‘वर्किंग फॉर स्टार्ट अप इज अ थ्रिल’ असं म्हणणाऱ्या ‘जेन नेक्स्ट’चे काही प्रतिनिधी (डावीकडून) अभिजित पाटील, चैतन्य तेलंग, अंकिता शहा, प्रेरणा लुनकर, गौरव चौधरी आणि मेहुल दीक्षित.

नऊ  ते पाचची नोकरी, उच्च शिक्षणाने मिळालेला हुद्दा, रोज थोडय़ाफार फरकाने करावं लागणारं तेच काम आणि त्या मोबदल्यात मिळणारा ठरलेला पगार. ही आदर्श नोकरीची संकल्पना हळूहळू आजची तरुण पिढी मागे सारत आहे. नोकरी करण्यापेक्षा स्वत:चा उद्योग सुरू करण्याकडे कल वाढतो आहे. स्वत:ची छोटी कंपनी सुरू करायची आणि त्यातून हवं ते काम करायचं, हे तरुणाईला चॅलेंजिंग वाटतंय. भावतंय. इंजिनीअर, एम.बी.ए. या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदव्या घेतल्यावर चांगल्या पगाराची नोकरी हे ध्येय ठेवण्याऐवजी स्वत:चा स्टार्टअप सुरू करण्याकडे तरुणाईचा कल आहे. त्यात ‘मेक इन इंडिया’ची हाक आल्याने आता स्टार्टअप्स जोमाने उदयास येत आहेत.

बायो मेडिकल इंजिनीअर असलेली नेहा मुहाना हिने परदेशात शिक्षण घेऊन मुंबईत स्वत:चं स्टार्टअप सुरू केलं. ‘परदेशात मोबाइल अ‍ॅक्सेसरीज उपलब्ध असतात. त्यामानाने आपल्याकडे मोबाइल अ‍ॅक्सेसरीजमध्ये थोडासा तोचतोचपणा असतो. त्यात काही तरी वेगळं करण्याची माझी इच्छा होती. त्यासाठी मी ‘एनथोपिया’ कंपनी चालू केली. आम्ही वेगवेगळ्या डिझाईन, फोटोज कव्हरवर प्रिंट करून देतो. माझ्या वडिलांचा टेक्स्टाइलचा व्यवसाय आहे. मात्र मला स्वत:चा असा व्यवसाय चालू करायचा होता. त्यासाठी मी हे स्टार्टअप सुरू केलं आहे. अ‍ॅमेझॉन.कॉममुळे प्लॅटफॉर्म मिळाला,’ असं नेहा सांगते.

नेहासारखंच मोबाइल अ‍ॅक्सेसरीजचा स्टार्टअप सुरू करणारी प्रेरणा लुनकर ही मार्केटिंगमध्ये एम.बी.ए. आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून तिने सहा महिन्यांपूर्वी ‘थिंकट्रिक सोल्युशन’ ही मोबाइल केसेस आणि मोबाइल कव्हर यांची ऑनलाइन विक्री करणारी कंपनी सुरू केली आहे. तीदेखील ‘अ‍ॅमेझॉन.कॉम’वरून या वस्तूंची विक्री करते. याबद्दल सांगताना प्रेरणा म्हणाली, ‘ऑनलाइन मार्केटमध्ये असलेला स्कोप पाहता आणि ई-कॉमर्समध्ये पुढील काही वर्षांत उपलब्ध असणाऱ्या संधी पाहता मी या क्षेत्राकडे वळले. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचता येतं. यातून खूप काही शिकायला मिळालं.’

काहींनी पॅशन म्हणून, तर काहींनी स्वत:ला एक्सप्लोर करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रांत कंपन्या सुरू केल्या आहेत. कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱ्या प्रसाद गणपुलेने सांगितले की, ‘कस्टमर्सना परफेक्ट सोल्युशन्स देण्यासाठी मी माझी रेमेनोरा ग्लोबल प्रा.लि. कंपनी सुरू केली. १५ मेंबर्सच्या आमच्या टीममध्ये कंटेंट रायटर्स, स्क्रिप्ट रायटर्स आहेत. आमच्यासारख्या यंग लोकांकडे खूप आयडीयाज् आणि खूप पोटेंशियल असतं. त्यासाठी अशी स्टार्टअप कंपनी खूप छान प्लॅटफॉर्म ठरू शकते. येत्या २५ जुलैला रॅमेनोरा ग्लोबलला ‘फास्टेस्ट ग्रोइंग कंपनी’चा अवॉर्ड मिळणार आहे. माझ्या मते हाय रिस्क हाय बेनिफिट हा फॉम्र्युला स्टार्टअप्ससाठी बेस्ट आहे. फक्त एका वर्षांत हे अचीव्ह करणं नक्कीच एनकरेजिंग आहे.’

नागपूरच्या एन.सी.एस.आर. केमिकल्स प्रा.लि.च्या चैतन्य तेलंगचा अनुभवदेखील असाच काहीसा आहे. मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात चैतन्यने ही कंपनी सुरू केली. ‘स्वत:ला डेव्हलप करायचं असेल तर संकटांना न घाबरता स्टार्टअप्समध्ये उतरलं पाहिजे. कारण खूप मोठं जग तुमची वाट बघत आहे,’ असं तो सांगतो.

आयआयटीअन्स तर ‘स्टार्टअप’कडे मोठय़ा प्रमाणात वळताना दिसतात. उत्तम पगाराची प्लेसमेंट मिळत असतानादेखील काही तरी नावीन्यपूर्ण करण्याच्या हेतूने आणि आपलं ज्ञान स्वत:च्या व्यवसायाकडे वापरण्याकडे त्यांचा कल आहे. अभिजित पाटील, विनित गुप्ता, पंकज राऊत आणि गौरव गोडबोले यांनी स्वत:च्या नोकऱ्या सोडून ‘थ्री डी झेस्ट’ नावाने स्टार्टअप सुरू केलेय. याद्वारे ते थ्री डी प्रिंटिंग आणि स्कॅनिंग करतात. याबद्दल सांगताना अभिजित पाटील म्हणाला की, ‘थ्री डी प्रिंटिंग आणि स्कॅनिंग ही टेक्नॉलॉजी आपल्या देशात नवीन आहे. त्यामुळे त्यावर काम करण गरजेचं आहे. स्टार्टअप सुरू करण्यामागचं अजून एक कारण म्हणजे यातून नोकरीच्या संधी उपलब्ध करता येऊ  शकतात. त्यामुळे नोकरीऐवजी मी स्टार्टअपचा निर्णय घेतला.’

vv03कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून सहा महिन्यांपूर्वी ‘थिंकट्रिक सोल्युशन’ हे स्टार्टअप सुरू केलं. ‘अ‍ॅमेझॉन’सारख्या प्लॅटफॉर्मचा इ-कॉमर्ससाठी खूप उपयोग होतोय.
– प्रेरणा लुनकर

 

कोमल आचरेकर – viva.loksatta@gmail.com