करिअरच्या खूप लवकरच्या टप्प्यावर फॉरेन्सिक अकाउंटिंग या हटके क्षेत्रात तिने पाय ठेवला आणि अनुभवाने ती तिचा पाया भक्कम करत गेली. लहान वयात तिने तिचा स्टार्टअप उभा केला. सध्या ती ‘रिस्क प्रो’ या कंपनीची संचालक म्हणून जबाबदारी सांभाळते आहे. ‘न्यायवैद्यक लेखापरीक्षण’ अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्रातील तिच्या कामासाठी तिला यंदाचा ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा पुरस्कार मिळाला आहे. पुणे येथे झालेल्या ‘केसरी टूर्स’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाऊंज’मध्ये या यंग अचिव्हर असलेल्या अपूर्वा जोशीशी संवाद साधला रेश्मा राईकवार आणि भक्ती बिसुरे यांनी..

सर्वोच्च काहीतरी करायचं

मी मूळची सोलापूरची आहे. तिथे राहून माझी इतकीच इच्छा होती की माझ्या नावासारखं काहीतरी करायचं. अपूर्वा म्हणजे पूर्वी कधी न झालेलं.. मला असंच काहीतरी करायचं होतं जे सगळ्यांपेक्षा वेगळं असेल, उत्तम असेल. घरून कधीच कोणत्याही करिअरबद्दल सक्ती नव्हती. माझी आवड म्हणून मी कॉमर्स घेतलं. सोलापूरमध्ये राहून फार काही एक्स्पोजर नव्हतं. त्यामुळे कॉमर्समधलं सर्वोच्च काय, तर सीए.. अशा सर्वसामान्य मताने मी सीएची तयारी सुरू केली. त्या वेळी आर्टकिलशिप करण्यासाठी पुण्याला आले असताना माझी या क्षेत्राशी ओळख झाली आणि मी त्यात काम करत गेले. ‘जे करशील ते सर्वोत्तम असलं पाहिजे’ एवढंच आई-बाबांचं सांगणं लक्षात ठेवून मी काम करायला सुरुवात केली.

आर्टकिलशिपची सुरुवात

पुण्याला आर्टकिलशिपसाठी काही सल्ला घ्यावा म्हणून मी मयूर जोशी यांना भेटायचा विचार केला. त्या वेळी ते  ‘लोकसत्ता’मध्ये लिहीत होते. सल्ला घ्यायला त्यांच्याशी बोलायला म्हणून मी गेले आणि मलाही कळलं नाही त्यांनी माझा इंटरव्ह्य़ू कधी घेतला! त्यांच्याकडेच आर्टकिलशिप करायला मी सुरुवात केली. मला जेवढी फॉरेन्सिक अकाउंटिंगबद्दल माहिती होती तेवढी मी आई-बाबांना दिली. आई-बाबांनीही त्याला काही हरकत घेतली नाही. त्या वेळी मयूर जोशी हे एकटेच या क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मीही हळूहळू या क्षेत्रात प्रवेश केला.

पहिली केस

माझी पहिली केस बँगलोरची होती. एका रीटेल चेनचं फॉरेन्सिक ऑडिट करायचं होतं. मी कुतूहलाने त्यांच्या वेअरहाऊसमध्ये गेले आणि इन्व्हेंटरीची मोजणी करायला लागले. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की टीव्हीचे बॉक्स हलके लागतायेत. म्हणून मी ते उघडून पाहिले आणि लक्षात आलं की आत टीव्ही नव्हतेच. तेव्हा मला या सगळ्यामागचा प्लॅन काय असू शकतो हे उलगडलं. पहिलीच केस अशी झाल्यामुळे मला हळूहळू माझ्या कामाचा अंदाज यायला लागला. अशा फ्रॉड्समागचे मास्टरमाइंड हेसुद्धा खूप हुशार असतात आणि अनेकदा ते सीएसुद्धा असतात. पहिल्याच केसने इतका हटके अनुभव दिल्याने मला यात तयार व्हायला फार अवघड गेलं नाही.

सीए आणि फॉरेन्सिक अकाउंटिंग

सीए असलेल्यांनी शक्यतो या क्षेत्रात येऊ नये असं माझं मत आहे. सीए हे अनेकदा फॉरेन्सिक अकाउंटिंगच्या विरुद्ध बाजूला असतात. त्यांच्या क्लायंटचा टॅक्स वाचवणं, त्यांची बॅलेन्स शीट स्ट्राँग दाखवणं अशा गोष्टी सीएच्या उद्दिष्टांत येतात. त्याच्या अगदी उलट काम आम्ही करतो. बारीक बारीक चुका किंवा ‘अ‍ॅडजस्टमेंट्स’ही आम्हाला शोधून काढायच्या असतात. त्यामुळे जर सीए या क्षेत्रात असतील तर त्यांचे स्वतचे ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’ होण्याची शक्यता असते. म्हणून माझा सल्ला असा असतो की सीए करून या क्षेत्रात शक्यतो येऊ नये.

अभ्यासक्रमाची रचना

२०१२ साली माझी आई गेली आणि मी पुण्याहून सोलापूरला गेले. तिथे असलेल्या वेळेत रिकामं बसून राहणं मला जमणार नव्हतं. त्या वेळात मी एक हँडबुक लिहून पूर्ण केलं. माझ्या सोलापूरसाठी मला काहीतरी करायचं होतं. तिथे बसल्या बसल्या मी ‘फॉरेन्सिक डिप्लोमा’, ‘फ्रॉड रिस्क मॅनेजमेंट’ असे काही सर्टिफिकेट कोस्रेसचे अभ्यासक्रम बनवले. दहा महिन्यांच्या विचारानंतर सोलापूर युनिव्हर्सटिीने तो फायनली मान्य केला आणि तिथे ते कोस्रेस सुरू झाले. इथून माझ्या लिखाणालाही बऱ्यापकी सुरुवात झाली. आता मला बऱ्याच ठिकाणांहून अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विचारणा होत असते आणि अनेक ठिकाणी मी तयार करून दिलाही आहे.

संधी कुठे आहेत?

फॉरेन्सिक अकाउंटिंगला अनेक ठिकाणी संधी आहेत. सध्या या क्षेत्रात काम करणारे लोक तसे कमी आहेत. त्यांची गरज आहे हे हळूहळू लोकांना पटायला लागलं आहे. इन्शुरन्स, बँकिंग या क्षेत्रांत फॉरेन्सिक अकाउंटिंगला चांगला वाव आहे. आधी सरकारी सेक्टर्सना या फील्डची गरज वाटत नव्हती. मात्र आता त्यांनाही त्याचं महत्त्व कळलेलं आहे. या कामासाठी त्यांनी तरुण जाणकार तज्ज्ञ नेमायला सुरुवात केली आहे. ‘एसएफआयओ’, ‘ईओडब्ल्यू’, ‘सीबीआय’ यांनाही आता या क्षेत्राची गरज जाणवते आहे. सेबीमध्येही फायनान्शियल फ्रॉड्ससाठी फॉरेन्सिक अकाउंटिंग क्षेत्रातील शिक्षण घेतलेली मॅनपॉवर नेमली जाते. यात संधी शोधल्या तर अनेक आहेत.

महिलांची संख्या

मी जेव्हा मीडिया म्हणून यात उतरले होते तेव्हा मी याच उद्देशाने उतरले होते की यातल्या यशस्वी महिलांशी मला संवाद साधता यावा. त्या वेळी या क्षेत्रात कर्तृत्ववान महिला होत्या. नंतर असं झालं की ‘केपीएमजी’मधील या फील्डमधल्या एका सिनियर माणसाने ‘केपीएमजी’ सोडली आणि दुसऱ्या कंपनीत जाताना ही अट ठेवली की मी माझ्याबरोबर अनेक एक्स्पर्ट घेऊन येईन. पण त्या कंपनीत आधीपासून असलेली एक्स्पर्ट महिला तिथे नको. या पद्धतीने या क्षेत्रातून महिलांना बाजूला करण्याचा ड्राइव्हच सुरू झाला आणि हळूहळू यात कमी महिला दिसू लागल्या.

इतर बऱ्याच गोष्टी आवडतात

नातेवाईकांपकी अनेकजण डॉक्टर आहेत, घरात बहुतेक सगळे डॉक्टरच आहेत. त्यामुळे लहानपणापासून वातावरण अभ्यासूच होतं. ज्ञानप्रबोधिनीच्या शाळेत मी शिकले. शाळेपासून मला वाचन करायला आवडतं. शाळेत मला ‘वाचकवीर’ वगरे अशी बक्षिसं मिळायची. अजूनही वाचण्याची आवड मी बऱ्यापकी जोपासली आहे. मला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडतो. देवाचं करायलाही मला आवडतं. मेडिटेशन करायला मला आवडतं. अनेकदा मला नुसतं लिहायलाही आवडतं. कॅफेमध्ये जाऊन बसून लेखन करायला मला विशेष आवडतं. डोक्याला शांतता मिळते आणि वातावरण बदललं की नवीन लिहायला सुचतही जातं. नेटवìकग करणं, लोकांशी बोलणं ही माझी एक आवडती गोष्ट.. वेगवेगळ्या समित्यांवर मी मेंबर आहे. वीकएंड, मित्रमत्रिणी, आउटिंग या गोष्टी मला कधीच विशेष आवडत होत्या असं नाही आणि कामातही मला तितकीच मजा येत असल्याने इतर काही खूप मोठं सॅक्रिफाइस करावं लागलं असंही मला कधी वाटत नाही.

प्रिव्हेंटिव्ह उपाय गरजेचे

कोणत्याही घोटाळ्याचे संकेत कुठे ना कुठे मिळत असतात. जिथे छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून घोटाळ्याची सुरुवात होते तिथेच ते लक्षात आले तर वेळीच त्याच्यावर योग्य ती उपाययोजना करता येऊ शकते. त्यासाठी रेग्युलर ऑडिट्स होणं गरजेचं आहे. फ्रॉड उघडकीला तेव्हा येतो जेव्हा मोठा फटका बसल्याचं लक्षात येतं. मात्र रेग्युलर चेक असेल तर एखाद्या फ्रॉडची नुकतीच सुरुवात होतानाही आपल्याला ते कळू शकतं. काही वेळा तो फ्रॉड नसतोही, ती केवळ एखादी चूक असते. पण वेळीच लक्षात आली तर चूकही सुधारता येऊ शकते. त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेणं गरजेचं आहे.

सर्टिफिकेशनसाठी प्रयत्न

मी सीए करत होते. मात्र फॉरेन्सिक अकाउंटिंगमध्ये काम करायला सुरुवात केल्यावर ते आवडायला लागलं आणि त्यातच पुढे करिअर करायचं ठरवलं. मात्र त्यातलं कोणतंही शिक्षण घ्यायच्या आधीच मी अनुभव घ्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे काहीतरी सर्टिफिकेट घेणं गरजेचं होतं. ‘इंडिया फॉरेन्सिक’ ही एक संस्था आहे जी या क्षेत्रात काम करते. त्यांची सर्टिफिकेशन्स या क्षेत्रात उपलब्ध आहेत. माझ्याकडे तीन सर्टिफिकेशन्स आहेत. ‘सर्टफिाइड फॉरेन्सिक अकाउंटिंग प्रोफेशनल’ हे एक ज्यात वेगवेगळे फ्रॉड्स, कॉर्पोरेट फ्रॉड्स अशा गोष्टी शिकवल्या जातात. ७५ टक्के मार्क्‍सना त्याचं पासिंग असतं. दुसरं सर्टिफिकेशन आहे ते म्हणजे ‘सर्टफिाइड बँकिंग फॉरेन्सिक अकाउंटंट’. यात ‘आरबीआय’चे नियम, गाइडलाइन्स, प्रक्रिया अशा बाबींचा अभ्यास करायचा असतो. डेबिट-क्रेडिटमधले फ्रॉड्स, बँकिंग क्षेत्रातील इतर फ्रॉड्स या सगळ्याबद्दलची माहिती यात मिळते. आणि माझं तिसरं सर्टिफिकेशन आहे ‘सर्टफिाइड अँटी-मनी लॉन्डिरग एक्स्पर्ट’. पशांचा रंग कसा बदलला जातो, म्हणजे थोडक्यात काळ्याचा पांढरा कसा करता येतो आणि पांढऱ्यातून काळा कसा तयार होतो, याबद्दलचा सखोल अभ्यास यात केला जातो. ही सगळी सर्टिफिकेशन्स या फील्डमध्ये अत्यंत उपयोगाची ठरतात.

काही गुण, काही स्किल्स..

या क्षेत्रात येण्यासाठी काही गुण मुळात अंगी असावे लागतात, काही स्किल्स आत्मसात करावी लागतात. फायनॅन्शियल स्टेटमेंट्स, बॅलेन्स शीट, टॅक्स, डेबिट-क्रेडिट, कम्प्लायन्स अशा गोष्टींचं ज्ञान असावं लागतं आणि त्यातली जाणही असावी लागते. त्याशिवाय यात पुढे जाताच येऊ शकत नाही. हे झाले स्किलसेट्स आणि ज्ञानाचा भाग. या क्षेत्रात यायचं असेल तर स्ट्रेस-फ्री जॉब, वीकएंडला सुट्टी, ठरावीक वेळेचे वìकग अवर्स, अशा अपेक्षा ठेवून चालत नाही. मेंदू कायम अलर्ट असावा लागतो आणि कोणत्याही वेळेला काम करण्याची तयारी असावी लागते. गुणांबद्दल बोलायचं तर पेशन्स अर्थात संयम माणसात असला पाहिजे. कोणतीही गोष्ट सापडेपर्यंत संयम ठेवावा लागतो आणि आधी सापडलेल्या गोष्टी, पुरावे, कोणालाही घाईघाईने बोलल्या जाणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी लागते. या क्षेत्रात येणाऱ्याला इतरांच्यात उत्तम पद्धतीने मिसळता आलं पाहिजे जेणेकरून माहिती काढणं, पुरावे शोधणं या गोष्टी सोप्या होतात. शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल सिक्स्थ सेन्स असला पाहिजे. कुठे चुका सापडू शकतात, कुठे अकाउंटिंगमध्ये गडबड असण्याची शक्यता आहे, कुठे फ्रॉडला स्कोप आहे अशी चक्रं सहजपणे आपल्या डोक्यात फिरली पाहिजेत.

शहाणं करणारा अनुभव

मी साधारण २४-२५ वर्षांची असताना मला पहिली असाइन्मेंट अशी मिळाली ज्यात मला भारताबाहेर जायला मिळणार होतं. कामासाठी बाहेर जाणं ही गोष्ट इतकी थ्रििलग होती की मी उत्साहात होते. मला ज्यांनी असाइन्मेंट दिली होती त्या बाईंना मी मुंबईत भेटले. त्या वेळी त्या एकदम पांढरी साडी, साधा चेहरा वगरे अशा रूपात समोर आल्या होत्या. जाताना मला त्यांनी गीता वगरे दिली आणि मीही ती घेतली. त्याच बाई जेव्हा मला दुबईत भेटल्या तेव्हा ओळखता येणार नाही असा त्यांचा पोशाख होता. तेव्हाही मला थोडं विचित्र वाटलं, पण म्हटलं कपडय़ांवरून एखाद्याला जज करणं बरोबर नाही. म्हणून मी ती गोष्ट सोडून दिली. नंतर त्यांनी माझ्याशी बोलताना मला कॉम्प्युटर फॉरेन्सिकची कामं सांगायला सुरुवात केली. त्यांच्या कंपनीत एका बऱ्यापकी वरच्या पोस्टवरच्या माणसाच्या कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्कवरून डेटा रिकव्हर करायला सांगितला. त्याच्या कॉम्प्युटरचा पासवर्ड, केबिनची किल्ली असं सगळं त्यांनी आणलं होतं. एक तर माझ्या क्षेत्रात मी हे काम करणं अपेक्षित नाही, पण मला येत होतं म्हणून मी तयार झाले. मात्र मी त्यांना सांगितलं की यासाठी मला एक ऑथॉरिटी लेटर लागेल. माझ्या हातात हे सगळं करायची अ‍ॅथॉरिटी दिली आहे हे पेपरवर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी काम करणार नाही, अशी भूमिका मी घेतली. तेव्हा मला तिथे थोडीशी गडबड जाणवली आणि मी ती असाइन्मेंट नम्रपणे नाकारली. त्या वेळी मी हा धडा शिकले की माणसाच्या पहिल्या इम्प्रेशनवर सगळ्या गोष्टी ठरवायच्या नाहीत आणि मोठी असाइन्मेंट दिसतेय म्हणून हुरळून जाऊन गाफील राहायचं नाही.

नीरव मोदी केस

१६ जानेवारी २०१८ रोजी दोन माणसं ‘पंजाब नॅशनल बँके’त कर्ज मागण्यासाठी गेली. तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे १०० टक्के सिक्युरिटी मागितली. त्या वेळी त्या दोघांकडून बँकेच्या ऑफिसर्सना असं कळलं की याआधीच्या त्यांच्या कर्जाना कधीच सिक्युरिटी मागितली गेली नव्हती. त्या वेळी तिथे असणाऱ्या ऑफिसर्सना संशय आला.  ‘स्विफ्ट’ हे बँकांच्या एकमेकांशी असणाऱ्या संपर्कासाठी तयार केलं गेलेलं सॉफ्टवेअर आहे. त्याच्या माध्यमातून बँका एकमेकांना आपल्या कस्टमर्सची माहिती शेअर करतात. त्यांची विश्वासार्हता तपासण्यासाठी या कम्युनिकेशन प्रणालीचा वापर केला जातो. त्यावर एखाद्याला जर दुसऱ्या बँकेकडे कर्जासाठी रेकमेंड केलं असेल तर त्याची नोंद रेकॉर्डला व्हावी लागते. पंजाब बँकेच्या अधिकाऱ्यांनी तपास करायला सुरुवात केल्यावर त्यांना असं लक्षात आलं की सॉफ्टवेअरवर तर कर्जाबद्दल रिमार्क्‍स आहेत, पण तशी नोंद कोणत्याही रेकॉर्डला नाही. यातून हळूहळू हा घोटाळा उघडकीस आला. अर्थात, हा त्या त्या वेळच्या बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत संगनमताने झालेला गरव्यवहार होता, कारण त्याशिवाय स्विफ्टचा वापर करून कर्ज मान्य करून घेणं शक्य नव्हतं. जोपर्यंत सगळं पूर्णत उघडकीला आलं तोपर्यंत तो देश सोडून गेलेला होता.

व्हिवा लाऊंज प्रतिक्रिया

अपूर्वा जोशी यांच्या कार्यक्रमाविषयी वाचून मी येथे आलो होतो. इथे आल्यावर मला समजले की, कशा पद्धतीने बँकांमध्ये घोटाळे होतात, मग ते ठरावीक काळानंतर उघडकीस येतात. अशा परिस्थितीतून मार्ग काढताना कोणत्या गोष्टी कराव्या लागतात, याविषयी सविस्तर माहिती मिळाली. एका नव्या करिअरची यानिमित्ताने माहिती मिळाली.   – प्रशांत यादव लांबतुरे

मी बारावी झाले आहे आणि आता मी सी.ए. फाऊंडेशनचा क्लास करते आहे. या कार्यक्रमाविषयी वाचलं की फॉरेन्सिक अकाऊंटिंग आणि फ्रॉड झालाय हे कसं शोधलं जातं, हे खूप इंटरेस्टिंग वाटलं. हे करिअर इनोव्हेटिव्ह आहे. त्यामुळे मी या कार्यक्रमाला आले. या करिअरला बरीच डिमांड आहे, हेही लक्षात आलं. हा कार्यक्रम प्रेरणादायी वाटला. आपणही असं काही वेगळं करू शकतो, जे समाजासाठी चांगलं आहे, याची जाणीव झाली. मी सी.ए. करिअर म्हणून लगेच सोडणार नाही. पण फॉरेन्सिक अकाऊंटिंग हाही एक पर्याय म्हणून डोक्यात ठेवेन.     – रश्मी दाते

हा कार्यक्रम खूप छान वाटला. घोटाळे कसे होतात, कशा पद्धतीने होतात याची माहिती शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितली. ज्यांना या विषयाची माहिती आहे त्यांच्यासाठी आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठीही अशा दोन्ही प्रकारच्या श्रोत्यांना हा विषय कळण्यास मदत झाली. निवेदकांनीही त्यांना खूप चांगले प्रश्न विचारले, त्यामुळे कार्यक्रम कंटाळवाणा झाला नाही. मी स्टॅटिस्टिक विषय अभ्यासते आहे, त्यामध्ये आम्हाला फ्रॉड अ‍ॅनालिसिस हा भागसुद्धा आहे. म्हणून त्याची अधिक माहिती घेण्यासाठी या कार्यक्रमाला आले होते.    – दामिनी महाजन

मला माहिती खूप छान मिळाली. हा खूप छान अनुभव होता. सी.ए. व्हायचा माझा विचार होता, पण आता मी हाही विचार करतेय की फॉरेन्सिक अकाऊंटिंग करू शकते का.. या कार्यक्रमानंतर निदान माझी ही विचारप्रक्रिया सुरू झाली आहे.   – रागिनी भानारकर

माझं नुकतंच बी.कॉम संपलं. तर काही तरी नवीन करून पाहू हा विचार करत होते. सगळीकडेच आता स्पर्धा इतकी वाढलीय की, प्रत्येक जण काही नवं करणाऱ्याच्या शोधात आहे. त्यांच्यासाठी हा खूप चांगला पर्याय सापडला आहे. अपूर्वा जोशी यांचे मार्गदर्शन आवडले. नवीन माहिती मिळाली.  – प्रियांका सरागे

शब्दांकन : वेदवती चिपळूणकर