एकच चहा, पण किती वेगवेगळी रूपं धारण करू शकतो. कधी तो दक्षिण आफ्रिकेतील रेड टी बनून समोर येतो, कधी जपानी चहा परंपरेचा भाग म्हणून येतो.. कधी इंग्लिश टी म्हणून समोर येतो, तर कधी अस्सल भारतीय मसाला चाय म्हणून पुढय़ातल्या कपात किंवा ग्लासात वाफाळतो. फोर्ट परिसरातील द टी ट्रेल कॅफे या चहाला केंद्रस्थानी ठेवलेल्या ‘कॅफे’मध्ये चहाच्या वेगवेगळ्या लीला अनुभवायला मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छच्या रणापासून पार मिझोराम आणि मेघालयापर्यंत बहुतांश भारतीयांना एक गोष्ट नेहमीच आपली वाटत आली आहे. ती गोष्ट म्हणजे चहा! भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात चहा पिकतो आणि विकतोदेखील. पण चहा म्हणजे केवळ तरतरी येण्यासाठी ढोसण्याचं पेयं नव्हे, तर ती क्षुधाशांतीची एक साधना आहे, हा विचार भारतीयांवर कधी कोणी बिंबवलाच नाही. तो रुजला तो जपानमध्ये आणि काही प्रमाणात ब्रिटनमध्येही. जपानात चहाची उद्याने तयार करून किंवा एखाद्या डोंगरावर देवालयासारखी चहालये उभारून त्याची आराधना केली गेली. फ्रान्समध्ये जसे वाईनसारख्या रक्तवारुणीशी प्रियाराधना करून तिची मर्जी संपादन करणारे मद्यमुनी आहेत, तसेच जपानातही चहामुनींची परंपरा आहे.

भारतात मात्र आपण चहाला ‘अमृततुल्य’ वगैरे उपाधी देऊनही रस्त्यावर आणला. एखाद्या नटाचा प्रचंड मानसन्मान करून शेवटी त्याला त्याच्या चाळीतल्या खोलीत पथारी पसरायला लागावी, तस्साच! वास्तविक भारतीय संस्कृतीत ध्यानाला फार महत्त्व. पण इथे पाश्चात्त्यांच्या प्रभावामुळे कॉफी हाऊस किंवा कॅफेज् फोफावले. पण चहाला मात्र टपरीवरच समाधान मानावं लागलं. वास्तविक जॅपनीज किंवा ब्रिटिश चहापान पाहिलं की, हे चहापान की एक आनंददायी सोहळा असा प्रश्न पडतो. त्यांची चहापानाची तयारी बघितली, तरी आपल्याकडे होणाऱ्या पंचपक्वान्नांच्या पंगतीसाठीच्या तयारीची आठवण व्हावी. लखलखीत कपबश्या, साखरेसाठी आणि दुधासाठी चकचकीत भांडी, लख्ख घासलेले चमचे, गरम पाण्याची किटली, चहाची पानं गरम पाण्यात बुडवण्यासाठी जाळी असा तो सगळा सरंजाम देखणा असतो.

असाच सरंजाम खाबू मोशायला फोर्ट भागातील एका कॅफेमध्ये आढळला. कॅफेचं नावही मोठं गमतीशीर होतं. ‘द टी ट्रेल कॅफे’! वास्तविक कॅफेची आकर्षक सजावट बघूनच खाबू मोशायला मेन्युकार्डाच्या उजव्या बाजूला असलेले भलेमोठे आकडे दिसायला लागले होते. बाबू खवय्या बरोबर असता तर, खाबूने मुकाट रस्ता धरून जवळच्या एखाद्या गाडीवरच्या वडापाववर समाधान मानलं असतं. पण आज खाबू मोशायबरोबर त्याची मैत्रीण खादाड बुचकी असल्यानं खाबूने टी ट्रेलची पायरी चढायचं धैर्य दाखवलं.

एखाद्या कॉफी शॉपमध्ये गेल्यावर कॅफेनच्या वासाने शांती मिळते. इथे तोच अनुभव टॅनिनचा किंवा थोडक्यात चहाचा गंध देतो. अशा नवख्या हॉटेलांमध्ये गेल्यावर खाबू मोशाय काही काळ गांगरतो. पण साक्षात खादाड बुचकी बरोबर असल्याने या वेळी खाबूच्या कपाळावर घामाचे थेंब वगैरे जमले नाहीत. थोडय़ाच वेळाने एका वेटरने हसतमुखाने खाबूसमोर दोन मेन्युकार्ड ठेवली. काही फाइन डाइन रेस्तराँमध्ये गेल्यावर बार आणि फूड अशी दोन मेन्युकार्ड तुमच्या समोर येतात. त्यातलाच हा प्रकार. पण इथे टीज् आणि ईट्स अशा दोन मेन्युकार्डपैकी टीज्मध्ये चहाचे प्रकार आणि ईट्समध्ये खाण्याचे प्रकार यांचा समावेश होता.

चहाच्या प्रकारांचं मेन्युकार्ड बघून खाबू थक्क झाला. एवढय़ा प्रकारचे चहा जगाच्या पाठीवर मिळतात, हेच त्याच्यासाठी धक्कादायक होतं. आपल्याला फक्त उकाळा, चिनी कम, मसालानी चाय, कटिंग आदी देशी प्रकारच ठाऊक!  पण इथे म्हणजे साऊथ आफ्रिकेपासून जपानपर्यंत आणि अर्जेटिनापासून ते ब्रिटनपर्यंत सर्वच देशांमधील चहाचे प्रकार मिळत होते. विशेष म्हणजे मेन्युकार्डची उजवी बाजूही आवाक्यातली होती. खाण्याच्या पदार्थामध्ये नेहमीचे पास्ता, सूप्स, सलाड, ब्रुशेटा, सँडविचेस आणि चक्क कांदा भजी असा मेन्यू होता. विशेष म्हणजे यातील काही पदार्थामध्ये चहाची पानं टाकून त्यातही चहाचा गंध मिसळण्यात आला होता.

खाबू आणि खादाड बुचकी या दोघांनी सुरुवातीला श्ॉमोमाइल टय़ुबर सूप मागवलं. या सूपमध्ये ग्रीन टीचा थोडासा गंध आणि इतर घटक होते. या सूपबरोबर दिलेला गार्लिक ब्रेड इतर कुठेही मिळणाऱ्या गार्लिक ब्रेडपेक्षा खूपच वेगळा होता. इतर ठिकाणी ब्रेडवर गार्लिकचा मारा केला जातो, असं खाबूचं स्पष्ट मत आहे. पण हा ब्रेड म्हणजे मध्येच लागणारा लसणीचा ठसका आणि बाकी छान लोण्याचा स्वाद, यांचं मिश्रण होतं. त्याचप्रमाणे सूपदेखील जिव्हा शांती करणारं होतं.

त्याशिवाय खाबूने मागवलेला ऑलिव्ह अँड ग्रीन टी ब्रुशेटादेखील दाद घेऊन गेला. या ब्रुशेटावर ऑलिव्ह ऑइल टाकून आणखी मजा आणली होती. त्याशिवाय ग्रीन टीची हलकी उपस्थिती या ब्रुशेटाला एक वेगळीच चव देत होती. त्याशिवाय चीजची पखरणही कमाल! खादाड बुचकीनेही थाई करी राईस मागवला. या करीमध्येही ग्रीन टीचा अंश होताच. मस्त गरमागरम मोकळा मोकळा भात, त्यावर हिरवीगार करी आणि त्याचा स्वर्गीय गंध, यांमुळे खाबू आणि खादाड बुचकी दोघंही काही काळ हरवून गेले.

खाणं झाल्यानंतर मग शेवटी चहा मागवण्यासाठी खाबूने पुन्हा एकदा चहाच्या मेन्युकार्डवर नजर टाकली. अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, जपान, रशिया येथील चहांपासून व्हाइट टी, ग्रीन टी, स्मोकी चायनिज लॅपसँग सुचाँग हा विन्स्टन चर्चिल यांचा आवडता चहा, क्लासिक चहांच्या पानावरील निलगिरी, अर्ल ग्रे, आसाम रिच आणि खास मसाला चहा, अद्रक चहा, कुल्हडमधील चहा अशा अस्सल भारतीय चहांपर्यंत चहांचं संमेलन या मेन्युकार्डवर भरलं होतं. बरं, यातील चहांच्या किमतीही १०० ते ११० रुपयांच्या आसपासच होत्या.

खाबू मोशायने आपल्या आवडत्या रंगाचा म्हणून साऊथ आफ्रिकन रेड टी मागवला, तर खादाड बुचकीने हेल्थ कॉन्शस वगैरे बनत डिटॉक्स हा शरीरातील आम्ल-पित्त आदी बाहेर काढण्यास मदत करणारा चहा मागवला. थोडय़ाच वेळात दोन ट्रे घेऊन वेटर अवतरला. प्रत्येक ट्रेमध्ये चहाची किटली, एक काचेचा कप आणि बशी, साखरेचे पुडे आणि एक छोटंसं वाळूचं घडय़ाळ. सुरुवातीला खाबूला त्या घडय़ाळातील वाळू म्हणजे साखर वाटली. ते घडय़ाळ फोडून त्यातील साखर चहात टाकण्याचा अर्थ वगैरे इथे अभिप्रेत आहे का, अशी शंकाही आली. त्यानुसार खाबू ते घडय़ाळ फोडणार, एवढय़ात वेटर पुन्हा अवतरला आणि त्याने एक मिनीट मोजण्यासाठी हे घडय़ाळ वापरायचे, असं सांगून ते घडय़ाळ वाचवलं. एक मिनीट संपलं की किटलीतला चहा कपात ओतायचा होता. खाबूने आज्ञा शिरसावंद्य मानून एका मिनिटानंतर चहा कपात ओतून लगेच एक घोट घेऊन बघितला. जपानी चहापंडित चहाची एवढी वाहवा का करतात, ते खाबूला एका क्षणात लक्षात आलं. आपण भारतीय करंटे लोक चहात दूध टाकून चहाची चव मारतो. पण तो नुसता बिनदुधाचाच नाही, तर बिनसाखरेचा चहादेखील खाबू मोशायच्या अंतरंगाचा ठाव घेत होता. काही काळ खाबू मोशाय भवताल विसरून त्या चहाबरोबर हितगुज करत राहिला. त्या आध्यात्मिक समाधीतून खाबू मोशायला बाहेर काढण्यासाठी वेटरला बिल आणावं लागलं. हे बिलदेखील सव्‍‌र्हिस टॅक्ससकट हजार रुपयांपर्यंतच होतं. त्यामुळे खाबू एकदम निष्टिद्धr(१५५)ांत होता. या कॅफेतून बाहेर पडताना खाबूला चहाचा एक वेगळाच अर्थ उमगला. अजूनही त्या चहाची मैफल खाबूच्या रंध्रारंध्रात सुरू आहे.

द टी ट्रेल कॅफे

कसे जाल :मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून काळा घोडा भागात किंवा जहांगीर आर्ट गॅलरीला येण्यासाठी डी एन रोडवरून चालत निघाल्यावर साधारण मुंबई विद्यापीठाच्या इमारतीसमोर तुम्हाला कंदील नावाचं हॉटेल दिसेल. त्याच्या थोडंसं पुढे फॅब इंडियाचं शोरूम आहे. त्या शोरूमच्या पुढे डाव्या बाजूला गल्लीत वळा. थोडंसं चालत गेल्यावर रस्ता पुन्हा डाव्या बाजूला वळेल. तिथेच द टी ट्रेल कॅफे दिसेल.

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of tea and tea categories
First published on: 26-02-2016 at 01:07 IST