विनय नारकर viva@expressindia.com

साडीचा पोत, रंग, प्रकार हे त्या स्त्रीचा सामाजिक स्तर, वांशिकता अशा बाबीही दर्शवायच्या. नेसण्याच्या पद्धतीही समाजानुसार वेगवेगळ्या असायच्या. त्या त्या समाजाला करावी लागणारी कामं, त्यांचं सामाजिक उतरंडीमधील स्थान, त्यांचे नैतिकतेचे संकेत या सर्व बाबींचं दर्शन स्त्रीच्या साडीवरून आणि नेसण्यावरून होत असे. म्हणजे पुरुषांच्या पगडीप्रमाणे हे होतं. ‘पगडीवरून बाप्याची तर लुगडय़ावरून बाईची जात समजते’, असं मी म्हणतो ते याचमुळे ..

गेल्या दोन लेखांमधून आपण साडीचा प्रवास आणि साडीची कालातीतता याबाबत जाणून घेतलं. साडी नेसण्याच्या पद्धतींवर आधीच्या काळात असलेला धार्मिक संकल्पनांचा प्रभाव कमी होत त्यात सुटसुटीतपणा कसा येत गेला हे जाणून घेणंही रोचक आहे.

साडीचं मुख्य वैशिष्टय़ आहे तिच्या रचनेतील प्रवाहीपणा, असं असलं तरी पारंपरिक साडीची रचना ही तशी बांधीव असते. साडीची रचना ठरावीक भागात विभागली जाऊ  शकते. साडीच्या वरच्या आणि खालच्या बाजूला, आडव्या रेषेत असणारे समांतर ‘काठ’ किंवा ‘किनार’, एका टोकाला असणारा ‘पदर’ आणि साडीचं ‘अंग’, या तीन भागांत साडी विभागलेली असते. संपूर्ण भारतात बनणाऱ्या साडय़ांमध्ये हीच रचना पाहायला मिळते. आधुनिक काळाप्रमाणे प्रमाणिकरणाचे कोणतेही प्रयोग वा प्रयत्न न करता साडीने रचनेच्या बाबतीत ही एकात्मता विकसित केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अस्सल भारतीयत्व दाखवणाऱ्या काही गोष्टींमध्ये साडी ही महत्त्वाची आहे असं मी म्हणतो याचं हे एक कारण आहे.

आधीच्या काळात स्त्रीच्या साडी निवडीमागे ‘आवड’ या गोष्टीशिवाय आणखीही कारणं असायची. साडीचा पोत, रंग, प्रकार हे त्या स्त्रीचा सामाजिक स्तर, वांशिकता अशा बाबीही दर्शवायच्या. नेसण्याच्या पद्धतीही समाजानुसार वेगवेगळ्या असायच्या. त्या त्या समाजाला करावी लागणारी कामं, त्यांचं सामाजिक उतरंडीमधील स्थान, त्यांचे नैतिकतेचे संकेत या सर्व बाबींचं दर्शन स्त्रीच्या साडीवरून आणि नेसण्यावरून होत असे. म्हणजे पुरुषांच्या पगडीप्रमाणे हे होतं. ‘पगडीवरून बाप्याची तर लुगडय़ावरून बाईची जात समजते’, असं मी म्हणतो ते याचमुळे ..

महाराष्ट्रातली कासोटा घालून नऊवार नेसण्याची रीत ही पुरातत्त्व नोंदीनुसार सर्वात प्राचीन ठरू शकते. कारण शुंग काळातील जे टेराकोटा शिल्प (इ.स. पूर्व १००) उपलब्ध आहे, त्यात साधारण अशाच पद्धतीने, कासोटा घालून नेसलेली साडी पाहायला मिळते. महाराष्ट्राशिवाय अन्य दख्खन भागात, दक्षिणेतील राज्यांमध्येही कासोटय़ाचे विविध प्रकार पाहायला मिळतात. पण मराठी नऊवार नेसणं हे विशेष लोकप्रिय ठरलं. हे नेसणं स्त्री शरीराच्या आकाराशी जास्त साधर्म्य असणारं असल्यामुळे कदाचित जास्त भावलं गेलं असेल. याचमुळे या धाटणीचं नऊवार नेसणं जास्त सुबक दिसतं.

शिल्पकार रावबहादूर गणपतराव म्हात्रेंनी नऊवारीतील कलात्मकता, नाजूकपणा आणि दिमाख यांचा अद्भुत आविष्कार, त्यांच्या ‘मंदिरपथगामिनी’ या शिल्पामधून केला आहे. या शिल्पामध्ये साडीचं सगळं अलंकरण लोप पावून फक्त नऊवारी कासोटय़ाचा सौष्ठवपूर्ण फॉर्म शिल्लक राहतो. राजा रविवम्र्याला तो केरळी असूनही मराठी नऊवारीची इतकी भुरळ पडली की त्याने अनेक चित्रांत देवतांसहित कित्येक नायिकांना याच धाटणीने साडी नेसवली.

महाराष्ट्रात ढोबळपणे नऊवारी काष्टा नेसण्याच्या दोन पद्धती होत्या, ब्राह्मणी आणि कायस्थी. ब्राह्मणी साडी नऊवार असायची, तर कायस्थी, सारस्वती रीतीने नेसण्यासाठी दहा वार किंवा अकरा वार साडी लागायची. आधी साडीचा पन्हाही बावन्न इंची असायचा. त्यामुळे कायस्थी, सारस्वती ओचा हा ब्राह्मणी ओच्यापेक्षा अधिक पायघोळ यायचा व नेसणंही अधिक डौलदार दिसायचं. खांद्यावरचा पदरही कधी ढळायचा नाही. मराठा पद्धतही साधारण अशीच पण ओचा थोडा आखूड असायचा, पदर मात्र कायम डोईवर. ब्राह्मणी पद्धतीत केळे घालून लुगडं नेसलं जाई. तर कायस्थी, सारस्वती, पाठारे प्रभू, चौकळशे किंवा पाचकळशांमध्ये निऱ्या बांधून नेसले जाई.

विदुषी दुर्गाबाई भागवत यांनी एक आठवण सांगितली आहे. त्यांचा शेजार जास्त कायस्थी होता. त्या प्रभावामुळे त्या देखील निऱ्या बांधूनच नऊवार नेसत. दुर्गाबाई एकदा झेवियर महाविद्यालयात बोलायला उभ्या राहिल्या असता, प्रसिद्ध लेखक न. चिं. केळकर म्हणाले, ‘कोण ही ब्राह्मणेतर मुलगी?’

तांत्रिक पद्धतीने पाहता नऊवारीचे कासोटा, बिनकासोटा, ओचे आणि सोगे हे प्रकार आहेत. नऊवारी लुगडं नेसताना रोज जे कसब दाखवावं लागायचं त्याची कल्पना आज येणं अवघड आहे. केळं आणि ओचा फार मोठा किंवा फुगीर चालायचा नाही. निऱ्या आणि कासोटय़ाची पट्टी रुंद व सम असावी लागायची. नेसणं दोन्ही बाजूंनी टाचांपर्यंत आलं पाहिजे, उंची कमी-जास्त होऊन चालणार नाही. हे ऐकूनच आपली दमछाक होते अर्थात, कामं करताना सोगा, ओचा सोयीनुसार खोचणं आदी प्रकार केले जायचे.

कामकरी स्त्रिया मात्र लुगडं गुडघ्यापर्यंत नेसून, पदर कमरेला खोचून सोय आणि सुबकता दोन्ही साध्य करायच्या. अशाच प्रकारे घट्ट कासोटा कोळीणीही बांधतात, तर काही भाजीवाल्या बिननिऱ्यांचा कासोटा नेसायच्या. बंजारी स्त्रियांचं दोन तुकडय़ांचं लुगडं ही एक वेगळीच तऱ्हा होती.

मुलीला वयात येण्याअगोदर एक प्रकारचं कासोटय़ाचं लुगडं असे, त्याला ‘परवंटा’ म्हणत. याला पदर नसायचा. पतीचा पहिला स्पर्श होताना नेसण्यासाठी ‘अष्टपुत्री’ हे पिवळं लुगडं असायचं. हे मामाकडूनच यायचं. अष्टपुत्रीला पदर व कासोटा नसायचा, पुढे गाठ व मागे निऱ्या असायच्या. या गाठीला ‘निवी’ म्हणत. पदराच्या ऐवजी शाल असे.

या सगळ्या प्रकारामध्ये देखणं आणि कलात्मक नेसणं असायचं कलावंतिणींचं आणि सरदार स्त्रियांचं. चापूनचोपून घातलेला कासोटा व जमिनीवर लोळणारा सोगा, ही त्यांची खास ओळख. ज्याला ‘राणीवसा झाडत जाणे’ असंही म्हटलं जायचं. राजस्त्रिया घोडय़ावर मांड ठोकून बसताना मात्र ‘मांडचोळणा’ नेसत.

थोडय़ा नंतरच्या काळात मराठी स्त्रियांना अधिक सुंदरतेने नऊवारी नेसायला शिकवलं एका पुरुषाने, ते म्हणजे बालगंधर्वानी. ते आपले पुरुषी पाय लपवण्यासाठी नऊवार खूप पायघोळ नेसत. त्यांचं बघून स्त्रिया पायघोळ नेसून, सोगे सोडून ते पायात घोळवत चालू लागल्या.

समाजात स्त्रिया हळूहळू शिकत गेल्या. त्यांच्या कामाच्या स्वरूपात बदल होऊ  लागले. स्त्रियांचा समाजातील वावर वाढला. सर्वामध्ये मिसळताना साडीच्या नेसण्यामध्ये सुटसुटीतपणा येणं गरजेचं ठरलं. शिक्षणामुळे धार्मिक रूढींचा मनावरील पगडाही कमी होत गेला. हळूहळू मागचा कासोटा निघून पुढची निरी राहिली. कालांतराने पेटीकोट (परकर)आले, तशी गाठीची गरज नाहीशी झाली. मागचा कासोटा गेल्यामुळे साडय़ांची लांबी कमी होऊन सहावारी व पाचवारी साडय़ा आल्या. हे नेसणं त्या गाठीच्या नावाने, म्हणजे ‘निवी’ म्हणून ओळखलं जातं. पण रूढ भाषेत आपण त्याला ‘गोल नेसणे’ असंच म्हणतो.

महाराष्ट्र, दख्खन आणि कर्नाटकाचा काही भाग इथे हे बदल आधी झाले. राजा रविवम्र्याच्या ‘लक्ष्मी’ या चित्रात हा बदल पाहायला मिळतो. बाकीच्या नऊवारी काष्टय़ासारखी लक्ष्मीची साडी नेसवलेली नाही आहे. राजघराण्यातील स्त्रियांना ब्रिटिशांना भेटण्याचे प्रसंग वारंवार येत. त्यावेळेस राजस्त्रियांना सुटसुटीत पोषाखाची गरज वाटू लागली. त्यांनीही गोल साडी नेसण्याची पद्धत चटकन अंगीकारली.

रवींद्रनाथ टागोरांचे भाऊ सत्येंद्रनाथ टागोर हे प्रशासकीय सेवेत होते. त्यांच्या कारकीर्दीचा बराच काळ त्यांनी महाराष्ट्रात घालवला. त्यांच्या पत्नी ज्ञानदानंदिनीदेवी यांनी महाराष्ट्रातील वास्तव्यात ही गोल साडी नेसण्याची पद्धत आत्मसात केली. त्यांनी शांतिनिकेतनमध्ये ही साडी नेसण्याची पद्धत शिकवली. तिथे सगळ्यांसाठी हीच पद्धत रुजवली गेली. इंदिरा गांधी तिथे शिक्षण घेत असताना ही पद्धत शिकल्या. त्यांनी कायमसाठी हेच नेसणं अंगीकारलं. त्यांच्याद्वारेही संपूर्ण देशात हे निवी किंवा गोल साडी नेसण्याचा प्रसार झाला.

समाजात हळूहळू लोकशाही रुजत होती, तशी ती साडी नेसण्यामध्येही अवतरली. जाती, धर्म, सामाजिक वा आर्थिक स्तर, राज परिवार वा सामान्यजन असा कोणताही भेदभाव नसलेलं साडी नेसणं भारतीय समाजात रुजलं.