vv11नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
नमस्कार दोस्तांनो,
सरत्या वर्षांच्या पार्टी मूडमधून अजून बाहेर आला नसाल तर त्याच नॉस्टॅल्जियाला जागून या वर्षांची पहिली प्ले लिस्ट देतोय. वर्षांची पहिली प्ले लिस्ट अर्थातच सरत्या वर्षांतल्या मला आवडलेल्या गाण्यांची. सरत्या वर्षांत गाजलेली काही गाणी तुम्हा सर्वाप्रमाणेच मलाही आवडली. उदाहरणार्थ ‘एक व्हिलन’मधलं मोहम्मद इफमर्नच्या अगदी तलम आवजातलं – ‘किसी शायरकी गज़्‍ाल..’,   उंगली चित्रपटातलं गुलराज सिंगनी संगीतबद्ध केलेलं आणि गायलेलं ‘ओ पाकिज़ा रे’.. सुंदरच आहेत ही गाणी!
ईडीएम (अर्थात इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक) या नवीन संगीत प्रकारात मोडणारी विशाल-शेखर जोडीची काही गाणी तुफान होती. ‘बँग बँग’ अणि ‘तू मेरी मैं तेरा’ ही गाणी ऐकली तेव्हा या नव्या साऊंडचं पर्व चालू झालंय असं नक्कीच वाटतंय. एऊट हा संगीत प्रकार गेल्या काही वर्षांत जगभर गाजणारा प्रकार आहे. जगभरातील सर्वात प्रसिद्ध संगीत प्रकार अशी याची ख्याती वाढते आहे. मेलडी आवडणाऱ्या भारतीय मनांवरही हळूहळू याची जादू पसरते आहे, असं म्हणायला हवं. कारण भारतातही हा प्रकार आता वापरला जातोय. या प्रकारात संगीताचं जवळजवळ सगळं काम डिजिटली केलं जातं. लाइव्ह म्युझिक वाजवणं हा प्रकार नसतो.
विशाल-शेखर याच जोडीची ‘मनवा लागे’ (चित्रपट – हॅपी न्यू इअर) आणि ‘ज़्‍ोहेनसीब’ (चित्रपट – हसीं तो फसीं) ही रोमँटिक गाणी बँग बँगच्या अगदी विरुद्ध प्रकारची आहेत. संगीताच्या एवढय़ा दोन टोकांचं काम तितक्याच ताकदीनं करणाऱ्या या जोडीला मनापासून सलाम!
याबरोबरच अशी काही गाणी जी तुलनेने कमी वाजवली वा ऐकली गेली, पण मला मनापासून आवडली.. ‘हायवे’मधलं सरांचं (सर.. अर्थात ए आर रेहमान) ‘सुहासाहा अम्मा का’ हे असंच एक गाणं. फारच गोड अंगाईगीत आहे हे.. आलिया भट आणि झेब (झेबुन्निसा बंगश) या गायिकांनी गायलेलं..  खरंच या गाण्याच्या गोडव्याला काही सुमारच नाही! तुम्ही ऐकलं नसेल तर नक्की ऐका. तसंच ‘टू स्टेट्स’मधलं ‘चंदनिया..’ हे गाणं. तितकंच मोहक आणि श्राव्य. मोहन कन्नन या गायकाच्या खर्जयुक्त आवाजात काही औरच जादू आहे. आणि सर्वात शेवटी फारच कमी लोकांनी ऐकलेलं असेल असं, पण मला सर्वात जास्त आवडलेलं गेल्या वर्षांतलं गाणं -‘गुलों में रंग भरे’! त्याविषयी वाचा सोबतच्या चौकटीत आणि पुढच्या आठवडय़ात पुन्हा भेटूच.. नव्या प्ले लिस्टसह.

हे  ऐकाच.. बेभान करणारी गजल
vv16‘गुलों में रंग भरे..’ ही मुळात मेहदी हसन यांनी गायलेली गजलय फैज या शायराची ही गज़्‍ाल गेल्या वर्षी रिलीज झालेल्या विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ चित्रपटासाठी वापरली गेली. अरिजीत सिंग यांनी या चित्रपटासाठी ही गजल गायली आहे. ही ओरिजिनल गज़्‍ालच मुळात बेभान करून टाकणारी आहे; त्याला मिळालेला अरिजीतचा अष्टपैलू आवाज.. कहर! आवर्जून ऐकलंच पाहिजे असं हे गाणं. जरूर ऐका.