ये मौसम का जादू है मितवा.. असंच काहीसं असतं पावसाळा आणि पावसाळ्यातल्या ट्रेकिंगचं. पावसाळी वातावरणाची जादू अनेक तरुणांच्या मनावर होते आणि मग ते निघतात ट्रेकिंगला. पावसाळा आणि ट्रेकिंग हे समीकरण म्हणजे तरुणांचा आवडता विषय. पावसाळा सुरू झाला आणि ट्रेकिंगचा प्लॅन झाला नाही असं शक्यतो होत नाही. ट्रेकिंग हे वेड गेल्या एक-दोन वर्षांत खूप प्रमाणात वाढलं आहे. आणि हेच हेरून अनेक छोटय़ा-मोठय़ा इव्हेंट कंपनी, ट्रेकिंग संस्था वर्षभरात अनेक छोटय़ा-मोठय़ा ट्रेकचं आयोजन करतात. मात्र अनेकदा ट्रेकिंग आवड आहे म्हणून करण्यापेक्षा नुसतंच थ्रिल वाटतं किंवा मित्रमैत्रिणींबरोबर जाऊन सोशल मीडियावर फोटो टाकण्यासाठीच केलं जातं. आणि त्यामुळे साहजिकच कुठलीही काळजी न घेता केले जाणारे ट्रेकिंग अनेकांसाठी जीवघेणे ठरत असल्याबद्दल ट्रेकर्स संस्थांनीही चिंता व्यक्त केली आहे.
पुण्याचे ‘गिरीदर्शन ट्रेकर्स’चे सदस्य सतीश मराठे सांगतात की, आत्ताची मुलं ट्रेकिंग मनापासून आवडतंय म्हणून जात नाहीत तर नुसती हौस आहे म्हणून जातात ज्यात प्रामाणिकपणा नाही. कोणत्याही गोष्टींची त्यांना माहिती नसते. अगदी छोटय़ा आणि प्राथमिक गोष्टी म्हणजे कुठल्याही ठिकाणी गेल्यावर कोणती काळजी घ्यायला हवी किंवा तिथे गेल्यावर स्वत:ची सुरक्षितता तरी कशी बाळगायला हवी, याचा विचार ते अजिबातच करत नाहीत. मुख्य म्हणजे आज ट्रेकिंग ग्रुप्स इतके वाढले आहेत की, त्यांच्यासोबत ट्रेकिंगला जाणं हा अगदी सहज आणि सोप्पा मार्ग त्यांच्यासाठी आहे. फक्त तरुण जमा करून त्याचा धंदा कसा होईल हे बघितले जाते, वरून ट्रेकिंग ग्रुप काढायचा असेल तर त्याला काही कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही, तसेच अनुभव नसलेल्यांना देखील काही ट्रेकिंग ग्रुप मार्गदर्शक म्हणून ठेवतात मग सोशल मीडियावरून कुठे आणि कसे जायचे एवढंच फक्त कळवलं जातं त्यामुळे सुरक्षितता काय घ्यायची ही माहिती त्यात नसते. सोशल मीडियावरून फार फार तर कोणत्या गोष्टी जवळ ठेवायच्या हे सांगितले जाते, पण त्या गोष्टींचा उपयोग सुरक्षिततेसाठी कसा करायला हवा हे माहीतच नसतं. फेसबुक, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही क्षणातच ट्रेकिंगची पोस्ट फिरते आणि मुलं तिथे लगेचच गर्दी करतात, ही आजची परिस्थिती आहे, असं ते म्हणतात.
अनेकदा चार ते पाच हजार तरुण आणि इतर मंडळी देवकुंड, कळसुबाई, माहुली, लोहगड, लोणावळ्याला जातात. इथे ट्रेकिंग करणं हे सर्वात कठीण आहे. देवकुंडला जायला १५ सप्टेंबपर्यंत बंदी आहे, कारण तिकडच्या धबधब्याजवळ मुलं मजा करायला जातात, पण त्या परिसरात या सीझनमध्ये खूप पाऊस असतो. त्यामुळे धबधब्याच्या पाण्यात वाढ होते. मग पाणी वाढलं की प्रवाहाची गती व दिशा कळत नाही. कळसुबाईसारख्या ठिकाणी एका वेळेस एका शिडीवरून तीन हजार तरुण वरखाली करतात मग अशा वेळेस स्वत:ची सुरक्षितता कशी करायची? याची माहितीही घेतली जात नाही. मग अपघात होतात. अपघात कसेही होतात. डोक्यावर दगड पडणे, पाय घसरून पडणे, पाण्यात बुडून, वाहून जाण्याच्या केसेस खूप आहेत. तुम्ही पडताय या भावनेने देखील आणखीन अपघात होऊ शकतो, अशी माहिती देतानाच त्यांनी आपला अनुभवही सांगितला. ‘आम्ही ट्रेकिंगला एका घाटावर गेलेलो. तर तिथे धबधब्यात गुडघ्याच्या वर पाणी होतं. अतिउत्साहाच्या भरात एका मुलाने उडी मारली आणि पाय फ्रॅक्चर झाले. एक मुलगी अशाच अतिउत्साहात पाय घसरून पडली होती. सेल्फीच्या नादात गवतात वगरे जातात. कुठूनही सापासारखे प्राणी येऊ शकतात. साप चावल्यावर फक्त फर्स्ट एड पुरेसे नसते, हॉस्पिटलमध्येच उपचार करणं गरजेचं असतं याची जाणीव नसते. रॅपलिंग करण्याची फॅशन सध्या आहे, पण त्यासाठी जी दोरी लागते ती फार सांभाळून आधी तपासून घ्यावी लागते, कारण पावसाच्या पाण्यामुळे त्याची इलॅस्टिसिटी (लवचीकता) जाऊ शकते. या बाबी खरंतर कोणी लक्षात घेत नाही, कारण या मुलांचा ट्रेकिंगवर अंधविश्वास असतो. स्वत:ची तयारी व सुरक्षिततता ही आपणच घ्यायला हवी याची पुसटशीही कल्पना नसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तरुण मुलांच्या असं वागण्यामागची मानसिकता काय असते याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज भाटवडेकर सांगतात, ‘मीसुद्धा हे करू शकतो असे दाखवायचा प्रयत्न ट्रेकिंगद्वारे होतो. मी ट्रेकिंगला का जातोय/ जातेय? ते मला आवडतं म्हणून की दाखवायला आणि जर मला आवडतं म्हणून मी जातोय वा जातेय तर त्यात मूळ हेतू इतरांना दाखवणे हा नसावा आणि इतरांना दाखवणं असेल तर मी शौर्यवान आहे हे इतरांना भासवून दिलं जातं. जर सोशल मीडियावर मिरवणं आहे तर त्यात न्यूनगंड आहे. इतरांनी कौतुक करावं ही भावना आहे, पण त्यावर सगळेच टाळ्या वाजवू शकत नाहीत. ती शक्यता कमी असते मग परत त्या मुद्दय़ावरून स्वत:वरच यावं लागतं. येथे इतरांना दाखवणं वरचढ आहे. जर मला ट्रेकिंग येत नाहीये आणि ते शिकायचं आहे तर ते मला शिकू देत, पण मला येतंच नाहीये आणि ते दाखवायचंय तर त्यात आत्मभान गरजेचे असते. ज्याला ट्रेकिंग शिकण्याची इच्छा आहे. ते आपल्याला झेपणार की नाही? मला काय खबरदारी घ्यावी लागेल याचा विचार करतात. पण फक्त मिरवायला हवंय तर त्यात गंभीरपणा नाही. या वयात कल्पनेत रमणं असते पण एखाद्या घटनेकडे पाहताना त्याचा परिणाम काय होईल याची तपासणी केली जात नाही. एखादी गोष्ट ती व्यक्ती कुठल्या दृष्टिकोनातून करतेय ही बाब महत्त्वाची ठरते.’
कुठेही जायचं असलं की आपल्याकडे सहसा पालकांकडून परवानगी घेतली जाते. पण अनेकदा घरातले पाठवणार नाहीत या भीतीने तरुणाई न सांगताच अनेक गोष्टी करते. आणि अनेकदा त्या गोष्टीमध्ये अडकल्यावर त्यांना बाहेर पडण्यासाठी किंवा मदतीसाठी घरचे नसतात. अनेकदा ट्रेकिंगचं नियोजनच नसतं. फक्त एखादी जागा किंवा गड ठरवला जातो आणि तिकडची माहिती न घेता, घरच्यांना न सांगता मुलं ट्रेकिंगला जातात. या तरुणाईच्या वागण्याबद्दल मानसोपचारतज्ज्ञ डॉ. वैशाली देशमुख सांगतात, ‘ट्रेकिंगला जाताना मुलं आवश्यक नियोजन करत नाहीत, आवश्यक माहिती काढत नाहीत, ज्या जागेवर जातोय त्या जागेवरचा धोका लक्षात घेत नाहीत, आई-वडिलांनाही सांगत नाहीत. यामागचं कारण म्हणजे त्यांच्यात असलेला जोश. अनेकदा त्यांना सोशल मीडियावर माझं आयुष्य कसं व किती रोमांचक आहे हे ट्रेकिंगमधून इतरांना भासवून द्यायचे असते. नेमकं सेल्फी काढण्यासाठी धोकादायक स्थळ निवडतात. ट्रेकिंगला जाताना म्हणून संभाव्य स्थितीचे व वास्तवाचे भान ते राखत नाही आणि मग विविध जीवघेणे प्रयोग अनेकदा केले जातात. सोशल मीडियावर जे वैयक्तिक आयुष्य आहे ते अजून फुलवायचा प्रयत्न केला जातो. यामागे स्पर्धा असते. त्यातून ट्रेकिंगला जाणं व मिरवणं असं सगळं येतं. अठरा व त्यापुढील वयात असे प्रयोग जास्त केले जातात.’
ट्रेकिंगला जायचं ठरलं की अनेकदा आपण एखाद्या संस्थेसोबत, ट्रेकिंग ग्रुपसोबत जायचा विचार करतो. आपण अनुभवी लोकांसोबत गेलो तर आपल्याला काही होणार नाही असा साधा विचार त्यामागे असतो. पण तरीही आपण अनेक बातम्या ऐकतो ज्यात असे ट्रेकिंग ग्रुपबरोबर गेलेल्यांनाही काही तरी अपघात झाला आहे. अशा वेळी सगळे आरोप त्या संस्थेवर केले जातात. पण अनेकदा त्यांनी काळजी घेऊ नही तरुण पिढी त्यांचं ऐकत नाही आणि त्याचा शेवट वाईट होतो. अनेक वर्षांपासून नियमितपणे ट्रेकिंगचं आयोजन करणाऱ्या ‘वंडरिंग शूटर’चे मकरंद चोथे सांगतात, अनेकदा तरुण मुलंमुली एखादा दिवस आणि जागा ठरवतात. बॅग भरतात आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकून ट्रेकिंगला निघतात. महाराष्ट्रात कळसुबाई आणि विकट गड अशा सोप्या जागेची निवड सहसा केली जाते. पावसाळ्यात तर इथे मेळा लागलेला असतो. जो तो ट्रेकिंगसाठी इथे येतो. पण त्यामुळेच अनेक अपघातही होतात. अशा ठिकाणी एक मार्ग असतो, त्यामुळे एकाच मार्गावरून येणं-जाणं होतं. बाजूला बांधलेली सुरक्षा जाळी किंवा पोल एवढे रिलायबल नसतात. आजची तरुणाई खूप कमी पेशन्स असलेली आहे, त्यामुळे त्यांना लगेच वरती चढायचं असतं आणि लगेच खाली यायचं असतं. आणि अशामुळेच अनेकदा अपघात होतात. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आम्ही जागेनुसार एका ट्रेकिंग ग्रुपमध्ये किती माणसं घ्यायची हे ठरवतो. आमचा एक माणूस पुढे दुसरा मध्ये आणि तिसरा मागे असतो. त्यामुळे प्रत्येकावर नीट लक्ष ठेवता येतं. आम्हाला ट्रेकला सुरुवात केल्यावर अध्र्या तासातच कोण ट्रेक पूर्ण करू शकेल याचा अंदाज येतो. अशा वेळी एखाद्याला जमत नसेल तर आम्ही त्याची समजूत काढून त्याला ट्रेक न करण्यासाठी तयार करतो. अनेकदा लोकांना ट्रेक जमत नसेल तरीही ट्रेक करायची इच्छा असते. अशा वेळी आम्ही त्यांना संभाव्य गोष्टीचा धोका सांगतो आणि त्यांना ट्रेकमध्ये पुढे घेऊ न जात नाही. अशा लोकांना समजून सांगणं थोडं कठीण असतं, पण या गोष्टी नाही केल्या तर ते जीवावर बेतू शकतं.’
तरुण पिढी सोशल मीडिया, सोशल लाइफ, पीअर प्रेशर अशा सगळ्या गोष्टींत अडकून पडलेली आहे. पण आताच्या पिढीने केवळ अट्टहास म्हणून न करता एखादी गोष्ट जमत नसेल तर ती आधी आत्मसात करून मगच आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेचा विचार करून पूर्ण करावी. सोशल लाइफच्या नादी लागून आपल्या खऱ्याखुऱ्या आयुष्याची वाताहत होणार नाही, याची काळजी ज्याची त्याने घ्यायलाच हवी.
ट्रेकिंग हे शंभर टक्के सुरक्षित नाही. आज ट्रेकिंग ही गरज नसून अट्टहास बनला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मुलं आई-वडिलांना, घरच्यांना न सांगताच ट्रेकिंगला जातात, कारण त्यामागे इतर दोस्त करतात म्हणून मीही, हा हट्ट आहे. पण.. ट्रेकिंगसाठी माझं रिस्क मॅनेजमेंट वेगळं असून इतरांचे वेगळे आहे हे समजून घ्यायची गरजच त्यांना वाटत नाही. ट्रेकिंगला जाताना त्या ठिकाणी मज्जा, मस्ती, चेष्टा-मस्करी चालते मग अपघात होतात. टेकडीवर हेडफोन्स लावून गाणी ऐकत ट्रेकिंग करतात, तर नेटवर्कसाठीही वाट्टेल त्या ठिकाणी जातात. मग बेपत्ता होतात. इतरांवर इम्प्रेशन म्हणूनही जातात. सेल्फी काढतात, या गोष्टी किती धोकादायक आहेत याचा विचार नसतोच. ही एक अॅक्टिव्हिटी आहे, जीवनावश्यक अॅक्टिव्हिटी नाही. जे सुखरूप ट्रेकिंग करून येतात, त्यांनीही सुरक्षितता बाळगलेली असते, त्यांच्याकडे अनुभवही असतो. इथे तरुणाई हा विचार करत नाही आणि अपघातांना बळी पडते. दर वीकेण्डला कोणाला ना कोणाला तरी अपघात होतोच, त्यामुळे ट्रेकिंग जितकं गंभीररीत्या पाहायला हवं तितकं पाहिलं जात नाही.
– सतीश मराठे, गिरीदर्शन ट्रेकर्स, पुणे</p>
viva@expressindia.com