विपाली पदे

प्रेम! एक अतिशय विलक्षण, जगावेगळी भावना. फेब्रुवारी महिना सुरू झाला की लगेचच व्हॅलेंटाइन डेचे वेध लागतात आणि मग नवथर वयातल्या, नुकत्याच प्रेमात पडलेल्या आणि प्रेमात आकंठ बुडालेल्या जोडप्यांचं १४ तारखेला काय करायचं?, याचं प्लॅनिंग सुरू होतं. खरं तर प्रेम हाच मुळात एक आनंदोत्सव. वर्षभर अगदी ३६५ दिवस साजरा करावा असा. त्यामुळे त्याला एका दिवसात बांधून ठेवणं म्हणजे त्या प्रेमावरच अन्याय केल्यासारखा वाटतो. पण तरीही, दरवर्षी नवनवीन प्रेमात पडलेली जोडपी सामावून घेत हा प्रेमाचा उत्सव उत्साहात साजरा होतो.

lara dutta on trolling
‘म्हातारी’ अन् ‘जाड’ म्हणणाऱ्यांना लारा दत्ताने सुनावलं; म्हणाली, “या सर्व गोष्टींमुळे माझ्या…”
Poetess Pradnya Daya Pawar reaction on Chinmay Mandlekar Getting Trolled For His Son Name Jehangir
“फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही,” चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगबाबत प्रसिद्ध कवयित्रीची पोस्ट; म्हणाल्या, “काळ…”
pushkar shrotri reacts on chinmay mandlekar trolling incident
“मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून…”, चिन्मय मांडलेकर ट्रोलिंग प्रकरणावर पुष्कर श्रोत्रीचं स्पष्ट मत; म्हणाला, “इतिहास चाचपडून बघा”
How Sugar Can Harm Liver
तुम्ही खाल्लेली साखर, फळे, हवाबंद पदार्थ यकृतावर कसा परिणाम करतात? डॉक्टरांनी सांगितलं, ‘साखरेच्या कराचं’ महत्त्व

कोवळ्या वयातलं नवथर प्रेम ही खरं तर शब्दात न मांडता येणारी भावना. पण याच भावनेचं एक वेगळंच रूप लेखक जॉन ग्रीन ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या पुस्तकातून आपल्याला दाखवून जातो. आणि हे पुस्तक वाचता वाचता आपण आपल्याही नकळत त्या प्रेमभावेनेच्या प्रेमात पडत जातो. या पुस्तकाचं नाव पाहिलं, तर साहित्याच्या अस्सल दर्दी रसिकांना थेट शेक्सपिअर आठवेल. कारण त्याच्या ‘ज्युलियस सीझर’ या अजरामर कलाकृतीमध्ये कॅसियस हा ब्रूटस ला म्हणतो, ‘द फॉल्ट इज नॉट इन अवर स्टार्स, बट इन अवरसेल्वज!’

या पुस्तकाचं कथानक हे त्याची षोड्शवर्षीय नायिका हेझल ग्रेस लँकेस्टर हिच्या शब्दातून उलगडत जातं. ही नायिका थायरॉईडच्या कर्करोगाने ग्रस्त आहे आणि तो कर्करोग आता तिच्या फुप्फुसांपर्यंत पोचला आहे. याच कालावधीमध्ये तिचे आई-वडील तिला एका संस्थेत घेऊन जातात, तिथे तिच्यासारखीच, समवयस्क आणि कर्करोगाने ग्रस्त असणारी मुलं तिला भेटतात. याच मुलांमध्ये असतो बास्केटबॉल खेळणारा आणि कर्करोगामुळे पाय कापावा लागलेला ऑगस्टस वॉटर्स. तो खरं तर तिथे त्याच्या मित्राला आधार वाटावा म्हणून आलेला असतो आणि तिथे त्याची ओळख होते ती हेझलशी.

अर्थात एव्हाना कथेच्या नायकाची आणि नायिकेशी वाचकांची ओळख झालेली असली, आणि अनेकांनी आता या दोघांचं प्रेम जमणार असा अंदाज व्यक्त केलेला असला तरी देखील यापुढे नेमकं काय घडतं, हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं आणि किंबहुना त्यामुळेच त्यांची ही प्रेमकहाणी वेगळी ठरते. मुळात आपल्या कथेतील नायक आणि नायिका हे दोघंही कर्करोगाने आजारी असल्यामुळे, जीवन-मृत्यूचा एक वेगळा लढा ते लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रेमकहाणीत एकमेकांवरचं भरभरून प्रेम आहे तितकं च एकमेकांबद्दल असलेली अमाप काळजी देखील आहे.

त्यांचं प्रेम ज्या क्षणी सुरू होतं तो क्षण देखील तितकाच विलक्षण आहे. ऑगस्टस एकदा हेझल सोबत असताना खिशातून एक सिगरेट काढतो आणि ओठात ठेवतो. ते पाहून हेझल खूप संतापते, कारण ऑगस्टसला आधीच बोन कॅन्सर असतो आणि त्यात अजून तो सिगरेट ओढून आपल्या रोगालाच मोठं करतो आहे. मात्र त्यावर ऑगस्टस शांतपणे म्हणतो की मी सिगरेट ओठात ठेवलेली असली तरी मी ती पेटवणार नाहीये. तो म्हणतो की या सिगरेटने मृत्यू समीप येतो हे मला ठाऊक आहे आणि म्हणूनच मी ती ओठात ठेवतो. पण तिला न पेटवल्यामुळे ती माझं काहीही वाकडं करू शकत नाही आणि अंतिमत: माझाच विजय होतो. त्याच्या या वाक्याने मात्र हेझल पुरती त्याच्या प्रेमात पडते.

प्रेमात पडल्यावर एकमेकांच्या घरी येणं जाणं सुरू होतं. एकमेकांना आवडणारी पुस्तकं ते एकमेकांना वाचायला देतात. यामध्ये, अ‍ॅमस्टरडॅम येथे राहणाऱ्या पीटर व्हॅन हॉटेन याने लिहिलेल्या ‘अ‍ॅन इम्पिरियल अफ्लिक्शन’ या तिच्या आवडत्या पुस्तकाबद्दल हेझल ऑगस्टसला सांगते. या पुस्तकात अ‍ॅना या कॅन्सरने आजारी असलेल्या मुलीची कथा आहे, आणि तिच्या अनुभवांमध्ये हेझल स्वत:ला शोधत असते. मात्र या पुस्तकाचा शेवट अर्धवट झालेला असल्यामुळे अ‍ॅना एकतर मृत्यू पावली असावी किंवा पुढे सांगण्याचंही त्राण तिच्यात राहिलं नसावं असा अंदाज वाचक बांधत असतात. हेझलकडून पुस्तकाबद्दल ऐकल्यानंतर ऑगस्टस हा हेझलसाठी त्या लेखकाला संपर्क करतो. त्या लेखकाला भेटण्यासाठी दोघं अ‍ॅमस्टरडॅम येथे देखील जातात. मात्र दारूच्या नशेत असलेला पीटर हेझलच्या आजाराची मस्करी करून, दोघांचा अपमान करतो. या प्रवासात मात्र दोघंही एकमेकांप्रति असलेल्या प्रेमाची कबुली देतात.

परत आल्यावर मात्र ऑगस्टसचा कर्करोग पुन्हा बळावतो आणि त्याला हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केलं जातं. मृत्यूची चाहूल लागल्यावर तो आयसॅक या आपल्या मित्राला आणि हेझलला बोलवून घेतो आणि दोघांकडून आपल्या दफनसमयी ते काय बोलणारेत ते वदवून घेतो. अत्यंत चटका लावणारा आणि मनाला स्पर्श करून जाणारा हा प्रसंग देखील लेखकाने तितक्याच हळुवार पद्धतीने मांडलेला आहे. मृत्यू हा अटळ आहे आणि आज किंवा उद्या आपली त्याच्याशी गाठ पडणार आहे याची जाणीव मनात असतानाच आपलं आयुष्य प्रेमाच्या रंगात रंगवणारे हे दोन जीव आणि त्यांची एक तरल प्रेमकहाणी प्रेमाचा खरा अर्थ समजावून जाते.

याच पुस्तकावर आधारित एक चित्रपट याच नावाने रसिकांच्या भेटीला आलेला होता. तसंच मराठीसोबतच जगभरातल्या अनेक भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद आपल्याला वाचता येतो. मात्र भाषा कुठलीही असली तरी शब्दांपलीकडे असलेलं प्रेम आणि त्याची भाषा हे पुस्तक आपल्याला शिकवून जातं. हीच प्रेमाची भाषा हल्लीच्या युवा पिढीला आकर्षित करते आणि म्हणूनच जगभरात युवापिढीने या पुस्तकाला आणि त्यावर आधारित असलेल्या चित्रपटालासुद्धा डोक्यावर घेतलं. हल्लीची युवा पिढी वाचत नाही असं जरी आपण ऐकत असलो, तरीसुद्धा चांगल्या साहित्यकृती त्यांच्यापर्यंत पोहोचल्या तर ते त्या कलाकृतींवरसुद्धा तितकंच प्रेम करतात. कारण जगाच्या कुठल्याही टोकावर आपण असलो, कुठलीही भाषा बोलत असलो, तरी शेवटी पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं!’

viva@expressindia.com