सुरांचं बाळकडू तिला घरातूनच मिळालं होतं. बोबडय़ा बोलांपाठोपाठच तिला सुरांची ओळख झाली. आज मालिकागीते, अल्बम्स, सुगम संगीत, सिनेसंगीत या सगळ्यामध्ये तिचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. अनप्लग्डची हुकुमाची राणी असलेली आजची कल्लाकार आहे, सावनी रवींद्र
संगीताचा समृद्ध वारसा असलेल्या कुटुंबात सावनीचा जन्म झाला. वडील डॉ. रवींद्र घांगुर्डे आणि आई डॉ. वंदना घांगुर्डे यांच्याकडून संगीताचं बाळकडू घेत सावनीचं बालपण स्वरमय वातावरणात गेलं. घरात संगीत असलं तरी आपण गायिकाच व्हायचं, असं काही सावनीने ठरवलं नव्हतं. पण नकळत त्या सुरांचे संस्कार होत गेले. सावनी सांगते की, शास्त्रीय संगीताचा माहोल असला तरी माझा सुगम संगीताकडे कल होता. तेव्हा मोठेमोठे संगीतकार आमच्या घरी यायचे. देवकाकांनी (यशवंत देव)पहिल्यांदा माझा आवाज हेरला. त्यांनी आई-बाबांना सांगितलं की, ‘सावनीचं गाणं खूप भावनिक आहे. तिचा आवाज पाश्र्वगायनासाठी चांगला आहे. शास्त्रीयपेक्षा तिला सुगम संगीताकडं वळवा.’ यामुळे शाळेत असताना तिने पंडित यशवंत देवांकडे सुगम संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमात तिला चक्क आशा भोसले यांच्या उपस्थितीत गायची संधी मिळाली. हेच गाणं ऐकून महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांनी तिची निवड भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात केली होती. मधल्या काळात ‘कटय़ार काळजात घुसली’ या नाटकामध्ये सावनीनं छोटय़ा सदाशिवची भूमिकाही केली. सावनीची दहावीची परीक्षा संपल्यावर एकदा तिचं गाणं ऐकलं, पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी. ते ऐकून त्यांनी तिला थेट भावसरगममध्येच गायला बोलावलं. तेव्हापासून गेली १३ र्वष सावनी हृदयनाथजींसोबत गाते आहे.
सावनीने रवी दाते यांच्याकडे गजल आणि पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलं आहे. महाविद्यालयामध्ये ती जर्मन शिकली होती. तिनं बी.ए. संस्कृत आणि एम.ए. मराठी केलं असून भारती विश्वविद्यालयातून एमए संगीतातील पदवी मिळवली आहे. याशिवाय तिने तेलगु, मल्याळम, कन्नड, तामीळ भाषेतूनही अनेक गाणी गायली आहेत. मध्यंतरी तिच्या ‘वेन्निलविन सालईगलिल’ या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड लाइक्स मिळाले आहेत. तिने ‘पसंत आहे मुलगी’, ‘कमला’, ‘अस्सं सासर सुरेख बाई’ आदी मालिकांची शीर्षकगीतं गायली आहेत.
लहानपणापासून सावनी स्टेज शो करते आहे. गुलजार- बात पश्मिने की, गझल का सफर, ब्लॅक अँड व्हाइट अशा अनेक कार्यक्रमातून तिने आपल्या सुरांची भुरळ घातली आहे. अमेरिका, लंडन, दुबई, अबुधाबी, सिंगापूर, कॅनडा, इस्त्रायल, झिम्बाब्वे आदी देशांत तिचे गायनाचे कार्यक्रम झालेले आहत. पंडित यशवंत देव, अरुण दाते, पंडित सुरेश वाडकर, रवींद्र साठे, रवींद्र जैन, उत्तरा केळकर, श्रीधर फडके यांच्यासारख्या अनेक जाणकार, मान्यवरांबरोबरही ती गायनाचे कार्यक्रम करते आहे.
अलीकडेच तिने मस्कतला तिचा सोलो शो लाँच केला, सावनी अनप्लग्ड नावाचा. दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदा तिने मराठीत अनप्लग्डचा प्रयोग केला. त्यावेळी तिला रसिकांची जशी दाद मिळाली होती, तशीच उत्तम दाद मस्कतच्या शोलाही मिळाली. अनप्लग्ड म्हणजे कोणत्याही इलेक्ट्कि वाद्यवृंदाशिवाय गायलेलं गाणं. यात मूळ वाद्यांचा वापर केला जातो. कधीकधी पियानोचा वापर केला जातो. अगदी कमीतकमी वाद्यांच्या साथीने गाणं गायलं जातं. जुनी सिनेगीतं, भावगीतं, शीर्षकगीतं, अल्बमची गाणी अशी कोणतीही गाणी, या प्रकारात गायली जातात. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत तिने ‘तू मला मी तुला’ हे गाणं गायलं होतं. तिच्या अनप्लग्ड गाण्याला जवळपास ५०हजार हिट्स मिळालेत. ती मालिका सुरु असताना एका लहानग्याच्या आईने सांगितलं की, हे गाणं माझ्या मुलाला इतकं आवडतं की ते लागल्याशिवाय तो जेवतच नाही. कमीतकमी ५वेळा तरी ते लावावं लागतं. ही दाद ऐकल्यावर फार समाधान वाटल्याचं सावनी आवर्जून नमूद करते. आता अनप्लग्ड म्हणजे सावनी असं एक समीकरणच रुढ झालं आहे. सावनीने प्ले स्टोअरवर स्वतचं अॅपही लाँच केलेलं आहे. तिच्या आवडत्या गायकांमध्ये अगदी कुमार गंधर्वापासून शाल्मली खोलगडेपर्यंत अनेकांचा समावेश आहे. इलया राजा आणि ए आर रेहमान यांच्याकडे गायचं तिचं स्वप्न आहे. गाण्यापलीकडे ती कथक शिकलेली आहे. तिला भटकायलाही खूप आवडतं. तिला वाचनाचाही छंद आहे. मध्यंतरी डॉ. आशुतोष जावडेकर आणि सावनी यांचा ‘आस’ हा प्रयोग खूपच गाजला. या द्वैभाषिक गाण्यातील मराठी कडवी सावनीने गायली आहेत. त्याचंही सोशल मीडियावर आणि मान्यवरांकडून बरंच कौतुक झालं होतं.
कलेचं सादरीकरण करताना सोशल मीडियाचा जास्तीतजास्त चांगल्या प्रकारे वापर करून घ्यायला हवा असं सावनी म्हणते. ती म्हणते याच माध्यमामुळे मला अनप्लग्डच्या प्रयोगांमध्ये अनेक रसिक श्रोत्यांची दाद मिळाली, मार्गदर्शन, सूचना मिळाल्या. ती स्वत रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली आहे.
त्यामुळे रिअॅलिटी शोबद्दल बोलताना ती म्हणते, हे एक व्यासपीठ आहे. या गोष्टीकडे फक्त एक चांगला टप्पा म्हणून बघायला हवं. इथे जी वाहव्वा मिळते, प्रसिद्धी मिळते ती केवळ त्यापुरतीच मर्यादित असते. खरी स्पर्धा तर त्याच्या पुढे सुरु होते. मी जेव्हा रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला तेव्हा त्यातून गायिका म्हणून मला बरंच काही शिकायला मिळालंच पण माणूस म्हणूनही मला खूप काही शिकायला मिळालं. सावनीला रसिक श्रोत्यांची दाद तर मिळाली आहेच पण त्यासोबतच अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. शाहू मोडक पुरस्कार, मोरया गोसावी पुरस्कार, रतिलाल भावसार पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार आदींची ती मानकरी आहे. एका आगामी चित्रपटात तिला बहिणाबाईंची रचना गायची संधी मिळाली आहे. प्रियांका चोप्राच्या आगामी सिनेमासाठीही एक आयटम नंबर तर आनंद शिंदे यांच्यासोबतही एका आगामी प्रोजेक्टमध्ये सावनी एक धमाकेदार गाणं गात आहे. तिने गाणी गायलेले विविध दक्षिणात्य चित्रपट आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. तिने बॉलिवूडमधलं पहिलंच आणि रोमँटिक गाणं, मोहम्मद इरफानसोबत गायलं आहे. पण त्याविषयीची अधिक माहिती मिळवण्यासाठी मात्र चाहत्यांना अधिक वाट पाहावी लागले. सध्या सावनी अनप्लग्ड या कार्यक्रमावर तिने लक्ष केंद्रीत केलंय. सावनीचा संगीतप्रवास असाच सुरेल व्हावा, यासाठी तिला खूप शुभेच्छा!