शेफ देवव्रत आपल्याला जगाच्या सफरीवर घेऊन चाललेत. प्रत्येक देशाची ओळख त्यांच्या ‘खाने’सुमारीतून आपल्याला होईल. युरोपीय खाद्यसंस्कृतीवर प्रभाव टाकणाऱ्या स्पेनच्या दौऱ्यावर आपण सध्या आहोत. स्पेनला निसर्गानं दिलेल्या गोष्टींचा वापर ते सढळ हस्तानं आपल्या रेसिपीजमध्ये करत असतात. स्पेनच्या खाद्योत्सवाचा हा शेवटचा टप्पा.
स्पेनची भूमी निसर्गरम्य तर आहेच. त्याचबरोबर ती सुपीकपण आहे. या उंचसखल डोंगराळ प्रदेशात टोमॅटो, ताज्या भाज्या, भात, केशराची फुलं, ऑलिव्ह या सर्व पिकांसाठी अतिशय योग्य हवामान आहे.
आपण स्पेन सफरीच्या पहिल्या भागात ‘पाईला’ (राइस डिश)ची रेसीपी बघितली होती. ही डिश मी क्रुझलाइनवर असताना ७०-८० वेळा बनवली असेल, तीपण बोटीवरच्या १८०० पाहुण्यांसाठी! निसर्गाने स्पेनला ज्या ज्या गोष्टी भेट दिलेल्या आहेत, त्या सगळ्यांचा सुंदर वापर या डिशमध्ये दिसतो. उदाहरणार्थ सीफूड, वाइन, केशर, भात इत्यादी. म्हणूनच की काय, ही जगातली पॉप्युलर स्पॅनिश डिश आहे. मला आठवतंय, किती तरी वेळा गेस्ट या डिशची रीपीट ऑर्डर द्यायचे.
आपल्याला सर्वाना माहीत आहे की, ऑलिव्ह ऑइल इतर तेलांपेक्षा कुकिंगसाठी किती तरी चांगलं आहे. जगातलं ४४ टक्के ऑलिव्ह ऑइल स्पेनमध्ये बनतं. माझा एक स्पॅनिश मित्र, आम्ही जेवायला बसलो की, त्याचं स्पेशल घरून आणलेलं ऑलिव्ह ऑइल सॅलडवर घालायचा आणि अभिमानाने आम्हालाही द्यायचा. ते खरं तर खूप छान असायचं, पण मी मनात म्हणायचो, ‘‘बेटय़ा, एकदा तुला मी आमच्याकडील, लसूण- शेंगदाण्याची चटणी आणि त्यावर कच्च्या शेंगदाण्याचं तेल खाऊ घालतो, मग बघू कोणाची टेस्ट भारी लागते.’’
आणखी एक गोष्ट – स्पेनचे केशर हे सर्वोत्कृष्ट मानलं जातं. इथल्या केशराच्या कांडय़ा लांब आणि उत्तम स्वादाच्या असतात. जगभरात स्पेनचं केशर एक्सपोर्ट केलं जातं. अशा या स्वादपूर्ण स्पॅनिश खाद्ययात्रेत आणखी काही रेसीपीज आता आपण बघू या. उन्हाळ्याच्या गरमीमध्ये थंडावा आणणारे स्पॅनिश गॅजस्पॅचो सूप आणि स्पॅनिश व्हॅनिला कस्टर्ड या दोन या रेसीपीज आज आपण बनवणार आहोत.
http://www.devwratjategaonkar.com 

स्पॅनिश व्हॅनिला कस्टर्ड विथ कॅरेमल सॉस
साहित्य : साखर – अर्धा कप (कॅरामलसाठी), व्हिप्पिंग क्रीम – २ कप, व्हॅनिला इसेन्स – १ टीस्पून, अंडी – ३, साखर – पाव कप, पुदिना पाने – ४-५.

कृती : चार ते पाच कप पाणी गरम करून घ्या. पॅन गरम करून त्यात साखर वितळवून घ्या, त्याला सतत चमच्याने तांबूस रंग येईपर्यंत परता. त्याचे कॅरेमल तयार होईल. मग कॅरेमल बाऊलमध्ये काढून घ्या. पॅनमध्ये क्रीम घालून मंद आचेवर गरम करून घ्या आणि गॅस बंद करा.
एका बाऊलमध्ये अंडी आणि साखर एकजीव करा आणि त्यात गरम केलेले क्रीम टाका. एकजीव करून घ्या. तयार मिश्रण कॅरेमलच्या बाऊलमध्ये चमच्याने टाका. ओव्हन १६३ अंशावर गरम करून घ्या. कॅरेमलचे बाऊल एका ट्रेमध्ये ठेवा आणि गरम केलेले पाणी ट्रेमध्ये टाका. ट्रेला ओव्हनमध्ये ठेवून ५०-६० मिनिटे बेक करा. बेक झाल्यावर ट्रे ओव्हनमधून काढून थंड करण्यासाठी तासभर फ्रिजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर ते सवर्ि्हग डिशमध्ये पुदिन्याच्या पानाने सजवून सव्‍‌र्ह करा.

चिल्ड स्पॅनिश गॅजस्पॅचो सूप
साहित्य : लाल टोमॅटो – ४-५, चिरलेली काकडी – १, चिरलेला पातीचा कांदा – १, लसूण पाकळ्या – २-३ (ठेचलेल्या), लाल/हिरवी सिमला मिरची चिरलेली- अर्धी, बेसील पानं (चिरलेली) – ७-८, ऑलिव्ह ऑइल – २-३ टी स्पून, मीठ- १ चिमूट, काळी मिरीपूड – १ चिमूट.
सजावटीसाठी साहित्य: लाल/हिरवी सिमला मिरची, चिरलेली काकडी, चिरलेला पातीचा कांदा, टोबॉस्को सॉस, पार्सली चिरलेली, किसलेला बर्फ, मीठ आणि काळी मिरी पूड, लहान ब्रेडचे तुकडे.

कृती: टोमॅटो गरम पाण्यातून काढून घ्यावे आणि त्याची साले आणि बिया काढून घ्यावी. मग टोमॅटोचे बारीक तुकडे करून घ्यावे. मग सर्व साहित्य एका बाऊलमध्ये टाकून त्याची प्युरी करून घ्या आणि त्यात थंड पाणी टाकून त्याला फ्रिजमध्ये ठेवा. सूप बाऊलमध्ये काढून सजावटीचे साहित्य त्यावर टाकून आणि किसलेला बर्फ टाकून सूप थंड सव्‍‌र्ह करा.

आजची सजावट
हॉटेलमध्ये असतं तसं सॅलड कावर्ि्हग आपल्यालाही करता आलं तर.. असं नेहमी वाटतं. ते वाटतं तितकं अवघड मुळीच नाहीय. हा कोपरा खास त्यासाठीच..
सफरचंदाचे गारनिशिंग
चित्रात दाखवल्याप्रमाणे सफरचंदावर वेगवेगळ्या शेपचे कट मारून वेगवेगळ्या डिझाइन्स करून त्यावर िलबाचा रस टाकून गारनिशिंग करा.