निलेश अडसूळ
कोणत्याही कलेत असलेले ‘प्रायोगिकत्व’ हाच त्या कलेचा आत्मा असतो. मग ती पाककला असो, लोककला असो, गीत – नृत्य – नाटय़ वा ललितकला. रसिकांच्या मनाला स्पर्शून जाण्यासाठी त्यात काही तरी वेगळेपण असावेच लागते. म्हणजे मिसळ विकणारे लाख असतील, पण अमूक एकाचीच मिसळ चांगली असे आपण ठामपणे सांगतो कारण त्यात वेगळेपण जाणवत असते. चित्रकलेच्या बाबतीत सांगायचं झालं तर या कलेचं अवकाश अगदी विस्तीर्ण आहे म्हणजे इथे सूत्राचे बंधन नाही, पण आपण केलेला आविष्कार उद्याचे सूत्र नक्कीच ठरू शकते. एखादा कलाविष्कार किंवा संकल्पना मूर्त रूपात आणताना साधारण रंगापासून ते कल्पकतेचं क्षितिज गाठेपर्यंत जे जे प्रयोग करता येतील त्या सर्व प्रयोगांचा सहज समावेश चित्रकलेत होतो.
डॉक्टर, इंजिनीयर किंवा गेला बाजार एमबीए वगैरे करणाऱ्यांची संख्या आपल्याकडे काही कमी नाही. पण कलेशी एकरूप होऊन त्यात काही तरी नवता आणणारे असे तुरळक हातच आपल्याला दिसतील. त्यातही पारंपरिक चित्रकलेच्या पलीकडे जाऊन काही तरुणांनी कल्पकता आणि तंत्रज्ञानाच्या बळावर विविध संकल्पनांना मूर्त रूप दिले आहे. या प्रायोगिकत्वाच्या पालखीचे भोई होऊ पाहणाऱ्या तरुणांपैकीच एक म्हणजे अमोल पाटील. अमोलचे शिक्षण मुंबईतल्या ‘रचना संसद’ महाविद्यालयातून झाले असून सध्या ऑब्जेक्ट कायनेटिक वर्क , ड्रॉईंग्ज, व्हिडीओ इन्स्टॉलेशन, परफॉर्मिग आर्ट्स अशा विविध माध्यमातून तो प्रयोग करतो आहे. त्यापैकी ‘कायनेटिक’ या प्रकारात त्याने काही विशेष प्रयोग केले आहेत. या प्रकारात विविध वस्तूंचा वापर करून एक रूपकात्मक पण तितकीच अर्थपूर्ण वस्तू तयार केली जाते. नुकतेच दिल्लीतील एमएमबी इन्स्टिटय़ूशनमध्ये त्याचे प्रदर्शन पार पडले. त्यासाठी त्याने ‘हायब्रीड सिटी – गेझ अन्डर युवर स्किन’ हा विषय निवडला होता. ज्यामध्ये शहरीकरणात हरवलेला सामान्य माणूस, सिमेंटची वाढती जंगलं आणि जागतिकीकरणाच्या वेगात नात्यांची होणारी वाताहत अशा मुद्दय़ांना अधोरेखित करत त्याने काही कलाकृती तयार केल्या होत्या. त्याच्या मते, कला ही अभिव्यक्तीचे असे माध्यम आहे ज्याद्वारे आपण समाजाच्या व्यथा आणि मानवी नात्यांचा आविष्कार अधिक स्पष्टपणे मांडू शकतो. जेव्हा एखादी कलाकृती आकाराला येते तेव्हा ती कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरती किंवा समूहापुरती असता कामा नये. याउलट सामान्यातील सामान्य माणसाला ती आपली वाटायला हवी. आणि या अशाच कलाकृती घडवण्याचा माझा प्रयत्न असतो, असे तो सांगतो. या क्षेत्रातील संधींविषयी मात्र अमोल वास्तव समोर आणण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मते, प्रयोग करत राहणं आणि त्यातून पैसे मिळवणे यासारखी कठीण बाब नाही. कारण इथे तुम्ही किती बोलताय याला महत्त्व नसते. तुमचे काम अधिक बोलके असायला हवे. ते असेल तरच संधी उपलब्ध होतात. आणि या क्षेत्रात काम करताना प्रत्येकाकडून काही तरी शिकण्याची तयारी असायला हवी आणि जनसंपर्कही तितकाच दांडगा हवा, असे अमोल सांगतो. येत्या जून-जुलै महिन्यात त्याचे ‘पॉलिटिक्स ऑफ स्किन’ हे प्रदर्शन स्वीडन आणि जपानमध्ये होणार आहे. ज्यामध्ये त्याने कामगार वर्गाच्या व्यथा मांडल्या आहेत. माहूल येथील औद्योगिक वसाहत, तिथल्या वातावरणाचा लोकांवर होणारा परिणाम, स्वच्छता कामगारांचे प्रश्न अशा अनेक मुद्दय़ांना घेऊन तो हे प्रदर्शन करणार आहे.
पुण्यातील सौरभ चांदेकर याने चित्रकलेला तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. ‘अभिनव कला महाविद्यालया’तून उपयोजित कलाशाखेचे (applied art) शिक्षण घेतलेला सौरभ सध्या डिजिटल पेंटिंग आणि कॅलिग्राफीमध्ये काही अभिनव प्रयोग करतो आहे. फाईन आर्ट्स आणि अप्लाईड आर्ट्स यांच्यात काहीसे भेद आहेत. फाईन आर्ट्स ही अभिव्यक्तीचा सर्वोच्च आविष्कार आहे, तर अप्लाईड आर्ट म्हणजे लोकांची मागणी समजून केलेली अभिव्यक्ती होय. ज्याचा आज संवाद माध्यम म्हणून किंवा जाहिरातींसाठी मोठा वापर होतो आहे, असे सौरभ सांगतो. पूर्वी डिजिटल माध्यमांमध्ये एखादे चित्र आणताना ते आधी कागदावर रेखाटावे लागत असे. मग काही संगणकीय प्रक्रिया करून त्याला डिजिटल रूप दिले जायचे. परंतु आता प्रगत तंत्रज्ञानामुळे हेच चित्र थेट संगणकावर किंवा आयपॅडसारख्या उपकरणावर काढणे शक्य झाले आहे. याला illustration (चित्रांकन) असे म्हणतात, परंतु ते तितके सहज शक्य नाही, त्यासाठी मूळ चित्रकलेची बैठक आणि साधना पक्की असणे गरजेचे आहे. आणि हीच साधना त्याला तंत्रज्ञान आणि चित्रकलेचा मेळ घालून नवनवीन प्रयोग करण्यासाठी बळ देते, असे तो सांगतो. त्याच्या कामासाठी आजवर त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०२१ मध्ये सौरभचे पहिले स्वतंत्र आंतरराष्ट्रीय प्रदर्शन लंडन येथे भरवण्यात येणार आहे त्यासाठी त्याने ‘दंभ’ हा विषय निवडला आहे. आपापसातील संवादात असलेला दंभ, त्याचे परिणाम, तो कसा कमी करायचा याचे रेखाटन तो आपल्या चित्रातून करणार आहे. ‘पीपल्स प्रिटेंड आर्ट रीविल्स’ असे या प्रदर्शनाचे शीर्षक असेल. या क्षेत्रातील आर्थिक बाजूविषयी सौरभ सांगतो, डिजिटल चित्रांना किंवा उपयोजित कला पद्धतीला जाहिरात क्षेत्रात आज मोठी मागणी आहे, परंतु इथे लोकांच्या मागणीनुसार जे मांडायचे आहे ते ‘नेमके’ मांडता यायला हवे. त्यासाठी कलाकाराने प्रचंड वाचन करावं, ऐकावं, जाणून घ्यावं आणि जे मिळेल ते आत्मसात करावं असा सल्ला तो देतो. त्याच्या मते लोकांमध्ये सहभागी होऊन जे घेता येईल त्याचा आपल्या कलेत समावेश करायला हवा, जेणे करून कलेला नवा आयाम मिळतो. तसेच ‘कला आणि कलाकार’ या शब्दांशी निगडित असलेली जुनी परिमाणे सोडून आता नव्या संकल्पना, नवे तंत्र आणून प्रयोग करणे गरजेचे आहे, तरच कलेतील आपले वेगळेपण आपल्याला सिद्ध करता येईल.
‘सर जे. जे. महाविद्यालयातील कुमार मिसाळला पोट्र्रेट पेंटिंगसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु या पारंपरिक चित्रात न अडकता काही तरी नवीन करण्याच्या तो शोधात असतानाच, त्याच्या उत्तम कामगिरीमुळे त्याला महाविद्यालयाकडून ‘प्रिंट मेकिंग’च्या प्रशिक्षणासाठी केरळला पाठवण्यात आले. या प्रवासादरम्यान त्याला पारंपरिक पद्धतीने कागद कसा तयार करतात याचे तंत्र अवगत झाले होते. मुंबईत परतल्यावर त्याने याच तंत्रावर विविध प्रयोग सुरू केले. आणि शेतीतील टाकाऊ वस्तूंपासून कागद तयार करण्याचा त्याचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला. त्याचे बालपण गावी गेल्याने आपल्याकडे असलेल्या मूळ शेतीविषयक ज्ञानाचाही त्याला यात उपयोग झाला. कुमारच्या मते, समोर असलेले ऑब्जेक्ट चित्रात उतरवण्यापलीकडे जात चित्रकलेत सतत नवीन प्रयोग करत राहायला हवे. कारण चित्रकलेचे पारंपरिक प्रकार कलाशिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला सक्तीने अभ्यासावेच लागतात. म्हणूनच अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आपण काय वेगळं देऊ शकतो याचा विचार प्रत्येक कलाकाराने करायला हवा, असे तो सांगतो. कुमार सांगतो, शेतीतील टाकाऊ माल वापरून कागदाचे पान बनवण्याच्या प्रयोगावर अनेकांनी टीका केली, यात काही वेगळेपण नाही असेही सांगण्यात आले. परंतु मी हार मानली नाही. त्यावेळी एक विचार आला की, पारंपरिक पद्धतीने पान तयार करून त्यावर रंगांनी चित्र काढण्यापेक्षा नैसर्गिक घटकांचेच रंग वापरून चित्र तयार करता येईल. आणि या प्रयोगावर अभ्यास सुरू झाला. त्यासाठी त्याने शेतीतील पदार्थामध्ये आढळणारे घटक, त्यातील विज्ञान आणि कला शास्त्राची सांगड घातली. शेण, चारा, केळीची पानं- फुलांच्या पाकळ्या अशा अनेक गोष्टीतील फायबर वापरून रंग तयार केले. आणि हे सर्व रंग एकत्र करून असे कागदी पान तयार झाले की त्याला चित्ररूप प्राप्त झाले. थेट कागद तयार करतानाच त्यावर चित्र रेखाटण्याचा हा प्रयोगही यशस्वी झाला. आता पुढे याच तंत्रावर कोल्हापूर येथील कुंभोज या त्याच्या गावी तो अधिक सखोल अभ्यास आणि प्रयोग करतो आहे. ही चित्रपद्धती म्हणजे टाकाऊ शेतीमालाच्या किंवा नैसर्गिक फायबरयुक्त कचऱ्याचे उत्तम व्यवस्थापन असल्याचे कुमारचे म्हणणे आहे.
ग्रामीण जीवनातील व्यथा आणि शहरीकरणाची कैफियत एकाच वेळी अनुभवलेला सचिन बोंडे आपल्या कलेला प्रयोगांच्या माध्यामातून ‘सामाजिक-राजकीय’ छटा देतो आहे. ‘ऑइल पॉलिटिक्स’ हे त्याचे आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय प्रदर्शन ठरले आहे. सचिन सांगतो, ग्रामीण जीवनात बालपण गेल्याने रॉकेलसाठी रेशनच्या दुकानात लागणाऱ्या रांगा, तिथे होणारं राजकारण ते जागतिक स्तरावर होणारं तेलासाठीचं राजकारण या सगळ्याचा परामर्श त्याने या कलाकृतीत घेतला आहे. असे आविष्कार घडवताना तो काही मानवनिर्मित वस्तूंना आकार देऊन रूपकात्मक कलाकृती उभी करतो, ज्याचे अनेक समकालीन आणि वास्तवदर्शी अर्थ आपल्याला लागत जातात आणि हेच त्याच्या प्रयोगांचे वैशिष्टय़ आहे. ‘जे. जे. महाविद्यालया’तून बाहेर पडल्यानंतर परंपरागत आलेल्या चित्रकलेत अडकून राहण्यात त्याला फारसा रस नव्हता म्हणून कल्पकतेच्या जोरावर त्याने हे प्रयोग सत्यात उतरवले. त्याच्या मते, चित्रकारिता म्हणजे फक्त ब्रश आणि कागद नव्हे. तर त्या पलीकडे जाऊन तुम्हाला जे पाहता येईल, जे अनुभवता येईल त्याला मूर्त रूप आणणे म्हणजे चित्रकारिता होय.
त्याच्या तेलाचे राजकारण या विषयातील कलाकृतीचे वैशिष्टय़ म्हणजे सामान्यजनांच्या रोजच्या वापरातलं घासलेट, दिवे, कं दील, जगाचा नकाशा, त्यावरचे तेलाचे डाग, शेल्फवर मांडलेल्या अत्तरांसारख्या छानशा कुप्यांमध्ये निरनिराळी इंधन तेलं, उंट (अरब देश) आणि हत्ती (आसाम) हे तेल सापडणाऱ्या प्रदेशांतले प्राणी.. बुद्धिबळाचा पट आणि त्यावरचा शह-काटशहाचा खेळ आणि थेट इराक युद्धात वगैरे वापरली गेलेली विमानं.. अशा प्रतिमा सचिनने वापरल्या आहेत. यातून त्याचा विषयावरचा अभ्यास आणि वस्तूंमध्ये शोधली गेलेली समर्पकता दिसून येते. मुंबई-पुण्यापासून ते देशभरातच नव्हे तर परदेशातही सचिनच्या प्रदर्शनाची वाहवा झाली आहे. असा प्रयोगात्मक चित्रभाषेतून बोलणारा सचिन या क्षेत्राविषयी सांगतो, आपण कलाकार झालो म्हणजे आपल्याला काम मिळेलच असे नाही. इथेही आता स्पर्धा वाढली आहे, त्यामुळे या क्षेत्रात स्ट्रगल अटळ आहे. परंतु जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन आणि नेमकं काय पाहावं हे कळलं तर प्रत्येक कलाकृतीला वेगळेपण आपोआपच येत जातं. समाजमाध्यमं किंवा इंटरनेटवरून या गोष्टी उचलता येत नाहीत. इथे टिकायचे असेल तर तुमच्या प्रायोगिकतेलाच महत्त्व आहे, असेही तो विशद करतो.
थोडक्यात कोणतीही कला आत्मसात करताना त्यात स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी, त्या मूळ कलेचा गाभा तसाच ठेवून त्यातील पारंपरिक मांडणीला छेद देणे गरजेचे आहे. यातून मूळ कलेला धक्का लागत नाही, तर ती अधिकच समृद्ध आणि विस्तृत होत जाते. असाच काही कल्पनांना छेद देत विविध प्रयोगांच्या माध्यमातून या अवलियांनी नव्या संकल्पनांची रुजवात केली आहे. एवढेच नव्हे तर आखीव चौकटी ओलांडून चित्रकलेत सुरू असलेले हे नवे प्रयोग नव्या कलाकारांसोबत पुढेही असेच सुरू राहणार आहेत!
viva@expressindia.com