भारताचे दुसरे माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. डॉ. सर्वपल्ली हे भारताचे राष्ट्रपती तर होतेच, परंतु ते स्वतः उच्चशिक्षित व्यक्तिमत्त्व आणि शिक्षकदेखील होते. त्यांची अशी इच्छा होती की त्यांचा वाढदिवस भारतातल्या सर्व आदरणीय शिक्षकांना समर्पित करावा. तेव्हापासून हा दिवस शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान प्रदान करण्यात, मूल्यं जोपासण्यात आणि समतोल विचारसरणी वाढविण्यात शिक्षकांची महत्त्वाची भूमिका ओळखण्यासाठी साजरा केला जातो. कालांतराने आता शिक्षकांची, शिक्षणाची आणि विद्यार्थ्यांची व्याख्या, व्यापकता आणि अध्ययन या सगळ्यांचीच परिभाषा बदलली आहे. समाजमाध्यमं, नवीन शिक्षण धोरण, परदेशी शिक्षण, आधुनिक शिक्षण या सगळ्यामुळेच शिक्षणाच्या कक्षा जरा रुंदावल्या असल्या तरीही माणसाच्या जीवनातील शिक्षणाचं आणि शिक्षकांचं महत्त्व तसूभरही कमी झालेलं नाही. त्याचं स्वरूप थोड्या प्रमाणात बदललं आहे हे निश्चित.

हल्ली मुलं विद्यार्थिदशेत असली तरी त्यांच्याकडे त्यांची त्यांची अशी बरीच ज्ञानार्जनाची साधनं उपलब्ध आहेत. म्हणूनच शिक्षणाची आणि शिक्षकांची त्यांची व्याख्या काय, त्यांच्या आयुष्यात शिक्षकांचं महत्त्व कशा पद्धतीचं आहे, तसंच शिक्षक या बदलाकडे कसं पाहतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे. शिक्षक दिनाबद्दल आजच्या ‘जेन झी’ची भूमिका थोडी वेगळी आहे. त्यांच्यासाठी हा दिवस केवळ औपचारिक कार्यक्रमापुरता मर्यादित नाही. पारंपरिक पद्धतीपेक्षा ते अधिक वैयक्तिक, थेट आणि मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्यावर भर देतात. भाषणांपेक्षा एखाद्या शिक्षकाने त्यांच्या आयुष्यात काय बदल घडवून आणला, कसा आत्मविश्वास दिला किंवा समजून घेतलं, हे अधोरेखित करणं त्यांना अधिक महत्त्वाचं वाटतं. पुण्याचा एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळा, लोणी काळभोर इथला प्रा. आदित्य सरदेसाई सांगतो, ‘काहींच्या मते, जेन झीचे विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांनी त्यांना जे सांगितलं आहे त्याबद्दल थोडे अधिक संवेदनशील असतात आणि दररोजच्या परिस्थितीतही भावनिक प्रतिसाद देतात… परिणामी शाळांमध्ये समुपदेशन व्यावसायिकांची मागणी वाढते आहे. आत्ताचे विद्यार्थी मागील पिढीपेक्षा अधिक ध्येयवेडे आहेत. सहज उपलब्ध असलेल्या माहितीचा फायदा म्हणा किंवा अति प्रमाणात माहिती उपलब्ध असल्याचा तोटा म्हणा, त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. विद्यार्थी मोठ्या चित्राऐवजी त्यांना त्या क्षणी काय हवं आहे यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे सध्या शिक्षकांना या पिढीची वैशिष्ट्यं ओळखून त्यांच्याशी संवाद साधतानाही बरेच बदल करावे लागत आहेत.’ पूर्वी आई-वडिलांबरोबरच शिक्षकांचाही तेवढाच धाक असायचा, त्यांनी सांगितलेला शब्द हा शेवटचा असायचा, आता थोड्याफार प्रमाणात हे चित्र बदललेलं दिसतं. त्याबद्दल बोलताना ‘किशोरवयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना तुम्ही काय बोलता आणि कसं बोलता याबद्दल थोडं सतर्क राहावं लागतं. अनुभवावरून सांगायचं झालं तर मी म्हणेन की, विद्यार्थी अशा शिक्षकांशी अधिक जोडले जातात जे त्यांच्याशी चांगला संवाद साधतात, ते तुमचा सूर ओळखतात आणि गोष्टींचं आकलन त्यांना फार लवकर होतं. त्यातच सोशल मीडिया पोस्ट्ससारख्या माध्यमातून विद्यार्थी अनेक समज-गैरसमज त्यांचे ते करून घेतात’, याकडेही आदित्यने लक्ष वेधलं.

‘आत्ताच्या विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक मार्गदर्शन पुरेसं नाही. अत्यंत स्पर्धात्मक जगात वावरणारी ही पिढी अनेकदा ताणतणाव, चिंता आणि ओळख संघर्षांना सामोरी जाते. त्यामुळे आजच्या शिक्षकाला भावनिकदृष्ट्या बुद्धिमान असणं आवश्यक आहे. सहानुभूती, सक्रिय ऐकणं आणि पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाणारं मार्गदर्शन देणं हे महत्त्वाचं आहे. नवीन काळातील शिक्षक हा केवळ धडे देणारा नसून नातेसंबंध निर्माण करणारा असतो. या पिढीसाठी सर्वोत्तम शिक्षक तो असतो, जो त्यांना केवळ परीक्षेसाठी तयार करत नाही तर त्यांना आयुष्यासाठी तयार करतो’ असं नवी मुंबईच्या ओरिएंटल महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेतल्या प्रा. इंद्रायणी उठाले सांगतात. एकीकडे शिक्षकांचा दृष्टिकोन अशा पद्धतीने बदलतो आहे. त्याच वेळी विद्यार्थ्यांच्या त्यांच्याकडून नक्की काय अपेक्षा असतात, तसंच शाळा किंवा महाविद्यालयातील शिक्षकांव्यतिरिक्त या मुलांची शिक्षकांची व्याख्या काय आहे याबद्दल डोंबिवलीची सानिका जोशी सांगते, ‘प्राध्यापक, पालक, मित्र आणि आता गूगल किंवा चॅट जीपीटी हेही अर्थातच माझे सर्वात मोठे शिक्षक आहेत. माहिती मिळवण्याची साधनं आता भरपूर आहेत, त्यामुळे जिथून योग्य ती माहिती मिळते ती साधनं आता प्रचलित आहेत. पण त्याच वेळी कोणतीही व्यक्ती त्याला किंवा तिला मिळालेल्या अनुभवांमधून सर्वात जास्त शिकते, यावरही माझा दृढ विश्वास आहे.’ व्यक्ती तितक्या प्रकृती, हळूहळू नोकरी करायला लागल्यावर बॉसबरोबर कसं वागायचं, मॅनेजरशी कसे व्यवहार करायचे, हे सगळं अनुभवातून शिकते आहे. यातून मला मिळालेला आत्मविश्वास वेगळ्याच पातळीवरचा आहे. मी अभ्यासक्रमात काय चूक आणि काय बरोबर आहे याबद्दल कॉलेजमधील माझ्या मार्गदर्शकांशीसुद्धा चर्चा करते. माझ्या व्यक्तिमत्त्वाचा आलेख ज्या ज्या माध्यमातून, ज्या ज्या व्यक्तींमुळे चढता राहिला ते सगळे माझ्यासाठी शिक्षकच आहेत, असंही सानिका सांगते.

थोडक्यात, शिक्षक आणि विद्यार्थी दोघांचाही बदलत्या प्रवाहाबरोबर एकमेकांशी जुळवून घेत पुढे जाण्याकडे कल दिसून येतो. केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण देणं एवढ्यापुरतंच शिक्षक मर्यादित राहत नाहीत. तसंच विद्यार्थ्यांनाही शिक्षकांकडून शिक्षणाबरोबरच त्यांच्या आयुष्यातील अनुभवावर आधारित ज्ञान मिळवण्याची आस दिसून येते. पूर्वी गुरुकुल परंपरा ही भारताची ओळख होती. गुरूला अनादी अनंत महत्त्व असायचं, गुरू हा आयुष्याचा गणगोत बांधणारा एक दुवा असायचा. आता गुरुकुल ते गूगल हे संक्रमण झालं आहे. आता काही गोष्टी थोड्या यांत्रिक पद्धतीने होतात. विद्यार्थ्यांना अनेकदा असं वाटतं की, ‘गूगलला सर्व काही माहिती आहे.’ त्यामुळे त्यांची शिक्षकांवरची मदार थोड्याफार प्रमाणात कमी झाली आहे. इतर क्षेत्रांत जसं बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी सतत स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता भासते आहे, तसं शिक्षकांनाही शिक्षण क्षेत्रात हा बदल आव्हानात्मक वाटू शकतो. किंबहुना, इतर क्षेत्रासारखी इथंही स्पर्धा वाढली आहे. पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक नवोपक्रमाचं संतुलन साधणं बऱ्यापैकी कठीण काम असल्याने शिक्षकांची जबाबदारी अधिक वाढली आहे.

आजचे विद्यार्थी प्रश्न विचारणारे आहेत. केवळ पुस्तकातील मजकूर स्वीकारण्यापेक्षा ते त्यामागची तथ्यं गूगलवर शोधतात, तपासतात आणि स्वतःची मतं बनवतात. शिक्षण म्हणजे फक्त पदवी नव्हे, तर करिअर घडवणारा मार्ग- ही त्यांची धारणा आहे. ऑनलाइन कोर्सेस, यूट्यूब, पॉडकास्ट यांना ते शाळा-कॉलेजइतकंच महत्त्व देतात. कौशल्याधारित शिक्षणावर त्यांचा भर आहे – कोडिंग, डिझाईन, कम्युनिकेशन, आर्थिक साक्षरता यांसारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात. कालबाह्य अभ्यासक्रम, परीक्षेचा अतिरेक, जीवनकौशल्यांचा अभाव यावर ते उघडपणे टीका करतात. गटामध्ये शिकणं, एकत्र काम करणं, पीअर लर्निंग यावर त्यांचा अधिक विश्वास आहे, शिक्षणाकडे पाहण्याचा विद्यार्थ्यांचा हा बदललेला दृष्टिकोन शिक्षकांनाही अधिक महत्त्वाचा वाटतो.

‘शिक्षक दिना’च्या निमित्ताने विद्यार्थी आणि शिक्षकांशी बोलताना, शिक्षण पद्धत पूर्णपणे बदललेली नाही हे जाणवतं. त्यामुळे जुनी पद्धत आणि भविष्यातील बदल स्वीकारण्याची गरज या दोहोंचा समतोल साधण्याचा प्रयत्न करणं गरजेचं ठरतं आहे. अर्थातच, शिक्षक या तणावाच्या केंद्रस्थानी आहेत. पारंपरिक आणि आधुनिक, अधिकृत आणि मैत्रीपूर्ण, परीक्षा-केंद्रित आणि जीवन-केंद्रित शिक्षण सर्व एकाच वेळी मिळणं अपेक्षित आहे. जर शिक्षक आणि विद्यार्थी दोघेही मोकळेपणाने आणि परस्पर आदराने या सतत बदलणाऱ्या वातावरणाशी मिळवून घेऊ शकले, तर आजचे डिजिटल वर्ग केवळ यांत्रिक शिक्षणाचं ठिकाण राहणार नाहीत, तर सर्वांगीण विकासाचं केंद्र ठरू शकतील.