घडी बदलाची

काहीशी स्वतंत्र, बेफाम, वेगवान जीवनशैलीत अडकलेली तरुणाई सध्या करोना आणि टाळेबंदीनंतर स्वत:त बदल घडवताना दिसते आहे. 

गायत्री हसबनीस

काहीशी स्वतंत्र, बेफाम, वेगवान जीवनशैलीत अडकलेली तरुणाई सध्या करोना आणि टाळेबंदीनंतर स्वत:त बदल घडवताना दिसते आहे.  एकीकडे आपल्याला हवे तसे वागू देण्याचा हट्ट धरणारी तरुण पिढी व्यायामापासून ते आहार – वर्तनापर्यंत गांभीर्याने विचार करत असल्याचे चित्र दिसते आहे. करोनामुळे बिघडलेले आरोग्य, कामावर झालेला परिणाम, वाढते मानसिक ताणतणाव ही सगळी बिघडलेली आयुष्याची घडी नीट बसवण्यासाठी सुरू असलेल्या या धडपडीचा नुकत्याच झालेल्या ‘युवा दिना’च्या निमित्ताने घेतलेला हा आढावा..

करोना आला आणि एका वेगात धावत असलेल्या सगळय़ांच्याच आयुष्याला एकदम खीळ बसली. बराच काळ घरात अडकून पडलेल्या तरुणाईला न्यू नॉर्मल होईपर्यंत अभ्यासापासून सोशल लाइफपर्यंत सगळय़ाच स्तरावर झगडावे लागले. मोबाइल-कॉम्प्युटरच्या आभासी खिडकीतून मित्रमैत्रिणींशी संवाद साधताना, कुठेही बाहेर जायचे नसल्याने वॉर्डरोबमध्ये निपचीत पडून असलेला कपडय़ांचा ढीग, खुंटीवर अडकून पडलेल्या अ‍ॅक्सेसरीजकडे पाहात असताना आपण या संग्रहासाठी किती निर्थक धावाधाव केली याची जाणीव पहिल्यांदाच अनेकांना झाली. एकेकाळी हव्याशा वाटणाऱ्या या गोष्टी नकोशाच्या यादीत गेल्या. जिमचे गणित योगा आणि घरच्याघरी केल्या जाणाऱ्या व्यायामावर आले. अचानक आलेल्या या करोना नावाच्या आजारामुळे आपल्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल करण्याची जाणीव झालेली तरुणाई सध्या पुन्हा भारतीय आहार, वर्तनशैली याकडे वळली आहे.

पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्यावर पहिल्यापासूनच प्रभाव आहे, मात्र करोनाकाळात अनेक शारीरिक – मानसिक आव्हानांचा सामना सगळय़ांप्रमाणेच तरुण-तरुणींनाही करावा लागला. मोबाईलचे व्यसन, धूम्रपान – दारूचे व्यसन, जिमच्या सतरा भानगडी, पिबग, क्लिबग, सेल्फी, पाटर्य़ा, डेटिंग अशा वेगळय़ाच जीवनशैलीत अडकलेल्या अनेकांना आपल्या आयुष्यात बदल करावासा वाटू लागला. मित्रमैत्रिणी-नातेवाईक यांचे स्टेटस वाचून किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर ख्यालीखुशाली जाणून घेणाऱ्या तरुणाईला एकमेकांना भेटून बोलण्याची, संवाद साधण्याची तीव्र गरज भासू लागली. डेटिंग अ‍ॅपवर कोणी हॅण्डसम चेहरामोहरा शोधण्यापेक्षा डोळसपणे विश्वासू जोडीदार शोधणे गरजेचे वाटू लागले आहे. कामाची धावपळ, मग त्याच वेगात ब्यूटीपार्लर, जिम आणि फास्ट फूडवर अवलंबून राहणे तरुणाईच्या अंगवळणी पडले होते. टाळेबंदीत सुरुवातीला एकलकोंडे आयुष्य नकोसे झाल्याने ऑनलाइन गप्पाटप्पा करणे,  मोबाइलवर तासन् तास अगदी रात्रभर जागरणे करून वेबसीरिज पाहणे, वर्क फ्रॉम होममुळे सकाळी लवकर उठून लॅपटॉपवर रात्री उशिरापर्यंत काम करत राहणे यामुळे मंडळी अक्षरक्ष: चिडचिडी झाली होती. त्यातून सततचा फास्ट फूडचा  मारा आणि अपुरी झोप यामुळे  मानसिक आणि शारीरिक त्रासही पदरी पडला. या सगळय़ातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही साधणे गरजेचे असल्याचे तरुणाईच्या लक्षात आले आहे. त्यामुळे एकीकडे सकाळी लवकर उठून व्यायाम करण्यापासून ते निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याच्या दृष्टीने कितीतरी वेगळय़ा गोष्टी अनेकांनी सुरू केल्या आहेत.

खरंतर सध्या करोना असला तरी नियम अधिक शिथिल झाले आहेत. कॅफेज-हॉटेल सुरू झाले, जिमही उघडल्या मात्र जिममध्ये जाऊन केवळ सिक्स पॅक अ‍ॅब्ज बनवण्याची धडपड करणाऱ्यांची संख्या नक्कीच कमी झाली आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यही साधले जात असल्याने अनेकांनी आपल्या दैनंदिनीत योगाचा समावेश केला आहे. फास्ट फूडवर काट मारत किंवा त्यावर नियंत्रण आणत घरच्या चविष्ट जेवणाकडे तरुणाई वळली आहे. करिअर सांभाळण्याबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासाचाही साकल्याने विचार करत नवीन कला, छंद जोपासण्यासाठी प्रयत्न होऊ लागले आहेत. ‘टाळेबंदीत मी निसर्गाच्या आणि शांत प्रदेशाच्या अधिक जवळ गेलो होतो. या पॉजमुळे मला निसर्गाचा अधिक आस्वाद घेता आला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. टाळेबंदीने फिरण्याची ओढ अधिक लावली. कमी वस्तीच्या ठिकाणी किंवा हटके ठिकाणे शोधून मी फिरून आलो. ट्रेक करून आलो. टाळेबंदीत तर मी जवळपाल ८० ट्रेक केले. उक्सान लेणी, पद्मावती लेणी, शिलाटणे लेणी, गदाड लेणी, कंब्रे लेणी अशा ठिकाणी मी फिरून आलो’, अशी माहिती पुण्याच्या पंकज वाडेकर या तरुणाने दिली. लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा सगळे काही सोपे वाटत होते, पण नंतर जसा तो वाढत गेला तसतसे सतत येणारे नकारी विचार, अस्वस्थता या सगळय़ांमुळे चिडचिड खूप प्रमाणात वाढली. या सगळय़ावर उपाय म्हणून मी वाचन आणि व्यायाम या दोन गोष्टींची संगत धरली. धावपळीमध्ये तब्येतीकडे दुर्लक्ष झाले होते. घरी राहून नित्यनेमाने व्यायाम करण्याचीही सवय लावून घेतली आणि आजही या दोन्ही गोष्टी तशाच पद्धतीने सुरू ठेवल्या आहेत, असे डोंबिवलीच्या नितीन मोरे याने सांगितले.

मोबाईलवरच रमलेली तरुणाई सध्या या सोशल मीडियावरून आपले आयुष्य सगळय़ांसमोर आणताना कचरू लागली आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या विकृत घटना, गुन्हे यामुळेही मंडळी काही प्रमाणात सावध झाली आहेत. मध्यंतरी यावर एक मीमही व्हायरल झाले होते. झूमवरील किंवा कुठल्याही व्हिडीओ कॉलवरील त्या व्हिडीओ आणि ऑडिओ या दोन बटणांवर  विश्वास ठेवायला हल्ली मन कचरते अशा आशयाची मार्मिक टिप्पणी या मीममधून करण्यात आली होती. ऑफिस किंवा लेक्चरच्या निमित्ताने व्हिडीओ कॉलवर असताना बऱ्याच जणांना खाजगी गोष्टी सार्वजनिक झाल्याच्या घटनांना समोरे जावे लागले होते. त्यामुळे असे संवेदनशील प्रकार निदान आपल्यासोबत होऊ नयेत म्हणून वेळीच सावध झालेले बरे अशी भूमिकाही बऱ्याच जणांनी घेतली. त्याचबरोबर सध्या इन्स्टाग्राम, डेटा प्रायव्हसी आणि विविध अ‍ॅप्सवरील गोधळांमुळे सोशल मीडियाच्या बाबतीतही बऱ्याच जणांनी डिजिटल डिटॉक्सचा पर्याय स्वीकारला आहे. एका ठाण्यातील मैत्रिणीने सांगितले, मला टाळेबंदीत जेवढा सोशल मीडियाचा कंटाळा आला होता तेवढा याआधी कधीच आला नव्हता. आता तिथे कॉन्ट्रोव्हर्सीशिवाय काहीही होत नाही त्यामुळे मी ते सगळे बंद केले. आता त्याचा मला फारसा फरकही पडत नाही. व्हॉट्सअ‍ॅप वगळता बाकी सगळी माझी सोशल मीडिया अकाउंट्स मी बंद केली आहेत, असे तिने सांगितले.

एकंदरीतच कोणाच्या कळत किंवा नकळत घडलेल्या या बदलांमुळे तरुणाईला नव्या संधींचे आकाशच खुले झाले आहे जणू.. कोणी नवीन भाषा, नवीन कला शिकतो आहे. अनेकांनी चित्रकारितेतून स्वत:ला तणावमुक्त करण्याचा मार्ग शोधला आहे. स्क्रीनचे व्यसन सुटण्याची धडपड होऊ लागली आहे. जुनी गाणी, जुने चित्रपट पाहणे, पुस्तके वाचणे याकडे वळलेली तरुणाई घरच्यांच्याही अधिक जवळ आली आहे.  टाळेबंदीपूर्वी एका वेगळय़ा गुंतागुंतीच्या आयुष्यात अडकलेली तरुणाई हा गुंता सोडवू पाहते आहे. बदलाची ही घडी तरुणाईने अचूक पकडली आहे, यात शंका नाही.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clock change time lifestyle corona ysh

Next Story
मन:स्पंदने : मानसिक आरोग्यावर बोलू काही!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी