यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. पण मग जर प्रश्न विचारला की, यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय तर आपल्याला उत्तर देता येईल का? यशाची नेमकी आणि एकच एक व्याख्या करणं तसं अवघड आहे. पण एडविन ब्लिस यांनी यशाची एक व्याख्या केली, जी निश्चितच बऱ्याच जणांना आपलीशी वाटू शकेल. ब्लिस यांच्या मते, यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न येणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. प्रत्येक लढाई जिंकणं म्हणजे यशस्वी होणं नव्हे तर युद्ध जिंकणं म्हणजे यश मिळवणं. यशाच्या सर्वाना पटू शकेल अशा व्याख्येने सुरू होणारे आणि तिथपासून आपल्याला यशाचा नेमका मार्ग ‘आखून’ देणारे पुस्तक म्हणजे ‘यश तुमच्या हातात!’
ज्या-ज्या व्यक्तीला समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगायची आस आहे, ज्या-ज्या व्यक्ती सकारात्मकतेने जगण्याकडे पाहू शकतात अशा व्यक्तींसाठी हे पुस्तक लिहिले गेले आहे. पण नकारात्मक दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींना अगदी साध्या-साध्या गोष्टींमधून सकारात्मकतेकडे हे पुस्तक वळवते. किंबहुना ‘दृष्टिकोना’तील बदल हेच यशाचे पहिले इंगित आहे, असे शिव खेरा नमूद करतात. काही पुस्तके वाचताना आपण, प्रस्तावना, लेखकाचे मनोगत आदी बाबी बाजूला सारून वाचतो. किंबहुना पुस्तकाची ओढ तसे करण्यास भाग पाडते. पण या पुस्तकाच्या बाबतीत ही चूक करून चालण्यासारखी नाही. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, हे ‘खाऊन’ टाकायचे पुस्तकही नाही. म्हणजे एकदा वाचायला हाती घेतले आणि सर्व पृष्ठे वाचूनच खाली ठेवले, हे ‘यश तुमच्या हातात’च्या बाबतीत शक्य नाही. का शक्य नाही, हे पुस्तक कसे वाचावे, ते पुस्तक वाचताना कसे जगावे असे सर्वच मुद्दे नेमकेपणे सांगणारे हे ‘ऑल इन वन’ मार्गदर्शक आहे.
यश मिळवण्यासाठी आवश्यक अशा नेमक्या बाबी कोणत्या? शिव खेरा यांच्या मते, प्रेरणा, आत्मप्रतिष्ठा (किंवा अधिक नेमका शब्द आत्मसन्मान), परस्परसंबंध, संवादकौशल्ये, सुप्त मन, ध्येयनिश्चिती, आयुष्याची नीतिमूल्ये आणि दूरदृष्टी हे घटक यशस्वितेसाठी आवश्यक आहेत. पण हे घटक आपल्यात आहेत का, ते कसे तपासायचे, यासाठी काही प्रश्नावली आहे का किंवा निदान त्यासाठी काही निकष आहेत का असे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावतात. पुस्तकाचे वैशिष्टय़ हे की, या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे मिळतात. अगदी सोपे-सोपे निकष, लहानशाच पण नेमक्या चाचण्या आणि मुद्देनिहाय प्रश्नावल्या या पुस्तकात आहेत. पुस्तक वाचनाच्या त्या-त्या टप्प्यावर आपण त्यांची काटेकोर अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर दिलेले ‘विजेते वेगळ्या गोष्टी करीत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात’ हे वाक्यच या पुस्तकाचे मध्यवर्ती सूत्र आहे. माणसांचा प्रेरणेकडून उलटय़ा दिशेने होणारा प्रवास तसा का होतो, संयम हे अगतिकतेचे लक्षण केव्हा ठरू लागते, अशा व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यातील अडचणी दाखवतानाच त्यापासून परावृत्त कसे व्हावे याचा विचार खेरा मांडतात. यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी स्वत:मध्ये बदल घडवून आणण्यासाठी लागणारी ऊर्जा आपल्याला आपल्या सुप्त मनातून मिळते आणि त्यासाठी ‘स्व-संवाद’ आवश्यक असतो, असे खेरा यांनी सांगितले आहे. या अनुषंगाने शिव खेरा यांनी मांडलेले मुद्दे अनुभवल्यानंतर खरोखरीच आपल्यात प्रचंड सकारात्मक बदल झाले असून आपल्या व्यक्तिमत्त्वाची आपल्याच अंत:करणावर उमटणारी नैसर्गिक प्रतिमा आपल्याला बरेच काही सांगून जाते.
सवयी कशा लागतात आणि त्या कशा लावाव्या लागतात, विनोदाचा वापर जखमेवर फुंकर घालण्यासाठी कसा करता येऊ शकतो, धोका पत्करायची तयारी, नियोजनाचे दैनंदिन आयुष्यातील स्थान अशा लहान-लहान पण असंख्य धाग्यांनी आपले व्यक्तिमत्त्व शिव खेरा विणतात. बदल हे जगाचे सूत्र असतानाही शाश्वततेचे महत्त्व शेवटच्या प्रकरणात खेरा यांनी समजावून सांगितले आहे. एखाद्या लहान मुलाला त्याचे पालक जसे बोट धरून मार्गस्थ करतात अगदी तस्सेच खेरा यांनी यशाच्या मार्गावर वाचकाला आणण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं काम फक्त त्या मार्गावर ‘निश्चयी’ पावलं टाकणं इतकेच..
पुस्तक – यश तुमच्या हातात
लेखक – शिव खेरा
पृष्ठे – ३२४
मूल्य – ३१० रुपये
प्रकाशक – मॅकमिलन पब्लिशर्स इंडिया लिमिटेड
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2013 रोजी प्रकाशित
बुक शेल्फ : यशाचा कृती आराखडा
यशस्वी होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. पण मग जर प्रश्न विचारला की, यशस्वी होणं म्हणजे नेमकं काय तर आपल्याला उत्तर देता येईल का? यशाची नेमकी आणि एकच एक व्याख्या करणं तसं अवघड आहे. पण एडविन ब्लिस यांनी यशाची एक व्याख्या केली, जी निश्चितच बऱ्याच जणांना आपलीशी वाटू शकेल.

First published on: 22-03-2013 at 01:05 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review yash tumchya hatat by shiv khera