मितेश रतिश जोशी
२७ फेब्रुवारी हा दिवस ‘मराठी राजभाषा दिवस’ म्हणून साजरा करण्याची आपली जुनी परंपरा आहे. शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने अनेक मराठी कुटुंबे परदेशात स्थायिक झाली आहेत. मग तिथले तरुण तुर्क त्यांचं मराठी भाषाप्रेम कसं जपतात, हे जाणून घेण्याचा ‘व्हिवा’चा हा विशेष प्रयत्न..
आपल्या आजूबाजूला आज परदेशी भाषा शिकून बाहेरगावी स्थायिक होण्याचा मोठा ट्रेंड आलेला आहे; पण आपलीच मातृभाषा परदेशात मोठय़ा प्रमाणात शिकवण्याचं काम पुण्यातील कांचन श्रीकांत कुलकर्णी करत आहे. डेक्कन जिमखाना मॉडर्न हायस्कूल आणि त्यानंतर मॉडर्न कॉलेजमधून शिक्षण पूर्ण झाल्यावर कांचन अमेरिकेत गेला तो कायमचाच. सध्या तो प्लेनो टेक्सास येथे आहे. या सगळ्या कामाची माहिती सांगताना कांचन म्हणतो, ‘‘प्लेनोमधील मराठी भाषेचा वर्ग २००५ साली मी माझ्या घरी सुरू केला. सुरुवातीला साधारण १० ते १२ मुलं होती. वय वर्षे ६ च्या आतली आणि ६ च्या वरची. हळूहळू प्रतिसाद वाढत गेला. आता बृहन्महाराष्ट्र मंडळ आणि भारती विद्यापीठ यांच्याबरोबर काम करून मराठीची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी मराठी शिकवण्याचे वर्ग चालतात. मराठीचे पहिली ते पाचवी असे वर्ग आहेत. साधारण १२५ मुलं फक्त प्लेनो मराठी शाळेत आहेत. २२ शिक्षक आहेत आणि रविवारी सकाळी ९ ते १२ या वेळात हे वर्ग घेतले जातात. डॅलसमध्ये अशी अजून एक शाळा आहे. या वर्षी अजून एक चांगली गोष्ट झाली आहे ती म्हणजे प्लेनो, फ्रिस्को, कॉपेल इ. शाळांमध्ये मराठीला आंतरराष्ट्रीय भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लेखी आणि तोंडी परीक्षा देऊन कॉलेज क्रेडिट्स मिळवता येतील. कॉलेज प्रवेशासाठी याची मदत होईल. यासाठी माझ्यासोबत मंदार गंधे, वैष्णवी आपटे यांनी प्रयत्न केले.’’ मातृभाषेसाठी काम करताना, मातृभाषा परदेशात शिकवताना मिळणारा आनंद फार वेगळा आहे. त्याचबरोबर मुलं मराठी कमी बोलतात, त्यामुळे न चिडता संयम दाखवून मुलांना बोलतं करावं लागतं. वेगवेगळे खेळ, कोडी घालून मुलांनी मराठीत उत्तर द्यावं यावर आम्ही भर देतो. त्यामुळे बऱ्याच वेळा मजेदार प्रसंगही घडतात. मुलांना म्हणायचं एक असतं, पण म्हणतात वेगळंच .. उदा. दरी, दारी, दोरी हे आणि असे शब्द खूप जवळचे असल्यामुळे मुलांचा गोंधळ उडतो, पण ते प्रयत्न करतात, असे अनुभवही त्याने सांगितले.
पक्का ठाणेकर असलेला, पण नोकरीच्या निमित्ताने दुबईत स्थलांतरित झालेला आशीष कल्पना शरद काळकर हा ‘स्मरणचित्र’ नावाचा ब्लॉग दुबईतून लिहितो. मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केलेल्या आशीषने आर्किटेक्चरमध्ये प्रथम क्रमांकाने पदवी प्राप्त केली आहे. दुबईतल्या ७० वर्षे जुन्या कंपनीमध्ये सध्या तो सीनियर आर्किटेक्चर कन्सेप्ट डिझायनर आहे. शाळेत चौथीला असताना दूरदर्शनवरच्या ‘आजचा दिवस गमतीचा’ या बालकथेवर आधारित मालिकेमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबरोबर काम करण्याची त्याला संधी मिळाली होती. त्यानंतर त्याने काही नाटकं लिहिली आणि बसवली. त्यातूनच त्याला लिखाणाची आणि रंगभूमीची आवड निर्माण झाली.आर्किटेक्चर करत असताना हौसेखातर पृथ्वी थिएटरमध्ये बॅकस्टेजसुद्धा त्याने केलं. आशीष सांगतो, ‘‘तिकिटाचे पैसे नसल्यामुळे नासीरजी, सोनाली कुलकर्णी, मकरंद देशपांडे अशांची अनेक नाटकं बॅकस्टेजला मदत करून मोबदल्यात विंगेत किंवा मागे उभी राहून बघितली. काही कारणांनी तेव्हा पूर्णवेळ नाटक आणि लिखाण करणं शक्य झालं नसलं, तरी आर्किटेक्चरसारख्या सर्जनशील व्यवसायामध्ये असल्यामुळे कलेशी असलेलं नातं घट्ट राहिलं, ही मी माझी जमेची बाजू समजतो. आज दुबईच्या माझ्या घरात अर्ध कपाट भरून वेगवेगळ्या भाषांमधली वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं आहेत. त्या सगळ्यांत प्रकर्षांने जाणवलेली बाब म्हणजे काही विषयांवर मराठी भाषेत खूप कमी लिहिलं गेलं आहे. त्याच अनुषंगाने मी अगदी काही दिवसांपूर्वी ‘स्मरणचित्रं’ नावाचा ब्लॉग सुरू के ला आहे, ज्यावर सुरुवात म्हणून मला आत्तापर्यंत भेटलेल्या आणि लक्षात राहिलेल्या विविध देशांतल्या व्यक्तींबद्दल मी लिहायला सुरुवात के ली. पुढे वेगवेगळ्या देशांच्या लोकांकडून ऐकलेल्या लोककथा, गूढकथा, नाटकं आणि त्यांच्या देशाचा इतिहास व रंगभूमीवर नित्यनेमाने लिखाण करायचा माझा मानस आहे.’’ जेव्हा जेव्हा आशीष भारतात येतो तेव्हा तेव्हा तो महाराष्ट्रातल्या लहान शहरांतल्या आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी मराठीतून संवाद साधतो. त्यांच्यापर्यंत या क्षेत्रातल्या विविध विषयांचं ज्ञान सोपं करून समजावण्याचा प्रयत्न या संवादमाध्यमातून तो गेले काही वर्षे करत आहे.
साधारण नव्वदच्या दशकात भारतातून परदेशात जाणाऱ्या मराठी मंडळींचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले होते. त्या स्थलांतराच्या झपाटय़ात जेमतेम ग्रॅज्युएशन झालेली देवयानी लग्न करून नवऱ्याबरोबर जपानसारख्या पार अनोळखी देशात येऊन पोहोचली. जपान, अमेरिका आणि मग इंग्लंड अशी त्रिस्थळी यात्रा करून सरतेशेवटी देवयानी लंडनला सेटल झाली. या सगळ्या काळात मराठी भाषेशी नाळ तिने तुटू दिली नाही, पण मराठी वाचायला मिळत नाही, ही खंत मात्र मनात सतत असे. म्हणूनच तिने इंटरनेटवर ‘मिसळपाव’, ‘मायबोली’सारख्या संकेतस्थळांवर अतिशय दर्जेदार साहित्य वाचायला सुरुवात केली. मराठी वाचण्यासाठी आसुसलेल्या देवयानीच्या मनाला तर जणू अलिबाबाची गुहाच मिळाली होती. ‘मिसळपाव डॉट कॉम’ या संकेतस्थळावर वाचता वाचता हळूहळू देवयानीने तिथे लिहायलाही सुरुवात केली. देवयानी सांगते, ‘‘या संकेतस्थळाने मला आणि माझ्यासारख्या अगणित अनिवासी भारतीयांना आपल्या मातृभाषेत व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ दिले. गेली काही वर्षे ‘मिसळपाव’च्या साहित्य संपादक मंडळामध्ये मी कार्यरत आहे. आमच्या टीममध्ये भारत, लंडन, अमेरिका अशा वेगवेगळ्या टाइम झोनमधील मंडळी आपापल्या वेळेनुसार काम करत असतात. संकेतस्थळाच्या रोजच्या संपादकीय कामांबरोबरच विविध लेखमाला आणि कथा स्पर्धा असे अनेक उपक्रम आम्ही वेळोवेळी राबवतो. ‘मिसळपाव’च्या दिवाळी अंकाची लोकप्रियता तर वर्षांगणिक अधिकाधिक वाढतेच आहे. कुठलाही उपक्रम असू देत, त्याची आखणी, नियोजन आणि अंमलबजावणी अगदी काटेकोर असावी असा आमचा कटाक्ष असतो. वाचकांपर्यंत उत्तम उत्तम साहित्य कसे पोहोचेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो. ईमेल, फोन्समुळे मी लंडनमध्ये असूनसुद्धा माझ्या कामात कधीही खंड पडला आहे, असे झाले नाही. लेखकांच्या प्रश्नांची उत्तरे असो, लेखांचे नियोजन, संपादनाचे काम असो किंवा एखाद्या उपक्रमाचे प्रमोशन, सर्व कामे विनासायास आणि वक्तशीरपणे पूर्ण व्हावीत असा आपला प्रयत्न असल्याचे तिने सांगितले.
गेल्या चार वर्षांच्या साहित्य संपादकीय काळात एका अनोख्या जगाशी देवयानीची ओळख झाली. त्याबद्दल ती सांगते, भारताबाहेर मी पहिल्यांदा जेव्हा निघाले तेव्हा वाटले की, मराठीशी असलेला आपला ऋणानुबंध संपला, पण सुदैवाने असे झाले नाही. उलट पुढच्या काही वर्षांत तो अधिकच दृढ झाला. आपल्या भाषेपासून आपण दूर जातोय की काय असे वाटत असतानाच अचानक काही तरी अकल्पित घडेल आणि एका वळणावर माझी माय मराठी मला अशी आणि इतकी कडकडून भेटेल असे मला कधी स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना तिने व्यक्त केली. मराठी भाषा टिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी मराठीत दर्जेदार साहित्य निर्माण व्हायला हवे तरच नि:संशयपणे मराठी वाचक पुन्हा वाचनाकडे वळेल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मिसळपाव’सारखी संकेतस्थळे अविरत प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नात लहानसा का होईना, पण माझा हातभार लागतोय याचा मला आनंद आणि अभिमान आहे, असे ती विशेष नमूद करते.
कोळ्यांची टोपी व पेहराव घालून संपूर्ण दुबई आगरी कोळी भाषेत बोलत पालथा घालणारा तरुण सध्या फेसबुकवर चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्याचं नाव आहे मंगेश पाटील म्हणजेच ‘दुबईकर दादूस’. मंगेशचं शालेय शिक्षण रायगड जिल्हा परिषदेच्या ‘कोकण एज्युकेशन सोसायटी’च्या शाळेतून पूर्ण झालं. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आणि मग नोकरीच्या निमित्ताने दुबई, बहरिन आणि कतार या देशांत मंगेश फिरत राहिला. एकदा तो भारतभेटीला आला होता. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, नातेवाईक व मित्रमंडळींमध्ये परदेशाविषयी विशेष आकर्षण आहे, पण त्यांची आर्थिक बाजू बळकट नसल्याने ते प्रत्यक्ष अनुभवाला मुकत आहेत. आपण त्यांना खराखुरा अनुभव नाही, पण व्हिडीओच्या माध्यमातून नेत्रसुख तर नक्कीच देऊ शकतो. त्याचसोबत आपल्या देशातील मराठी संस्कृती व भाषेच्या चळवळी त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवू शकतो, या विचाराने मंगेशने ‘दुबईकर दादूस’ या फेसबुक पेजची सुरुवात केली. दर शुक्रवारी त्याला ऑफिसला सुट्टी असते. त्यामुळे त्याने तो दिवस निवडून त्या दिवशी दुबईतल्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊन लाइव्ह व्हिडीओच्या माध्यमातून सुरुवात केली. हळूहळू त्याची लोकप्रियता त्याच्या धाकड बोलीभाषेमुळे वाढत गेली व आज त्याचे फेसबुकवर अडीच लाख फॉलोअर्स आहेत. मंगेश दादूस सांगतो, ‘‘आज या फेसबुक पेजच्या माध्यमातून वेगवेगळ्या देशांत स्थायिक झालेली हजारो मराठी माणसं जोडली गेली. आगरी कोळी बोलीभाषा व मराठी संस्कृतीचा पैलू जपण्याचं काम मी माझी नोकरी सांभाळून करतो आहे याचा मला अभिमान वाटतो.’’
मूळची पश्चिम महाराष्ट्रातल्या कराडची, पण लग्न झाल्यावर नवऱ्यासोबत जपान, मग इंग्लंड व आता जर्मनीकर झालेली श्वेतल रोहनील कदम-राजे हिचं स्वत:चं यूटय़ूब चॅनेल आहे ज्याचं नाव आहे ‘धन्य ते फॉरेन’. ऑनलाइन मार्केटिंग मॅनेजर असलेली श्वेतल तिच्या चॅनेलच्या माध्यमातून जर्मनीतील जीवनशैली, संस्कृती, शिक्षणव्यवस्था अशा अनेक विषयांबाबत माहितीपर व्हिडीओ बनवते. जर्मनीसारख्या समृद्ध देशाकडून काय शिकण्यासारखं आहे आणि काय अंगीकारणं टाळता आलं तर बरं, याबाबत हे सगळे व्हिडीओ असतात. श्वेतल सांगते, ‘‘भाषाप्रेम’ काय असतं हे मला जर्मन लोकांकडून शिकायला मिळालं. भाषेचा अभिमान असणं आणि तो अंगीकारून त्यानुसार वागणं, हे जर्मन लोकांकडून शिकावं! त्यांना प्रश्न इंग्रजीमधून विचारला तरी उत्तर ते जर्मनमधूनच देतील! मीदेखील माझ्या मातृभाषेतून चॅनेल सुरू केलं ते याच कारणामुळे. मराठी मुलामुलींना जगाबद्दल मातृभाषेतून कळावं हा एवढाच एक उद्देश होता. आपल्या भाषेतून जर्मनीतून काम करत असताना एक समाधान वाटतं, लांब राहूनही मी सगळ्यांशी संवाद साधू शकते, अशी एक भावना असते. कमेंटमध्ये जेव्हा मराठी माणूस व्हिडीओ उपयोगी ठरला किंवा माझी मुलगी नेटाने अभ्यासाला लागलीये जर्मनीला यायचं म्हणून असे अभिप्राय वाचते, त्या वेळी कष्टाचं चीज झालायसारखं वाटतं, असं श्वेतल सांगते.
केवळ हे पाच तरुणच नाही, तर यांच्यासारख्या अनेक तरुण तुर्कानी पाश्चात्त्य संस्कृतीत राहून, वेगळ्या बोलीभाषेत बोलून, अवघड नोकरीधंदा सांभाळूनसुद्धा आपल्या मातृभाषेशी असलेली नाळ जपली आहे. त्यांच्यामुळे आज परदेशातही मराठीच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत..!