तेजश्री गायकवाड

आजूबाजूला जे सुरू आहे, ज्या नवीन गोष्टी येत आहेत त्या स्वीकारायच्या, आत्मसात करायच्या आणि त्याप्रमाणे बदलायचा प्रयत्न करायचा या प्रक्रि येतून प्रत्येक जण जात असतो. बदल ही काळाची गरज आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये बदल हा होतच असतो. सतत बदलती फॅशन इंडस्ट्री बदलांना नाही कसं म्हणेल?सध्या ज्या वेगाने लाइफस्टाइल बदलते आहे त्याचे पडसाद त्याच वेगाने फॅशनमध्येही उमटत असल्याने गेल्या वर्षभरात या इंडस्ट्रीने अक्षरश: कात टाकली आहे. प्रयोगशीलता हा तर फॅशनचा आत्मा आहेच, त्यामुळे सतत नव्या गोष्टी इथे येतातच, मात्र सध्या त्या तंत्राचा हात हातात घेऊन रॅम्पवर उतरतायेत..

आजची पिढी किती टेक्नोसॅवी आहे हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सध्याच्या काळात डिजिटली सादर होणारी प्रत्येक गोष्ट तरुण पिढीला आवडते, पटकन माहिती होते. म्हणूनच अशा पद्धतीने डिजिटली सादरीकरणाचे प्रयोग अनेक फॅशन शोमध्ये होताना दिसत आहेत. फॅशन उद्योगाचे हे टेक्नोसॅवी (तंत्रस्नेही) रूप सध्या डिझाइनर्सपासून ग्राहकांना आकर्षित करते आहे.फॅशनला टेक्नॉलॉजीचा झालेला परीसस्पर्श गेल्या वर्षी पहिल्यांदा पाहायला मिळाला तो रॅम्पवर..त्यामुळे आता या वर्षी फॅशनचे हे टेक्नोसॅवी रूप आणखीनच बहरत जाणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘मिलान फॅशनवीक’मध्ये रॅम्प वॉक करणाऱ्या मॉडेल्सने अगदी नवीन अवतार घेतला होता. एरव्ही रॅम्पवर कलेक्शन अंगावर लेवून टेचात मिरवणाऱ्या ललना दिसतात. यावेळी मात्र ‘डॉल्जेन’ आणि ‘गबाना’ या डिझायनर हॅण्डबॅगचं कलेक्शन घेऊन रॅम्पवर चक्क ड्रोनने हजेरी लावली. डिझायनरने आपलं कलेक्शन सादर करण्यासाठी टेक्नोलॉजीचा उत्तम वापर करत लोकांना आश्चर्यचकित केले. असाच प्रकार पहिल्यांदाच झालेल्या ‘सिलिकॉन फॅशनवीक’मध्येसुद्धा बघायला मिळाला. या फॅशनवीकमध्ये अ‍ॅक्सेसरीज नाहीत तर चक्क कपडेसुद्धा ड्रोनच्या साहाय्यानेच रॅम्पवरती अवतरले. बारीक, छान कॅटवॉक करणाऱ्या मॉडेल्सला उत्तम रिप्लेसमेंट म्हणून ड्रोन, रोबोट असू शकतात, अशी कल्पना इतर कुणी केली नसली तरी फॅशन शोच्या निर्मात्यांनी मात्र कल्पनाच केली नाही तर ती प्रत्यक्षातही आणली. बाकी इंडस्ट्रीमध्ये अनेक कामांसाठी आता रोबोट किंवा डिजिटल प्रणालीचा वापर होतोय. आता हाच वापर फॅशन इंडस्ट्रीपासून लांब राहिलेला नाही असं निश्चितपणे म्हणता येईल. निव्वळ ग्लोबल स्तरावरच असे डिजिटल प्रयोग झाले आहेत असंही नाही. तर भारतातील सगळ्यात गाजलेल्या आणि मोठय़ा फॅशन शोमध्येही डिजिटल प्रयोगांचा पगडा जाणवला. एखाद्या फॅशनवीकमध्ये टेक्नोलॉजीचा जास्तीत जास्त वापर साऊंड सिस्टीम आणि लाईट्सपर्यंतच केला जातो, हे आजवरचं चित्र होतं. पण नुकत्याच पार पडलेल्या ‘लॅक्मे फॅशनवीक विंटर फेस्टीव्ह’ या सीझनमध्येही फॅशन आणि टेक्नोलॉजीचा उत्तम मेळ बघायला मिळाला.

कुठल्याही फॅशनवीकमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अर्थातच त्यांचा रॅम्प.  पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या रॅम्पची जागा यंदा स्क्रीन रॅम्पने घेतली होती. प्रत्येक शोनुसार त्या डिजिटल रॅम्पचे रंग, डिझाइन यात बदल केला जात होता. फॅशनडिझायनरच्या कलेक्शनला, त्यामागच्या इन्स्पिरेशनला योग्य अशा रॅम्पमुळे वेगळाच उठाव येत होता. अर्थात त्यामुळे कलेक्शन आणि त्यामागची डिझायनरची कॉन्सेप्ट लोकांना समजायला सोपी जात होती. डिजिटल रॅम्पच्या सुरवातीला म्हणजेच बॅकड्रॉपलाही यंदा टेक्नोलॉजीचा साज चढवण्यात आला होता. अनेक फॅशनवीकमध्ये पाठच्या बॅकड्रॉपवर निव्वळ डिझायनरचं नाव, कलेक्शनचं नाव एवढंच असतं, परंतु यंदा त्या जागेचाही वापर उत्तम प्रेझेन्टेशनसाठी करण्यात आला होता. डिझायनर नेहमीच त्यांच्या कलेक्शनमधून काही ना काही गोष्ट सांगायचा प्रयत्न करत असतो. हेच प्रयत्न यंदा त्या डिजिटल बॅकड्रॉपमुळे सोपे झाले होते. एखाद्या कलेक्शनमागची कथा आधी त्यावर दिसत होती, नंतर कलेक्शन सादर होत होतं. त्यामुळे लोकांना त्या कलेक्शनमागची मेहनत सहज लक्षात येत होती. कथाकथनाचा आपल्यावर असलेला प्रभाव लक्षात घेऊन केलेला हा स्क्रीन प्रयोग भलताच यशस्वी ठरला आहे. केवळ कलेक्शनची माहिती देण्यापुरता मर्यादित न ठेवता डिझायनरचे कलेक्शन सादर करण्याकरताही या डिजिटल बॅकड्रॉपचा हटके पद्धतीने वापर करण्यात आला होता. डिजिटल रॅम्प आणि डिजिटल बॅकड्रॉपप्रमाणे अजून एक आगळा वेगळा प्रयोग पहिल्यांदाच फॅशनवीकमध्ये करण्यात आला. तो म्हणजे एका शोसाठी मोठा होलोग्राम तयार करण्यात आला होता. होलोग्राम असल्यामुळे तुम्ही कोणत्याही बाजूने सादर होणारं कलेक्शन सहज बघू शकता. होलोग्रामवरही कथारुपातच कलेक्शन आणि त्यामागची प्रेरणा रंगवण्यात आली.  रॅम्प, त्यावर रॅम्पवॉक करणारे मॉडेल, साउंड आणि प्रेझेन्टेशनसाठी तयार केलेलं डेकोरेशन हे सगळंच एकत्रितरीत्या त्या होलोग्रामवर डिजिटली सादर झालं.

या डिजिटल प्रयोगाबरोबरच भारतात कपडय़ामध्येही वेगवेगळे प्रयोग केले गेलेले पाहायला मिळाले. याबद्दल ‘प्रतिपदा’ या ब्रॅण्डचा ओनर आणि डिझायनर अथर्व चव्हाण सांगतो, गेलं वर्षभर जुनं ते सोनं म्हणत डिझायनरने कपडय़ांवर प्रयोग केलेत असं म्हणायला हरकत नाही. वर्षभर खण, इकत, लिनन अशा जुन्याच फॅ ब्रिक्सची चलती होती. कपडे, बॅग, ज्वेलरीपासून ते अगदी चपलांपर्यंत या कपडय़ांनी बाजी मारली होती. पारंपरिक पण रिच लूक असणाऱ्या या फॅ ब्रिक्सचे वेस्टर्न ड्रेस आणि ट्रॅडिशनल ड्रेस असे दोन्ही प्रकार गाजले. आणि हेच फॅ ब्रिक या वर्षीही ट्रेण्डमध्ये असतील, असं वाटत असल्याचं अथर्वने सांगितलं. साधी प्लेन लिननची साडी आणि त्यावर इकतचा ब्लाउज हा लूक अगदी तरुण मुलींनाही प्रचंड आवडला. मुलांच्या फॅशनमध्येही या फॅ ब्रिक्सनीजागा घेतली आहे. खणाची बॉर्डर असलेले कुर्ते मुलांनी मिरवले, तर प्लेन कॉटन, लिननचे कुर्ते आणि त्यावर छानसा प्रिंटेड स्टोल असा लूकही गाजला. एकंदरीत आपल्याकडे असलेली कपडय़ांतील विविधता निरखून, अभ्यास करून त्यावर डिझायनर्स नवनवीन प्रयोग करत आहेत. २०१९ साली याची सुरुवात झाली होती हे लक्षात घेतलं तर यावर्षी त्यात आणखी नवनवे प्रयोग होतील, असा विश्वास अथर्वने व्यक्त केला. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांच्या ‘तेजाज्ञा’ या फॅशनब्रॅण्ड मध्येही अनेक प्रयोग केलेले दिसले. त्यांच्या ‘दागिना कलेक्शन’ने फेस्टीव्ह सीझनमध्ये धुमाकू ळ घातला. साडीच्या ब्लाऊजवरच दागिन्यांचं भरतकाम त्यांनी केलं होतं. त्यामुळे तुम्ही साडी नेसली की त्यावर दुसरा कोणताही वेगळा नेकपीस घालायची गरज उरली नाही. ‘तेजाज्ञा’च्या कलेक् शनमध्येही खण या कापडाचा वापर ज्वेलरी, बॅग, साडी, वेस्टर्न ड्रेस यात केलेला दिसून आला. कपडय़ाप्रमाणेच सिल्वर ज्वेलरीचाही गेल्या वर्षी बोलबाला होता आणि हा ट्रेण्ड यंदाही चालूच राहणार आहे. सिल्वर आर्टिफिशल ज्वेलरी आणि ओरिजिनल चांदीची ज्वेलरी अशा दोन्हींमध्ये प्रयोग बघायला मिळाले. चोकर, लॉँग नेकपीस यंदा ट्रेण्डमध्ये होते. नथ हा प्रकार यंदा गाजला, कारण ट्रॅडिशनल नथ डिझाइनला ट्विस्ट देऊन हटके कलेक्शन्स अनेक ब्रॅण्ड्सनी बाजारात आणली होती. यात बारीक नथ, पेशवाई नथ, सिल्वर नथ जास्त ट्रेण्डमध्ये होत्या.

एकंदरीतच पाहायला गेलं तर रॅम्पपासून प्रत्यक्ष क लेक्शन, अ‍ॅक्सेसरीज सगळ्यावरच झालेला तंत्रज्ञानाचा परिणाम फॅशन विश्वच बदलून टाकणारा ठरला आहे. फॅशन इंडस्ट्रीचीही तंत्राशी झालेली मैत्री येत्या काळात आणखी काही नवे क्रिएटिव्ह प्रयोगरंग दाखवत राहील यात शंका नाही!