकास बिल्डिंगच्या कॉर्नरला आहे ‘जिमी बॉय रेस्टॉरंट’. वाघमुखी असलेल्या या रेस्टॉरंटला बाहेरून पाहिल्यास हा एखादा नवखा कॅ फे वाटेल. पण तुम्ही जेव्हा रेस्टॉरंटच्या आतमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला एक सुखद धक्का बसतो. उंच छत, त्याला लटकणारे पंखे आणि झुंबर, लाकडी खुच्र्या, टेबलांच्या पृष्ठभागावर अंथरलेली काच, बाजूच्या भिंतींना खेटून उभ्या असलेल्या नक्षीदार लाकडी मशाली, त्यावर तितकेच आकर्षक दिवे, भिंतीवरील जुनं घडय़ाळ आणि पारशी धर्मीयांशी संबंधित तसबिरी तुमचं लक्ष वेधून घेतात. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी नव्याने उघडलेल्या टिनपाट कॅ फेपेक्षा हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे याची खात्री व्हायला लागते.

‘हॉर्निमन सर्कल’प्रमाणेच ‘जिमी बॉय’ हेसुद्धा नव्याने झालेलं नामकरण. ‘जिमी बॉय’चं मूळ नाव ‘कॅ फे इंडिया’. इराणहून मुंबईत दाखल झालेल्या इराण्यांपैकीच अर्देशियन इराणी हेदेखील एक. नाक्यावरची वाघमुखी जागा म्हणून १९२५ साली त्यांनी ही जागा विकत घेतली आणि ‘कॅ फे इंडिया’ची सुरुवात केली. त्या काळी हा परिसर गजबजलेला असे. दक्षिण मुंबईच्या या परिसरात आता केवळ कामासाठी लोक  जातात, पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला हा परिसर म्हणजे मुंबईचा केंद्रबिंदू मानला जायचा. आजूबाजूच्या परिसरात लोकांची वस्ती होती. सर्व महत्त्वाची कार्यालयं, ब्रिटिश आर्मीच्या वसाहती, सरकारी इमारती याच भागात होत्या. त्यामुळे दिवसभर कॅ फेमध्ये लोकांची रेलचेल असे. खरंतर त्या काळी हॉटेलिंग ही चैनीची गोष्ट मानली जायची. त्यामुळे दाराशी आलेली प्रत्येक व्यक्ती ही देवासमान असे. त्यांची मनापासून ऊठबस केली जाई. परिसरातील लोक मुख्यत: सकाळच्या न्याहरीसाठी इथे गर्दी करत. इराणी चहा, बन मस्का, ऑमलेट पाव, खिमापाव, मावा समोसा, मावा केकसारख्या पदार्थाना लोकांची पसंती असे.

अर्देशियन यांच्यानंतर कॅ फेची जबाबदारी जमशेद आणि बमन यांच्या खांद्यावर आली. त्यापैकी जमशेद यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करत १९६५ साली माहीम येथे ब्रिस्टॉल बेकरी सुरू केली. जॉन्सन हाऊसजवळील पीतांबर लेनवरील याच बेकरीतील ‘बिम्बो ब्रेड’ नामक एका पदार्थाने आजही लाखो मुंबईकरांची सकाळ होते. लाल-निळ्या पट्टय़ाचं पॅकेजिंग असलेला आणि नावामध्ये हत्तीची प्रतिकृती असलेला ‘बिम्बो ब्रेड’ची निर्मिती तेव्हाच्या ‘कॅफे इंडिया’पासून आहे.

काळ पुढे सरकला तशी व्यवसायाची गणितं बदलली. मुंबईसुद्धा झपाटय़ाने बदललली आणि वाढली. लोक केवळ कामानिमित्त दक्षिण मुंबईत येऊ  लागले. त्याचाच परिणाम या परिसरातील अनेक व्यवसायांवर झाला. १९९९ साली जमशेद यांचे पुत्र अस्पी इराणी यांनी कॅ फेचा संपूर्ण कायापालट केला. जमशेदींना त्यांच्या परिवारामध्ये लाडाने ‘जिमी बॉय’ म्हटलं जायचं. त्यामुळे नव्याने उभ्या राहिलेल्या कॅफेचं नामकरण ‘जिमी बॉय’ करण्यात आलं. रेस्टॉरंटचा आतील जुना पारशी लुक तसाच ठेवून ते पूर्णत: वातानुकूलित करण्यात आलं होतं.

मुंबईतील इतर इराण्यांकडे मिळणारे किंबहुना त्याहून अधिक पदार्थ आजघडीला ‘जिमी बॉय’मध्ये मिळतात. त्यामध्ये पारशी आणि नॉर्थ इंडियन पदार्थाचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. पण इथे मिळणारी एक गोष्ट तुम्हाला क्वचितच इतरत्र कुठेही मिळेल, ती म्हणजे ‘लगन नू भोनू’. पारशांच्या लग्नामध्ये तयार केल्या जाणाऱ्या पदार्थाची ही मेजवानी ‘जिमी बॉय’ची खासियत आहे. विशेष म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही प्रकारांत तुमच्या आवडीप्रमाणे ‘लगन नू भोनू’ मिळतो. ‘नॉनव्हेज’मधील मेजवानीत पात्रानी मच्छी, सल्ली मर्गी किंवा मर्गी ना फर्चा, चिकन किंवा मटन पुलाव आणि सोबतीला धनसाक दाल तसंच व्हेजमध्ये लगन सारा नू स्टय़ु किंवा खारा भिंडी, सली व्हेजिटेबल किंवा काजू व्हेजिटेबल्स, व्हेज पुलाव आणि धनसाक दाल हे पदार्थ असतात. तर दोन्ही जेवणांमध्ये सागो वेफर्स, पारशी रोटली, गाजर मेव्याचं लोणचं, लगन नू कस्टर्ड किंवा कुल्फी हे पदार्थ सारखे असतात. पारशी लोकांच्या लग्नाचं निमंत्रण तुम्हाला आजवर मिळालं नसेल आणि त्यांच्या लग्नातील मेजवानी चाखायची असेल तर ‘जिमी बॉय’ गाठायला हवं. त्याशिवाय वर्षभर पारशी पद्धतीचे पदार्थ मिळण्याची जागा म्हणून ‘जिमी बॉय’ची डायरीत नोंद करायला हरकत नाही.

‘जिमी बॉय’ने काळाप्रमाणे स्वत:ला बदललं असलं तरी काही जुन्या पाऊलखुणा कायम ठेवल्या आहेत. इराणी हॉटेलमध्ये कायम दिसणाऱ्या पोलंडच्या बेन्टवूड चेअर अजूनही दिसतील. त्या ‘कॅ फे इंडिया’च्या वयाच्या आहेत. टेबलांचा पाया लाकडी आणि नक्षीदार असला तरी त्यांचे गोल पृष्ठभाग जाऊ न आता चौकोनी पृष्ठभाग आले आहेत. आजही रेस्टॉरंटचा बेकरी सेक्शन सुरू आहे. त्यातील सर्व पदार्थ ब्रिस्टॉल बेकरीतून येतात. ‘जुनं तेच सोनं’ असं म्हणत काळानुरूप न बदलता खंगत जाण्यापेक्षा नव्याची कास धरून स्वत:मध्ये आवश्यक ते बदल करणं केव्हाही चांगलं. कारण बदल हेच एकमेव शाश्वत सत्य आहे. ‘जिमी बॉय’ने ते आपल्या कृतीतून करून दाखवलं आहे आणि म्हणूनच तो स्पर्धेत टिकून आहे.

viva@expressindia.com