विपाली पदे

सर्व सद्गुण हे सोन्याच्या ठिकाणी विराजमान असतात असं म्हणतात. आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याचं महत्त्व मोठय़ा प्रमाणात आहे. सोन्याचे खरे तेज डोळ्यांत भरते ते म्हणजे स्त्रियांचे सौंदर्य खुलवणाऱ्या विविध दागिन्यांमुळे आणि त्यांच्या प्रकारांमुळे. गेल्या काही वर्षांत ऐतिहासिक मालिका किंवा चित्रपटांमधून सातत्याने पारंपरिक दागिने लोकांसमोर आले असल्याने सोन्याचे पारंपरिक दागिने घडवून घेण्याकडे कल वाढतो आहे. हेच ओळखून ज्वेलर्सनीही तरुणवर्गाची पसंती लक्षात घेत जुन्या दागिन्यांना नवा साज चढवत सणासुदीच्या निमित्ताने ही पारंपरिक फ्युजन कलेक्शन्स बाजारात आणली आहेत..

सध्याच्या काळात दागिन्यांमध्ये रोज नवनवीन प्रकार येत आहेत. या दागिन्यांची फक्त नावं बदलून त्यात कलात्मकता आणून ग्राहक वर्गाला सोन्या-चांदीच्या पेठा तृप्त करत आहेत. दिवाळीसारख्या सणाच्या निमित्ताने दागिन्यांमध्ये कितीही नवीन प्रकार येत असले तरी पारंपरिक दागिनेच आजही मोठय़ा प्रमाणात विकत घेतले जातात. आजकालच्या ‘रेट्रो थीम’मध्ये गणले जाणारे हे दागिने असले तरी लग्नात पेशवेकालीन पेहेराव असला की या दागिन्यांची खरेदी होतेच. त्यामुळे दिवाळीपासून ते लग्नसमारंभापर्यंत या पारंपरिक दागिन्यांना पुन्हा एकदा महत्त्व प्राप्त झाले आहे.

या पारंपरिक दागिन्यांचे प्रकार अगणित आहेत. सध्या त्या दागिन्यांमध्ये खास प्रचलित असलेले दागिने म्हणजे गळ्यातील ठुशी, सरी, मोहनमाळ, पोहेहार, लफ्फा, तन्मणी, चंद्रहार, लक्ष्मीहार, मंगळसूत्र, जोंधळीपोत, कं ठी, गोफ. हातात साजेशा पिछोडा, गोठ, पाटल्या, तोडे, बांगडय़ा. कानातील कुडय़ा, झुंबर, बुगडी. पायातील जोडवी, मासोळ्या, विरवल्या, तोडे, पैंजण, नाकात शोभून दिसणारी नथ, चमकी, त्याचप्रमाणे बाजूबंद असे असंख्य प्रकार आज सोन्याच्या पेठांमध्ये पाहायला मिळतात. हे सोन्याचे दागिने आकर्षक वाटावेत म्हणून त्याला हिरे, मोती इतर रत्ने यांनी सुशोभित केले जाते. पारंपरिक दागिना, त्यावर नवीन नक्षीचा साज असा प्रकार सध्या अनेक ज्वेलर्सनी आणलेल्या कलेक्शनमध्ये पाहायला मिळतो आहे.

‘वामन हरी पेठे ज्वेलर्स’ने त्यांच्या दागिन्यांच्या लोकप्रिय अशा ‘नावीन्य’ कलेक्शन अंतर्गत लक्ष्मी, तन्मणी, बाजूबंद, ठुशी, मंगळसूत्र, नथ हेच पारंपरिक दागिने प्रामुख्याने आणले आहेत. तरुण मुलींना, स्त्रियांनाही हे पारंपरिक दागिनेच भावतात असा आमचा अनुभव आहे. मात्र ठुशी-नथ किं वा तन्मणी असे दागिने त्यांच्या आई-आजीकडेही त्यांनी पाहिलेले असतात. त्यामुळे या दागिन्यांमध्ये आम्हाला नवं काय मिळेल, असा त्यांचा प्रश्न असतो. हे नावीन्य घडणावळ, कलाकुसर यातून देत नावीन्य कलेक्शन आम्ही करतो, अशी माहिती वामन हरी पेठे ज्वेलर्सचे संचालक आशीष पेठे यांनी दिली. आताही त्यांनी ‘नावीन्य हस्तपर्ण’ हे नवीन कलेक्शन बाजारात आणले आहे. ज्यात ब्रेसलेट, चेन, हस्तकमल, बाजूबंद, हस्तपंजा इत्यादी हातातील दागिन्यांना असलेले ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन ते फ्युजन पद्धतीने घडवण्यात आले आहेत. मुघलांचा वारसा असलेले हे हातात घालायचे दागिने शाही घराण्यांमध्ये परिधान केले जात असत. मोठे खडे आणि सुबक नक्षीकाम असलेले हे दागिने तरुणाईत विशेष लोकप्रिय असल्याने सणासुदीला खास आभूषणे म्हणून हस्तपर्ण कलेक्शन आणले असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, ‘नावीन्य नथ’ हा देखील एक नवीन प्रकार त्यांनी बाजारात आणला आहे. यात त्यांनी प्रामुख्याने पूर्वापार घालत असलेल्या नथ या दागिन्याची सांगड आजच्या काळातील मॉडर्न तरुणीशी घातलेली आहे. या दागिन्याचा मूळ साचा तोच असून फक्त तो घडविण्यात बदल केलेला आहे. मोराची वगैरे डिझाइन वापरून त्याला हटके रूप दिले आहे. पारंपरिक दागिन्यांच्या प्रकाराला नवीन नक्षीचा साज चढवण्याचा प्रकार हा सध्या बाजारात असलेल्या सगळ्याच ज्वेलर्सच्या कलेक्शनमध्ये दिसून येतो आहे.

‘कल्याण ज्वेलर्स’नेही ‘मुहूर्त कलेक्शन’ नावाचे नवीन कलेक्शन सादर केले आहे. यात मुख्यत्वे दिवाळीच्या निमित्ताने त्यांनी रुबी आणि पन्ना यांच्या साहाय्याने आकर्षक फ्लोरल डिझाइन्सने दागिने घडवले आहेत. रुबी आणि पन्नाचा वापर करून घडवलेले हे दागिने केवळ नऊ वारी साडीसारख्या पोशाखावर नाही तर इंडो वेस्टर्न पोशाखावरही तितक्याच सुंदरतेने उठून दिसतात. त्यामुळे सोन्यात घडवलेले हे खास फ्युजन दागिने यावर्षी खास पसंतीस उतरतील, असा विश्वास कल्याण ज्वेलर्सच्या सूत्रांनी व्यक्त केला. पारंपरिक दागिन्यांचेच प्रकार ‘चिंतामणी ज्वेलर्स’नेही बाजारात आणले आहेत. फक्त पारंपरिक दागिन्यांवर अवलंबून न राहता त्यांना आधुनिक स्वरूपात सादर करणे सध्या महत्त्वाचे ठरते आहे. पारंपरिक ठुशीसोबतच कुं दनाची माळ असलेली ठुशी किंवा आजच्या तरुणींच्या सोयीसाठी बांगडय़ांच्या रूपात तयार ठुशी चिंतामणी ज्वेलर्सनी बाजारात आणली आहे. हिऱ्यांची कुडीजोड किंवा हिऱ्यांची मणिवाटी या पारंपरिक दागिन्यांनाही खूप मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

पारंपरिक दागिन्यांचा साज घेऊन आलेले हे फ्जुजन दागिने साडीप्रमाणेच इंडो-वेस्टर्न पेहरावावरही उठून दिसत असल्याने त्याची मागणी खूप वाढली आहे. याआधी सोन्याच्या दागिन्यांमध्ये नवीन काही मिळत नसल्याने इमिटेशन ज्वेलरी घेण्याकडे लोकांचा कल वाढला होता. आता मात्र पुन्हा एकदा या सोन्या-चांदीतील फ्युजन दागिन्यांना मागणी वाढली असल्याने बाजारपेठांमध्ये याच कलेक्शनची गर्दी पाहायला मिळते आहे.

viva@expressindia.com