23 September 2020

News Flash

८ तास, २०३ महिला..

प्रदीपचे वडील पोलीस सेवेत आहेत. त्यांच्यामुळेच प्रदीपला एअरफोर्समध्ये जायची इच्छा निर्माण झाली.

|| मितेश जोशी

जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आंतरराष्ट्रीय लुक डिझाइनर प्रदीप शिंदे या तरुणाने आठ तासांत २०३ महिलांचा हेअर कट करण्याचा विक्रम रचला आहे. त्याच्या या विक्रमाविषयी आणि आंतरराष्ट्रीय लुक डिझायनिंगच्या करिअरविषयी जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

प्रदीपचे वडील पोलीस सेवेत आहेत. त्यांच्यामुळेच प्रदीपला एअरफोर्समध्ये जायची इच्छा निर्माण झाली. पण प्रदीपची उंची कमी असल्याने त्याचं सिलेक्शन झालं नाही. प्रदीपचा भाऊ  हेअर ड्रेसर होता. त्याचं स्वत:चं सलून होतं. दहावी ते पंधरावी या सहा वर्षांच्या काळात दर रविवारी प्रदीप सलूनमध्ये भावाला मदत करण्यासाठी जात असे. पदवी शिक्षण पूर्ण करून प्रदीपने पूर्णवेळ केशभूषा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. गोरेगावमधील एका इन्स्टिटय़ूटमध्ये त्याने हेअर स्टायलिंगचा डिप्लोमा घेतला. त्यानंतर लगोलग ठाण्यातील ‘युनायटेड २१’ या हॉटेलमध्ये दीड वर्ष काम केलं. मग तीन वर्ष त्याने कोचीनच्या ताज हॉटेलमध्ये काम केलं. त्याच वेळी परदेशी लोकांचं लुक डिझाइन करण्यात त्याला रस वाटू लागला. दरम्यानच्या काळात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ब्युटी कोर्स केला. हे सगळं करता करता त्याने ‘हेअर अ‍ॅण्ड फेअर स्टुडिओ’ हा स्वत:चा ब्रॅण्डही सुरू केला. मात्र आंतरराष्ट्रीय लुक डिझाइनर म्हणून ओळख मिळवण्यासाठीचा त्याला आणखी प्रवास करावा लागणार होता..

स्वत:चा स्टार्टअप सांभाळत त्याने यूएसमध्ये एका क्रूझवर काम करायला सुरुवात केली. इथे त्याला पहिल्यांदा खूप मोठय़ा प्रमाणावर परदेशी लोकांसाठी हेअर स्टायलिंग करायची संधी मिळाली. ‘माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ म्हणजे मी व्यतीत केलेले क्रूझवरचे ते दिवस होय. तिथले अनुभव मला आजही उपयोगी पडतायेत,’ असं प्रदीप सांगतो. हेअर स्टायलिंगसाठी भारतात उपलब्ध नसलेल्या वस्तू मी क्रूझवरती हाताळल्या. वेगवेगळ्या देशांत कोणता हेअरकट ट्रेण्डमध्ये आहे हे तिथे मला चटकन कळायचं. माझ्या डोक्यात स्वत:च्या ब्रॅण्डची स्वप्नं दिवसरात्र पिंगा घालत होती. म्हणून भारतात परतलो आणि माझ्या स्टुडिओत काम करायला सुरुवात केली, असं प्रदीप सांगतो. क्रूझवरचा त्याचा कामाचा अनुभव आणि तिथले ग्राहक या दोन्ही गोष्टी त्याच्याशी कायमच्या जोडल्या गेल्या.

कमीत कमी वेळात जास्तीत जास्त स्त्रियांचा हेअरकट करण्याचा विक्रम रचण्याची कल्पना डोक्यात कशी आली याबद्दल बोलताना तो म्हणतो, गेले १० वर्षे मी ज्या क्षेत्रात काम करतोय त्या क्षेत्रात मला काही तरी विक्रम करायचा होता. त्यासाठी मी गिनीज बुक चाळलं. त्यात मला आठ तासांत १८० महिलांचे केस कापण्याचा विक्रम रचल्याची माहिती मिळाली. विक्रम आपण मोडायचा असं मनोमन ठरवलं आणि या वर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी ही संधी साधली, असं प्रदीपने सांगितलं.

हे करायचं ठरवल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे इतक्या महिला कशा येतील? आणि त्यातही ज्यांना माहिती मिळाली त्या स्त्रियांनी मला वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडलं. घाई-गडबडीत आम्हाला इजा झाली तर.. केस चुकीचे कापले तर.. अशा त्यांच्या अनेक प्रश्नांवर उत्तरं देऊन, त्यांचा विश्वास संपादन केला, असं प्रदीप सांगतो. अर्थात, हा विक्रम पूर्ण करण्यासाठी या व्यवसायातील दहा वर्षांचा अनुभव कामी आल्याचेही त्याने सांगितले. क्रूझवर किंवा हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांकडे निवांतपणा नसायचा. त्यांनी दिलेल्या कालावधीत काम उत्तमरीत्या पूर्ण करणं हे नेहमी आव्हान असायचं. सततच्या प्रॅक्टिसमुळे अगदी दोन मिनिटांतसुद्धा हेअरकट केल्याचा अनुभव माझ्याजवळ आहे. सतत १२ तास स्टुडिओत उभं राहून काम करणंसुद्धा सवयीचं असल्याने सलग आठ  तास उभं राहून विक्रम रचणं माझ्यासाठी कठीण नव्हतं, असं त्याने सांगितलं.

विक्रमाच्या दिवशी प्रदीपने व त्याच्या साथीदारांनी मालाडमधील चारकोप नाका या भागात एक मंडप टाकला होता. सुरुवातीला केवळ १०० महिलांची नावनोंदणी झाली होती. नंतर महिलांनी येऊन नावनोंदणी करून विक्रमासाठी मोठी साथ दिल्याची माहिती प्रदीपने दिली. सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या आठ तासांत २०३ महिलांचा हेअरकट करण्याचा विक्रम त्याने रचला. ज्याची दखल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नावनोंदणी करून घेतली जाणार आहे. प्रदीपला सामाजिक क्षेत्रात काम करण्याची प्रचंड इच्छा आहे. ज्या मूकबधिर मुलांना या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे अशा मुलांना ट्रेनिंग देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचं प्रदीपचं मोठं स्वप्न आहे. स्वत:ची इन्स्टिटय़ूटही त्याला सुरू करायची आहे. त्याच्या या धाडसी स्वप्नांना आणि कर्तबगारीला ‘व्हिवा’ परिवाराकडून शुभेच्छा..!

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2019 12:03 am

Web Title: world record in hairstyle
Next Stories
1 रेड कार्पेटवरील ‘स्टॅण्ड आऊट’ फॅशन
2 धनसाकच्या पलीकडची पारशी खाद्यसंस्कृती
3 रंगुनी रंगात साऱ्या..
Just Now!
X