मयूरी धुमाळ

केंद्र सरकारने ११ डिसेंबरला नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केलं आणि धार्मिक तत्त्वावर नागरिकता ठरवणारं विधेयक म्हणून देशभरात त्या विरोधात निदर्शनं झाली. समर्थक-विरोधकांचे वाद झाले. आता जेव्हा अवैध स्थलांतरितांचा प्रश्न येतो तेव्हा मग मागे जाऊन थोडं या देशाच्या मूळ नागरिकांचा इतिहास शोधावा म्हटलं तर अवघड होऊन बसतं. कारण वरकरणी पाहता आपण आपला इतिहासच आर्यापाशी सुरू करतो..

आर्य कोण होते? कुठले होते? या सगळ्या प्रश्नांना काही एक ठरावीक उत्तर अजून नाही. आणि तरीही बहुमान्य असा आर्याच्या भारतावरल्या आक्रमणाचा, त्यांच्या स्थलांतराचा सिद्धांत समोर असताना आपण स्वत:ला त्यांचे वंशज म्हणवतो. पण त्यांच्या आगमनानंतर हजारो जमाती या प्रदेशात आल्या, इथे स्थायिक झाल्या आणि असं असूनही आपला इतिहास आपण एकतर थेट आर्याशी जोडतो किंवा अगदी अलीकडच्या सोयीस्कर मुघल, राजपूत, मराठा, ब्रिटिश इतपतच वळून पाहतो..

आर्यापूर्वीही इथे आदिवासी म्हणजे इथले या प्रदेशाचे मूळ रहिवासी होते. द्रविड संस्कृती, सिंधू संस्कृती जे प्रगतही होते शिवाय, पर्शिया, मध्य आशिया, मंगोल अशा कुठून कुठून जमाती इथं आल्या. ग्रीक, शक, हूण, कुशाण, मौर्य, राष्ट्रकूट काय किंवा घुरी, तुघलक, खिल्जी काय या सगळ्यांच्या जेनेटिक्सचा काही ना काही संकर आपल्या जीन्समध्ये असणारच आहे. तेव्हा वर्णसंकर, जातिसंकर, धर्मसंकर झाला हे नाकारणं आणि त्यामुळं स्वत:ला थेट आर्यवंशी म्हणणं मूर्खपणाचंच म्हणायला हवं.

मुळातच मानव जमात ही ग्लोबलायझेशनचं प्रॉडक्ट आहे. जमीन, तिची मालकी, अस्मिता, राष्ट्रप्रेम, राष्ट्रवाद ही सगळी संक्रमणाची बायप्रॉडक्ट्स आहेत. महत्त्वाचं म्हणजे ‘हिंद’ हा शब्द पर्शियन आहे. इथली मंदिरं, त्यांचं सौंदर्य यात ग्रीक स्थापत्यशास्त्राचा अंश दिसून येतो. हे लक्षात घेताना उत्क्रांतीची व्याप्तीही लक्षात घेतली पाहिजे. उत्क्रांती ही केवळ जैविक नसते तर ती सांस्कृतिक आणि सामाजिकही असते. ती स्वत:चं संक्रमणाचं चक्र (सायकल) सांभाळत असते. हे वर्तुळाकार संक्रमणच इतिहासाची पुनरावृत्ती शक्य करत असावं. म्हणूनच ‘हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ’ असं म्हटलं जात असावं. मानवी इतिहासात ज्या घटनांना आपण रिव्हॉल्यूशन म्हणत आलो त्या घटना म्हणजे सामाजिक उत्क्रांतीचे टप्पे म्हणता येतील. आपापल्या भौतिक, सामाजिक वेगानुसार जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात वेगवेगळ्या गतीनं ही संक्रमणं झालेली पाहायला मिळतात. प्रत्येक समाज या टप्प्यांतून जातच असतो. तसतसा तो जास्तीत जास्त सुसंस्कृत (civilized) होऊ  पाहात असतो. पण अर्थशास्त्राच्या ‘थिअरी ऑफ युटिलिटी’प्रमाणे सुसंस्कृत समाजांना नवनव्या घटना पुन्हा पुन्हा अराजकतेच्या तळाला आणत राहतात.. स्थिरता मिळवू पाहणारा समाज एकदा मूलभूत गरजा आणि आवश्यकतांच्या संघर्षांतून बाहेर पडला, सुखावह आयुष्य जगू लागला की मगच त्याला कला, व्यवहार, व्यापार, सुबत्ता मिळते आणि या समाधान अन् सुबत्तेतून मग त्याच्या धर्म, अस्मितांचे प्रश्न जागे होतात. स्पर्धा सुचू लागते आणि यातूनच पुन्हा नव्या अस्थिरतेकडे हा समाज वाटचाल करू लागतो.

अशा बऱ्याच संक्रमणांतून आपण आजच्या आधुनिक राष्ट्र, नेशन स्टेट, ग्लोबल, पॉलिटिकल, लिबरल वगैरे परिभाषांपर्यंत पोहचलो आहोत ही मोठी उत्क्रांती! या उत्क्रांतीचा प्रवास एका पूर्णत्वाच्या स्थिरतेकडचा आहे. जिथे मानवी मूल्यांचा, स्वातंत्र्याचा अखंडित उपभोग शक्य असेल; वगळण्यासाठी जात, धर्म, लिंग, वर्ण, वर्ग, सत्ता, असे कोणतेच निकष नसतील. पण सध्या तरी अशी स्थिरता इन्फिनिटीपाशी कुठे तरी असावी असंच वाटतंय. तिच्यापुढे फासिझम, अतिरेकी राष्ट्रवाद, प्रोटेक्शनिझमची आव्हानं पुन्हा पुन्हा उभी राहताना दिसतात.

आर्य जे कुणी असतील, जिथले कुठले असतील, त्यांनी लादलेला, संक्रमित केलेला ‘वर्चस्वाचा’ बराच प्रबळ डॉमिनन्ट असा जीन इथल्या मातीत रुजला आणि आता त्यांच्याशी थेट नातं सांगणारे त्या वर्चस्वाचेही वंशज ठरतात. वर्चस्व म्हणजे आर्यत्व असेल तर आज पुन्हा एकदा इतिहासाचं वर्तुळ अस्मितेच्या आणि अस्तित्वाच्या संघर्षांपाशी येऊन पोहोचलंय. हिटलरही स्वत:ला आर्यवंशी ‘समजायचा’, वर्चस्वाचा हाच जीन त्याच्या रक्तात भिनला आणि यातूनच जन्मलेला नाझी भस्मासुर जगानं पाहिला.. आता प्रश्न जेव्हा स्थलांतरितांचा येतो तेव्हा वर्चस्वाचा अधिकार लादणारे हे आर्यवंशी स्थलांतरितांचेच वंशज ठरत नाहीत का? त्यामुळे या भूमीवरचा अधिकार असा एकाच कुणाच्या नियमांवर कसा ठरेल?

खरं तर आम्ही स्वतंत्र झालो तेव्हा आम्हाला वाटलं या इतिहासातल्या चुकांमधून शिकून उत्क्रांतीचे काही टप्पे गाळून स्थिरत्वाच्या थोडं जास्त जवळ जाता येईल. पण वर्तुळाच्या सिद्धांतानं आम्हाला पुन्हा तिथंच आणून सोडलंय!

viva@expressindia.com