27 January 2021

News Flash

स्मार्टफोनचा मेंदू

हल्ली दर सहा-आठ महिन्यांनी नवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांचे प्रमाण भरपूर वाढले आहे.

|| आसिफ बागवान

मोबाइलचा देखणा लुक, पुढे-मागे असलेले जास्त मेगापिक्सेलचे डय़ुअल कॅमेरे, मोठी स्क्रीन आणि परवडणारी किंमत या सर्व गोष्टी ग्राहकांना आकर्षित करत असतात. पण मोबाइलला ‘स्मार्ट’ बनवतो तो त्याचा प्रोसेसर. स्मार्टफोनचा प्रोसेसर हा त्याचा मेंदूच असतो. तो सक्षम असेल तर स्मार्टफोनच्या कार्यक्षमतेबद्दल चिंता नसते.

हल्ली दर सहा-आठ महिन्यांनी नवीन स्मार्टफोन घेणाऱ्यांचे प्रमाण भरपूर वाढले आहे. प्रत्येक वेळी नवा फोन आला की, सध्याचा फोन देऊन त्या बदल्यात आकर्षक सवलत मिळवून नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांचा उत्साह खरंच कौतुकास्पद असतो. नवा स्मार्टफोन म्हणजे नवीन तंत्रज्ञान, नवीन वैशिष्टय़े, नवीन सुविधा असा विचार करून ही खरेदीची लगबग सुरू असते. अर्थात असं करणं सर्वानाच परवडतं, असं नाही. परंतु, तरीही साधारणपणे सर्वसामान्य ग्राहकही वर्षांकाठी नवीन स्मार्टफोन घेण्याच्या प्रयत्नात असतोच. आता नवीन स्मार्टफोन खरेदी करताना काय काय पाहिलं जातं? प्रत्येकाचा प्रत्येक वेळी दृष्टिकोन सारखाच असेल असं नाही. पण काही महिन्यांपूर्वीच एका खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार नवीन स्मार्टफोन खरेदी करताना ग्राहकांचे प्राधान्य कॅमेरा, बॅटरी आणि रॅम यांना असते. जवळपास ८९ टक्के ग्राहक आणखी दर्जेदार कॅमेऱ्यासाठी स्मार्टफोन खरेदी करतात तर, ८७ टक्के ग्राहकांचा भर जास्त बॅटरी क्षमता असलेल्या मोबाइलवर असतो. जास्त मेमरी असलेल्या मोबाइलला ७९ टक्के तर जास्त स्टोअरेज असलेल्या मोबाइलला ७२ टक्के ग्राहक पसंती देतात.

चांगला कॅमेरा, जास्त बॅटरी क्षमता, जास्त स्टोअरेज ही स्मार्टफोनची महत्त्वाची वैशिष्टय़े आहेतच. परंतु, एक सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ असे आहे ज्याकडे सर्वसामान्य ग्राहकांचे नेहमीच दुर्लक्ष होते. ती गोष्ट म्हणजे स्मार्टफोनचा प्रोसेसर. स्मार्टफोनचा प्रोसेसर हा त्याचा मेंदू असतो. स्मार्टफोनवर केली जाणारी प्रत्येक क्रिया या प्रोसेसरशी निगडित असते. एखाद्या कॉम्प्युटरचा सीपीयू हा जसा त्या कॉम्प्युटरचा आत्मा असतो तसंच नातं प्रोसेसर आणि स्मार्टफोनचं असतं. स्मार्टफोनवर एखादं अ‍ॅप सुरू करण्यापासून इंटरनेटवर ब्राउजिंग करण्यापर्यंत आणि मोबाइल गेम खेळण्यापासून व्हिडीओ पाहण्यापर्यंत तुम्ही जे जे करता, ते प्रोसेसरमुळे घडत असतं.

स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर, ही एक छोटीशी चिप असते. त्याला ‘एसओसी’ अर्थात ‘सिस्टीम ऑन चिप’ असंही म्हणतात. हा प्रोसेसर दोन घटकांवर आधारलेला असतो. एक म्हणजे ‘कोअर’ आणि दुसरं ‘क्लॉक स्पीड’. मोबाइलमधील वेगवेगळ्या क्रिया पूर्ण करणारा घटक म्हणजे ‘कोअर’. तुमचा मोबाइल एकाच वेळी किती प्रक्रिया पार पाडू शकतो, हे ‘कोअर’मुळे ठरत असतं. त्यामुळे जितके जास्त ‘कोअर’ तितक्या अधिक क्षमतेने आणि वेगाने स्मार्टफोनमधील क्रिया पार पडत असतात. सध्या बाजारातील सर्वच स्मार्टफोन हे जास्त ‘कोअर’युक्त प्रोसेसर असलेले असतात. डय़ुअल कोअर म्हणजे दुहेरी कोअर असलेले, क्वाड कोअर म्हणजे चार कोअर असलेले, ऑक्टा कोअर म्हणजे आठ कोअर असलेले अशा स्वरूपात सध्या प्रोसेसर मिळत असतात.

प्रोसेसरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे ‘क्लॉक स्पीड’. ‘क्लॉक स्पीड’चा साधा सरळ अर्थ म्हणजे, प्रत्येक कोअर एखादी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती वेग घेतो, त्याचे परिमाण. हा वेग ‘गिगाहार्ट्झ’मध्ये मोजण्यात येतो. त्यामुळे जितके जास्त गिगाहार्ट्झ तितका जास्त वेग, हे लक्षात ठेवा. अलीकडे एकाच स्मार्टफोनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोअर असतात आणि त्यांचा वेगही वेगवेगळा असतो. त्यामुळे क्वचित तुम्हाला एखाद्या मोबाइलमध्ये १.२ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर आणि १.७ गिगाहार्ट्झचा क्वाड कोअर असे एकूण आठ कोअर असलेला प्रोसेसरयुक्त स्मार्टफोन पाहायला मिळू शकतो.

जितका जास्त क्षमतेचा प्रोसेसर तितकी स्मार्टफोनची किंमत वाढते. बहुतेक वेळा आपण स्वस्त दरातील स्मार्टफोन खरेदी करताना प्रोसेसरचा विचारच करत नाही. प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांवरूनही प्रोसेसरचा दर्जा आणि किंमत ठरत असते. साधं स्पष्टीकरण द्यायचं झालं तर, इंटेल या कंपनीने बनवलेले मदरबोर्ड असलेला कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप हा ‘एएमडी’ या कंपनीने बनवलेल्या मदरबोर्डयुक्त कॉम्प्युटरपेक्षा महागच असतो. तसंच स्मार्टफोनच्या प्रोसेसरचंही आहे. स्मार्टफोनचे प्रोसेसर बनवणाऱ्या कंपन्यांची संख्या मर्यादितच आहे. त्यातही क्वालकॉम आणि मीडियाटेक या कंपन्या आघाडीवर आहेत. अ‍ॅपल आणि सॅमसंग या कंपन्या स्वत:च्या स्मार्टफोनमध्ये स्वनिर्मित प्रोसेसरचा वापर करतात. पण क्वालकॉमचे प्रोसेसर हे जवळपास सर्वच नामांकित ब्रॅण्डच्या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतात. तर मीडियाटेकचे प्रोसेसर हे व्हिवो, ओप्पो यासारख्या परवडणाऱ्या किंमत श्रेणीतील स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतात.  स्मार्टफोन खरेदी करताना प्रोसेसरचा विचार करणं आवश्यक आहे. समजा तुमच्या मोबाइलमध्ये २१ मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. कॅमेरा जितका अधिक मेगापिक्सेलचा तितकी अधिक शक्ती त्याचे कार्य पूर्ण करण्यासाठी लागत असते. तुम्ही स्मार्टफोनचा जितका जास्त वापर करता, त्यावर तुम्हाला किती प्रोसेसर क्षमता असलेला स्मार्टफोन उपयुक्त ठरेल, हे अवलंबून असते. तुम्ही सर्वसामान्यपणे स्मार्टफोनचा वापर करणारे असाल तर, तुम्हाला जास्त प्रोसेसरच्या भानगडीत पडण्याची गरज नाही. म्हणजे, नेहमीचे ठरावीक अ‍ॅप्स, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, कॅमेरा असा तुमचा वापर असेल तर तुम्हाला जास्त मोठय़ा प्रोसेसरची गरजही नाही. पण तुम्ही ऑनलाइन गेम खेळणारे असाल किंवा सतत ऑनलाइन व्हिडीओ खेळणारे असाल किंवा फिफा/पब्जीसारखे उच्च ग्राफिक क्षमतेचे गेम खेळणारे असाल तर तुम्हाला जास्त प्रोसेसर असलेला मोबाइलच योग्य ठरतो. त्यामुळे यापुढे तुम्ही मोबाइल खरेदी करायचा विचार करणार असाल तर तुमच्या निकषांच्या यादीत प्रोसेसरचा मुद्दाही लक्षात ठेवाच!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2019 11:54 am

Web Title: smartphone
Next Stories
1 आदिश वैद्य
2 संधीच्या प्रकाशवाटा
3 नूडल्सच्या पलीकडे !
Just Now!
X