scorecardresearch

शास्त्रीय ‘कल्ला’कार

शास्त्रीय गायन, नृत्य आणि वादन आदी विविध शास्त्रीय कलांच्या स्पर्धामध्ये उत्साहाने सहभागी होत विद्यार्थी आपली भारतीय संस्कृती कलागुणांमधून जोपासताना दिसत आहेत.

शास्त्रीय ‘कल्ला’कार

अभिषेक तेली, लोकसत्ता

पाश्चिमात्य व निरनिराळय़ा स्पर्धाच्या साथीने आता शास्त्रीय कलांशी संबंधित स्पर्धाही आंतरमहाविद्यालयीन स्तरावर मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्या आहेत. शास्त्रीय गायन, नृत्य आणि वादन आदी विविध शास्त्रीय कलांच्या स्पर्धामध्ये उत्साहाने सहभागी होत विद्यार्थी आपली भारतीय संस्कृती कलागुणांमधून जोपासताना दिसत आहेत.

आयुष्याच्या प्रवासात महाविद्यालयीन दिवसांची मजाच काही और आहे. कॅम्पसमधील चर्चा आणि कँटीनमधला कल्ला याचबरोबर होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा हा महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या जिव्हाळय़ाचा विषय असतो. साहित्यकला, ललितकला, सादरीकरण कला आदी विविध स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळतो. एक कलाकार म्हणून त्यांची जडणघडण होते. मात्र या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धावरही पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. पाश्चिमात्य नृत्य व गायन, हिपहॉप संगीत व नृत्य, रॅप, डीजे वादन, बॉलीवूड गायन व नृत्य अशा विविध स्पर्धाची रेलचेल आपल्याला आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये गेल्या काही वर्षांत दिसून येत होती. अलीकडे हे चित्र काही प्रमाणात बदलताना पाहायला मिळतेय. पाश्चिमात्य व निरनिराळय़ा स्पर्धाच्या साथीने आता शास्त्रीय कलांशी संबंधित स्पर्धाही आंतरमहाविद्यालयीन स्तरावर मोठय़ा प्रमाणात होऊ लागल्या आहेत. शास्त्रीय गायन, नृत्य आणि वादन आदी विविध शास्त्रीय कलांच्या स्पर्धामध्ये उत्साहाने सहभागी होत विद्यार्थी आपली भारतीय संस्कृती कलागुणांमधून जोपासताना दिसत आहेत.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाचे सर्वाधिक वारे हे मुंबई शहरात पाहायला मिळतात. मुंबई विद्यापीठाचा ‘युवा महोत्सव’ असो वा सेंट झेविअर्स महाविद्यालय, के. सी. महाविद्यालय, एच.आर महाविद्यालय, रुईया महाविद्यालय, पोदार महाविद्यालय, मिठीबाई महाविद्यालय, व्ही.जी.वझे महाविद्यालय, एस.के.सोमय्या महाविद्यालय अशा मुंबई आणि उपनगरातील महाविद्यालयांमधून विविध कलांवर आधारित स्पर्धाचे आयोजन केले जाते. या स्पर्धाच्या मांदियाळीत गेल्या ५५ वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवामध्ये भारतीय शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य वादन, शास्त्रीय स्वरवाद्य वादन, भारतीय शास्त्रीय नृत्य अशा स्पर्धामधून शास्त्रीय कलांना मानाचे स्थान मिळाले आहे. याबद्दल बोलताना, ‘प्रथमत: कोणत्याही कलेचा शास्त्रशुद्ध अभ्यास असणे, अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रीय कलेसंबंधित विविध स्पर्धा युवा महोत्सवात घेत आहोत, जेणेकरून ताकदीचे कलाकार तयार होतात. शास्त्रीय कलेच्या निरनिराळय़ा प्रकारांमधून विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास होतो. अशा स्पर्धामधून विद्यार्थ्यांना भविष्यात व्यावसायिक स्तरावर काम करण्याचीसुद्धा संधी मिळते’, असे मत मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे यांनी व्यक्त केले.

सध्या तरुण पिढीला पाश्चिमात्य नृत्यांचे आकर्षण असताना, माटुंग्यातील रुईया महाविद्यालयाची तन्वी कदम ही विद्यार्थिनी भरतनाटय़म विशारद असून गेल्या १४ वर्षांपासून गुरू पवित्र भट यांच्याकडे शास्त्रीय नृत्याचे शिक्षण घेत आहे. मुंबई विद्यापीठाच्या ५४ व्या व ५५ व्या युवा महोत्सवांत तिने शास्त्रीय नृत्यात सुवर्णपदक पटकावले. आजवर मुंबईतील विविध आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांच्या शास्त्रीय नृत्य स्पर्धेचा अनुभव गाठीशी असणारी तन्वी म्हणते, ‘पूर्वापार चालत आलेल्या शास्त्रीय नृत्यकलेकडे तरुणाईचे काहीसे दुर्लक्ष झाले होते, मात्र सध्या शास्त्रीय कलांसंबंधित स्पर्धाचा मोठय़ा प्रमाणात आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये समावेश होत असल्यामुळे शास्त्रीय नृत्यकलेला एक नवी उभारी मिळाली आहे. या स्पर्धाच्या माध्यमातून मणिपुरी, भरतनाटय़म, कथकली, कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या शास्त्रीय नृत्यांच्या शैलींबाबत प्रामुख्याने तरुण रसिकांना माहिती मिळते. आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांत शास्त्रीय नृत्यासाठी दिल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांमुळे, स्पर्धकांच्या कौशल्याचा एक प्रकारे कस लागतो. आपण स्वत:मधील कला अजून अनोख्या पद्धतीने कशी मांडू शकतो, हे शिकायला मिळते’.

मुंबई-पुण्यातच नव्हे तर कोकणातही रत्नागिरीसारख्या शहरातही महाविद्यालयीन स्पर्धामध्ये शास्त्रीय गायन आणि नृत्यावर आधारित स्पर्धा आयोजित केल्या जातात. पुढे हेच स्पर्धक व्यावसायिक मैफिली वा कार्यक्रमातून आपली कला सादर करत करिअर घडवतात, अशी माहिती रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. आनंद आंबेकर यांनी दिली. ‘आमच्या महाविद्यालयात डिसेंबर महिन्यात झेप महोत्सवाच्या माध्यमातून शास्त्रीय गायन आणि नृत्य करणाऱ्या नवीन कलाकारांसाठी विशेष कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामुळे ग्रामीण भागातील आमचे विद्यार्थी सातत्याने युवा महोत्सव आणि राज्यस्तरावरील स्पर्धामधून यशस्वी ठरले आहेत, पुढे जाऊन राज्य नाटय़ स्पर्धा, संगीत नाटकांमध्येही ते सहभागी होतात. काही कलाकार मंदिरांमध्ये होणाऱ्या व्यावसायिक मैफिलीमधून उत्तम मानधन घेतात. तर काहीजण क्लासेस व व्यावसायिक समूहाद्वारे आपली कला सादर करून स्वत:चा उदरनिर्वाह करतात’, असे आंबेकर यांनी सांगितले. यंदा या महाविद्यालयाच्या चैतन्य परब या विद्यार्थ्यांने मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात शास्त्रीय गायनामध्ये कांस्यपदक आणि तन्वी मोरे हिने नाटय़संगीतमध्ये कांस्यपदक प्राप्त केले.

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामधील सहभाग विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा ठरतो याबद्दल बोलताना रुईया महाविद्यालयातील यश कुलकर्णी हा तबलावादक म्हणतो, ‘आंतरमहाविद्यालयीन स्तरावर शास्त्रीय कलांना मानाचे स्थान मिळाल्यामुळे एक तबलावादक म्हणून मला बराच फायदा होतो आहे. या स्पर्धाच्या माध्यमातून आपल्या कलेच्या सादरीकरणासाठी छान व्यासपीठ मिळते, रियाज होतो, मोठमोठय़ा परीक्षकांचे मार्गदर्शनही लाभते’. यशने युवा महोत्सव, नांदी, क्षितिज आदी विविध आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांमध्ये तबलावादन स्पर्धामधून आहे विजय मिळवला आहे. गेले ७ वर्ष तो कैलास जोशी व स्वप्निल भिसे यांच्याकडे तबला वादन शिकतो आहे. शास्त्रीय नृत्यांगना आणि कथक नृत्यात पदवी शिक्षण घेतलेली ईश्वरी कुलकर्णी ही तरुणी गेल्या अनेक वर्षांपासून विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये सादरीकरणाबरोबरच शास्त्रीय नृत्यस्पर्धाचे परीक्षणही करते. ‘आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामध्ये शास्त्रीय नृत्याचे स्थान पूर्वीपासूनच बळकट आहे, परंतु अलीकडच्या काळामध्ये शास्त्रीय नृत्याला तरुणाईचाही तितकाच प्रतिसाद मिळतो आहे ही प्रचंड आनंदाची बाब आहे. हल्ली शास्त्रीय नृत्याच्या स्पर्धेमध्ये कथक व भरतनाटय़मचे दर्जेदार स्पर्धक मोठय़ा संख्येने पाहायला मिळतात. वेळेची मर्यादा, शुद्ध शास्त्रीय नर्तन, पेहराव, त्याला प्रत्यक्ष वादकांची जोड यामुळे कलेची सात्त्विकता महाविद्यालयीन स्तरावरही टिकून राहते. विविध स्पर्धाप्रमाणे शास्त्रीय नृत्याचीही स्पर्धा जिंकण्यासाठी महाविद्यालयांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. शास्त्रीय कलांच्या स्पर्धासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना  मिळणारा पािठबा व शास्त्रीय नृत्याला मिळणारे मानाचे स्थान, हे चित्र पाहून एक शास्त्रीय नृत्यांगना म्हणून आनंद होतो’, अशी भावना ईश्वरीने व्यक्त केली.

अभिजात कलांना विद्यार्थ्यांनी महत्त्व द्यावे

पुण्यातील प्रतिष्ठेच्या फिरोदिया करंडक स्पर्धेत अभिनय, नृत्य, संगीत, शिल्पकला आदी विविध कलांचा एकत्रित नाटय़ कलाविष्कार विद्यार्थी सादर करतात. या करंडकाच्या आयोजन समितीतील अजिंक्य कुलकर्णी म्हणतात, ‘आम्ही विद्यार्थ्यांना सातत्याने अभिजात भारतीय संगीत, भारतीय नृत्यप्रकार यांना प्रामुख्याने महत्त्व देण्याचे आणि या कलेसंबंधित सादरीकरणे पाहण्याचे आवाहन करतो. संयोजक म्हणून अभिजात संगीत, शास्त्रीय नृत्य यांना मुलांनी महत्त्व द्यावे म्हणून आम्ही प्रयत्न करतो’.

नवनवीन प्रयोग करण्याची संधी. . .

आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांमध्ये बासरी वादनासारखी शास्त्रीय कला सादर करताना आलेल्या अनुभवाबद्दल डोंबिवलीतील अथर्व जाधव हा तरुण बासरीवादक म्हणतो, ‘आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांमध्ये शास्त्रीय कलांना मानाचे स्थान मिळते आहे. या स्पर्धामध्ये असणाऱ्या नावीन्यपूर्ण आणि सर्जनशील संकल्पनांमुळे बरेच नवीन सादरीकरणाचे प्रकार तयार झाले. कधी एकटय़ाने, द्वंद्व तर कधी सात ते आठ वादकांसह एकाच बँडमध्ये वाजवण्याचा अनुभव मिळाला. मी आणि माझा सहकारी यश नेहमीच वेगवेगळय़ा रागांत नावीन्यपूर्ण सादरीकरण करण्याचा प्रयत्न करत असतो. एकंदरीत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धामधून नवीन प्रयोग करता आले आणि सातत्याने रियाज करताना डोक्याला चालना मिळत गेली’. अथर्वनेही गेल्या वर्षी मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात स्वरवाद्य स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे.

नागपुरातही शास्त्रीय कलास्पर्धाना वाढता प्रतिसाद

नागपूर, चंद्रपूर आणि विदर्भातील अन्य काही महाविद्यालयांमध्ये शास्त्रीय कला जोपासल्या जात आहेत. नागपूरमधील वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या (मॉरिस कॉलेज) संगीत विभागाकडून शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते. याशिवाय चंद्रपूर येथील एफईएस मुलींच्या महाविद्यालयातही निरनिराळय़ा स्पर्धा आयोजित केल्या जातात.  मॉरिस महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोनाली यादव स्पर्धाविषयी मत मांडताना म्हणाली की, ‘हल्ली तरुणाई विदेशी संगीताकडे वळत असली, तरी आमच्या महाविद्यालयामध्ये शास्त्रीय संगीत आणि नृत्याला अधिक महत्त्व आहे. शास्त्रीय एकल आणि समूह गायन व नृत्य स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना बराच फायदा होतो.  या स्पर्धेमध्ये आमचा चांगलाच कस लागतो आणि इतरांकडूनही नवीन गोष्टी शिकता येतात. नुकत्याच अमरावती येथे झालेल्या शास्त्रीय संगीत उत्सवामध्ये विदर्भातील अनेक महाविद्यालयांचे विद्यार्थी आले होते. चंद्रपूर आणि इतर जिल्ह्यांतून शास्त्रीय नृत्याचा चमूही आला होता. अशा स्पर्धाना विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद ही आनंदाची बाब आहे’. तर एफईएस मुलींच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. बन्सोड सांगतात की, ‘विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव द्यायचा असल्यास स्पर्धाची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांची शास्त्रीय संगीत विषयाकडे गोडी वाढत असून, दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असल्याचे समाधान आहे’.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व व्हिवा ( Viva ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 02:49 IST