07 July 2020

News Flash

उदितजी द बॉस

बॉलीवूड संगीतामध्ये ८०चे दशक असे होते ज्यात गायकांमध्ये अनुकरणार्थीचा भरणा होता.

नव्या पिढीचा गायक, संगीतकार, हरहुन्नरी युवा कलाकार सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट!
बॉलीवूड संगीतामध्ये ८०चे दशक असे होते ज्यात गायकांमध्ये अनुकरणार्थीचा भरणा होता. संगीताच्या गोल्डन इरामधून बॉलीवूड नुकतेच बाहेर पडत होते आणि निर्माते-दिग्दर्शकांच्या अपेक्षांमुळे म्हणा किंवा लहानपणापासून कानावर हे चार-पाच मोजकेच आवाज पडत असल्याने म्हणा, गायकांमध्ये प्रति किशोर, प्रति मुकेश, प्रति लता, व्हॉइस ऑफ आशा, व्हॉइस ऑफ रफी अशी बिरुदे मिरविणाऱ्यांचीच संख्या जास्त होती. ८०च्या उत्तरार्धात मात्र एक आवाज असा आला, जो ऐकल्यावर ‘हिरोचा आवाज असावा तर असा’ अशीच सगळ्यांची प्रतिक्रिया होती. एक असा आवाज ज्यात कुठल्याही जुन्या काळातल्या आवाजाची आठवण नव्हती. जुन्या काळाची आठवण नव्हती असे नाही, पण नवीन काळाची नांदी नक्कीच होती. एक अशी गायकी ज्यात अनुकरण नव्हते असे नाही, पण नक्कल नक्कीच नव्हती. एक असा फ्रेश आवाजाचा गायक, ज्याने एक आगळीवेगळी, तजेला देणारी, आल्हाददायक गायकी आपल्यासमोर मांडली. एक असा गायक, ज्याचा आवाज म्हणजे जणू धुक्याने माखलेली पहाट किंवा धबधब्याचे तुषार.. उदित नारायण! खानत्रयी असो, गोविंदा असो, अक्षयकुमार असो की अजून कोणी, अगदी आज आजपर्यंतच्या सर्वानाच उदितजींचा आवाज चपखल बसला. नुसता बसलाच नाही, तर तो त्या त्या हिरोचाच आवाज वाटला. उदीतजींनी आपल्या स्टाइलमध्ये असा प्रत्येक हिरोसाठी बदल न करताही हे घडले. कारण ती स्टाइल नवीन होती, वेगळी होती, त्यांची स्वत:ची होती. म्हणूनच ‘कयामत से कयामत तक’चे नाव काढल्यावर जसा आमिर खान आठवतो, तसाच किंबहुना त्या आधीही उदित नारायण आणि ‘पापा कहते है’, ‘अकेले है तो क्या गम है’, ‘ऐ मेरे हमसफर’, ‘गजब का है दिन’ ही गाणी आठवतात. सॉफ्ट बॅले प्रकारच्या गाण्यांना शोभेल असा हा आवाजाचा पोत आपण आधी कधी ऐकालाच नव्हता. या प्रकारची अनेक गाणी उदीतजींनी अजरामर केली आहेत. ‘पहला नशा’, ‘घर से निकलते ही’, ‘आओ ना’, ‘सुनता है मेरा खुदा’, ‘तेरी याद हमसफर सुबहोशाम’, ‘मै यहां हूं यहां’, ‘वो चांद जैसी लडकी’, ‘चांद छुपा बादल में’.. प्रत्येक गाणे ऐकले की कसे फ्रेश वाटते. पुन:पुन्हा प्रेमात पडावेसे वाटते.
उदीतजींचा आवाज खरे तर जरा जाडसर, पोक्त असा, पण आपला आवाज नेमका कसा आहे आणि त्या आवाजाचा आपण नेमका कसा कसा वापर करू शकतो हे सर्वात जास्त कोणाला कळले असेल तर ते उदीतजींनाच. त्यामुळेच फक्त सॉफ्टच नाही, तर गाण्याच्या प्रत्येक प्रकारात त्यांचा आवाज शोभला. ‘कोई मिल गया’ (कुछ कुछ होता है), ‘ये दुनिया हसिनोंका मेला’, ‘धडक धडक’, ‘बिन तेरे सनम’सारखी उडत्या चालीची गाणी असोत, ‘क्या करे क्या ना करें’, ‘मै तेरा हिरो नंबर वन’, ‘किसी डिस्को मे जायें’पासून ‘धक धक करने लगा’सारखी खटय़ाळ, मिश्कील गाणी असोत, ‘ये तारा वो तारा’, ‘आहिस्ता आहिस्ता िनदिया तू आ’ (स्वदेस) सारखी लहान मुलांसाठीची गाणी असो किंवा ‘राधा कैसे न जले’, ‘ऐसा देस है मेरा’सारखा लोकगीतांचा बाज असो, उदितजींनी प्रत्येक गाणे तेवढय़ाच तन्मयतेने, प्रत्येक वेळी तेवढीच मजा घेत गायले. मजा घेत गाणे म्हणणे ही उदीतजींची सर्वात मोठी खासियत म्हणता येईल. त्यांचे कुठलेही गाणे आपण डोळे मिटून ऐकले, तर आपल्याला एक हसतमुख, मनाने स्वच्छ, चांगल्या स्वभावाचे कोणी तरी, आपल्या हसऱ्या चेहऱ्यानिशी गाणे म्हणत आहे असा भास होतो, मग ते कुठलेही गाणे असो, अगदी सॅड साँगसुद्धा! आणि तसे असले तरी दर्दभऱ्या गाण्यातील भावना पोहोचवण्यात मात्र काहीही कसर राहिलेली दिसत नाही. असेच एक विरहगीत म्हणजे ‘ऐ अजनबी’- दिलसे या चित्रपटामधले. उदीतजींनी गायलेले माझे सर्वात आवडते गाणे. हे गाणे त्यांनी जसे गायले आहे, तसे कोणीच गाऊ शकणार नाही. विशेषत: ‘जी रही.. है..’ची जागा! केवळ दर्जा!
उदीतजींनी कोणाची डायरेक्ट कॉपी नाही केली, पण लहानपणापासून उदीतजींना खूप ऐकल्यामुळे माझ्याकडून अनेकवेळा गाताना नकळत त्यांची कॉपी होत असते..! १ डिसेंबरला त्यांचा साठावा वाढदिवस. वाढदिवसाच्या शुभेच्छा!
viva.loksatta@gmail.com

हे ऐकाच..

सहाना सरल

उदीतजींनी बॉलीवूडमधले पहिले गाणे खुद्द रफीसाहेबांबरोबर गायले आहे! १९७९ मध्ये आलेल्या ‘उन्नीस बीस’ चित्रपटात असलेले ‘मिल गया मिल गया’ हे त्यांचे अधिकृतरीत्या पहिले गाणे. नक्की ऐका.
उदितजींनी हिंदीबरोबरच इतर अनेक भाषांमध्ये, जवळजवळ ३४ वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली. त्यांची भोजपुरी गाणी जशी खास हिट आहेत, तशीच तामिळ गाणीसुद्धा प्रसिद्ध आहेत. ‘शिवाजी द बॉस’मधले ‘सहाना सरल’ हे गाणे माझ्या फार आवडीचे आहे. त्याचे हिंदी व्हर्जन ‘सुहाना समां’ पण निघाले होते, त्यातही उदीतजींचाच आवाज आहे, पण त्यात शब्द मारून-मुटकून बसवलेले वाटतात. ओरिजिनल तामिळच ऐका. नक्की ऐका!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2015 1:01 am

Web Title: udit narayan the boss
Next Stories
1 डिवेलपमेंट
2 वाद संवाद
3 विस्मृतीत गेलेलं आपलं काही
Just Now!
X