|| वैशाली शडांगुळे

नुकताच जगातील नामांकित ‘ऑस्कर’ चित्रपट पुरस्कार सोहळा झाला. त्याआधी ‘गोल्डन ग्लोब’, ‘बाफता’ असे नामांकित आणि प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळे संपन्न झाले. या सोहळ्यांमुळे रेड कार्पेट फॅशन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. चौकटीबाहेर जाऊन फॅशन स्टॅण्ड आऊट करण्याची आणि लोकप्रियतेची गणितं या वेळीही डिझायनर्स आणि सेलेब्रिटींनी आखली होती. यानिमित्ताने रेड कार्पेटवरची फॅशन नक्की कशी ग्लोबल होते? मीडिया, जगभरातील क्रिटिक्स, सामान्य जनता आणि बॉलीवूडदेखील कशा प्रकारे रेड कार्पेटवरील फॅशनकडे लक्ष ठेवून असतात याचा अंदाज या लेखातून घेऊ या..

आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळे आणि त्या सोहळ्यात सुरुवातीलाच होणारा रेड कार्पेट म्हणजे आकर्षणाचा भाग. नुकताच जगातील नामांकित ‘ऑस्कर’ चित्रपट पुरस्कार सोहळा झाला. त्यामुळे रेड कार्पेटवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील उच्चभ्रू कलाकारांनी आपल्यापरीने फॅशनविश्वात भर टाकायला सुरुवात केली आहे. आपले विचार आणि त्याभोवतीच्या एकूणच जगण्याची दृष्टी कलाकारांनी आपल्या पोशाखातून जगासमोर आणली. जगाच्या कानाकोपऱ्यातून फॅशन एका रेड कार्पेटवर येते आणि संपूर्ण जग एकाच वेळी त्यांना पाहत असतं, त्यांच्या आऊटफिटविषयी चर्चा करत असतं, कोडकौतुकही करत असतं आणि टीकाटिप्पणीही करत असतं. रूढ चौकट मोडण्याचे आपले प्रयत्न आपल्या कपडय़ांतून लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्याला फॅशन म्हणून स्वीकारले जाईल, हा विश्वास लोकांमध्ये वाढत चालला आहे. त्याअर्थाने रेड कार्पेटवरची फॅशन दिवसेंदिवस सक्रिय होतेय.

जगभरातील निमंत्रित मंडळी आपल्या परीने वेगवेगळी कधी अगदी सर्वसामान्य तर कधी जगावेगळीच फॅशन करतात. रेड कार्पेटवर येणं हा एक सोशल इव्हेंट आहे अशा इव्हेंट्ससाठी एक विशेष थीम असते, ज्यातून आपल्या कल्पकतेतून त्या थीमला साजेसे आऊटफिट बनवण्याची जबाबदारी सेलेब्रिटींच्या डिझायनरची असते. प्रत्येक वेळी थीम असतेच असं नाही. कधी थीम असते तर कधी थीमच नसते, पण या मंचावर सेलेब्रिटी आपल्या आवडीनिवडीप्रमाणे स्वतंत्र रेड कार्पेट ड्रेसेस परिधान करून येऊ  शकतात. थीम फॉलो न करता आपले ड्रेसेस निवडण्याची मुभाही त्यांना असते. एक तर थीम नसल्यास वैयक्तिक पातळीवर फॅशन करणं हा मोठा भाग असतो. त्यामुळेच एक वेगळा अनुभव, अभ्यास आणि मेहनत कलाकारांच्या पोशाखातून जगासमोर येणं हाही तितकाच महत्त्वाचा भाग. या प्रक्रियेतून तसे ड्रेसेस स्पेशली बडय़ा डिझायनर्सकडून तयार केले जातात. यात डिझायनर आऊटफिट्सपासून कॅज्युअल ड्रेसिंग, फॉर्मल ड्रेसिंग, ओव्हरसाइज्ड ड्रेसिंगपर्यंत वेगवेगळे आऊ टफिट्स घालणं सेलेब्रिटी पसंत करतात.

या सोहळ्यातून समोर येणाऱ्या सेलेब्रिटींच्या फॅ शनचे परीक्षण करून त्यांनाबेस्ट ड्रेस्ड आणि वर्स्ट ड्रेस्ड अशी टायटल्स दिली जातात. जेव्हा रेड कार्पेटवरची फॅशन ही प्रयोग या अर्थाने पाहिली जाते तेव्हा आपण केलेली फॅशन चाहत्यांमध्ये लोकप्रिय व्हावी, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, असं साहजिकपणे कलाकारांना वाटतं. पण रेड कार्पेटवरच्या अशा एका ड्रेसमागे डिझायनर आणि सेलेब्रिटी यांचं नातं, त्यांचे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात. मुळात, रेड कार्पेटवर सेलेब्रिटी येतात तेव्हाच ती फॅशनही ‘स्टॅण्ड आऊट’ या अर्थाने जगासमोर येते. त्यामुळे आपली फॅशन लोकप्रिय व्हावी या सकारात्मक विचारानेच कलाकार ते परिधान करतात. अर्थात, स्वत:ला लोकप्रियता मिळावी म्हणून तसे प्रयत्न होणं हा सत्तर टक्के त्या शोचा भाग असतोच. हा इव्हेंट जगभरात महत्त्वाचा असल्याने जाणीवपूर्वक एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जगभरातील डिझायनर्स, आपल्याकडील डिझायनर्स आणि बॉलीवूड सेलेब्रिटी रेड कार्पेटवरील फॅशनचा अवलंब करत असतात. मोठय़ा डिझायनर्सचे तर डोळ्यांत तेल घालून रेड कार्पेटवरील फॅशनकडे लक्ष असते. आपली फॅ शन मोठय़ा डिझायनर्स, तज्ज्ञ, क्रिटिक्सचा, रिसर्चर यांच्याकडून पाहिली जातेय, अभ्यासली जातेय हे सेलेब्रिटींनाही माहिती असतं.  त्यांच्या आऊटफिटचा, व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यावर मोठे लेखक लिहितात, त्यामुळे आपला ‘प्रेझेन्स’ किती महत्त्वाचा आहे याची सेलेब्रिटींना व्यवस्थित कल्पना असते.

कोणतीही फॅशन जेव्हा समाजमाध्यमातून मोठय़ा नावलौकिक असलेल्या सोहळ्यातून येते तेव्हा ती फॅशन ट्रेण्डमध्ये यायला काही सेकंदही पुरतात. सामान्य माणसांच्या नजरेतून मग तो एक ट्रेण्ड बनतो की अमुक एका अभिनेत्री किंवा अभिनेत्याने काय घातलं होतं? कोणते फॅब्रिक्स होते?, यावर चर्चा करून लोक ते फॉलो करतात. रेड कार्पेटवर येणाऱ्या सेलेब्रिटींमध्ये आऊटफिट्स आणि ड्रेसेस बाबतीत स्पर्धा असतेच, त्यामुळे डिझायनर्सवर ही आणखी एक विशेष जबाबदारी असते की कुठल्या अभिनेत्रीचा ड्रेस रेड कार्पेटवर दुसऱ्या अभिनेत्रीच्या ड्रेससारखा दिसता कामा नये. पण असाही एक मुद्दा येतो की सेलेब्रिटी परत तेच ड्रेसेस पुन्हा परिधान करून रेड कार्पेटवर येतात. तेव्हा टीकाही होऊ शकते किंवा सेलेब्रिटीने रिपीट केला आहे याचा अर्थ तो ट्रेण्डमध्ये येईल, असाही विचार केला जातो. रेड कार्पेटवर अवतरलेले आतापर्यंतचे ड्रेसेस हे खूप मेहनतीने साकारले आहेत आणि ज्या पद्धतीच्या स्टाइल्स आत्तापर्यंत वापरल्या आहेत ते पाहता नवं काही करण्याचं धाडस डिझायनर्स सातत्याने करतात हेच दिसून आलं आहे. अभिनेत्रींच्या ड्रेसेसवर प्रामुख्याने जास्त काम होताना दिसते. आज डिझायनर्स ड्रेस नव्या पद्धतीने, नव्या फॅब्रिकचा वापर करत, नव्या डिझाइनने तयार करतात तेव्हा त्या ड्रेसची किमया त्या वर्षीही जाणवतेच. पण तो पुढच्या वर्षी रिपीट झाला तरी त्याचा ट्रेण्ड कायम राहिला आहे इतक्या चांगल्या पद्धतीने त्याकडे पाहिलं जातं. सेलेब्रिटीही त्याच पद्धतीने विचार करताना दिसतात. इतक्या मोठय़ा मंचावरून प्रकट होणारी कला जी पोशाखातून जगासमोर येते ती कुठल्या तरी संग्रहालयात किंवा छायाचित्रांमध्ये बंद राहण्यापेक्षा जिवंत राहिली पाहिजे तरच त्याचे मूल्य रेड कार्पेटवरून अधिकच वाढेल, असा विचार सेलेब्रिटी आणि डिझायनर्स करतात. त्यामुळे स्वत:चा ड्रेस रिपीट न करता एकमेकांचे ड्रेस घालून तो ट्रेण्ड म्हणून कायम ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होताना दिसतो.

आता हॉलीवूड आणि बॉलीवूड काही वेगळं राहिलेलं नाही. आपल्याकडील सेलेब्रिटी हॉलीवूड पुरस्कार सोहळ्यात ग्रेसफुली वावरतात, आपल्याच नाही तर इतर कोणत्याही देशातील सेलेब्रिटी ग्लोबल प्लॅटफॉर्मवर सहज आणि सुंदरपणे त्यांनी परिधान केलेले ड्रेसेस ग्रेसफुली मिरवतात. असे पुरस्कार सोहळे हे ग्लोबल व्यासपीठ असल्यानेच त्या पद्धतीने देशोदेशीचे डिझायनर्स आपले ड्रेस डिझाइन करतात. एखादा सेलेब्रिटी आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतो तेव्हा आपल्या देशातीलच फॅशन ग्लोबल प्लॅटफॉर्मवर आणली पाहिजे, असा त्याचा हट्ट नसतो. आपण दुसऱ्या देशात जातो तेव्हा आपण त्या देशाच्या फॅशनशी एकरूप होतो. नाही म्हटलं तरी यातून एक गोष्ट लक्षात येते की सेलेब्रिटी कोणती ग्लोबल फॅशन कशा पद्धतीने कॅरी करतात, याचा सर्वसामान्यांवर जास्त प्रभाव पडतो. परदेशातील मंडळी जेव्हा मुख्यत्वे भारतात येतात तेव्हा ते त्यांच्या देशातीलच फॅशनला प्राधान्य देतात. मुळात आपण एकमेकांच्या फॅ शनची देवाणघेवाण करतो.

एक भाग इथे असा आहे की जसं रॉयल वेडिंग्ज होतात तेव्हा आपण त्यांचे रॉयल आऊटफिट्स घातले तर ते आपल्या भारतात फॉलो होतील, पण तिथेच जर आपण रॉयल साडी किंवा भारतीय राजेशाही साडी नेसली तर ती साडी बाहेर म्हणजे परदेशात जास्त फॉलो होईल. मुळात ती जगभरात प्रसिद्ध होईल, कारण भारतात त्याचे कौतुक होताना अख्ख्या जगात ती फॅशन ‘स्टॅण्ड आऊट’ होईल. त्यामुळे आपल्या देशातील फॅशन ग्लोबली स्टॅण्ड आऊट म्हणजेच फॉलो व्हावी अशी इच्छा असेल तर रेड कार्पेटवर आपल्या देशातील फॅ शनच सादर व्हायला हवी हे लक्षात घेतले पाहिजे. तिथे परदेशी फॅशनचा विचार करून चालणार नाही. भारतीय डिझायनर्सवर वेस्टर्न फॅशनचा खूप प्रभाव आहे म्हणूनच ग्लोबली वेस्टर्न फॅशनच भारतीय सेलेब्रिटीही घालतात. आता मात्र हे चित्र बदलायला हवं. रेड कार्पेटवरून भारतीय डिझायनर्स आणि सेलेब्रिटी यांनी भारतीय फॅशनच प्रमोट करण्याची वेळ आली आहे. तरच भारतीय फॅशन अधिकाधिक ग्लोबल होईल!

शब्दांकन : गायत्री हसबनीस

viva@expressindia.com