डॉ. अपूर्वा जोशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या व्यवसाय क्षेत्रात धुमाकूळ घालणारा हा ‘स्टार्टअप’ म्हणजे नक्की काय? त्याच्या संकल्पनेपासून त्याच्या विस्तारापर्यंत आणि त्याविषयीच्या कल्पना ते त्याचे वास्तव अशा वेगवेगळ्या पैलूंची ओळख प्रसिद्ध फॉरेन्सिक अकाउटिंग तज्ज्ञ आणि ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ पुरस्काराच्या मानकरी डॉ. अपूर्वा जोशी ‘सदा सर्वदा स्टार्टअप’ या सदरातून करून देणार आहेत.

सध्या ‘स्टार्टअप’ या शब्दाने व्यवसाय क्षेत्रात नुसता धुमाकूळ घातला आहे. सगळ्या वर्तमानपत्रात, इंटरनेट साईट्सवर कोणी किती पैसे गुंतवणूकदाराकडून उभे केले, कोणत्या स्टार्टअपचं व्हॅल्युएशन किती झालं याची तर सध्या स्पर्धाच सुरू आहे. कोणी स्टार्टअप विकलं? कोणी ते घेतलं? का विकलं? आणि का घेतलं? यावरच्या चर्चांचा अगदी महापूर आला आहे. रिटेल क्षेत्रात तर ‘स्टार्टअप’ या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे आणि आता तर ‘वॉलमार्ट’ने ‘फ्लिपकार्ट’ विकत घेतल्यामुळे रिटेल क्षेत्रात नुसतं उत्साहाला उधाण आलं आहे.

भारत सरकार पण सध्या स्टार्टअप या संकल्पनेला खतपाणी घालतं आहे, आजूबाजूच्या सगळ्या लोकांना स्टार्टअप या विषयावर बोलताना पाहून मला खरंच प्रश्न पडतो की स्टार्टअप म्हणजे नक्की आहे तरी काय? जेव्हा मी ‘स्टार्टअप’ हा शब्द ऐकते तेव्हा माझे मन त्वरित बंगलोरमधल्या कुठल्या तरी रेट्रो ऑफिसमध्ये रुंजी घालून येते. मध्यरात्री बिअर पिणे, त्यांनी नुकत्याच विकत घेतलेल्या पुस्तकांबद्दल, ग्रीक व रोमन संस्कृतीबद्दल हसत गप्पा मारणे आणि त्यांच्या उद्योजक गुंतवणूकदाराच्या कामगिरीबद्दल किंवा त्याने केलेल्या कारवायांबद्दलच्या गप्पा मारणे, या अशा सगळ्या गोष्टी डोळ्यासमोरून तरळून जातात. पण वास्तव काही वेगळेच असते.

‘स्टार्टअप’ हा व्यवसायाचा असा प्रकार असतो जो कोणता तरी अस्तित्वात असलेला महत्त्वाचा प्रश्न सोडवत असतो, त्यासाठी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेत असतो, व्यवसाय चालेल किंवा नाही याची कोणतीही शाश्वती व्यवसाय करणाऱ्याला नसते. स्टार्टअपमध्ये काम करणाऱ्यांसाठी हा मटका असतो, लागला तर कोटय़वधींचा. अनिश्चिततेचं दुसरं नाव ‘स्टार्टअप’ असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.

सध्या जनमानसात एक समज रूढ होत चालला आहे तो म्हणजे इंटरनेटद्वारे काहीही सुरू केलं की त्याला ‘स्टार्टअप’ म्हणतात. ‘फ्लिपकार्ट’, ‘मिंत्रा’, ‘जबॉंग’, ‘बिग बास्केट’मुळे इंटरनेटवरून करायच्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले खरे, पण स्टार्टअप म्हणजे निव्वळ इंटरनेट नव्हे, कोणताही व्यवसाय जो समाजाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवू शकतो त्याला आपण ‘स्टार्टअप’ म्हणू शकतो. शहरीकरणाच्या रेटय़ात पेट्रोल पंपावर पण गर्दी होऊ लागली आहे, मग जर कोणी घरपोच पेट्रोल देण्याचा व्यवसाय सुरू केला तरी त्याला स्टार्टअप म्हटलं जाऊ  शकतं.

जेव्हा ‘फ्लिपकार्ट’ने व्यवसाय सुरू केला तेव्हा ते फक्त दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह करून विकत होते, दुर्मीळ पुस्तक वाचायला मिळणं ही त्यावेळी एक मोठी समस्या होती. शहरीकरणाच्या रेटय़ात जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढायला लागली, काही ठिकाणी दर्जेदार माल मिळायचा तर काही ठिकाणी स्वस्त, काही गोष्टींसाठी घासाघीस करावी लागत असे, काही वस्तू राज्याच्या ठरावीक भागांतच उपलब्ध असायच्या तर काही उत्पादनांचा गंधही ग्रामीण ग्राहकाला नव्हता, कमी किमतीत हवा असलेला आणि दर्जेदार माल मिळवताना ग्राहकाची पुरती तारांबळ उडत असे.

सचिन आणि बिन्नी बन्सलांच्या मारवाडी नजरेने हा प्रश्न अचूक हेरला आणि ‘फ्लिपकार्ट’ने मोठय़ा खुबीने लोकांना स्वत:च्या पदरचे पैसे टाकू न, जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन, इंटरनेटवरून जीवनावश्यक वस्तू रास्त दरात खरेदी करायची सवय लावली आणि इथून खरी सुरवात झाली ‘स्टार्टअप’ ही संज्ञा प्रसिद्ध व्हायला. ‘फ्लिपकार्ट’चा जन्म बंगलोरला झाला त्यामुळे बंगलोरला नवउद्यमींच्या हृदयात मोठं स्थान प्राप्त झालं.

बंगलोर ही स्टार्टअपसाठी स्वप्नभूमी बनून गेली, व्यवसाय सुरू करण्यापासून ते अगदी गुंतवणूकदार मिळवण्यापर्यंत सगळ्या गोष्टी इथे सहज उपलब्ध आहेत. पण तरीही यात हाताच्या बोटावर मोजता येतील एवढय़ाच स्त्रिया सध्या स्टार्टअपच्या मालक म्हणून सक्रिय आहेत. एका पाहणीनुसार स्त्रियांनी सुरू केलेल्या स्टार्टअप्सपैकी २ टक्केच स्टार्टअप्सना गुंतवणूक उभी करता येते. त्यांनी सुरू केलेल्या कंपन्यांना इतर कंपन्यांच्या तुलनेत ५० टक्केच गुंतवणूक दिली जाते आणि एकूण स्टार्टअप सुरू केलेल्या लोकांपैकी फक्त १३ टक्के स्टार्टअप्स हे स्त्रियांनी सुरू केलेले असतात. लिंगभेदामुळे महिलांना नवउद्यमी बनण्यात अनेक अडथळे आले, पण या सगळ्या खेळात दशकभरात एक नवीन गोष्ट समोर आली ती म्हणजे सचोटी. महिला स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक के ल्यावर फार कमी वेळेस गुंतवणूकदारांचे पैसे बुडाले. महिला नवउद्यमींमध्ये ही सचोटी फार मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळते.

श्रद्धा शर्मा किंवा फाल्गुनी नायर अशा काही थोडक्या स्त्रियांची यशोगाथा मला एक स्त्री म्हणून महत्त्वाची वाटते. श्रद्धा शर्माच्या ‘युस्टोरी’मध्ये वाणी कोला या महिला गुंतवणूकदारानेच पैसे लावले आहेत. आता काळ बदलतो आहे, काळासोबत महिलांचे प्रश्नदेखील बदलत आहेत आणि या प्रश्नांना उत्तरंदेखील मिळत आहेत.

महाराष्ट्रात आज अनेक नवउद्यमी आपल्याला दिसून येतात. त्यांच्या कथा या बेंगळुरू किंवा गुरगावातल्या उद्यमींपेक्षा नक्कीच वेगळ्या आहेत. आपल्या मातीतूनदेखील अनेक नवउद्यमी घडत आहेत. पुणे मुंबई, कोल्हापुरात नवउद्यमींना साथ देण्यासाठी इको सिस्टिम बनवल्या जाताहेत. या सर्वात स्त्रियांनी मागे पडू नये, हाच माझा या लेखनामागचा उद्देश आहे.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article on start up business abn
First published on: 03-01-2020 at 04:18 IST