आदित्य जोशी
‘थ्री इडियट्स’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेले लडाख हे भारतातील एक पर्यटन ठिकाण बनले. याचे नाव काढताच आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या विविधरंगी पर्वतांच्या रांगा, तिथला निळाशार पेंगाँग लेक, बुद्ध मॉनेस्ट्री आणि जगातील सर्वात महत्त्वाचा सैनिकी तळ असलेले ठिकाण सियाचिन. पण लडाखच्या भटकंतीव्यतिरिक्त तिथल्या चविष्ट अशा जेवणाचा आस्वाद देखील घेता येतो. लडाख म्हटलं की पर्यटकांना फक्त आठवतात ते गरमागरम मोमोज आणि सुपी नुडल्स, पण प्रत्यक्षात तिथली खाद्यसंस्कृती बऱ्याच प्रमाणात वेगळी आहे. त्याला स्वत:ची अशी एक वेगळी चव आहे आणि पदार्थ बनवण्याची पद्धतदेखील वेगळी आहे.
लडाखविषयी हे सांगण्याचं कारण म्हणजे गेली पाच वर्षे मी पर्यटन क्षेत्रात टूर व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. यानिमित्ताने, लडाख, अंदमान, भूतानसारखे वेगवेगळे प्रदेश, तिथली माणसे, तिथली संस्कृती, खाद्यसंस्कृती अनुभवण्याची संधी मला मिळाली आहे. आणि आठवणींची ही खाण स्वत:पुरती न ठेवता ब्लॉगच्या माध्यमातून लिहिता होत मी ती रिती करत आलो आहे. या भ्रमंतीत लडाख मात्र मी स्वतंत्रपणे अनुभवले. मी स्वत: टूर लीडर म्हणून लडाखला अनेकदा जाऊन आलेलो असलो, तरी यावेळेस मात्र मी कामाव्यतिरिक्त आठ दिवस लडाखमध्ये असल्याने जमेल तितके ‘लोकल फूड’ खाऊन बघायचे असा विचार केला. टूर सांभाळत मला जमेल तशी माहिती काढून मी अनेक ठिकाणी खाद्यभ्रमंती केली आणि आवर्जून माझ्याबरोबर आलेल्या पर्यटकांना देखील तिथले पदार्थ खाण्यासाठी घेऊन गेलो होतो.
मूळचा मुंबईकर असल्यामुळे पहिले चहा हवा अशा विचाराने मार्के टमध्ये फिरताना वेगळाच लडाखी चहा प्यायला मिळाला. त्याला ‘नमकीन चाय’ तर तिथे ‘पो चा’ असंही म्हणतात. हा चहा वेगळा का?, तर यात लडाखी स्त्रिया बटर घालतात. मुळात हा चहा चहापत्ती, पाणी, थोडं मीठ आणि याकच्या दुधापासून बनवलेले बटर घालून केला जातो. तिबेटीयन संस्कृती पाहिली तर तिथे मोठय़ा प्रमाणात हा चहा बनवला जातो.
लडाखमध्ये थापा म्हणून माझ्या भावासारखा असलेला एक गृहस्थ राहतो. त्याला भेटायला म्हणून मी त्याच्या घरी गेलो असता तो मला म्हणाला, बस आज आमच्याकडे पुलाव केला आहे. आणि त्या दिवशी मी पहिल्यांदा ‘लडाखी पुलाव’ पोटभर जेवलो. हा चवीनुसार काश्मिरी आणि इतर ठिकाणी मिळणाऱ्या पुलावच्या तोडीस तोड आहे. थोडासा कच्चट असा भात, मटण आणि वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये एकत्र केलेले हे अफलातून मिश्रण होते. त्यात कांदा व गाजर यांची पेजही होती. चवीला आणि सजावटीसाठी काजू घातलेले होते. या पदार्थाची खरी चव अशा रस्त्यावर उभ्या असणाऱ्या गाडय़ांवर मिळणार नाही किंवा रेस्टॉरंटमध्येही मिळणार नाही. जर तुमच्या नशिबात एखाद्या लडाखी माणसाची ओळख लिहिली असेल आणि त्याने तुम्हाला आग्रह केलाच तर त्याच्या घरी जाऊन नक्की पोटभर हा पुलाव खाण्याची संधी घ्यायलाच हवी.
एका रेस्टॉरंटमध्ये गेलो असता, तिथल्या मेनूकार्डमध्ये ‘तीमो’ या नावाचा शाकाहारी पदार्थ पाहिला आणि चव घेऊन बघूया म्हणून तो मागवला. लडाखमध्ये तीमो सकाळी न्याहारी करताना तर काही जण जेवतानासुद्धा खातात. हा पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या भाज्या थोडा मसाला घालून शिजवलेल्या होत्या. आणि याचे वैशिष्टय़ म्हणजे तिथे तीमो हा वेगळी चव असणाऱ्या पावाबरोबर खाल्ला जातो. जो मुळात आपण जो साधा पाव खातो त्याच्यापेक्षा वेगळा असतो. हा पदार्थ मांसाहारी प्रकारातही बनवला जातो.
लडाखी लोकांच्या रोजच्या जेवणातील अविभाज्य पदार्थ म्हणजे ‘साग’. थोडक्यात सांगायचं तर अतिशय साधी अशी पालकाची भाजी होती. पण तोंडाला पाणी सुटेल असा त्याचा सुवास. पालक, लाल मिरच्या, लसूण आणि लवंगा हे सगळं घालून मोहरीच्या तेलात भाजी केली होती. तिथले लोक ही भाजी पोळी किंवा भाताबरोबर खातात. हा पदार्थ मूळचा काश्मीरचा आहे, असे सांगितले जाते. तिथे मिळणारा ‘थुक्पा’ म्हणजे आपल्याला समजेल अशा भाषेत सांगायचं तर नुडल्स आणि सूप एकत्रित क रून बनवलेला पदार्थ. भाज्यांचे प्रकार यात एकत्रित असतात. नॉनव्हेज असेल तर चिकन, मटण किंवा डुकराचे मांस घातले जाते. अगदीच जानेवारीत थंडीत गेलात तर हा थुपका खायलाच हवा. कारण कुठेही थुक्पा गरमागरमच मिळतो आणि हा पोटभरीचा पदार्थ आहे. त्याचप्रमाणे तिथे अजून एक ‘चोलक’ नावाचा पदार्थ मिळतो. अतिशय उत्कृष्ट आणि तोंडाला पाणी सुटेल असा हा पदार्थ नूडल्सबरोबर खाल्ला जातो.
लडाखमध्ये रात्री एकटा फिरत होतो, तेव्हा एका ठिकाणाहून कसला तरी मस्त वास आला. त्या वासाबरोबर माझी भूक चाळवली आणि मी भूक भागवण्यासाठी त्या दुकानाकडे वळलो. ‘स्क्यू’ नावाचा हा पदार्थ होता. मराठी माणसाला चटकन लक्षात येईल असं सांगायचं तर आपल्याकडच्या वरणफळांसारखा हा प्रकार आहे. मस्त रस्सेदार मटणाची आमटी बनवून लडाखी माणसं त्यात स्क्यू म्हणजे गव्हाच्या पिठाचे चौकोनी तुकडे करून घालतात आणि चवीने खातात.
लडाखला आधीही अनेकदा गेलेलो असल्यामुळे तिथले मूळ पदार्थ ऐकिवात होते, पण त्यातल्या काही मोजक्याच पदार्थाची चव घेता आली होती. यावेळेस मी तिथे गेलो तेव्हा ‘कुल्चा बन’ मागवला. आपण जसं चहाबरोबर बिस्कीट किंवा पाव खातो अगदी तशाच पद्धतीने तिथले लोक हा पाव खातात. आपल्याकडे मिळणाऱ्या कुल्च्यापेक्षा निश्चित वेगळा असा हा पदार्थ आहे. हा पावाचा प्रकार चहा आणि कहावा सोबत खातात. प्रवासामुळे दमलेलो असताना गरमागरम चहाबरोबर कुल्चा बन खाण्यात वेगळीच मजा आहे. त्याचप्रमाणे नुब्रा या लडाखमधील भागात फारशा भाज्या आणि इतर गोष्टी उपलब्ध नसतात. पण तरीही तिथले सौंदर्य बघायला येणाऱ्या पर्यटकांना काहीतरी वेगळे पदार्थ चाखायला मिळावेत म्हणून मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो, तिथे जेवण बनवणाऱ्या कुकला तुझ्याकडे असेल त्या भाज्या आणि मसाले वापरून एखादा चविष्ट पदार्थ बनव, असे सांगितले. लगेच त्याने संध्याकाळी आमच्यासमोर गरमागरम ‘खंबीर’ आणि ‘खंबीट’ नावाचा लडाखी पदार्थ करून आणून ठेवला. हा एक ब्रेडचा पदार्थ आहे. जो ब्राऊनिश रंगाचा असतो. तो उत्तम प्रकारे भाजलेला असतो आणि चवीपुरते त्यात मीठ टाकलेले असते. कधी कधी यात भाज्यादेखील घालतात किंवा लडाखी बटर चहाबरोबर हा ब्रेड खाल्ला जातो.
आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ‘मोमोज’बद्दल वेगळे काय सांगावे. मुख्यत्वे हा पदार्थ भाज्या घालून मोदकाप्रमाणे आकार बनवून शिजवतात. आणि मांसाहारी असेल तर त्यात चिकन, मटण याचे सारण असते. मूळचा लडाखी असलेला पदार्थ आजकाल आपल्याकडे मुंबईतही सर्रास मिळतो. त्यामुळे त्यात फारसे विशेष वाटत नसले, तरी जशी पुण्यात गेल्यावर चितळे यांची आंबा बर्फी आणि बाकरवडी आपण खातो, अगदी तसेच लडाखला गेल्यावर मोमोज हे खाल्लेच पाहिजेत. लडाखला जाऊन जर तुम्ही मोमोज खाल्ले नाहीत, तर तुम्ही गुन्ह्यास पात्र ठरता असेच म्हणावे लागेल. लडाखमध्ये गोड देखील तितकेच खाल्ले जाते. ‘फिरनी’ म्हणजे आपण खातो त्या पद्धतीची खीर इथे मिळते. छोटय़ा मातीच्या भांडय़ात ही खीर देतात, त्यामुळे त्याची चव अजूनच वेगळी लागते. इराणी चव असलेला हा पदार्थ आहे. यात वरून पिस्ता आणि फळे घालतात. लडाखचा प्रदेश हा मुळात अक्रोडांसाठी प्रसिद्ध आहे. साधारण जुलै महिन्यात अक्रोड येतात आणि मग त्याचा रस तिथले लोक पितात. पाचक म्हणून हा रस अतिशय उत्तम असतो.
लडाखची खाद्यसंस्कृती ही अशी विविधढंगी असून मुख्यत: मांसाहारी पदार्थ लोक जास्त खातात. देशातील सगळ्यात उंच ठिकाणी जाऊ न डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या तिथल्या निसर्गाचा आनंद घेत खाद्यभ्रमंती करणे म्हणजे मोठी पर्वणीच आहे. त्यामुळे लडाख तर बघाच, पण तिथले पदार्थ आवर्जून चाखून बघा. म्हणजे भारतात प्रांताप्रमाणे बदलणाऱ्या संस्कृतीचा एक पैलू तुमच्या कायम स्मरणात राहील.
शब्दांकन : विपाली पदे
viva@expressindia.com