सारंग साठय़े

माझ्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मी कॉलेजकडून ‘पुरुषोत्तम करंडक’साठी केलेली पहिली एकांकिका. ‘जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल.’ मला स्मरणरंजन अर्थात ‘नॉस्टेल्जिया’ आवडत नाही. कारण कॉलेज पातळीवरच्या स्पर्धा कॉलेजपुरत्याच सीमित असाव्यात, असं मी मानतो आणि कॉलेज सुटल्यानंतर अशा स्पर्धाकडे मी ढुंकूनही पाहिलं नाही. तरीही पहिली एकांकिका ही माझ्यासाठी महत्त्वाची आहे. तिने माझ्या आयुष्याला वेगळे वळण दिले. तिने मला एका निर्णायक टप्प्यावर आणून सोडले. खरे तर जोनाथनची गोष्ट नेहमीचीच. कुठेतरी ऐकलेली. म्हणजे आपल्या सर्वाचीच. आपापलं पोट भरा. तृप्तीचा ढेकर द्या आणि शांत झोपा. उगाच ऊंच भराऱ्या घेण्याच्या विचारात पडू नका, असा विचार घेऊन जगणाऱ्या समाजात अडकलेल्या सीगलची ही कथा आहे. या अशा स्थितीप्रिय समाजाचा प्रवाह सोडून त्याविरोधात पंख पसरवणाऱ्या सीगलची ही कथा आहे. हा सीगल नवीन काहीतरी करू पाहतो. हे शिकताना तो धडपडतो. ठेचकाळतो. पडतो, पण त्यातून उठून पुन्हा भरारी घेण्यास शिकतो. तेव्हा त्याला त्याची ‘उंची’ कळते. ताकदीची जाणीव होते. आपण आजवर उडत असलेल्या वर्तुळाच्या बाहेर अजूनही एक जग आहे, हे त्याला समजते. म्हणजे ‘फिनिक्स’ पक्ष्याप्रमाणे राखेतून कसं उगवायचं, याचं त्याला भान येतं. यात मी जोनाथनची भूमिका अगदी मनापासून साकारली. तरीही मी स्वत:ला जोनाथन मानीत नाही. कारण प्रवाहाविरुद्ध पोहून मी काही केले असे मला वाटत नाही. मला जॉनच्या गोष्टीने जे काही शिकवले ते वेगळेच होते. जॉनची गोष्ट त्याच्या भरारीशी येऊन संपत नाही. पुढे जाऊन जोनाथन एका वेगळ्या जगात पोहोचतो. जिथे त्याच्यासारखेच प्रवाहाविरुद्ध पोहणारे असतात. अशाच एकाला तो प्रवाहाविरुद्ध कसं पोहायचं, याची जाण आणून देतो. त्याला ते कौशल्य शिकवतो. त्या सीगलचं नाव असतं सलीवन. जेव्हा जॉन सलीला सोडून आणखी पुढच्या प्रवासाला निघतो. तेव्हा सली त्याला असं म्हणतो, की ‘हरकत नाही, तू जा. पुन्हा भेटू. कोणास ठाऊक कधीतरी, कुठल्या तरी जगात मी तुला उडण्याचे चार धडे देईन’. सलीचे हा संवाद माझ्या मनावर असा काही ठळकपणे उमटला की माझी जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली ती कायमचीच.

भारतात गुरू-शिष्य परंपरेला फार मान आहे. आपल्या गुरूला वा ज्यांना आपण सर्वोच्च स्थानी मानतो, अशा लोकांना आपण जवळजवळ देवस्थानी ठेवतो. माझ्यावरही तेच संस्कार झाले. आजी मला महाभारतातल्या गोष्टी सांगायची. तेव्हा ती त्यातील मथितार्थ मला समजून सांगायची. प्रत्येक गोष्टीतून ती मला काही तरी शिकवायची. पांडवांचे गुरू द्रोणाचार्य यांनी चोरून विद्या शिकणाऱ्या एकलव्याकडे गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून मागितला आणि एकलव्याने क्षणाचाही विलंब न लावता तो त्यांना दिलाही. माझ्या अंत:करणात रुतलेल्या नेमक्या याच विचाराला सलीवनने तडा दिलेला होता. शिष्य सलीवनने गुरू जोनाथनला देव मानण्याऐवजी त्याच्याहून अधिक उंच उडण्याची मनीषा बाळगलेली होती. त्याचा ध्यास गुरूहून मोठे होण्याचा होता. तीच अवस्था इथे जोनाथनची होती. म्हणजे जोनाथनला जे साध्य करायचे होते, ते त्याने सलीवनच्या आकांक्षेतून मिळविलेले होते. याचा अर्थ असा होता, की शिष्य सलीवन हा गुरूहून मोठा व्हावा, ही जोनाथनची इच्छा होती. जोनाथनला सलीवनला शिकविण्यातून हेच तर मिळवायचे होते.

गुरू आदरणीयच असतो आणि त्याचा मानही ठेवला गेला पाहिजे. परंतु ज्या वाटेवरून कसे जायचे, हे तो आपल्याला शिकवितो, तेव्हा ते शिकतानाही त्याहीपुढे एक जग आहे आणि त्या जगात पोहोचणे ही आपली आकांक्षा असायला हवी, याची जाणीव असणे महत्त्वाचे आहे. आपली झेप घेण्याची मर्यादा ही शेवटी आपणच ठरवू शकतो.

मानवाला प्रश्नच पडले नसते, तर तो उत्तरांच्या या टप्प्यांपर्यंत पोहोचलाच नसता. प्रश्न प्रत्येकाला विचारावेत. प्रश्न आईला विचारावा. वडिलांना विचारावा. गुरूला विचारावा. त्यांनी केलेल्या विधानांना जरूर ‘चॅलेन्ज’ करावं. कारण जे काही समोर येतं त्याचा स्वीकार करणं हे माणूसपणाचं लक्षण नाही. कारण जे आपल्याला माहीत नाही, ते माहीत करून घेणे, पहिलं कर्तव्य आहे. त्याहीपेक्षा अधिक काही मिळविण्याचा प्रयत्न माणसाने सातत्याने करावा. हाच खरा मानवधर्म.

आता हे सारे करणे म्हणजे काहीतरी क्रांती घडविणे असा याचा अर्थ नाही. आयुष्यात अगदी साध्या गोष्टींमध्ये बदल केला तरी बराच काही फरक पडत असतो. यासाठी सोपे उदाहरण देतो. जेव्हा तुम्ही एखाद्या गावाला फिरायला जाता. तेव्हा ते गाव आधीच फिरून आलेला तुमचा एक मित्र सांगतो, की ‘अमुक एका गल्लीत जा. तमुक बोळातून बाहेर पड. तिथे अगदी चविष्ठ पराठा मिळतो.’ मित्राने सल्ला दिल्याप्रमाणे तो पराठा नक्की खा. तो खाऊन झाल्यावर पुढच्या अनोळखी गल्लीतून तसेच चालत जा. तसेच चालत राहिलात कदाचित काही गल्ल्या सोडून पलीकडे एक रबडीवाला सापडेल. म्हणजे सांगायचा अर्थ इतकाच की सर्वात चविष्ठ पराठा खाल्ल्यानंतर तुम्हाला जगात सर्वात चविष्ठ रबडी बनवणाराही भेटेल. तीही मनापासून चाखा. पण परत तुमच्या मित्राकडे येऊन त्याला नक्की सांगा, की ‘तू ही पुन्हा कधी पराठावाल्याच्या गल्लीत गेलास तर पराठा खाऊन झाल्यावर चार गल्ल्या सोडून पुढे जा, तिथे तुला सर्वात चविष्ठ रबडी मिळेल.’

थोडक्यात, आपला विचार जिथे थांबतो, तिथे सर्व शक्यता संपलेल्या असतात. यालाच शून्यावस्था म्हणतात. ती जीवनात कधी येता कामा नये. शेवटी मर्यादा म्हणजे काय हो, तर थकल्या-भागल्या मनाने स्वत:ला घालून घेतलेले कुंपणच असते.

(शब्दांकन: गोविंद डेगवेकर)

viva@expressindia.com