वैष्णवी वैद्य, विपाली पदे – viva@expressindia.com

महाभारतातल्या शीर्षक गीतातलं एक वाक्य ‘सीख हम सीखे युगों से.. नये युग का करे स्वागत.’ संग्रहालय फक्त एक वास्तू नाही, भूतकाळातील धागे वर्तमानाशी जोडताना समोर येणारा पुढच्या अनेक पिढय़ांचा भविष्यकाळ आहे. भूतकाळात आताचे हे संग्रह जिवंत होते, वर्तमानात आपण आहोत आणि भविष्यात आपण केलेलं नव्या माध्यमांचं संशोधन असणार आहे. कालातीत घटनांचे बंदिस्त रूप म्हणजे संग्रहालय. १८ मे हा ‘संग्रहालय दिन’ म्हणून साजरा झाला. सगळे ठप्प असतानाही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्या पद्धतीने ‘संग्रहालय दिन’ साजरा झाला ते पाहता के वळ ऐतिहासिक ठेवा म्हणून त्याकडे न पाहता अधिक अभ्यासपूर्ण वृत्तीने ‘संग्रहालयशास्त्रा’चा नव्याने वेध घेतला जातो आहे हे सहज लक्षात येते.

इतिहासाशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा म्हणजे ‘संग्रहालय’; संग्रहालय ही एक अशी वास्तू आहे जी तिच्या प्रत्येक कोपऱ्यातून आपल्याला इतिहासातल्या वास्तव कथा स्वत: सांगत असते. अनेक घटना, चळवळी, व्यक्तिरेखा, आठवण रूपात आपल्याला संग्रहालयातून भेटत असतात. आपल्या प्रांताचे वैभव जपणे आणि पुढच्या अनेक पिढय़ांपर्यंत ते पोहोचवण्याचं काम संग्रहालये करतात. पूर्वी लिखित संग्रह करणे शक्य नव्हते. म्हणून कोरीव कामं व्हायची. अश्मयुगातील दाखले आपल्याला अशा कोरीव माध्यमातूनच मिळतात. संग्रहालयांची मुळं ख्रिस्तपूर्व काळापासून आहेत अशी माहिती आता वाचायला मिळते. संग्रहालयांना भेट देणं हा प्रत्येकासाठी वेगवेगळा अनुभव असू शकतो. कलाप्रिय लोक के वळ निस्सीम कला अनुभवायला तिथे जातात. मात्र  त्यापलीकडे जात या संग्रहालयांचा अभ्यासपूर्ण नजरेने शोध घ्यायचा प्रयत्न तरुणाई करताना दिसते आहे. आपल्याकडे असलेला अमूल्य ठेवा जतन करणं, तो पुढच्या पिढीकडे नेणं या जबाबदारीच्या प्रगल्भ भावनेतून संग्रहालयांकडे पाहण्याचा आणि त्याच उद्देशाने जगभरात संग्रहालय दिन साजरा करण्याकडे कल वाढतो आहे.

आतापर्यंत संग्रहालये आणि पुरातत्वशास्त्र यासारख्या गोष्टी पर्यटनाच्या माध्यमातून पाहिल्या गेल्या, पण आता तरुणाईसाठी संग्रहालयं फक्त एक  देदीप्यमान वास्तू न राहता संशोधनाचा विषय बनू लागली आहेत. इतिहासाशी जोडणारा हा दुवा समाजात ज्ञानप्रपंचाची पाळंमुळं रुजवतो आहे.  ‘संग्रहालयशास्त्र’ किंवा ‘म्युझियोलॉजी’ हा विषय पुरातत्वशास्त्राच्या अभ्यासक्रमातसुद्धा असतो. त्यात आम्हाला टायपोलॉजी, डिस्प्ले टेक्निक्स, प्रकाशयोजना, संग्रहालयाशी निगडित कायदे, संग्रहालयाचे जतन करणे आणि त्या अभ्यासक्रमाची व्याप्ती अशा विषयांवर अभ्यास असतो. या क्षेत्राचे ऑनलाइन अभ्यासक्रम अजून फारसे आलेले नाहीत, कारण यात व्यावहारिक ज्ञानावर जास्त भर दिला जातो,’ असं सायली पेंडसे सांगते. ती डेक्कन महाविद्यालयाच्या पुरातत्व विभागाची विद्यार्थिनी आहे. ‘पुरातत्वशास्त्र आणि संग्रहालयशास्त्र या दोन क्षेत्रांत किंचित फरक आहे, पण दोन्हीसाठी संशोधनात्मक आणि चिकित्सक बुद्धीची गरज आहे’, अशी माहितीही तिने दिली.

संग्रहालयाचे योग्य प्रकारे जतन, त्यामधून येणारा महसूल, संग्रहालय आणि मार्केटिंग, अशी अनेक सामाजिक अंगे तरुणांच्या अभ्यासात सध्या दिसून येतात. संग्रहालय हे फक्त पर्यटन क्षेत्र राहिलं नसून ती सामाजिक चळवळ होताना दिसते आहे.  या वर्षी संग्रहालय दिनाच्या निमित्ताने अनेक मोठय़ा परदेशी संग्रहालयांच्या व्हच्र्युअल टूर यूटय़ूबच्या माध्यमातून आयोजित करण्यात आल्या होत्या. आपल्या देशात असणाऱ्या खूप जुन्या आणि  समृद्ध ठेवा असणाऱ्या संग्रहालयांचा डिजिटल वॉक-थ्रूही झूम करून बघता आला. लॉकडाऊनच्या या काळात व्हच्र्युअल टूर्सबरोबरच वेबिनार्सच्या माध्यमातून संग्रहालयाशी संबंधित विविध विषयांवरील मार्गदर्शन कार्यक्रमांचे प्रमाणही तितकेच लक्षणीय होते. संग्रहालय या संकल्पनेचा उगम, विविध स्मारकांचे कोरीव काम, थ्री-डी संकल्पना, डिजिटल माध्यम आणि संग्रहालय यांसारख्या अनेक आधुनिक विषयांवर चर्चासत्रे, तज्ज्ञांच्या मुलाखती अशा व्हच्र्युअल कार्यक्रमांचे आयोजन झूम, यूटय़ूबच्या माध्यमातून केले गेले. इतक्या मोठय़ा प्रमाणावर संग्रहालयांचा अभ्यास करण्यामागची नेमकी कारणे काय असावीत?, याचा विचार करताना येत्या काळात संग्रहालयांचे जतन आणि त्यांचे योग्य पद्धतीने मार्के टिंग करणे आणि त्यासाठी नव्या पद्धतीचे धोरणात्मक नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे, असे सुवोदिप भौमिक सांगतो. तो कोलकत्ता विद्यापीठाच्या पौराणिक इतिहास विभागाचा विद्यार्थी आहे.

आधुनिक माध्यमांच्या साहाय्याने संग्रहालयांचासुद्धा आता डेटाबेस बनवता येतो, ज्यायोगे पर्यटकांची माहिती, प्रत्येक दिवसाची पर्यटकांची संख्या हे मुद्दे अभ्यासले जाऊ शकतात. टेड-टॉक हे सध्याचे ट्रेंण्डिंग माध्यम! यावरही अनेक तज्ज्ञ संग्रहालयाशी निगडित विषयांवर आपला अनुभव, माहिती, अभ्यास मांडत असतात. म्युझियम ऑफ द फ्यूचर, रिथिंकिंग म्युझियम, आर्ट म्युझियम ऑफ टुडेज सेंच्युरी अशा संशोधनात्मक विषयांवर टेड-टॉक्स उपलब्ध आहेत. इतके च नाही तर संग्रहालयातील आधुनिक थ्री-डी टेक्नॉलॉजीही अवाक करणारी आहे. पुण्यातील सुप्रसिद्ध ‘राजा  दिनकर  केळकर वस्तुसंग्रहालय’ चक्क थ्री-डी स्वरूपात घरबसल्या लोकांना पाहायला मिळतं आहे. या संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे सांगतात, आमच्या संग्रहालयाने लॉकडाऊनच्या काळात जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी थ्री-डी व्हच्र्युअल टूरची निर्मिती सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीकांत केळकर यांच्या आर्थिक सहकार्याने केली. या टूरला जगभरातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सुमारे तीन लाखांहून अधिक लोकांनी ती टूर पाहिली. या निमित्ताने संग्रहालय नव्या माध्यमातून जरी लोकांपर्यंत पोहोचले असले तरी प्रत्यक्ष भेट देण्याची मजा काही औरच आहे.

थ्री-डी संकल्पना ज्यांची होती ते अनिरुद्ध करमरकर सांगतात, ‘मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे. ३६० अंशात फोटो काढून असा डिजिटल वॉक थ्रूकरता येतो हे मी शिकलोच होतो. मी आणि माझा मित्र अमित पटवर्धन यांनी हा प्रयोग करता येईल का?,  असा विचार केला. त्याला के ळकर वस्तुसंग्रहालयाच्या संचालकांची आणि इतर टीमची साथ मिळाली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा वॉक थ्रू पब्लिश झाला आणि त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला’.

नाशिकचे ‘शांती कृष्णा संग्रहालय’ हे आशियातील एकमेव नाण्यांचे संग्रहालय आहे. तिथले आर्किऑलोजी असिस्टंट सीताराम तोरसकर सांगतात, ‘आम्ही आमच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवरून सध्या संग्रहात असणाऱ्या नाण्यांची माहिती टाकत आहोत. सध्याच्या परिस्थितीमुळे प्रत्यक्ष येऊन बघणं शक्य नाही, पण आमचे संग्रह  या माध्यमातून बघण्यासाठी उपलब्ध आहेत’.

इतिहासाच्या अभ्यासाला मिळालेली ही आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या अभ्यासाकडे बदलत चाललेल्या दृष्टिकोनाची प्रचीती आणून देते आहे. आज वेगवेगळ्या माध्यमांतून, विचारांतून इतिहासाचा अभ्यास करत वर्तमानात तो आकळून घेणे आणि त्याच्या अभ्यासातून भविष्याची वाटचाल करण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे. आणि या नव्या दृष्टीने संग्रहालयाशी स्वत:ला जोडून घेत  पुढे चाललेले लाखो लोक हे भविष्याचे चित्र निश्चितच सुखावणारे आहे.
(फोटो सौजन्य : राजा दिनकर केळकर संग्रहालय)