‘सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची..’ म्हणत ‘त्याला’ मनोभावे ओवाळताना मन समाधानानं भरून जातं. ‘त्याचं’ ते ‘लंबोदर-पितांबर’ असं मनोहारी रूप पाहून ‘त्याच्या’ स्वागतासाठी केलेली धावपळ, मखरासाठी जागवलेल्या रात्रींचा सगळा शिणवटा पार पळून जातो. निरांजनाच्या त्या प्रकाशात ‘तो’ अधिकच आपलासा वाटू लागतो. ‘त्याच्या’ निमित्तानं आपापल्या ‘व्हेरी बिझी शेडय़ुल’मधून वेळ काढून नातलग नि फ्रेण्ड सर्कलच्या भेटीगाठी होतात. विविध अभिजात कलांचं सादरीकरण ‘त्याच्या’समोर पेश केलं जातं. काहीसा असाच आहे आजच्या तरुणाईच्या मनातला गणपती. एकदम साधासुधा नि परंपरांचं भान राखणारा. प्रदूषण टाळून पर्यावरणस्नेह जपणारा. लाखोंच्या उलाढालींचा वापर सकारात्मक कामासाठी व्हावा, अशी आस बाळगणारा. असा मनातला गणेशोत्सव जनात येणं हे अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी तरुणाईनं सोडायला हवीय भंपक मनोरंजनाची कक्षा नि करायला हवीय बुद्धीदेवतेची डोळस आराधना. त्यासाठी करू या बाप्पाकडं एकच प्रार्थना की, ‘सुबुद्धी दे गणनायका..’
‘मन:पूर्वक’ गणेशोत्सव साजरा करणाऱ्या काही ‘गणेशप्रेमीं’नी आपल्या मनातल्या आयडियल गणेशोत्सवाबाबतच्या भावना ‘व्हिवा’शी शेअर केल्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनिकेत केळस्कर
माझ्या मनातला गणेशोत्सव पर्यावरणस्नेही आहे. आपण प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून शाडू मातीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. गणेशोत्सवातील कार्यक्रमांत फिल्मी आयटम साँग्जपेक्षा आपल्या संस्कृतीशी संबंधित गाणी असावीत नि त्यावर नृत्य सादर केलं जावं. नाटक किंवा विविध कार्यक्रमांद्वारे गणेशोत्सव साजरा करण्याचं खरं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवावं. हल्ली कार्टून कॅरॅक्टरसारख्या मूर्ती घडवल्या जातात. पण हे मला अयोग्य वाटतं. कारण गणेशोत्सवातल्या गणपतीची प्रतिष्ठापना ही मनोरंजनासाठी नसून लोकांमध्ये एकता आणि भक्तिभाव निर्माण झाला पाहिजे म्हणून केली जाते. गणपतीच्या सजावटीसाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा तेच पैसे एखाद्या वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात दान केले पाहिजेत. कारण गणपतीला सजावटीपेक्षा माणुसकी अतिप्रिय आहे, हेच खरं.

निकिता माणगावकर
गणेशोत्सवाच्या निमित्तानं लोकांनी एकत्र यावं आणि एकमेकांशी संवाद साधावा, हा या उत्सवाचा हेतू आहे. त्यासाठी लाखो रुपयांची मूर्ती आणि आरास असू नये. मूर्ती छान असावी, हे वाटणं साहजिक असलं तरीही त्यासाठीच्या काही मर्यादा आपणच ठरवाव्यात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लाखो रुपयांचं बजेट सकारात्मक कामांसाठी खर्च करावं. कल्याणनिधी उभारावा किंवा गरिबांना मदत करावी. ‘भाव तिथे देव’ हे शंभर टक्के खरं असल्यानं माणुसकी जपावी. यामुळे उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होईल. ‘कमर्शिअलाइझेशन ऑफ फेस्टिव्हल्स’ ही टर्म मोडीत काढत देवाला मनोमन भजत गणेशोत्सव साजरा करणं मला आयडियल वाटतं. ‘हॉस्पिटॅलिटी इज द रूट ऑफ फेस्टिव्हल’, असं म्हणतात नि गणेशोत्सव हा तर सर्वात मोठा सण आहे. डेकोरेशन, फूड वगैरेंचं आऊटसोìसग करून स्टेट्स जपण्यापेक्षा हा उत्सव आपल्याला झेपेल असाच साजरा करावा. आरास नि भपकेबाजपणा हे तितकंसं महत्त्वाचं नसतं. आदरातिथ्य हा सणाचा पाया आहे, तो जपला पाहिजे.

सौरभ तावडे
गणेशोत्सव हा उत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केला तो लोकांनी एकत्रित येण्यासाठी, संघटित होण्यासाठी. पण आज तसं दिसत नाही. आजची तरुण पिढी गणेशोत्सवाकडं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहातेय. गणेशोत्सवामध्ये तरुणाईचा सहभाग जास्त आहे. त्याचं काही अंशी प्रतिबिंब असेल कदाचित पण कर्णकर्कश संगीत, दरवर्षी मूर्तीची उंची वाढवणं, गणपती नवसाला पावतो, अशी बातमी पसरवणं, असे प्रकार होऊ  लागलेत. गणपती हा एक प्रकारे ब्रॅण्ड होऊ  लागलाय. गणपतीला अमुक तमुकचा राजा ठरवून तशी जाणीवपूर्वक प्रसिद्धी केली जातेय. गणेशोत्सव पूर्वीसारखा राहिलेला नाही. गणेशोत्सव मंडळांतील नि घरी येणाऱ्या गणपतींचं प्रमाण एवढं वाढतंय की, लोकांना इतरत्र गणेश दर्शनाला जायला वेळ नाही. एकीकडं यो यो हनीसिंगची गाणी ऐकणारी तरुणाई गणेशोत्सवाबद्दल काय विचार करते, हे मला जाणून घ्यावंसं वाटतं. गणेशोत्सव अतिशय साध्या पद्धतीनं साजरा व्हावा, असं वाटतं.

निशिगंधा बेर्डे
प्रत्येकाच्या मनातला गणेशोत्सव वेगवेगळा असतो. मला वाटतं की, गणेशोत्सव हा आपण सगळे वादविवाद विसरून एकत्रित यावेत, म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या न्युक्लिअर फॅमिलीजमधली सगळी भावंडं या उत्सवात एकत्र येतात. पाच दिवस आनंदानं मिळूनमिसळून राहतात. काही वेळा मात्र गणपती आणण्यावरून वाद होतात. आजकाल जो तो आपापल्या उद्योगात एवढा व्यस्त असतो की, गणपती आणायला कुणाला वेळ नसतो. त्यावर आलटून पालटून एकेकाकडे गणपती आणण्याचा तोडगा काढला जातो. असं काही घडलं तर बाप्पा आणायचा आनंद नाहीसा होऊन मन हिरमुसतं. गणपतीच्या देखाव्यापासून ते दागिन्यांपर्यंत वायफळ खर्च करण्यापेक्षा काहीतरी चांगलं काम करावं. अनाथाश्रमाला मदत करा. गरिबांना दानधर्म करा. उत्सवादरम्यान काही वेळा अंधश्रद्धा वाढतात. पण भावनेच्या भरात वाहून जाणं योग्य नाही. भावना आणि डोळस श्रद्धा महत्त्वाची असतात. नुसत्या देखण्या देखाव्यांपेक्षा आपण केलेली मन:पूर्वक पूजा महत्त्वाची ठरते.  

प्राची परांजपे
भाद्रपदात येणारा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव. माझ्या घरी गणपती येत नसले तरी माझ्या मनात दरवर्षी गणेशोत्सवाचा विचार आल्याशिवाय राहात नाही. मनातल्या मनात आयोजलेला हा उत्सव पाच दिवसांचा असतो. नातेवाईकांची लगबग, आरतीची चढाओढ, झांजांचा नाद, पारंपरिक पदार्थाचा सुवास अशा मंगल वातावरणाची जोड माझ्या मनातल्या गणेशोत्सवाला असते. गणेशाच्या स्वागतासाठी नि नंतर विसर्जनासाठी घरच्या मंडळींची अगदी जय्यत तयारी असते. मोठाले स्पीकर्स, डिस्कोलाइटिंग नि दारूच्या नशेत झिंगणाऱ्या लोकांना अजिबात थारा नसतो. त्याऐवजी ढोल-ताशे, आरती-गाणी नि नामस्मरणाच्या गजरात माझ्या मनातील गणपतीचं विसर्जन होतं. त्याचं स्वरूप भव्य-दिव्य नसतंच. भारतीय परंपरा नि संस्कृतीचं भान त्यात राखलेलं असतं. एकूणच गणेशोत्सवाचं बाजारीकरण न करता आपल्या परंपरेला साजेसा गणेशोत्सव साजरा केला पाहिजे.   

आदित्य दीक्षित
गणशोत्सव म्हटल्यावर मनात एक चैतन्य संचारतं. बाप्पाविषयी असलेल्या श्रद्धेला नव्यानं पालवी फुटते. बाप्पाकडं आशीर्वाद मागण्याचं समाधान काही औरच असतं. एखादा कठीण-निर्णायक प्रसंग आलाच तर मी बाप्पालाच मनोमन साकडं घालतो. आमच्या घरी कधी गणपती आलाच नाही. आंबिवलीला आजी-आजोबांकडं पाच दिवस नि वांद्रयाला मामाकडं दहा दिवस गणपती असायचा. तिथं जायचो. त्यामुळं ग्रामीण नि शहरी भागातील गणेशोत्सव मी जवळून अनुभवले. कमी वस्ती असलेला गावचा गणेशोत्सव जरा शिस्तीचा नि मंगलमय असायचा. नदीत गणेश विसर्जन व्हायचं. याउलट मुंबईतला गणेशोत्सव म्हणजे धम्माल असायची. चौपाटीवरच्या वाळूत आरती करून बाप्पाला निरोप दिला जायचा. आताच्या गणेशोत्सवाचं स्वरूप बदललंय. लोकमान्य टिळकांनी आपला समाज एकत्र नि एकसंध राहण्यासाठी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाला गालबोट लागलंय. ‘उंच माझा झोका’ मालिकेत दाखवलं होतं, महादेव गोविंद रानडे टिळकांना म्हणतात की, ‘देवघरातला गणपती तुम्ही रस्त्यावर आणू नका. भविष्यात त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.’ काही अंशी हे खरं ठरतंय.

हाय फ्रेण्ड्स ! वेलकम टू ‘व्हिवा वॉल’! ही आहे तुमच्या मनातलं सगळ्यांपर्यंत पोहचवायची एक हक्काची जागा. तुमच्या आवडीचे चित्रपट, नाटक, म्युझिक, पुस्तकं, मालिका आणि करंट टॉपिक्स अशा ढेरसाऱ्या विषयांवर आपण बोलणार आहोत. तुम्हीही या वॉलवर लिहू शकता. त्यासाठी तुमचे विचार आमच्याशी जस्ट शेअर करा. त्यासाठी आम्हाला ईमेल करा- viva.loksatta@gmail.com सब्जेक्टलाइनमध्ये – विवा वॉल असं जरूर लिहा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh lovers feelings about thier ideal ganesh festival
First published on: 29-08-2014 at 01:06 IST