मितेश जोशी

गायिका, अभिनेत्री, इंटीरियर डिझायनर आणि यशस्वी फॅशन डिझायनर अशा एकापेक्षा एक धुरा लीलया पेलत चाहत्यांच्या मनात हक्काचं स्थान पक्कं करणारी अभिनेत्री म्हणजे आरती वडगबाळकर. भूक सहन न होणाऱ्या आरतीचा जेवणाच्या ताटातल्या चटणी-लोणच्यावर विशेष जीव आहे. चटणी-लोणच्याच्या आंबट-तिखट करामती वाचूयात आजच्या ‘फुडी आत्मा’ सदरामध्ये..

Indias highest paid actress Urvashi Rautela charges 1 crore for 1 minute
एका मिनिटासाठी १ कोटी मानधन घेणारी भारतातील ‘ही’ पहिलीच अभिनेत्री; दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रालाही यात टाकले मागे
mugdha godbole shared angry post after kshitee jog receiving negative comments
“मंगळसूत्र घालावं की नाही?”, क्षिजी जोगच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या गलिच्छ कमेंट्स, प्रसिद्ध अभिनेत्री संतापून म्हणाली…
Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’

आरतीला वेगवेगळे पदार्थ खाण्याची प्रचंड हौस आहे. सकाळच्या दिवसाची सुरुवात ती थेट पोळी-भाजीनेच करते. लहानपणी तिच्या आईने तिचे दिवसाच्या सुरुवातीला चहा-कॉफीचे आणि नाश्त्याचे चोचले केले नाहीत. तिने थेट पोळीभाजी खाण्याचीच सवय लावली. आईने लावलेली ही सवय आजही पाळण्याचा ती प्रयत्न करते. चहा-कॉफीची सवय जरी तिला नसली तरी नवऱ्याच्या हातचा आयता चहा कधी तरी प्यायला तिला आवडतो. आरतीला वेगवेगळी सरबतं प्यायला आवडतात. दुपारच्या जेवणात भाकरी, भाजी, कोशिंबीर, वरणभात असा पारंपरिक आहार ती घेते. तोंडी लावायला डाव्या बाजूला चटणी आणि लोणचे हवेच! हा तिचा व तिच्या घरच्यांचा हट्ट असतो. संध्याकाळची भूक ती जेवणानेच शमवण्याचा प्रयत्न करते. संध्याकाळी सहा-सातच्या सुमारास नेमकं अरबट चरबट खाल्लं जातं. भूक कंट्रोल होत नाही. पोटातली आग शांत व्हावी म्हणून संध्याकाळीच पोटभर जेवण्याकडे तिचा कल असतो, असं ती सांगते.

आरतीची आजी खूप सुंदर चटण्या बनवायची. याविषयीची आठवण सांगताना ती म्हणाली, ‘‘माझ्या लहानपणी आजीच्या राज्यात मी तिच्या हातच्या वेगवेगळय़ा चटण्या खाल्ल्या आहेत. काही नसेल तर नेहमीची शेंगदाणा चटणी किंवा मसाल्यात तेल आणि कांदा घालून केलेली तेलकट चटणी ही ताटात डाव्या बाजूला हमखास असायची. माझी आजी ९० वर्षांची होऊन गेली. ती जाण्याच्या आधी जेव्हा ती आजारी होती, तेव्हा तिच्या बेडच्या बाजूला तीन बरण्या असायच्या. तेल, तिखट आणि मीठ! तिला तिखटा-मिठाचा काला हा जेवणात लागायचाच. चमचमीत खाण्याची तिला आवड होती. तिची आवड माझ्यात उतरली असं मला वाटतं.’’ आरतीची आईही खूप सुंदर चटण्या बनवते. ‘‘वेगवेगळय़ा भाज्यांच्या चटण्या आमच्या घरी कायम असतात. टोमॅटोची, दुधीची, पालकाची, पुदिन्याची, शिराळय़ाच्या सालीची खमंग चटणी असे अनेक प्रकार घरी आजही होतात. भाज्यांचा जो भाग भाजीत वापरू शकत नाही तो चटणीत वापरायचा. मुळात भाज्यांपासून चटणी बनवण्यासाठी भाजीवाल्याकडून फ्रेश भाजी घ्यायला हवी, हे माझ्या आईचं शास्त्र आहे. म्हणजे चटणीसाठी शिराळे निवडताना मस्त हिरवा रंग आणि सरळ शिराळा निवडावा. तो कुठेही वाकलेला नको. शिराळय़ाच्या म्हणजेच दोडक्याच्या सालींची खमंग चटणी बनवण्याची आईची खास रेसिपी आहे. सर्वप्रथम शिराळे स्वच्छ धुऊन पातळ साले काढून घ्यावीत. शिराळय़ाची सालं बारीक चिरून घ्यावीत. एका पॅनमध्ये एक टीस्पून तेल गरम करून त्यात शिराळय़ाच्या साली, थोडं ओलं खोबरं, लसूण, कडीपत्ता, मिरच्या मंद आचेवर अर्धवट शिजेपर्यंत परताव्यात. परतलेले जिन्नस थंड झाल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून बारीक वाटून घ्या. तडका पॅनमध्ये एक टीस्पून तेल कडकडीत गरम करून त्यात मोहरी, तीळ, कडीपत्ता, लाल मिरची घाला. फोडणी चटणीवर ओता. एकजीव करून झाल्यावर ही चटणी भाकरी, पोळी किंवा भाताबरोबर खाऊ शकता.’’ अशी आईच्या हातच्या चटणीची खमंग गोष्ट सांगताना ती आणखी एका चटणीची रेसिपी सांगते. ‘‘नैवेद्याच्या पानात बऱ्याचदा आमसूलाची चटणी असते तीसुद्धा बनवायला अतिशय सोपी आहे. आमसूल भिजवून त्यात गूळ, मीठ, तिखट, जिरे पावडर एकजीव करून मिक्सरवर बारीक केले की आमसूल चटणी तयार. असं हे चटणीपुराण घरी सतत सुरू असतं,’’ असं ती सांगते.

भारतीय स्वयंपाकात साखर वा मीठ यांच्या वापराने पदार्थ दीर्घकाळ टिकवण्याची सोय फारच प्राचीन आहे. कोणताही पदार्थ आपण आधी डोळय़ांनी चाखत असतो आणि त्यानंतर जिभेवर त्याचा स्वाद अनुभवण्यासाठी आपण तयार होतो. अशा दर्शनानेच चव जिभेवर रेंगाळू लागते तो पदार्थ म्हणजे लोणचं. चटणीप्रमाणेच घरात लोणच्याचेसुद्धा शौकीन आहेत, असं सांगत आरती म्हणाली, ‘‘शहरात आजकाल लोणचं वगैरे कोणी घरी करत नाही. लागेल तशी लोणच्याची बाटली विकतच आणतात, पण माझ्या सासरी अजूनही माझ्या सासूबाई लोणचं घरीच करतात. माझ्या सासूबाई वेगवेगळय़ा प्रकारची अतिशय सुंदर लोणची बनवतात. दरवर्षी उन्हाळय़ात पंधरा ते वीस किलो लोणचं आमच्या घरात तयार होतं. माझे मित्र-मैत्रीणसुद्धा हक्काने त्यांच्याकडे लोणच्याची डिमांड करतात आणि आईसुद्धा तितक्याच मायेने सगळय़ांना लोणचं भरभरून देतात.’’

लोणचं घालणं हा एक सोहळाच असतो आमच्याकडे. आता त्यांचं वय लक्षात घेता आम्हीच त्यांना रोखत असतो. वेगवेगळय़ा सीझनमध्ये लोणचं बनवण्याची पद्धत मराठी घरांमध्ये आहे. उन्हाळय़ात कैरी-करवंद, हिवाळय़ात आंबेहळद, ओली हळद, गाजर यांचं लोणचं, तर उरलेल्या मोसमात लिंबं आहेतच. द्राक्षांच्या सीझनमध्ये द्राक्षाचं लोणचंही अप्रतिम होतं, हे सांगतानाच आरती द्राक्षाच्या लोणच्यांची रेसिपी सांगू लागते. ‘एका भांडय़ात पाव वाटी तेलाची मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी तयार करा. ती एका बाजूला गार करत ठेवा. दुसऱ्या भांडय़ात एक वाटी द्राक्ष चिरून घ्या. मोहरीची पूड दोन चमचे, लाल तिखट अर्धा चमचा, बारीक मीठ तीन चमचे, थोडासा गूळ एकत्र करून त्यावर गार झालेली फोडणी ओता. थोडय़ाशा तेलात अर्धा चमचा मेथी तळून ती कुटून द्राक्षाच्या लोणच्यात घाला. हे लोणचं तुम्ही ताबडतोब खाऊ शकत नाही, ते दुसऱ्या दिवशी खावं. लोणचं अधिक आंबट हवं असल्यास त्यात अर्ध लिंबू पिळावं. आमच्या लोणच्याच्या खाबूगिरीमध्ये आम्ही कशालाच दूर लोटलं नाही,’’ असं ती गमतीने सांगते. पुढे ती सांगते, ‘‘मी कॉलेजमध्ये असताना वेगवेगळय़ा माशांची लोणची खाल्ली होती. त्यातलंच एक लक्षात राहिलेलं कोळंबीचं लोणचं. बरेच जण त्याला चिंगळाचं लोणचं असंही म्हणतात. कोळंबीबरोबरच अनेक मांसाहारी लोणचीही प्रसिद्ध आहेत. बोंबील माशाचं लोणचं, ज्याला म्हाकुळ लोणचं असंदेखील म्हणतात. चिकन, मटण आणि बांगडा अशा प्रकारची लोणचीसुद्धा कोकण आणि गोवा प्रांतांत प्रसिद्ध आहेत.’’

शाळेत असताना मधल्या सुट्टीत डबा एक्स्चेंज करून खायचे, असं सांगत आरतीने लहानपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ‘‘शाळेत असताना माझी आई रोज डब्यात वेगवेगळे पदार्थ द्यायची. कधी आलू मटार, कधी पराठे, तर कधी सँडविच माझ्या डब्यात असायचं. माझ्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा हा माझ्याच वर्गात होता. आम्ही एकमेकांच्या घरी कायम जेवायला असायचो. त्यामुळे आम्हाला एकमेकांच्या आईच्या जेवणाची पद्धत माहिती होती आणि चव आवडीची होती. म्हणून आम्ही डबे एक्स्चेंज करायचो आणि खायचो. रुपारेल कॉलेजमध्ये गेल्यावर मी नाटकाला वाहून घेतलेलं, त्यामुळे मला खाण्यापिण्याची शुद्धच नव्हती. मी डोंबिवलीला राहायचे. कॉलेज दादरला होतं. रात्री तालीम संपायला उशीर झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कॉलेजला यायचं असेल तर मी जवळच्या मित्रमैत्रिणींकडे राहायचे. मला गरम जेवायला आवडतं, त्यामुळे मी कँटीनमध्ये किंवा मित्राच्या घरी जाऊनच जेवणावर ताव मारायचे. कॉलेज कँटीनमध्ये इडली चिली आणि फ्राइड राइसची मी दिवानी होते. आमच्या कॉलेजच्या कोपऱ्यावर एक छोटेखानी हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये खिशाला परवडेल अशा भावात चांगलं खायला मिळायचं. अद्वैत दादरकर तेव्हा मला मित्रांच्या चमूत चिडवायचा, जर आरतीने साडेसातच्या सुमारास हॉटेलमध्ये जाऊन तिथली फ्राइड मिसळ खाल्ली तर समजा ती घरी जाणार नाही. आपल्यापैकीच कोणाकडे ती राहणार आहे. माझ्या एका खाण्यावरून माझी पुढची कृती चटकन आणि अचूक ओळखली जायची.’’ अशा आठवणी तिने सांगितल्या.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात आरती, सिद्धार्थ चांदेकर, क्षितिज पटवर्धन, सुयश टिळक असा सहा जणांचा मित्रपरिवार एकत्र मुंबईत राहायचा. तेव्हाची खाबूगिरी जगात भारी होती, असं आरती सांगते. ‘‘आम्ही मित्रपरिवार एकत्र राहायचो तेव्हा आमच्याकडे कुंदा नावाच्या एक काकू स्वयंपाक बनवायला होत्या. आम्ही जरी सहाच जण तिथे राहत असलो तरी आमचे इतर मित्रमैत्रिणीही रोज घरी पडीक असायचे. त्यामुळे काकूंचा अक्षरश: जीव निघायचा. त्या प्रेमाने गरमागरम पोळय़ा वाढायच्या. चाळीस ते पन्नास पोळय़ा त्या रोज बनवायच्या. त्याचबरोबर सगळय़ांना स्वत:ला जेवण बनवायची हौस होती. क्षितिज पटवर्धन सगळय़ात आधी उठायचा, त्यामुळे तो सगळय़ांसाठी नाश्ता बनवायचा. त्याला सगळय़ात साखर घालण्याची सवय होती, त्यामुळे त्याची फोडणीची पोळी म्हणजे कॅरॅमल फोडणीची पोळी असायची. माझ्या हातची अंडा करी, बैदा करी हे पदार्थ सगळय़ांना आवडायचे. पहाटे ४ वाजता उठून मॅगी बनवायचो. ज्या पातेल्यात मॅगी बनवली आहे ते पातेलं मधोमध ठेवायचो. त्या पातेल्याच्या अवतीभवती दाटीवाटीने आम्ही चमचे घेऊन बसायचो आणि मग एकत्र मॅगीवर हल्लाबोल व्हायचा. रात्री उरलेलं शीळ खाण्यासाठी एवढय़ा सगळय़ांमध्ये बिचारा सिद्धार्थ चांदेकरच पुढे यायचा. त्याला काहीही चालायचं. त्याचे खाण्याचे नखरे नव्हते. खाण्याचे नखरे क्षितिज पटवर्धनचे जास्त होते.’’ अशी आठवण सांगत तिने क्षितिजचाही किस्सा सांगितला. ‘‘आम्ही पुण्यातून पहाटे अचानक गोव्याला फिरायला जायला निघालो. नळस्टॉपला पहाटे पोहे मिळतात जे क्षितिजला प्रचंड आवडतात. त्यामुळे आम्ही थांबून त्याच्यासाठी स्पेशल पोहे पार्सल घेतले. त्याला सरप्राइज देण्यासाठी गाडीत मागच्या सीटवर ते ठेवले, जेणेकरून ते पोहे बघून तो खूश होईल. गाडीत बसल्यावर त्याला म्हटलं की, पटय़ा, बघ मागे सीटवर काय गंमत आहे. त्या पोह्यांकडे बघून तो म्हणाला, ‘अरे! असं प्लॅस्टिकमध्ये बांधलेलं खायला नको होतं’.

त्याच्या या वाक्यावर माझा जो काही सात्त्विक संताप तिथे झाला, त्याला शेवटपर्यंत आम्ही ते पोहे खाऊ दिले नाहीत. त्याला खूप भूक लागली अशातच त्याला बरेच तास आम्ही उपाशी ठेवलं,’’ असं तिने सांगितलं. खाण्याच्या या गमतीजमती रमणारी आरती खरोखरच फुडी आहे, त्यामुळे जे काही बनवायचं ते ती तितक्याच प्रेमाने आणि निगुतीने करते.

viva@expressindia.com