टॅटू ही काही आपल्यासाठी बाहेरून आलेली फॅशन नाही. भारतात गोंदवून घेणं नवं नाही. पण गोंदून घेण्याचं टॅटू होतं, तेव्हा ते फॅशन स्टेटमेंट बनतं. लोकांना जेव्हा आपल्या भावना व्यक्त करायच्या असतात तेव्हा ते आपल्या भावना लिखाणातून किंवा बोलून व्यक्त करतात. पण हल्ली टॅटू हेही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा दाखला देणारं, भावना व्यक्त करणारं माध्यम झालंय. केवळ हातावरच नाही तर मानेवर, दंडावर, कमरेवर, पायावर अक्षरश: अंगभर रंगीबेरंगी टॅटू गोंदवून घ्यायची फॅशन आली आहे. परदेशापेक्षा ही क्रेझ आपल्याकडे अजून कमीच असली तरीही अनेक तरुण ‘कूल डूड’ दिसण्यासाठी आणि मुली ‘मॉड’, ‘फॅब’ दिसण्यासाठी टॅटू करून घेतात.
आत्ताचे बरेच तरुण कू ल दिसण्यासाठी मानेवर सूर्य काढून घेतात. कोणी अँकलवर टॅटू काढून घेतलेले आपण पाहतो. वयस्कर मंडळी टॅटू काढला की ‘कशाला ते अंग रंगवायचं कारण नसताना’ असं म्हणत असली तरी तरुणाईमध्ये टॅटू काढणारा ‘हेप’ असल्याचं मानलं जातं. पण हे टॅटू काढल्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी आणि त्याचे प्रकार कोणते हे जाणून घेण्यासाठी व्हिवानं टॅटू एक्सपर्ट शशिकांत शेलार यांचाशी संवाद साधला.
शशिकांत यांच्या मते टॅटू हा नेहमी आपल्या लाइफ स्टोरीशी रिलेटेड असावा. तुमच्या आयुष्यात काही घडलं असेल तर त्याचं प्रतिबिंब टॅटू डिझाइनमधून उमटावं.. तुमचं प्रेम, छंद, आवड त्यातून दिसावं अशी अपेक्षा असते. कुणी गिटारप्रेमी त्यासाठी शरीरावर गिटार कोरून घेतो, तर कुणी आपल्या प्रेयसीचं नाव. टॅटू फक्त फॅशन म्हणून नसावा. याचं कारण असं की, एखादा सिम्बॉल आपल्याला आज आवडला आणि त्याची फॅशन उद्या निघून गेली तर आपल्याला आउटडेटेड वाटायला लागेल. कारण टॅटू हा पर्मनंट असतो. टॅटूमधे रंगांनुसार दोन प्रकार आहेत ते म्हणजे ब्लॅक अँड ग्रे आणि कलर्ड. मग या दोन मुख्य प्रकारात बरेच प्रकार येतात. पण सध्या जास्त डिमांड असणारे काही ठरावीकच प्रकार आहेत. टॅटूचा रंग हा तुमच्या वर्णावरतीही अवलंबून असतो हे विसरू नका. तुम्ही सावळे असाल तर ब्लॅक अँड ग्रे टॅटूच शरीरावर काढा आणि जर तुमचा वर्ण गोरा असेल तर कुठलाही रंग उठून दिसेल. मल्टिकलर टॅटू तुम्ही शरीरावर काढू शकता. टॅटू खराब झाला तर त्यावर रि-टचअप करता येतं. तसंच छोटय़ा डिझाइनचं मोठं डिझाइनही नंतर करता येऊ शकतं. बेसिक टॅटू डिझाइनच्या किमती ५०० ते ७०० रुपये प्रत्येक चौरस इंचाला यापासून सुरू होतात. परमनंट टॅटू नकोसा झाला तर काढून टाकणं तसं सोपं नाही. त्यासाठी लेजर ट्रीटमेंट किंवा प्लॅस्टिक सर्जरी या महागडय़ा ट्रीटमेंट घ्याव्या लागतात.

टॅटू डिझाइनचे काही प्रमुख प्रकार आपल्याकडे प्रचलित आहेत.

नेम टॅटू डिझाइन-  या टॅटू प्रकारात आपल्या आवडत्या व्यक्तींची नावं शरीरावर कोरली जातात, आपल्या भावना त्यांच्यापर्यंत टॅटूच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी. पण हा टॅटू शरीरावर कोरण्यापूर्वी ज्या व्यक्तीचं नाव कोराल त्याला ही गोष्टी आवडते की नाही ह्य़ाची खात्री करून घ्यायला विसरू नका.
ईगल टॅटू डिझाइन- टॅटू लवर्सचं हे डिझाइन सगळ्यात आवडतं डिझाइन आहे, कारण गरुड या पक्ष्याला ‘किंग ऑफ बर्ड’ असं म्हणतात. या टॅटू प्रकोरात आपण नुसता ईगल किंवा दुसरं डिझाइन एलिमेंट (ईगल विथ नाइफ, नक्षी) वापरून नवीन युनिक स्टाइलचा टॅटू आपण बनवू शकतो.
बटरफ्लाय डिझाइन- बटरफ्लाय टॅटू ग्रेस आणि ब्युटी यांचं प्रतीक दर्शवतो. या डिझाइनमध्ये फुलपाखरांचे पंख वेगवेगळे रंग वापरून आणि वेगवेगळे पॅटर्न वापरून काढले जातात. त्यामुळे हा टॅटू शरीरावर उठून दिसतो.
स्पायडर टॅटू-  हा टॅटू काढणं सहज शक्य आहे. पण हा टॅटू काढून घेताना विश्वासातला माणूस शोधा. या डिझाइन प्रकारात जर तुमच्या डोक्यात एखादी डिझाइन फिक्स असेल तर ठीक आहे. नाहीतर जर तुम्ही क न्फ्यूज असाल तर टॅटू आर्टिस्ट तुमच्यासाठी युनिक डिझाइन बनवू शकतो हे विसरू नका.
                          
टॅटू काढल्यानंतर कुठची काळजी घ्याल?
* टॅटू काढल्यानंतर २४ तासांनी बँडेज काढा आणि मग त्यावर ऑइनमेंट लावा.
* दिवसातून ३ ते ४ वेळा न चुकता टॅटू काढलेल्या भागाची वारंवार साध्या साबणाने आणि पाण्याने धुवून स्वच्छता करा, पण ते कुठल्याही टॉवेलने न पुसता वाऱ्यावर असेच वाळवा.
* दिवसातून अनेक वेळा माइल्ड मॉइश्चराइज लावा.
* टॅटू काढलेल्या भागावर थेट सूर्यप्रकाश पडू देऊ नका.
* टॅटूवर चिकटतील असे कपडे घालू नका.
* टॅटूच्या ठिकाणी झालेली जखम दोन आठवडे सुकू द्या.