मितेश रतिश जोशी viva@expressindia.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे शहराला लाभलेला स्थापत्य वारसा त्याने जवळून अनुभवला. हा अनुभव जलरंगांचं तंत्र आत्मसात करताना, वास्तुकलेच्या अभ्यास करत असताना त्याच्या पाठीशी होता. जुन्या वाडय़ांचे मौल्यवान लाकडी अवशेष धुळीत पडलेले पाहून ईशान क्षीरसागर या तरुणाला खंत वाटली व पुढे त्याने याच अवशेषांचे संवर्धन करत जगभर भारतीय स्थापत्यशास्त्राची ओळख करून दिली ती त्यापासून बनवलेल्या वस्तूंमधून..

ईशान क्षीरसागर हा तरुण मूळचा पुण्याचा. त्याचे संपूर्ण बालपण पुण्याच्या पेठांमध्ये फिरस्ती करतच गेलं. ‘अभिनव कला महाविद्यालय’, पुणे येथे २०११ साली ‘बॅचलर ऑफ फाईन आर्ट’ या शाखेतून ईशानने पदवी शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्याला कलेची आवड होती. त्यासाठीचं पोषक वातावरण त्याला घरातूनच मिळालं होतं. त्यामुळे या क्षेत्राकडे पूर्णवेळ वळून पुढे याच क्षेत्राचा व्यवसाय म्हणून त्याने अंगिकार केला. इतिहाससंपन्न पुणे शहराला लाभलेला स्थापत्य वारसा त्याने जवळून अभ्यासला. जुन्या इमारती व वाडे पाडून पुन्हा बांधताना त्यांचे मौल्यवान तसेच कलात्मक अवशेष जेव्हा विद्रूप अवस्थेत धुळीत पडलेले ईशानने पाहिले, तेव्हा एक भारतीय या नात्याने त्याच्यातील कलाकाराचे मन सुन्न झाले. कोणीतरी याचे संवर्धन करून यांना नवी झळाळी द्यायला हवी असे त्याच्या मनात आले. कोणीतरी का?, आपणच देऊ या विचाराने ईशान उठला व भारताचे दुर्मीळ वैभव नव्या रूपाने प्रकाशझोतात आणू लागला.

ईशान सांगतो, ‘हे लाकडी अवशेष घरात सजावटीच्या निमित्ताने लोक जतन करून ठेवतील या आशेने मी कामाला लागलो. सोबतच जुन्या अँटिक तांब्या – पितळेच्या वस्तू, मूर्ती, भांडी यांचेही जतन करू लागलो. काष्ठ आणि धातू यांचा मिलाफ मी इथे केला’. या सर्व वस्तू तो बनवतो असा लोकांचा समज आहे, तो मात्र मी या सर्व वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यातून जमवतो असे सांगत हा गैरसमज दूर करतो. मी या वस्तू अजिबात कोरत किं वा बनवत नाही. या वस्तू साधारण दीडशे ते तीनशे वर्ष जुन्या अवशेषांपासून बनवलेल्या असतात. जमवलेल्या वस्तू साफ करून त्याची डागडुजी करून मी या वस्तू नवीन रुपात जगभर विकतो, असे ईशान सांगतो.

लुप्त होत जाणाऱ्या कलांचे जतन करताना..

ईशानला हे काम करत असताना अनेक अडचणी येतात. त्याविषयी तो सांगतो, काही वाडय़ांचे मालक त्यांच्या जवळच्या वस्तू धड विकतही नाहीत आणि जतनही करत नाहीत. मधल्या मध्ये या वस्तू धूळ खात पडतात तेव्हा जास्त त्रास होतो. भारताच्या एका कोपऱ्यातून वस्तू घेऊन महाराष्ट्राच्या दुसऱ्या कोपऱ्यात वस्तू विकताना त्याचे आकारमान, त्याचे वजन या कारणांमुळे त्या वस्तू नीट पोहोचतही नाहीत. तेव्हाही खूप धावपळ करावी लागते. वस्तूंना नवी झळाळी देण्याबरोबरच त्या वस्तूचे पुढे आयुष्यही वाढवावे लागते. त्यामुळे त्यांना बऱ्याचदा खिळ्यांचा किंवा हुक्सचा आधार देऊन हलक्या हाताने कोणतीही नक्षी बिघडू न देता जोडकाम करावे लागते. हे हुक्स व खिळे फक्त आजच्या काळातले वापरले जातात. त्या वस्तूतील अस्सल प्राचीनपणा ९५ टक्के  जपण्याचा प्रयत्न आपल्याकडून के ला जात असल्याचे त्याने सांगितले.

ईशानने या व्यवसायाला ‘मोहर’ असे नाव दिले आहे. ‘माझे आजोबा मनोहर व आजी मोहिनी या दोघांच्या नावाचा मिलाफ करून मी हे नाव ठेवले आहे, कारण माझ्या आजोबांनी माझ्याकडून इतिहासाचे व आजीने कलेचे धडे गिरवून घेतले. आता त्याच आधारे मी इतिहास व कला यांचा मेळ साधून कलाकृती घडवण्याचे काम करतो आहे. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ मला हे नाव सुचले’, असे तो सांगतो. शिवाय, मोहर या शब्दाचा अर्थ नवी पालवी. जुन्या वस्तूंना इथे नवा मोहर देण्याचे काम के ले जाते, ज्यामुळे समोरचा अगदी पाहताच त्याच्या मोहात पडतो, अशी या नावातली आगळी गंमत तो समजावून सांगतो.

ईशानने टाळेबंदीचा फायदा घेऊन व्यवसायाचा विस्तार केला. आतापर्यंत त्याने सहा महिन्यात ६० वस्तूंची विक्री केली आहे. त्यातल्या काही वस्तूंची माहिती सांगताना ईशान म्हणाला, भारताबाहेर नक्षीकाम केलेल्या वस्तूंची मागणी नेहमीच सर्वाधिक असते. त्यामुळे माझ्या प्रॉडक्टलाही खूप मागणी आहे. अमेरिका, कॅनडा येथील परदेशी बांधव माझे ग्राहक आहेत. पूर्वीच्या काळी वाडय़ांच्या दारावर दर्शनी भागात गणेश पट्टय़ा असायच्या त्या पट्टय़ांना विशेष मागणी आहे, कारण त्यात कल्पकतेने नक्षीकाम केलेले असते. त्याचसोबत आरसे, समया किंवा दिवे ठेवण्याचा स्टँड, नेम प्लेट, लाकडी देव्हारा, लाकडी खांब या वस्तूंनाही खूप मागणी असल्याचे ईशान सांगतो.

फॅशनच्या नावाखाली नकली अँटिक वस्तू विकत घेण्याऐवजी खऱ्याखुऱ्या परंपरागत ठेव्याचं जतन घरोघरी झालं पाहिजे तरच पुढच्या पिढीला या सर्व वस्तूंची ओळख होईल. आणि त्यांच्याकडून या वारशाचं जतन केलं जाईल. कला ही समाजाचा कणा असते आणि हाच कणा  बळकट ठेवण्याचं काम ईशानसारखे तरुण करताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Conservation of precious wood relics by pune painting artists ishan kshirsagar zws
First published on: 25-06-2021 at 03:16 IST