स्वत: शिकतानाच लहान मुलांच्या सर्वागीण विकासाच्या संदर्भातलं शिक्षण तिनं अमेरिका आणि इंग्लंडमध्ये घेतलं. मग सुरू झालं प्रत्यक्षातलं काम. ओरिसातल्या प्रकल्पातला सहभाग. या विविध टप्प्यांविषयी सांगतेय सुनृता.

आमचं कुटुंब कायमच शिक्षणात रमलेलं. आई वर्षां सहस्रबुद्धे अनेक र्वष शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. मलाही मुलांसोबत काम करताना मजा यायची. सुरुवातीपासून मानसशास्त्रात रस असल्याने त्याचा अभ्यास केला. विविध संस्थांमधल्या प्री-स्कूलच्या मुलांपासून ते मोठय़ा मुलांसोबत मी काम करीत होते. गोष्टी सांगायला जाणं किंवा कष्टकरी पंचायतमध्ये वेगवेगळे पाठ घेणं, या गोष्टी कॉलेज जीवनात चालू होत्या. कॉलेजमध्ये मानसशास्त्राचा अभ्यास करताना बाळाचा विकास कसा होतो, हे सांगणारे दोन लघुपट तयार केलेले. सामाजिक विषयांमध्ये रस असल्याने त्यासंबंधीच्या विविध प्रश्नांबद्दल मी व्यक्त होते. त्यातूनच ‘सनसनी’ या माध्यमांबद्दलच्या पथनाटय़ानं आकार घेतला होता.
बारावीत अमेरिकेत शिक्षणासाठी जायची संधी मिळाली. तेव्हा अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट हा विषय शिकले. वाटलं, किती इंटरेस्टिंग फिल्ड आहे हे. मानसशास्त्र आणि मुलं या दोन्ही आवडीच्या गोष्टींचा मध्य सापडल्यासारखं वाटलं. येस (युथ एक्स्चेंज अ‍ॅण्ड स्टडी प्रोग्रॅम) ही अमेरिकन सरकारच्या स्कॉलरशिपअंतर्गत तिथल्या शाळेत वर्षभर शिक्षण घेता येतं. त्यानुसार मेरीलॅण्डच्या रिव्हर हिल हायस्कूलमध्ये शिकले. परतल्यावर पुणे विद्यपीठातलं मानसशास्त्राचं पदवी शिक्षण पूर्ण झालं. मात्र अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंटचे फार मोजके कोर्सेस होते. होते ते संगोपनाच्या दृष्टीनं बघणारे होते. मग परदेशात याविषयीचे कोर्सेस बघत स्कॉलरशिपसाठीही प्रयत्न करीत होते. मग कॉमनवेल्थ स्कॉलरशिप मिळल्यावर इंग्लंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ स्टर्लिगमध्ये मास्टर ऑफ सायन्स इन चाइल्ड डेव्हलपमेंट हा अभ्यासक्रम निवडला. वर्षभरात त्याबद्दल विविधांगी माहिती मिळाली. वेगवेगळ्या देशांतून आलेली मुलं वर्गात होती. प्रोफेसर्स डाऊन टू अर्थ होते. आपले प्रश्न त्यांना सहजपणे विचारता येऊ शकत. अर्ली चाइल्डहूडमधल्या अनेक संशोधनांविषयी या काळात कळलं. त्या वेळी प्रबंधासाठी भारतातच यायचं ठरवलं होतं. कारण आपल्याकडचा डेटा फारसा अद्यावत नाहीये. आपण बरेचदा परदेशी संशोधनांवर अवलंबून असतो. त्यामुळे आपल्याकडेही डेटा जनरेट व्हायला हवा, असं वाटलं. ते काम अजूनही चालू आहे. भारतात काम करायला परतायचं, हे आधीच पक्कं ठरलेलं. त्यामुळे कोर्स संपल्यावर तिथली पीएच.डी. आणि नोकरीचीही ऑफर नाकारली. आपल्याकडच्या लहान मुलांचे प्रश्न अधिक जिव्हाळ्याचे होते. दुसरं म्हणजे अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट- लहान मुलांचा विकास या विषयाबद्दल आपल्याकडे फारच कमी जागरूकता आहे. बाळाच्या आयुष्यातल्या पहिल्या तीन वर्षांचं महत्त्व आपल्याकडच्या पालकांपर्यंत पोहोचलेलं दिसत नाहीये. त्यामुळे त्यावर काम व्हायला हवं, असं मनापासून वाटत होतं.videshini

परतल्यापासून वेगवेगळ्या संस्था- एनजीओज, पाळणाघरं, अनाथाश्रमांसोबत समुपदेशनाचं काम करतेय. मध्यंतरी अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीच्या पुढाकारानं Consultant to the Institute
for Fiscal Studies, UK for “Early childhood development for the poor:
Impacting at scale वर या प्रोजेक्टबद्दल कळल्यावर मी त्यांना ईमेल केला. त्यांचे दोन रिसर्च प्रोजेक्ट मला लीड करायला मिळाले. या प्रकल्पाच्या वेगवेगळ्या सहभागी संस्थांची समन्वयक म्हणून काम करीत होते. संशोधन करणारी टीम लंडन-अमेरिकास्थित आणि फिल्ड टीम ओरिसात होती. या अडीच वर्षांत रिसर्च डिझाईनपासून ते फिल्डवर प्रत्यक्षात साकारण्यापर्यंत विविध कामांचा अनुभव घेता आला. ओडिसातल्या शहरी वस्त्या आणि दुर्गम गावांत हे संशोधन चालू होते. अर्ली स्टिम्युलेशन म्हणजे काय, तीन वर्षांच्या आतील बाळांच्या मेंदूला चालना देणं का महत्त्वाचं आहे नि ते कसं द्यायचं त्याविषयीची जागरूकता पालकांमध्ये यावी, हा या प्रकल्पांचा मुख्य हेतू होता. आमच्या प्राथमिक अंदाजानुसार मुलांच्या परफॉर्मन्समध्ये नक्कीच फरक पडलाय. त्यासाठी या माध्यमाचा हातभार लागलेला दिसतोय. तिथल्या अल्पशिक्षित मुली-बायकांना मुलांच्या वाढीसंदर्भात माहिती देत प्रशिक्षण दिलं जायचं. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून खेळणी बनवायचो. आठवडय़ातून एक दिवस एक तास ती बाई बाळाच्या घरी जाऊन आईसमोर बाळाशी खेळून दाखवायची. आईला बाळ कसं शिकतंय, तेही दाखवायची. आठवडाभर ती खेळणी तिथं ठेवायची. पुढल्या आठवडय़ात नवीन खेळणी घेऊन जायची आणि आई बाळाशी खेळली असेल, तर ते बाळाच्या खेळण्यातून आम्हाला दिसायचं.

ओडिसाची टीम नि मी सुरुवातीला चाचपडतच काम सुरू केलं. मुळात ओडिसाच्या संस्कृतीत बऱ्यापैकी निवांतपणा आहे. मी हे काम अमेरिकेतल्या टीमसोबत कोऑर्डिनेट करायचे. ओडिसावाले म्हणायचे की, आठवडाभरात काम करू. तो काम पूर्ण झालेला आठवडा उजाडायचाच नाही. खूप दिवस लागायचे. दुसरीकडे अमेरिकनांची पटकन रिप्लाय देणारी टीम होती. त्यातून परस्परांची समजूत तयार करणं, हे खूप मोठं आव्हान होतं, ते मला मग जमू लागलेलं. सुरुवातीला आम्ही मुख्यत: हिंदीतूनच बोलायचो. ऑफिस टीमला हिंदी यायचं, पण वस्तीतल्या बायकांना हिंदी यायचं नाही. मी निरीक्षण करायला जायचे, तेव्हा सोप्पी ओडिया वाक्यं शिकायची छान संधी मिळाली. मग ते ओडियातून शिकवणार नि मी त्यांना हिंदीतून शिकवणार, असा छान संवाद साधला जायचा. ओरिसातलं दारिद्रय़ लगेच जाणवतं. अनेक घरांमध्ये गेल्यावर खूप प्रेमानं त्यांनी आमचं स्वागत केलं. बऱ्याच ठिकाणी केवळ आम्ही गेलोय, म्हणूनच बाळाला एकमेव कपडा घातला जायचा. अशा अनेक घरांतल्या गोड आया नि बाळांना भेटायला मिळालं. तीच माझी सगळ्यात मोठी प्रेरणा होती, तिथं काम करीत राहण्याची. कारण राहण्याची जागा, प्रवासाची साधनं, बदलतं हवामान आदी प्रश्न उभे ठाकायचे. आयत्या वेळी काहीही अडचणी यायच्या. त्यांवर मात करून आम्ही बाळाच्या घरी पोहोचायचो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचं लोभस हसू पाहून आधीच्या सगळ्या कष्टांचा विसर पडायचा. हळूहळू ओडिया गाणीही यायला लागली मला.

तिथल्या लोकांनी आम्हाला चांगल्या पद्धतीनं स्वीकारलं. त्यांना पुण्याहून मी तिकडं काम करायला गेल्याचं अप्रूपच वाटायचं. आमच्या कामाच्या शैली अंगवळणी पडायला थोडा वेळ लागला. उदा. एकदा डेटाच्या कामासाठी मी त्यांना विचारलं, ‘लॅपटॉप काढता का?’, तर उत्तर आलं, ‘बॅग हेवी होते, म्हणून आणला नाही..’ असे शॉक खूप मिळाले. मग मी सगळंच साहित्य सोबत घेऊन जायला लागले. एक जाणवलं की, हा समाज खूप धार्मिक असून दिवसातला बराच काळ धार्मिक विधींतच जातो. कटकमध्ये बायकांनी बाहेर पडणं, काम करण्याला हळूहळू मान्यता मिळतेय. मी फ्लॅटवर राहात असल्यानं स्वत:चा डबा घेऊन जायचे. सुरुवातीला जाणवलं की, तिथं जातिव्यवस्थेचा अजूनही पगडा आहे. त्यामुळे त्यांना माझ्या आडनावावरून माझी जात कळत नसल्याने मला डब्यातला खाऊ द्यायचा की नाही किंवा माझा डबा खायचा की नाही, हे त्यांना ठरवता येत नव्हतं. तिथं मांसाहार नि भात-बटाटा अधिक प्रमाणात खातात. मी कामानिमित्तानं नि सुट्टीतही फिरले. एकदा कोणार्क फेस्टिव्हलला जायचा योग आला. तिथं नृत्य करायला मिळणं, ही खूप प्रतिष्ठेची गोष्ट मानली जाते. मला भरतनाटय़मचा परफॉरमन्स बघता आला. नृत्याच्या पाश्र्वभूमीला कोणार्कचं देऊळ दिसण्याचा तो खूपच अविस्मरणीय अनुभव होता.

वंचित समाजातल्या मुलांसाठी काम करण्याकडे घरातल्यांचा ओढा असल्याने त्यांना कधी कनव्हिन्स नाही करावं लागलं. शिक्षणासाठी परदेशात जातानाही त्यांचा भक्कम पाठिंबा होता. माझ्या कामाची चौकट मी कधी आखून घेतलेली नव्हती. त्यामुळे दुसरीकडे जावं लागणार, हे घरीही माहिती होतं. सहा महिन्यांपूर्वी ओडिसाचा प्रकल्प संपल्यावर मी एक संस्था स्थापन केलेय- द फर्स्ट थ्री नावाची. गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्व थरांतील बाळांसोबत मी काम केलं नि करतेय. त्यामुळे लक्षात आलं की, अर्ली स्टिम्युलेशनबद्दलची जागरूकता सर्वदूर पोहोचलेली नाहीये. बाळाची पहिली तीन र्वष खरंच का महत्त्वाची असतात, याची कल्पना पालकांना नसते. बाळाच्या पालकांसह भोवतालच्यांसाठी एक रिसर्च सेंटर असावं, जिथं बाळ कसं शिकतं, ते त्यांना शिकता येईल. त्याखेरीज विविध संस्थांसाठी समुपदेशनाचं कामही चालू आहेच.
स्कॉटलंडला असताना स्टायपेंडचे पैसे साठवून ते फिरण्यासाठी वापरायचे. युक्रेनमधल्या मैत्रिणीसोबत युक्रेनला जायचं ठरवलं. मला पूर्वेकडचा युरोप पाहायची इच्छा होती. तिथं अनेक ठिकाणी दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम अजूनही जाणवतात, दिसतात. एक अनुभव आहे, स्कॉटलंड स्टर्लिगमधला. अभ्यास करताना पुस्तकं हवी असतील आणि ती उपलब्ध नसल्यास ती जगभरात असतील तिथून मागवून उपलब्ध करून देण्याची प्रथा आहे. सुदैवानं मला ही अभ्यासातली लक्झरी अनुभवायला मिळाली. तिथले प्रोफेसर्स अतिशय ज्ञानवंत होते. एका प्रोफेसरांच्या प्रगाढ ज्ञानाचं खूप दडपण यायचं, पण ते आमच्या प्रश्नांची मनापासून उत्तरं द्यायचे. ते इतके साधे होते की, युनिव्हर्सिटीतल्या प्ले ग्रुपसाठी सांताक्लॉज झालेले. माणूस आणि करिअर या दोन्ही गोष्टी कशा वेगळ्याच असतात, हे शिकायला मिळालं. फार छान माणसं भेटली मला तेव्हा. अजूनही मी त्यांच्या संपर्कात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाषा शिकायला मला मज्जा आलीय कायमच. कॉलेजमधल्या जर्मन भाषेखेरीज आणखी एखादी भाषा शिकावीशी वाटल्याने पुणे विद्यापीठातून स्पॅनिश भाषेत पदवी घेतली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील DELE (Diploma of Spanish as a foreign
language) परीक्षेत पहिल्या स्तरावर विशेष योग्यता मिळालीय. स्पॅनिश शिकताना एक टप्पा आला की, ठरवावं लागलं, भाषा शिकायचीय की मुलांसोबतचं काम. अर्थातच मुलांसोबतच्या कामाची निवड झाली. मुलांसाठी काय गोष्टी करता येतील, याचा शोध घेताना
‘क्लाउन्स विदाउट बॉर्डर्स’बद्दल समजलं. ते देशोदेशीच्या निर्वासितांच्या कॅम्पमध्ये जाऊन मुलं आणि मोठय़ांना हसवतात. त्यांचा ट्रेनिंग कोर्स करण्याची संधी मिळाली. आता मुलांसाठी ‘क्लाउनिंग’ करता करता आम्हीही शिकतोय. सध्या मी ‘पालकनीती’ मासिकात लेख लिहितेय. मुलांना जास्तीत जास्त वेळ द्या आणि त्यांचं संगोपन छान पद्धतीनं करा, ही कळकळीची विनंती.

-सुनृता सहस्रबुद्धे

(शब्दांकन : राधिका कुंटे)