मुलींनी छेडछाडीविरोधात आवाज उठवला तर त्यांच्या मदतीला कायदा आहे, पोलीस आहेत. पण किती जणींना याची माहिती असते? आपल्याबरोबर छेडछाड झाली तर  काय करता येईल, हे सांगणारा हा लेख.
सार्वजनिक मंडळांची आरास, गणरायाची विविध रूपं पाहण्यासाठी भाविक मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरत असतात. या लाखोंच्या गर्दीत कधी कधी तरुण मुली ‘टार्गेट’ होतात. छेडछाड, विनयभंग, धक्काबुक्की, अश्लील शेरेबाजी होत असते. आंबटशौकीन तर खास या कामासाठीच रस्त्यावर फिरत असतात. हे लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी खास महिला सुरक्षेसाठी विशेष बंदोबस्त केला आहे. इतर शहरांमध्येही अशी पथकं असतात. पण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छेडछाडविरोधी पथक
मुंबईत प्रथमच अशाप्रकारचे विशेष छेडछाडविरोधी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात साध्या वेशातील महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारी असणार आहेत. संपूर्ण शहरभर हे पथक फिरून कुठे छेडछाड, महिलांना हेतुपुरस्सर धक्काबुक्की होते का ते पाहणार आहे. लगेचच अशा लोकांना अटक केली जाणार आहे. तरुण मुले खास करून अशा कामात आघाडीवर असतात. त्यामुळे या वेळी छेडछाड सुरू असताना गुप्त पद्धतीने त्यांचे चित्रीकरण केले जाणार आहे. आरोपींना पकडल्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावून ते चित्रण दाखवले जाणार आहे. मुंबईत नुकताच हा प्रयोग करण्यात आला होता. छेडछाड करणाऱ्या २५ तरुणांचे चित्रीकरण करून नंतर त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले होते. बऱ्याचदा एखादी व्यक्ती हेतुपरस्सर धक्का मारतेय, शेरेबाजी करतेय, छेडछाड करतेय हे माहीत असतं, पण त्याविरुद्ध ती महिला काही करू शकत नाही, अशा वेळी हे पथक आपले काम करणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. असे पथक पुण्यातही कार्यरत असणार आहे.

मोबाइल पोलीस स्टेशन
छेडछाड झाली तर पोलीस स्टेशनपर्यंत तक्रार पोचवायची कशी? यावर पोलिसांनी उत्तर शोधलं आहे. प्रत्येक प्रमुख मंडळाबाहेर एक मोबाइल पोलीस स्टेशन उभारण्यात येणार आहे. म्हणजे एखाद्या महिलेला काही तक्रार करायची असल्यास तिला पोलीस ठाण्यात जाण्याची गरज नाही. ती या मोबाइल पोलीस ठाण्यात जाऊ शकते. तेथे महिला अधिकारी तैनात असतील आणि त्याच ठिकाणी गुन्हा दाखल करता येणार आहे. तशी सुविधा या मोबाइल पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महिला बीट मार्शल
यावेळी मुंबई पोलिसांनी देशातील पहिले महिला बीट मार्शल मुंबईत सुरू केले आहे. महिला पोलीस कर्मचारी बीट मार्शल म्हणून काम करणार आहेत. गणेशोत्सवापासून त्यांचे काम खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे. शहरभर फिरून त्या महिला, मुले यांच्यावर लक्ष ठेवणार आहेत. या महिला पोलीस कर्मचारी प्रशिक्षित असून त्यांच्याकडे शस्त्र असणार आहे. त्यामुळे रस्त्यावर असलेल्या महिलांच्या मदतीला त्या तात्काळ पोहोचू शकणार आहेत. ज्या ठिकाणी सर्वात जास्त छेडछाड, विनयभंग होतात असे एकूण २३६ स्पॉट पोलिसांनी शोधले असून, त्या ठिकाणी या महिला बीट मार्शल खास लक्ष ठेवणार आहेत. महिलांच्या छेडछाड आणि विनयभंगाचे प्रकार करणारे प्रामुख्याने मोटारसायकलवरून फिरत असतात. अश्लील शेरेबाजी करणे, धक्के मारणे आदी प्रकार ते मोटारसायकलवरून करत असतात. त्यामुळे खास मोटारसायकलस्वारांना चाप लावणारे एक पथक तयार करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात हे पथक फक्त मोटारसायकलस्वारांवरच लक्ष ठेवून त्यांच्या हुल्लडबाजीला आळा घालणार आहेत.

मंडळांना सक्त ताकीद
महिला भाविकांशी सभ्यपणे वागण्याच्या सूचना सर्व मंडळांना देण्यात आल्या आहेत. तक्रार असल्यास कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. धक्काबुक्की, लगट ही दर्शनाच्या वेळी होते. त्यामुळे प्रत्येक मंडळाने स्त्री आणि पुरुष भाविकांच्या वेगळ्या रांगा लावाव्यात अशा सूचना दिल्या आहेत. तर मंडपात पुरेसा प्रकाश असावा, भरपूर सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशाही सूचना दिल्या आहेत.

काय काळजी घ्याल?
* शक्यतो महागडे दागिने घालून बाहेर पडू नये.
* शक्यतो दर्शन घेताना गटामध्ये जावे.
* एकटय़ाने जाणे टाळावे.
* मोबाइलवर हेडफोनने बोलू नये.
* गर्दीच्या ठिकाणी विशेष काळजी घ्यावी.
* कुणी छेडछाड करत असल्यास तत्काळ हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करावा.
* प्रत्येक शहरासाठी हा हेल्पलाइन क्रमांक वेगळा असतो.
* हा हेल्पलाइन क्रमांक आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करावा.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girls raise voice against eve teasing
First published on: 05-09-2014 at 01:17 IST