नित्यनियमाने सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणाऱ्यांना गेल्या आठवडय़ात दीपिका पदुकोणच्या ट्विटने, नंतर लिहिलेल्या फेसबुक पोस्टने आणि त्याला देण्यात आलेल्या उत्तराने हादरून टाकले. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या वेबसाइटवर दीपिकाचा एक फोटो अपलोड करून या ‘क्लिवेज शो’ असं हेडिंग दिलं. दीपिकानं ट्विट करून या पोस्टचा खरपूस समाचार घेतला आणि तिच्या ट्विटला सर्व थरांतून पाठिंबा मिळाला. त्या वृत्तपत्रानंही मग लेख लिहून दीपिकाचा हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं. त्यावर पुन्हा वाद- प्रतिवाद झाले आणि सोशल नेटवर्किंगवरचं व्हच्र्युअल वर्ल्ड यानं ढवळून निघालं.
त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ‘माल-फंक्शन’चा मुद्दा चव्हाटय़ावर आला. ‘माल-फंक्शन’ म्हणजे अपघाताने कपडा सरकून अंगाचा काही भाग दिसणं. सोशल मीडियावर बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्रींचे काहीसं ओंगळवाणे आणि नको त्या पोझमधले फोटो फिरत असतात. असले फोटोज् कमेंट्स आणि लाईक्स मिळवत असले तरी, त्याविषयी सगळ्यांची मतं सारखी नसतात. सोशल मीडियामध्ये अशा प्रकारचे व्हिडीयोज किंवा फोटोज लोकप्रिय होण्यामागे ही तरुणाईची ‘टेस्ट’ असल्याचं बोललं जातं. पण प्रत्यक्षात काही आंबटशौकीन वगळता यात कुणी सामील नसतं. उलटपक्षी या प्रकारामुळे अस्वस्थ होणाऱ्या तरुणांची संख्या जास्त आहे. पण अस्वस्थता शब्दांतून व्यक्त होत नव्हती. दीपिकाच्या पोस्टनंतर किमान ही अस्वस्थता पुढे आली. तिनं सडेतोडपणं मांडलेला आपला मुद्दा तरुणाईला भावला. सार्वजनिक ठिकाणी अशी काही फजिती झाली, तर त्याची बातमी व्हायला लागली. सुरुवातीला केवळ गंमत म्हणून सुरू झालेल्या या प्रकाराला सोशल मीडियामुळे एक व्यापक स्वरूप मिळालं. त्यात कित्येकदा केवळ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी हे प्रकार घडवूनही आणले जाऊ लागले. त्यामुळे एखादीचा दोष नसेल तिलाही याच नजरेने पाहिलं जाऊ लागलं. गोंधळलेल्या अभिनेत्री कधी कोण फोटो घेईल याचा अंदाज नसल्याने बिचकून राहू लागल्या. मध्यंतरी एका चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी गेलेल्या परिणितीने स्टेजवरची खुर्ची पाहून ‘कदाचित मी चुकीचा ड्रेस निवडला आहे,’ असं माध्यमांसमोर मान्य केलं. तिची ही प्रतिक्रिया आगामी धोका नजरेसमोर ठेवूनच होती, हे सांगायला कोण्या तिसऱ्याची गरज नाही. व्यवसायाने फॅशन फोटोग्राफर असलेला अनिकेत आरोटेचंसुद्धा असंच काहीसं मत होतं, ‘आजच्या जगात, जे दिसतं, जे गाजतं, ते खपतं असं सूत्र चालतं. त्यामुळे कित्येक अभिनेत्री हे सर्व प्रसिद्धीसाठी करूनही घेतात. पण हे जरी आपण खरं मानलं, तरी एक फोटोग्राफर म्हणून हे प्रकार माझ्या तत्त्वात बसत नाहीत.’ थोडक्यात, या क्षेत्रात काम करणाऱ्यांपासून ते तरुणांपर्यंत प्रत्येकात या प्रकाराबद्दल असंतोष आहे. तरीही हे प्रकार घडत असतील तर नक्की का, याची एकदा उजळणी करणं गरजेचं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress deepika padukone anger tweet over cleavage news by times of india
First published on: 26-09-2014 at 01:03 IST