शाळेची पायरी ओलांडून आता आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या नवख्या वाटांवरून वाटचाल करण्यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे, तर बारावीपुढील घेण्यासाठी नव्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन थोडं सीनिअर झाल्याची भावना काही जणांच्या मनात घर करत आहे. लांबलचक प्रवेश प्रक्रिया संपवून कॉलेजमध्ये येणाऱ्या या नव्या दोस्तांच्या स्वागतासाठी शिक्षकांसह एसवाय आणि टीवायमधले सीनिअर्सही सज्ज होत आहेत. ‘रॅगिंग’ हा अमानुष प्रकार आता आऊट ऑफ बॉक्स झालाय तरीही, ज्युनिअर्सवर थोडीशी ‘सीनिऑरिटी’ दाखवली जातेच. त्यामध्ये एकमेकांची थोडी खेचण्याचा उद्देश असतो. यासोबतच ‘एफवाय’मध्ये एखादा सुंदर ‘नवीन चेहरा’ आला असेल तर धडपड सुरू होते ओळख वाढवण्याची आणि या कामात मित्रमंडळींची साथ नाही लाभली तर सोशल नेटवर्किंग साइट्स आहेतच! कॉलेजमध्ये आलेल्या या नव्या मित्रमंडळींचे स्वागत करण्यासाठी मग निमित्त मिळतं ते ‘ओरिएंटेशन किंवा फ्रेशर्स पार्टीचं’. हल्ली मुंबईच्या कॉलेजमधली फ्रेशर्स पार्टी हा तर एकदम प्रोफेशनल प्रकार असतो. यासाठी रीतसर इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची मदतही काही कॉलेजेसमध्ये घेतली जाते. फ्रेशर्स पार्टीची थीम ठरते. पेज थ्री, रेट्रो, मिसमॅच, रेड कार्पेट, ट्रॅडिशनल या काही पॉप्युलर थीम आहेत. याशिवाय पावसाळी सरींचा एकंदरीत मूड पाहता यंदा रेन ड्रॉप्स, क्रेझी रेन अशा थीम्स ठेवण्यात येत आहेत.  फ्रेशर्स पार्टी किंवा ओरिएंटेशनची तयारी सुरू असतानाच सीनिअर्सना महाविद्यालयांत डिपार्टमेंटच्या हेडबरोबर मीटिंग करावी लागते. कॉलेजच्या नियम आणि अटींच्या यादीलाही सामोरं जावं लागतं. कोणत्या गाण्यावर डान्स करायचे या मुद्दय़ापासून, ज्युनिअर्सचं स्वागत करण्यासाठी घाट घातलेल्या या कार्यक्रमांसाठी किती ‘काँट्रिब्युशन’ काढायचं, हॉल कसा सजवायचा यावरून मग चर्चा, मतभेद, वाद आणि खटके उडतातच. या सगळ्याची झलक सध्या वेगवेगळ्या कँपसमध्ये दिसते आहे.
ही पार्टी, हा सारा घाट ज्यांच्यासाठी आहे त्यांना रीतसर आमंत्रित करण्यापासून या कार्यक्रमांची सुरुवात होते. ‘पार्टी तो बस बहाना है, हमे तो शॉपिंग जाना है’ असं म्हणत या सेलिब्रेशन मूडला आधीच सुरुवात झालेली असते. थीम्सनुसार कपडे, अ‍ॅक्सेसरीज, फूटवेअर खरेदी करण्यासाठी या नव्या मित्रमंडळींचं सध्या प्लॅनिंग सुरू आहे. महाविद्यालयातील नवे नियम, नवीन मित्रमंडळी, नवे शिक्षक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीनिअर्स व त्यांचा सीनिऑरिटीला साजेसा अ‍ॅटिटय़ूड,सारं काही जमवून घेत ही ज्युनिअर मंडळी या नवख्या वातावरणात रमत आहेत. या नव्या वाटसरूंसाठी आखण्यात आलेले हे त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम त्यांना वेगळ्या अनुभवासोबतच काही आठवणी आणि नवे मित्र नक्कीच देतील.
सायली पाटील -viva.loksatta@gmail.com