संगीताच्या दुनियेत कानसेन उत्तम गाण्याच्या शोधात तहानभूक हरपून फिरत असतात, तर खाद्यदुनियेत खानसेन उत्तम खाण्याच्या शोधात तहान आणि भूक दोन्ही बाळगून मुशाफिरी करत असतात. या प्रवासात दोघांच्याही तबियतीला खूश करतील, असे काही टप्पे येतात. खाबू मोशायच्या या प्रवासात चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि कऱ्हाडपासून वऱ्हाडपर्यंत सगळ्याच प्रांतांतील लज्जतदार पदार्थाची मेजवानी देणारा एक टप्पा आला.. ‘मेतकूट’!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाबू मोशायने आतापर्यंत तुम्हाला अनेक चांगल्या चांगल्या ठिकाणांची सैर घडवली. खाण्याच्या बाबतीत खाबू मोशाय जातव्यवस्था चांगलीच मानतो, हेदेखील आता तुम्हाला माहीत झालं आहे. काही दिवसांपूर्वी खाबू मोशायने चांद्रसेनीय कायस्थ प्रभू यांच्या घरांतच बनणारे काही खास पदार्थ मिळण्याचं ठिकाण तुम्हाला दाखवलं होतं. आता याच ठाणे शहराच्या गर्भातलं असंच भन्नाट ठिकाण खाबू मोशाय तुम्हाला सांगणार आहे. वास्तविक या ठिकाणाच्या नावामध्येच स्मरणरंजनाचा आनंद आहे.. ठिकाण आहे- ‘मेतकूट’!
लहानपणी भुकेच्या वेळा ठरलेल्या नसायच्या. मग खूप भूक लागली की, घरात असलेल्या आजीचं डोकं खायचं. मग आजीचे डोळे लकाकायचे आणि चेहऱ्यावर एक मिस्कील हसू आणत आजी स्वयंपाकघरात जायची. मग कधी त्या स्वयंपाकघरातून डांगर बाहेर यायचं, कधी दडपे पोहे, कधी तांदळाच्या ओल्या फेण्या, तर कधी गरमागरम मऊ भात, तूप आणि मेतकूट! किंवा कधी तरी आजी वाटीत एखादा पदार्थ द्यायची. ‘‘आजी, आणखीन दे,’’ असं म्हटल्यावर आजी हसायची आणि विचारायची, ‘‘ओळख कसला पदार्थ आहे?’’ अर्थातच उत्तरं चुकायची आणि आजी हसून खरं उत्तर द्यायची. ते ऐकून आश्चर्यच वाटायचं.
हे सगळं लिहिण्याचं कारण की, त्या वेळी खाल्लेले आज्जीच्या हातचे अनेक पदार्थ खाबू मोशायला या मेतकूट नावाच्या हॉटेलात पुन्हा एकदा भेटले! वास्तविक सजीव गोष्टी भेटतात आणि निर्जीव गोष्टी सापडतात. हा व्याकरणाचा नियम आहे; पण या ठिकाणी खाबू मोशाय या पदार्थाना अक्षरश: कडकडून भेटला. एखाद्या इराण्याच्या हॉटेलला शोभेल अशाच जागेत हे ‘मेतकूट’ आहे. सहा ते सात एवढीच टेबलं, त्या टेबलांवर पितळेचा वाटेल असा तांब्या आणि फुलपात्रं मांडून ठेवलेली. आता फुलपात्र या शब्दाचा अर्थ माहीत असायला एकदा तरी पंक्तीत जेवण्याचा अनुभव गाठीशी असायला हवा. दोन-तीन चटण्या, लोणची असलेलं एक तबकही टेबलावर ठेवलेलं असतं.
या ‘मेतकूट’मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त महाराष्ट्रीय पदार्थाचीच लज्जत घेता येईल. इतर कोणतेही पदार्थ इथे नाहीत. नाश्त्याच्या पदार्थावर नजर टाकली, तर तिथे दडपे पोहे, भाजणीचं थालीपीठ, असे पदार्थ हमखास दिसतात. त्या थालिपीठावर लोणी असतं, हे वेगळं सांगायला नकोच. त्याचप्रमाणे गोडाच्या पदार्थामध्येही इथे अस्सल मराठमोळे गोडाचे पदरथच चाखायला मिळतील. यात पाकातल्या पुऱ्या, पुरणपोळी, सांज्याची पोळी, गोडाचा शिरा, घावन घाटलं, साखरभात आदी पदार्थ आहेत. गुलाबजाम, जिलबी आदी उत्तर भारतीय पदार्थाना या हॉटेलच्या मेन्यूकार्डमध्ये स्थान नाही.
भाज्यांमध्येही भरली वांगी, वांग्याचं, भोपळ्याचं भरीत, ओल्या काजूची उसळ, शहाळ्याची भाजी असे काहीसे भन्नाट पदार्थ इथे खायला मिळतील. यात मुख्यत्वे कोकणात तयार होणाऱ्या पदार्थाचा भरणा जास्त आहे. त्याशिवाय भाताच्या प्रकारात खास नागपुरातच बनणारा गोळा भात हा पदार्थ खायला मिळतो. जेवणानंतर आपोष्णी म्हणून ताकतई, ताक, पीयूष आदी गोष्टी सज्ज असतात. या बेताला अस्सल पेशवाई बेत म्हणता येणार नसलं, तरी पदार्थाचं मराठमोळेपण जिभेला भावून जातं. हे पदार्थ फारसे महागही नाहीत. म्हणजे यातील बरेच पदार्थ १०० रुपयांच्या आतबाहेर आहेत, तर काही पदार्थ १८०-२०० रुपयांपर्यंत आहेत.
आजकाल नातवाला पुरणपोळ्या किंवा डांगर वगैरे करून घालणारी आज्जी दुर्मीळ झाली आहे; पण डांगर खाण्याची इच्छा अजूनही होते. अशा वेळी ‘मेतकूट’ गाठणं केव्हाही श्रेयस्कर!
    
कसे जाल
मेतकूट हॉटेल ठाण्यातील प्रसिद्ध घंटाळी देवी मंदिराच्या पुढील चौकातच आहे. ठाणे पश्चिमेला उतरल्यावर विष्णू नगर भागातील घंटाळी देवी मंदिर कोणालाही विचारलं, तर शेंबडं पोरही तुम्हाला आणून सोडेल; पण इथे येताना भरपूर वेळ हाताशी ठेवायला हवा, कारण हॉटेलात शिरायला गर्दीही तेवढीच असते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Famous food of metkut restaurant of thane
First published on: 07-03-2015 at 01:06 IST