आज दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस. दिवाळीच्या सणात एक वेगळीच ऊर्जा, उत्साह आणि आत्मीयता आहे. आपोआपच आपण घराची साफसफाई करायला घेतो, समारंभ साजरे करण्याची लगबग सुरू होते, स्वयंपाकघर गोडाच्या आणि तळणीच्या सुगंधाने न्हाऊन जातं. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असल्याने बरेचसे नातेवाईक एकत्रच असायचे, तसेच सरकारी कामकाजांना, बँकांना सुट्टीसुद्धा असायची, त्यामुळे दिवाळी जरी चार-पाच दिवस असली तरी १०-१५ दिवस नुसती धमाल असायची. काळानुरूप आपल्या आयुष्यात कॉर्पोरेट लाइफची एंट्री झाली आणि सण साजरे करायच्या पद्धती बदलून गेल्या. आता मुळातच एकमेकांच्या भेटी कमी होतात म्हणून नातेवाईक आवर्जून भेटवस्तू देतात आणि हल्ली प्रत्येक कंपनीतही दिवाळीच्या दरम्यान गिफ्ट हॅम्पर्स देण्याची पद्धत आहे.
कर्मचाऱ्यांना, ग्राहकांना आणि भागीदारांना दिल्या जाणाऱ्या या भेटवस्तू आता केवळ औपचारिक सवय राहिलेल्या नाहीत; तर त्या कंपनीच्या मूल्यांची, संस्कृतीची आणि भावनिक गुंतवणुकीची ओळख बनल्या आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत कंपन्यांचे दिवाळी गिफ्ट्स म्हणजे ड्रायफ्रूट बॉक्स, मिठाईचे डबे आणि डायऱ्या इतक्यापुरतं मर्यादित होतं. पण आजचा ग्राहक आणि कर्मचारी अधिक जाणकार आणि सजग झाला आहे. आरोग्य, टिकाऊपणा आणि वैयक्तिक स्पर्श या गोष्टी आता गिफ्टिंगसाठी महत्त्वाच्या ठरत आहेत.
पर्यावरणपूरक भेटवस्तू
सध्या इकोफ्रेंडलीची लाट आली आहे, पण ती नुसती वरवर नसून तरुणाई अगदी तंतोतंत ते धोरण पाळताना दिसतेय. जे गिफ्ट हॅम्पर्स या वर्षी ट्रेंडमध्ये होते त्यात पर्यावरणपूरक प्रॉडक्ट्स अगदी आग्रहाने होते. उपासना सावंत आणि अजित सावंत यांचा ‘गामता’ हा ब्रँड आहे जिथे केमिकल फ्री उदबत्ती आणि धूपकाड्या मिळतात. हा पर्याय सध्या खूप प्रचलित आहे याचं कारण फक्त पर्यावरण नसून स्वतःची तब्येत सांभाळणंसुद्धा आहे. बऱ्याच लोकांना उदबत्तीच्या वासाने घशाचा, खोकल्याचा त्रास होतो. म्हणूनच पंचगव्यापासून म्हणजेच देशी गायीचं शेण, गोमूत्र, दही, तूप, दूध आणि नैसर्गिक वनस्पतींचे अर्क वापरून तयार केलेल्या उत्पादनांना अधिक मागणी आहे. आजकाल लोकांना गोड पदार्थ सोडून अनेक नवीन पर्याय हवे असतात, जे द्यायला चांगले आणि अर्थपूर्ण असावेत असा आग्रह असतो, त्यात हे गिफ्ट हॅम्पर्स अगदी योग्य ठरतात.
ऋजुता गोखले यांचा मेराकी हा ब्रॅण्ड आहे, ज्यामध्ये आकर्षक स्कीन केअर प्रॉडक्ट्स असतात. सुगंधी उटणे, तेल, साबण, रोल ओन पर्फ्युम, फेस क्लिंझर, लीप बाम अशा अनेक प्रकारची विविधता त्यांच्याकडे आहे. मेराकीची संपूर्ण उत्पादने वॉटरलेस फॉर्म्युलेशनवर आधारित असून, ती नैसर्गिक घटकांपासून हाताने तयार केलेली आहेत. अशा पद्धतीची कुठलीही कठोर रसायने किंवा प्रिझर्व्हेटिव्ह्ज न वापरता बनवलेल्या स्किन केअर प्रॉडक्ट्सनाही खूप मागणी आहे. घरगुती तुपाचा वापर करून बनवलेली मेराकी, बर्वासारख्या कंपन्यांचे स्किन केअर प्रॉडक्ट्सची गिफ्ट हॅम्पर्स सध्या दिवाळीसाठी गिफ्टिंगचा उत्तम पर्याय ठरत आहेत.
होम डेकोर कस्टमाईज्ड गिफ्ट्स
कस्टमाईझेशन हा तरुणाईचा आवडता विषय आहे. गिफ्ट हॅम्पर्सही अशाच पद्धतीने करून मिळतात, जेणेकरून आपापल्या आवडीप्रमाणे वस्तू घेता येतात. कल्याणचा केतन काळे याचा ‘बाझुका गिफ्ट्स’ नावाने गिफ्टिंग ब्रॅण्ड आहे ज्यामध्ये विविध शो पीस कस्टमाईझ करून मिळतात. सिरॅमिक मग, डेस्क ॲक्सेसरीज, कंपनीचे ब्रॅण्डिंग केलेले वाॅलेट, पर्स, थर्मास असे अनेक प्रकार त्याच्याकडे उपलब्ध आहे. या वर्षीच्या हॅम्पर्समध्ये सगळ्यात हिट प्राॅडक्ट्स म्हणजे लाकडी मोबाइल स्टॅण्ड, कस्टमाईझ कीचेन, फ्रिज मॅगनेट्स हे होते. कंपनीच्या नावाचे ब्रॅण्डिंग केलेले टी-शर्ट्ससुद्धा घेतले जातात, असं त्याने सांगितलं.
दिवाळीत फराळ आणि फॅशनसोबत काळानुरूप ट्रेंडमध्ये आलेला प्रकार म्हणजे सजावटीच्या वस्तू. भिंतीवर, दारावर लावायला तोरण, दिवे, पणत्या यातले इतके लाखो प्रकार बाजारात आहेत की काय घेऊ आणि काय नको असं होतं. रेझिन, एम डी एफ, सिरॅमिक, ॲक्रॅलिक अशा अनेक पणत्यांचे आधुनिक प्रकार हल्ली हॅम्परमध्ये पाहायला मिळतात. खण आणि लोकरीचे प्रकार सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत. लोकरीच्या समई रांगोळ्या, तोरण, फुलं, खणाच्या शरावती फ्रेम्स, पर्स, फ्रिज मॅग्नेट्स, तोरण, अगदी ज्वेलरीसुद्धा कॉर्पोरेट गिफ्ट हॅम्परमध्ये नावीन्यपूर्ण वाटेल. या वर्षी अनेक होलसेलर्सच्या मते खण आणि लोकरीपासून बनवलेल्या वस्तूंना भरपूर मागणी आहे.
डोंबिवलीच्या अश्विनी भावसार शहा यांचा ‘गिफ्टबड्स कॉर्पोरेट गिफ्टिंग’ या नावाने कॉर्पोरेट गिफ्टिंग ब्रँड आहे. त्या सांगतात, ‘पैठणी कापडातले डेकोरेटिव्ह आयटम खूप आवडीचे आहेत. आम्ही आमच्या हॅम्परमध्ये पैठणीचं तोरण, पितळेचा मोठा ग्लास ज्यात रात्रभर पाणी ठेवून सकाळी पिऊ शकता किंवा रोज वापरू शकता ज्याला आम्ही शुगर पॉट असंही म्हणतो, डेकोरेटिव्ह पणत्यांचा सेट, आणि लोकांच्या आवडीप्रमाणे खाण्याच्या वस्तू; हे सगळं एका सुंदर बॉक्समध्ये पॅक करतो. आमच्याकडे ५०० पासून ते तुमच्या बजेट आणि गरजेप्रमाणे हॅम्पर बनवून मिळतात. अशा ४-५ चांगल्या वस्तूंचे हॅम्पर्स १५००, २००० आणि ३००० च्या रेंजमध्ये मिळतात.’
फूड आयटम्स
पूर्वी सरकारी नोकरीत मोठ्या मोठ्या पदांवरच्या लोकांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी चार ड्रायफ्रुट्सचे सेट असलेला बॉक्स दिवाळीत हमखास मिळायचा. काही काळाने त्यामध्ये होममेड चॉकलेट्सची भर पडली, आता हळूहळू राहणीमानानुसार या दोन गोष्टी निर्विवाद आहेतच, पण त्यासोबतच हेल्दी फराळाचे काही प्रकार, मिलेट्स चिवडा, ड्रायफ्रुट लाडू, बेक्ड करंज्या असे कोरडे पदार्थ या वर्षीच्या हॅम्पर्समध्ये ट्रेंडिंग आहेत. कॉर्पोरेट गिफ्टिंगचे क्लाएंट्स म्हणजे एक तर कंपनीचे मोठे क्लाएंट्स असतात किंवा कंपनीचे कर्मचारी असतात. आता हेल्दी डाएटचा ट्रेंड असल्याने फूड हॅम्पर्ससुद्धा अशा प्रकारे बनवून मिळतात.
अश्विनी पुढे सांगतात, ‘क्लाएंट्सला आपल्या बजेटप्रमाणे वेगवेगळे पर्याय हवे असतात, पण त्यातला ड्रायफ्रुट्स हा आयटम हॅम्परमध्ये हवाच असतो. याचं कारण म्हणजे दिसायला छान, शाही आणि तसा बजेटफ्रेंडली पर्याय आहे. तसेच चॉकलेट्ससुद्धा अजूनही आवडीचे आहेत. हॅम्पर्समध्ये बजेट थोडं जास्त असेल तर ब्रँडेड चॉकलेट्स देता येतात किंवा मग हॅण्डमेडसुद्धा हल्ली प्रचलित आहेत.’बजेट थोडे जास्त असणाऱ्या कंपन्या बकलावा, कुकिज, नानकटाई, हेल्दी केक्ससुद्धा हॅम्परमध्ये देतात. मोठे स्वीट्स ब्रँड्सचे स्पेशल कॉर्पोरेट गिफ्टिंगचे हॅम्पर असतात ज्यामध्ये थोडा टिकाऊ फराळ मिळतो, दोन गोड आणि दोन तिखट असे चकली, शंकरपाळे, दोन प्रकारचे लाडू आणि चिवडा असे हव्या त्या साइझमध्ये फराळाचे बॉक्ससुद्धा या वर्षी ट्रेंडिंग हॅम्पर्स आहेत.
लोकांना हॅम्पर्सचे बॉक्ससुद्धा खूप आकर्षक हवे असतात. म्हणजे पैसे खर्च करायची तयारी असते. पण त्याच्यामुळे नावीन्य, थोडंसं राजेशाही आणि अर्थात क्वलिटी या तीन गोष्टी प्रामुख्याने हव्या असतात. फक्त गिफ्ट हॅम्पर्सचे बॉक्स मिळतील अशी अनेक होलसेल दुकाने मुंबई-पुण्यात आहेत. मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट, माटुंगा आणि माहीममध्ये अनेक होलसेलची दुकाने फक्त अशा बॉक्ससाठी प्रचलित आहेत. पुण्यात अख्खी रविवार पेठ तुम्हाला हव्या त्या होलसेल वस्तूंसाठी बेस्ट जागा आहे.
दिवाळी गिफ्टिंग ही केवळ वस्तू देण्याची परंपरा नसून, ती भावना व्यक्त करण्याची एक संवादशैली बनली आहे. एखाद्या कर्मचाऱ्याने वर्षभर दिलेल्या योगदानाची दखल घेणे असो किंवा दीर्घकालीन ग्राहकासोबतचं नातं जपणं असो, या भेटवस्तूंमधून व्यक्त होणारा थँक यू अधिक मनापासून वाटतो. कॉर्पोरेट गिफ्टिंग हे आज ब्रँड बिल्डिंगचा महत्त्वाचा भाग ठरले आहेत. एक विचारपूर्वक निवडलेली भेट कंपनीची संस्कृती आणि दृष्टी दाखवते.ऑर्गेनिक फूड हॅम्पर्स, सस्टेनेबल डेकोर, हँडक्राफ्टेड प्रॉडक्ट्स आणि लोकल ब्रँड्सला प्रोत्साहन देणाऱ्या भेटी आजच्या कॉर्पोरेट जगतात लोकप्रिय ठरत आहेत. काही कंपन्या तर ‘एक्सपिरिअन्स गिफ्ट्स’, जसं की ट्रॅव्हल व्हाऊचर, वेलनेस सत्रं किंवा माइंडफुलनेस वर्कशॉप्स देण्याकडे वळल्या आहेत. म्हणूनच, गिफ्ट आता फक्त वस्तू नसून एक संदेश आहे, ‘आम्ही केवळ व्यवहार करत नाही, नातीही जपतो.’
दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!