|| दीपेश वेदक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई ते न्यू जैपाईगुरी स्टेशन अंतर पार करून मी दार्जिलिंगला जाण्यासाठी सज्ज होतो. गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळाल्यावर कॉलेज हॉस्टेलमध्ये दाखल व्हायला अजून एक दिवस होता. या एका दिवसात मला दार्जिलिंग तर बघायचंच होतं. पण, तिथली खाद्य संस्कृतीही अनुभवायची होती. हा एक दिवस माझ्या शब्दांत..

वेळ सकाळी साडेआठ-नऊची. ठिकाण न्यू जैपाईगुरी स्टेशन. मुंबईवरून निघून तीन दिवस झाले होते. पुढचा प्रवास गाडीने करायचा होता. आता दार्जिलिंग फक्त काही तासांवर होतं. पण इथून दार्जिलिंगपर्यंतच्या रस्त्यात फार अशी दुकानं नाहीत. त्यामुळे काही खायला मिळेल, असं वाटत नव्हतं. तेव्हा गाडीत बसण्यापूर्वी एक छोटा स्नॅक ब्रेक गरजेचा होता. हावडा ते दार्जिलिंग या दहा तासांच्या प्रवासात राहुल आता माझा चांगला मित्र झाला होता. ‘इथे बाहेर एका ठिकाणी खूप छान पराठे मिळतात.’ मला भूक लागली आहे, हे ओळखून तो म्हणाला. आम्ही थोडं चालून त्या दुकानापाशी आलो. आम्हाला बघतच दुकानाचा मालक धावत आमच्याकडे आला. पराठे चाखून बघा, म्हणत आग्रह करू लागला. कदाचित आम्ही त्याचे त्या दिवसातले पहिलेच गिऱ्हाईक असू. समोर दोन भले मोठे आणि गरमागरम पराठे, थोडं लोणचं आणि बटाटय़ाची पातळ भाजी आली. आम्ही काहीही न बोलता त्यावर आडवा हात मारला. आमची भाजी संपलेली आहे, हे पाहून दुकानदार पुन्हा वाढत होता. अवघ्या पन्नास रुपयांत माझी या दुकानात उत्तम सोय झाली होती. बाहेर येऊन राहुलने मला दार्जिलिंगच्या गाडीमध्ये बसवलं. हा पठ्ठय़ा मूळचा महाराष्ट्रातला असला, तरी इथे सिलिगुरीला राहतो, त्यामुळे याला बंगाली उत्तम येते. ‘२५० च्या वर एकही रुपया देऊ नको,’ असं म्हणत तो घरी जायला निघाला.

दहाच्या सुमारास आमची गाडी दार्जिलिंगच्या दिशेने निघाली. ड्रायव्हर, एक शेरपा, दार्जिलिंग पाहायला निघालेल्या बंगाली मित्रमंडळींचा एक ग्रुप आणि मी असे आम्ही दहा एक जण त्या गाडीमध्ये होतो. कोलकातावरून कधीही दार्जिलिंग अगदी हाकेच्या अंतरावर. त्यामुळे ही मंडळी दार्जिलिंग बघायला कितव्यांदा निघालीत, हे त्यांनाही माहीत नव्हतं. थोडं अंतर पुढे गेल्यावर त्यातल्या एका मुलीने एक छोटा डबा माझ्या पुढे केला. ‘ट्राय इट’ तिने गोड आवाजात सांगितलं. कदाचित मी इथला नाही, हे तिला कळलं असावं. ‘सॉन्देस, वी कॉल इट.’ मी उत्सुकतेने एक छोटा तुकडा घेऊन तोंडात भरला. ‘वाह’ मी नकळत म्हणालो. आणि या बंगाली मिठाईमुळे आमच्या गप्पा सुरू झाल्या. बंगालमध्ये अनेक प्रकारचे ‘सॉन्देस’ तुम्हाला मिळतील. त्यातलाच हा एक. ही मंडळी सुट्टी पडली की दार्जिलिंगला निघतात. दार्जिलिंगपर्यंतच्या प्रवासात यांच्या बोलण्यातून एक कळलं की, इथे राहायचं तर बंगाली किंवा नेपाळी यायला हवी. आणि बंगालीमध्ये कोणत्या शब्दांना काय म्हणतात, हे समजून घेत मी दार्जिलिंगला पोचलो.

हिमालयीन गिर्यारोहण संस्थेमध्ये शिक्षण घेण्यासाठी मी दार्जिलिंगला आलो होतो. हॉस्टेलमध्ये शिफ्ट होण्यापूर्वी माझ्याकडे अजून एक दिवस होता. मुंबईवरून निघताना एक स्वस्त हॉटेल मी इन्टरनेटवर बघून ठेवलेलं. आम्ही उतरलो तिथून दोन एक किलोमीटर अंतर कापत मी त्या जागी पोचलो. तेव्हा हे हॉटेल आता बंद असल्याचं समजलं. तेव्हा पुन्हा मुख्य बाजारपेठेकडे मी जायला निघालो. वाटेत एक आजोबा भेटले. एचएमआयमध्ये मी शिक्षणासाठी आलोय, हे समजल्यावर ते खूश झाले. एका ओळखीच्या हॉटेलमध्ये मला नेऊन त्या हॉटेल मालकाशी खूप वेळ नेपाळीमध्ये काही तरी बोलले. मला या अनोळख्या शहरात त्यांनी चारशे रुपयांत रूम मिळवून दिली. रूममध्ये सामान ठेवून मी दार्जिलिंग फिरायला बाहेर पडलो.

माझं कॉलेज इथून तीन किलोमीटरवर होतं. चालत, दार्जिलिंग बघत मी कॉलेजकडे जायला निघालो. वाटेत एका छोटय़ा झोपडीमध्ये एक आजी काही तरी विकताना दिसली. काही साधारण नेपाळी दिसणारे लोक तिथे गर्दी करून बसलेले. मी आत शिरताच त्यांनी मला जागा करून दिली. ‘आलू मिमी’ बाजूला बसलेल्या एकाने ऑर्डर दिली. मीसुद्धा लगेच तेच द्यायला सांगितलं. समोर एका बाऊलमध्ये लाल रंगाचं सूप आलं. दार्जिलिंगमध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ‘आलू मिमी’ चाखता येईल. टोमेटो, बटाटा आणि स्थानिक भाज्यांनी भरलेलं हे सूप मी चवीने प्यायलो. या सूपसोबत ‘झाला’ म्हणून तिखट चटणीसुद्धा दिली जाते. ‘डल्ले’ या स्थानिक मिरचीच्या प्रकारापासून बनवलेली ही चटणी खाताना जरा सांभाळूनच राहा. फार तिखट असते ती. इथे अजून एक पदार्थ तुम्हाला चाखायला मिळेल तो म्हणजे ‘थुकपा’. सूप आणि नूडल्सचं आंबट-गोड आणि थोडं तिखट असं हे अगदी छान समीकरण. इथे आलात तर हा पदार्थ तुम्ही नक्की चाखायला हवा.

कॉलेजच्या वाटेवर आणखी एका पदार्थाने माझं लक्ष वेधून घेतलं. मुंबईमध्ये मिळणारी पाणी-पुरी इथेसुद्धा मिळते, हे पाहून माझी पावलं आपसूकच त्या दिशेने वळली. ‘पुचका’ असं नाव इथल्या लोकांनी या आपल्या पाणी-पुरीला दिलं आहे. आणि मुंबई प्रमाणेच इथले लोकही या पदार्थासाठी वेडी आहेत. अर्थात या ‘पुचका’ची चव थोडी वेगळी असली तरी ही दार्जिलिंग पद्धतीची पाणी-पुरी चाखायला काहीच हरकत नाही.

कॉलेजला जाऊन एक फेरी मारून आलो. साधारण साडेचारच्या सुमारास इथे अंधार पडायला सुरुवात होते. सहा ते सातनंतर इथल्या रस्त्यांवर कोणीही नसतं. माझ्यासाठी हे सगळं नवं असलं तरी दुकानं बंद होण्यापूर्वी मला जेवणाची सोय करायची होती. खिशात मोजून पन्नास रुपये होते. वाटेत ‘चौरस्ता’ या दार्जिलिंगमधल्या सर्वात हॅपनिंग जागेवर मी येऊन पोहोचलो. देशाच्या वेगवेगळ्या भागांतून फिरायला आलेले पर्यटकांनी ही जागा वर्षभर भरलेली असते. चौरस्त्याच्या एका बाजूला मला छोटीशी खाऊ गल्ली दिसली. वीस ते तीस रुपयांना दहा-बारा मोमो तुम्हाला इथे सहज मिळतील. शिवाय शिफले, आलू मिमी आणि दार्जिलिंग मधले सगळे छोटे-मोठे पदार्थ तुम्हाला चाखायचे असतील तर हे उत्तम ठिकाण. खिशातले पन्नास रुपये बाहेर काढून मी भरपूर मोमो आणि शिफले विकत घेतले आणि रूमकडे निघालो. मुंबई-महाराष्ट्रात मिळणारे मोमो आणि दार्जिलिंगला मिळणारे मोमो यांमध्ये खूप फरक असतो. आपण वापरतो ते मसालेही वेगळे. स्थानिक भाज्या किंवा चिकन खिमा, कांदा, कोबी यांचं सारण भरलेले मोमो, मसालेदार पदार्थ खाणाऱ्या आपल्याला कदाचित फिके वाटतील. पण, सोबत ‘झाला’ चटणी चवीला घेतली तर या मोमोना एक वेगळीच चव येते.

दार्जिलिंग हे वर्षभर पर्यटकांनी भरलेलं ठिकाण असलं तरी इथे काहीही खाताना आपण नेमकं काय खातोय, हे एकदा त्यांना विचारून घ्यायला हवं. इथले अनेक पदार्थ खूप स्वस्त असले तरी मोठय़ा हॉटेलमध्ये मात्र तुम्हाला त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागेल. पण स्थानिक पदार्थ खायचे ते या छोटय़ा छोटय़ा दुकानांमध्येच. अर्थात जिभेला चव आणि पायाला भिंगरी असेल, तर कोणतंही शहर परकं नाही आणि कोणताही पदार्थ वाईट नाही. दार्जिलिंग असो किंवा आणखी एखादं नवं शहर ‘खायचं, फिरायचं आणि झोपायचं’ हे एक सूत्र मात्र मी कधीही विसरत नाही.

संयोजन साहाय्य : भक्ती परब

मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Journey to darjeeling
First published on: 22-02-2019 at 00:02 IST