रुजुता दातार
Already have an account? Sign in
पेहराव हा प्रत्येक संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतात पोशाखांचे अनेक प्रकार आहेत. एकीकडे सणासुदीच्या निमित्ताने पारंपरिक पोशाखाचे प्रकार आपल्याकडे कायम ट्रेण्डी असतात, तर दुसरीकडे सणासुदीच्या निमित्ताने आपल्याला आपली संस्कृतीही जपायची इच्छा असते आणि नवं काही करून पाहण्याचीही आवड असते. नव्या-जुन्याचा समतोल साधण्याचा हा आग्रह कपडय़ांच्या बाबतीत तर ठळकपणे जाणवतो. त्यामुळेच हल्ली इंडो-वेस्टर्न कपडे अधिक ट्रेण्डमध्ये आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने खण आणि इरकलचा पाश्चिमात्य अवतार धारण केलेले पेहराव अधिक पाहायला मिळणार आहेत, असं फॅशन डिझायनर सांगतात.
फॅशनच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही सणांना स्टायलिश, हटके लुक कसा करता येईल? आपण इतरांपेक्षा कसे वेगळे दिसू याकडे सगळय़ांचा कल दिसून येतो, कारण प्रत्येक सण-समारंभ, कार्यक्रमांनुसार फॅशन ट्रेण्ड्स बदलत असतात. त्यामुळे दररोज बदलत जाणाऱ्या फॅशन तंत्रानुसार स्वत:ला अपडेट ठेवणं ही काळाची गरज आहे. आपल्याकडे पारंपरिक पैठणी, खण, इरकल यांची आवड आणि मागणी काळ बदलला तरी अजूनही जोरदार आहे. हे पारंपरिक फॅब्रिक मुख्यत: साडीत जास्त लोकप्रिय आहे. मात्र आता साडी, कुर्ते याबरोबरीनेच वेस्टर्न पॅटर्नमध्ये या फॅब्रिकला तरुण-तरुणींकडून अधिक पसंती मिळते आहे. पैठणी, खण आणि इरकल फॅब्रिकमध्ये जॅकेट, ड्रेस, श्रग, पँट्स, वन पीस बाजारात उपलब्ध आहेत. सणांच्या दिवशी हटके, पण संस्कृतीला धरून पेहराव करण्याचा ट्रेण्ड दिवसेंदिवस वाढतो आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत सणांच्या दिवशी मुली साडी आणि मुलांमध्ये कुर्ता एवढीच फॅशन होती; पण काळानुसार हा फॅशन ट्रेण्ड झपाटय़ाने बदलत जाताना दिसतो आहे. फॅशन हा आवडीचा विषय असल्याने आपल्याला हवी तशी फॅशन ड्रेसमध्ये मिळाली नाही की कस्टमायझेशन करून सणांना प्रामुख्याने इंडो-वेस्टर्न पॅटर्नमध्ये आपल्याला हवा तसा पेहराव करण्यावर सगळय़ांचा भर वाढतो आहे. इतकंच नव्हे तर खण, पैठणीपासून सुंदर ड्रेसेस बनवणारे अनेक ब्रॅण्ड्स हल्ली सगळीकडे पाहायला मिळत आहेत.
गुढीपाडवा अगदी काही दिवसांवर आल्याने खरेदीची लगबग सगळीकडे सुरू आहे. त्यासाठी एथनिक ड्रेसेसऐवजी खण किंवा पैठणीच्या कापडाचे वेस्टर्न ड्रेसेस पेअर करण्याला प्राधान्य मिळते आहे, असं अभिनेत्री आणि ‘खणेरी’ ब्रॅण्डची संस्थापक मानसी जोशीने सांगितलं. ‘खणामध्ये वेगवेगळे रंग उपलब्ध आहेत. शिवाय या फॅब्रिकवर असलेल्या शंकरपाळय़ाच्या आकाराच्या डिझाईनमुळे त्याचे कपडे उठावदार दिसतात, असं ती सांगते. कर्नाटक, पंढरपूर
मराठमोळी पैठणी नेहमीच स्त्रियांना हवीहवीशी वाटते. देशभरातच नव्हे तर जगभरात सात देशांमध्ये पैठणीचे कपडे धाडणाऱ्या, डिझाईन आणि निर्मितीही करणाऱ्या ‘धनाज पैठणी’ची धनश्री म्हणते, ‘आपल्याकडे एक तरी पैठणी असावी असं स्त्रियांना वाटत असतं. पैठणी म्हटलं की डोळय़ासमोर येते ती साडीच. एखादा सणवार वगळता साडी नेसून सजण्याची संधी फारशी मिळत नाही; पण त्याच पैठणीपासून जर वेगवेगळय़ा प्रकारचे ड्रेसेस डिझाईन केले तर ते सगळय़ा कार्यक्रमांसाठी छान दिसतात. सावरायला आणि वावरायलाही सोपे असल्याने त्यांना अधिक पसंती मिळते.’ ट्रेण्ड बदलत जातो तसे पैठणीच्या कपडय़ांचे डिझाईन्स, पॅटर्न्सही बदलतात, असं ती म्हणते. येवल्याच्या पैठणीचे लॉन्ग ड्रेसेस, लॉन्ग आणि शॉर्ट कुर्तीज आहेत. फक्त स्त्रियांसाठीच नव्हे तर पुरुषांसाठीही पैठणी जॅकेट्स उपलब्ध आहेत, असं तिने सांगितलं. सध्या पुरुषांच्या पैठणी जॅकेटसाठी खूप मागणी आहे. पैठणीमध्ये ग्राहकांना हव्या असलेल्या पॅटर्नमधील ड्रेसेस उपलब्ध करून देत असल्याचंही धनश्रीने सांगितलं. मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या या ट्रेण्डी इंडो-वेस्टर्न पेहरावाचा उपयोग करत येत्या गुढीपाडव्याला परंपरा जपत नवं काही साधण्याचा आपला हट्ट पूर्ण करणं फॅशनप्रेमींना सहज शक्य होणार आहे.