तन्मय कवठेकर, साऊ थ कॅरोलिना, यूएसए
तिथल्या मुलांना कॉलेजला जाताना थोडासा ताण असतो की, आपल्याला त्यासाठी पैसे कुठून मिळणार, खर्च कसा निघणार, म्हणून ते कॉलेजला जाताना आधी विचार करतात. त्यामुळे काहीजण शिकण्यापेक्षा कमावण्याला प्राधान्य देतात. त्यांना स्कॉलरशिप किंवा शिक्षणकर्ज दिलं जातं. मात्र त्यांच्या राहाणीमानाचा दर्जा पाहता त्यांना कळत नाही की, आपण किती कमावतोय, खर्च करतोय आणि शिलकीत टाकतोय.. त्यांच्यावर अमुक पदवी घ्याच, असा दबाव आणला जात नाही. आताशा नव्या पिढीला थोडंसं याबाबत मार्गदर्शन केलं जाताना दिसतं आहे. इंजिनीअरिंगविषयी आवड वाढवण्यासाठी आणि गणिताची खूप भीती वाटते, ती दूर सारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
मास्टर्ससाठी २०१३मध्ये अमेरिकेत गेलो आणि चार र्वष तिकडेच होतो. चार महिन्यांपूर्वी भारतात परत आलो आहे. माझी बायको प्रियांका जॉर्जियामध्ये पदवी शिक्षण घेत आहे. मी राहात होतो त्या क्लेमसनची ओळख कॉलेज टाऊन अशी आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी शोधली. या भागात टेक्नॉलॉजी इंडस्ट्री खूप कमी आहे. शिवाय बऱ्याचदा कंपन्या स्थानिक युनिव्हर्सिटीतील उमेदवारांना प्राधान्य देतात. एक निरीक्षण असं की, सहसा कॅम्पसमध्ये फारसे मित्र-मैत्रिणी होत नाहीत. सगळे आपापल्या ग्रुपमध्ये असतात. पण निरनिराळ्या इव्हेंटसच्या निमित्ताने काही ओळखी होतात. तिथे बरेच ख्रिश्चन ग्रुप्स अॅक्टिव्ह असून ते अनेक विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. ते वेगवेगळ्या अॅक्टिव्हिटीज आयोजित करतात. कॉलेजच्या इंडियन असोसिएशनतर्फे दिवाळीसारखे सणवारही साजरे केले जातात. भारतीय असो किंवा स्थानिक मी कुठल्याही एकाच ग्रुपमध्ये नव्हतो. तिथं जायच्या आधी मी कमी बोलायचो, त्या स्वभावात निश्चितच फरक पडला. आपण दुसऱ्या देशात असताना चारजणांशी संवाद साधणं गरजेचं ठरतं. विशेषत: नोकरीच्या संदर्भात नेटवìकग हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरतो. भारतात आपण प्राध्यापकांना जास्ती शंका विचारत नाही. याउलट तिथल्या प्राध्यापकांना क्षुल्लकातील क्षुल्लक गोष्ट विचारल्यास ते ती गोष्ट नीटपणे समजावून सांगतात. त्यांची रीतसर वेळ घेऊ न शंकानिरसन करून घेता येतं. अर्थात विद्यार्थीसंख्या आपल्यापेक्षा कमी असल्याने प्राध्यापक वेळ देऊ शकतात, हेही लक्षात घ्यायला हवं. अभ्यास सतत करावाच लागतो. आपल्याकडे अनेकदा शेवटच्या महिनाभरात रट्टा मारला जातो. तिथे सुरुवातीपासून असाईनमेंट देतात, त्या कराव्याच लागतात. स्वत:चा स्वत: अभ्यास करावा लागतो.
आमच्या कॉलेजच्या आजूबाजूला छान निसर्गसौंदर्य होतं. त्यामुळं डोंगरदऱ्यात ट्रेकिंगला जाणं, घरापासून पाच मिनिटांवर असणाऱ्या लेकमध्ये स्विमिंग करणं, बोटिंग करणं अशा अनेक गोष्टी केल्या जायच्या. आमच्या युनिव्हर्सिटीची स्थापना १८८९ मध्ये झाली. युनिव्हर्सिटीचं बोटॅनिकल गार्डन असून ते सामान्यांसाठी खुलं असतं. मीही त्या गार्डनमध्ये फिरायला जायचो. तिथले भोवतालचे लोक मदतीस कायम तत्पर असायचे. विद्यार्थ्यांखेरीज निवृत्त झालेले लोक अधिकांशी राहतात. तिथे इंजिनीअरिंगला मुख्यत्वे चिनी, भारतीय आणि श्रीलंकन, बांगलादेशी, पाकिस्तानी विद्यार्थ्यांची संख्या जास्ती आढळते. त्यातही काहींना शिक्षणासाठी प्रायोजकत्व मिळालेलं असल्याने त्यांचं राहाणीमान भिन्न असतं. आम्ही मित्र रुममेट म्हणून राहात होतो. जेवण घरीच करायचो. मीट खाणं ही कॉमन गोष्ट असून शाकाहारी पर्याय खूप कमी होते. ख्रिसमसच्या वेळी टर्की हमखास असायची. बेकरी फूडची क्वॉलिटी खूप चांगली होती. सिमला मिरची, पालक, बटाटा, कोबी, फ्लॉवर याच भाज्या आम्ही आलटून-पालटून करायचो. जास्ती पर्याय उपलब्ध नव्हते. तिथल्या खाण्यात मसाले वगैरे वापरले जात नाहीत. क्वचित काहींना आपल्याइतकं तिखट खाता येतं. मी राहायचो तिथून इंडियन स्टोअर गाडीने तासाभराच्या अंतरावर होतं. दोन-तीन आठवडय़ांचं सामान आम्ही घेऊ न यायचो. वाहतुकीचा प्रश्न तिथे आहेच. ठरावीक ठिकाणी आणि वेळी बस-ट्रेनची सोय उपलब्ध असल्याने गाडीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. भारतीय संस्कृतीतलं आदरातिथ्य आणि आपुलकी ही गोष्ट त्यांच्यासाठी नवीन होती. ते मित्र-मैत्रिणींकडे वेळ घेऊनच जातात. आम्ही भारतीय मित्र पटकन एकमेकांकडे जायचो, असेल ते शेअर करून खायचो. याचं बाकीच्या विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटायचं.
डाऊनटाऊनमधल्या पबमध्ये शुक्रवार-शनिवार रात्री अधिक गर्दी असायची, कारण तिथले लोक रविवार दुपारपासून पुढल्या आठवडय़ाच्या तयारीला लागतात. एकुणात लोकांना बहुतांशी गोष्टी स्वत:हून करायची आवड आहे. त्यामुळे स्वावलंबन अंगी बाणलं गेलं. इथे स्वत:चं काम स्वत: करता येत होतं, फक्त केलं नव्हतं. तिथे अभ्यास-नोकरी करायची आणि कामही करायचं असल्याने वेळेचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं होतं, ते मी केलं. त्याखेरीज कधी कंटाळा आला तर काही अॅक्टिव्हिटीज होत्याच. एका ट्रेकिंग ग्रुपसोबत महिन्यातून एक-दोनदा ट्रेकिंगला जायचो. तिथे गेलो तेव्हा वाटलं नव्हतं की, आपल्याला एट्रन्सशिप मिळेल आणि तिथल्या पहिल्या पगारातून आपण गाडी घेऊ शकू. त्या गाडीने आम्ही दोन मित्रांनी मिळून २००० मैलांची सात दिवसांची रोड ट्रिप केली होती. तो खूप छान अनुभव होता. एका मित्राकडे गन आणि रायफल असल्याने शूटिंगही केलं होतं. शिवाय शूटिंग रेंजही उपलब्ध होती. मी रायफल, पिस्तूल, शॉटगन वापरून पाहिली. तो एकदम मस्त अनुभव होता. माझ्या मनात कधीतरी फ्लाइंग लायसन्स घ्यायची इच्छा होती. त्यासाठी चौकशी करायला गेलो असताना एक मस्त गोष्ट घडली.. कॉलेजच्या फ्लाइंग क्लबतर्फे एक इंट्रोडक्टरी फ्लाइट ट्रिप नेण्यात आली होती. वर गेल्यावर पंधरा-वीस मिनिटांसाठी त्यांनी कंट्रोल्स आमच्या हातात दिले होते.. लई भारी वाटलं होतं. अशा बऱ्याच छोटय़ा छोटय़ा गोष्टी आहेत की, त्यातल्या काही पुन्हा करता येतील की नाही माहिती नाही, पण त्याकरता याव्यात यासाठी काहीतरी पर्याय शोधून काढेन. तिथल्या खेळण्यांची क्वॉलिटीही चांगली होती. लहानपणी खेळायला मिळाल्या नाहीत अशा गोष्टी तिकडे करायला मिळाल्या. मला लहानपणी आरसी बोट्स आवडाच्या. त्या मी इथे कधी चालवल्या नाहीत, पण तिथे मी तशा बोट घेऊन त्यांच्याशी खेळलो. फोटोग्राफीची आवड जोपासण्यासाठी तिथे पैसे साठवून कॅमेरा विकत घेतला होता. आताही तिथून मित्र यायचे असतील तर इलेक्ट्रॉनिक वस्तू मागवतो.
तिथे लोक फ्रेण्डली व्हायला वेळ घेतात. मुळात एकमेकांविषयी विश्वास वाटायलाच वेळ लागतो. काही लोक लगेच मित्र होतात. मी राहायचो तिथल्या अनेकांच्या आयुष्यावर धर्म या गोष्टीचा मोठा पगडा होता. हा भाग यूएसच्या बायबल बेल्टमध्ये येतो. बहुसंख्य ख्रिश्चन मंडळी रविवारी चर्चमध्ये जातात. त्यानिमित्ताने बरेचजण वाद्यवादनही शिकले. सगळं कुटुंब ख्रिसमस, इस्टरच्या निमित्ताने एकत्र येतंच. त्यामुळे कुटुंब आहे, तिथेच जवळपास राहायचा प्रयत्न ते करतात. सोळा-अठरा वर्षांचे झाल्यावर स्वावलंबी होऊ पाहतात. कॉलेजच्या शिक्षणासाठी स्वत: पैसे साठवतात. तिथे कोणतंही काम छोटं समजलं जात नाही. माझ्या ओळखींच्यांपैकी काहींची मुलं समर जॉब करतात. ते करायला त्यांना कमीपणा वाटत नाही. किंबहुना त्यांना हे काम केल्यामुळं कुणी काही बोलतही नाहीत. प्रत्येकाने आपापलं आयुष्य आपल्याला हवं तसं जगावं, त्यात कुणी ढवळाढवळ करणार नाही, हे तिथं दिसतं आणि ते मला आवडतं. मात्र तिथल्या मुलांना कॉलेजला जाताना थोडासा ताण असतो की, आपल्याला त्यासाठी पैसे कुठून मिळणार, खर्च कसा निघणार, म्हणून ते कॉलेजला जाताना आधी विचार करतात. त्यामुळे काहीजण शिकण्यापेक्षा कमावण्याला प्राधान्य देतात. त्यांना स्कॉलरशिप किंवा शिक्षणकर्ज दिलं जातं. मात्र त्यांच्या राहाणीमानाचा दर्जा पाहता त्यांना कळत नाही की, आपण किती कमावतोय, खर्च करतोय आणि शिल्लकीत टाकतोय.. त्यांच्यावर अमुक पदवी घ्याच, असा दबाव आणला जात नाही. आताशा नव्या पिढीला थोडंसं याबाबत मार्गदर्शन केलं जाताना दिसतं आहे. इंजिनिअरिंगविषयी आवड वाढवण्यासाठी आणि गणिताची खूप भीती वाटते, ती दूर सारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. बाहेरून तिथे शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना ठरावीक गुणांची पातळी गाठणं आणि ती कायम ठेवणं अपेक्षित असतं. तिथे कॉपी करू नका, हे सांगतानाच झोकून देऊन अभ्यास करा, हेही सांगितलं जातं. कॉपी करताना पकडलं गेल्यास खूप कडक कारवाई होते. एकदा प्राध्यापकांनी सांगितलं की, गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका अभ्यासू नका. तरी तसं केलं जातंय हे लक्षात आल्यावर त्यांनी प्रश्नांची धाटणी थोडीशी बदलली. पण काहींनी आधीच्या वर्षीचे प्रश्न सोडवले असल्याने तशी उत्तरं लिहिल्याचं प्राध्यापकांच्या ध्यानी आलं आणि त्यांनी अख्ख्या वर्गाला नापास करून टाकलं.
तिथे कॉलेजमध्ये प्रवेश घेताना फक्त गुण पाहिले जात नाहीत तर विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व कसं आणि किती विकसित झालंय ते पाहिलं जातं. त्यात खेळ, स्वयंसेवी वृत्ती, त्यांची गुणवैशिष्टय़ हे सगळे पैलू बघितले जातात. तिथे अमेरिकन फुटबॉल फार खेळला जातो. विशेषत: कॉलेजच्या पातळीवरचे सामने फारच आवडीने पाहिले जातात. आमच्या कॉलेज स्टेडिअमवरच्या मॅच पाहायला लोक कुठून कुठून यायचे. तिथले लोक जिमला जातात, तसंच वेळ मिळेल तेव्हा जॉगिंगही करतात. दैनंदिन वेळापत्रक कटाक्षानं पाळलं जातं. प्रत्येकाला व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य असल्याने कल्पनांना मुक्त विहाराची संधी मिळते. पालकांचाही भक्कम पाठिंबा मिळतो.
viva@expressindia.com