परीक्षा, अभ्यास, रिलेशनशिप, मैत्री, करिअर, लुक्स.. तरुणाईच्या आयुष्यात यातलं काहीही हल्ली तणाव निर्माण करतं. असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी
बॉस रजा देईल की नाही देणार? ‘टु बी ऑर नॉट टु बी’च्या तालावर निशांतच्या मनात हा गहन प्रश्न घिरटय़ा घालत होता. जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला जायची केव्हापासून तयारी चालली होती. त्यांच्या ग्रुपची तिकिटं काढताना तोंडाला फेस आला होता आणि खिशाला पडलं होतं भलंमोठं भगदाड. बाबांना विचारल्यावर त्यांनी शंका काढल्या त्या वेगळ्याच. म्हणे कोण हा जस्टीन बिबर? जॉब नवीन आहे तुझा? काय नडलंय एवढे ढीगभर पैसे देऊन जायचं? आणि केवढी गर्दी तिथे. काही प्रॉब्लेम झाला तर.. चेंगराचेंगरी व्हायची. त्या कान किटवणाऱ्या आवाजात, एवढय़ा गर्दीत लांबवर कुठे तरी तो ठिपक्याएवढा बिबर दिसणार तुला. त्यापेक्षा यू टय़ूबवर बघ. नाही तरी कायम नेटवर पडीक असता ना? नाही काय, वाय-फायचं लिमिट कसं संपतं मग सारखं? बाबांच्या पोतडीतले प्रश्नांचे बाण संपतच नव्हते. आता एवढं सगळं त्यांनी ऐकवल्यावर आई तरी कशी मागे राहील? तिनंही तिचं मत मांडलं. हे बघ, आम्ही तसे मॉडर्न पॅरेन्ट्स आहोत, पण या अशा ठिकाणी मुलं आणि मुली अगदी अंगात आल्यासारखे, एखाद्या तारेत असल्यासारखे एकमेकांच्या अंगावर पडून नाचत असतात. आणखी काय करत असतील कोण जाणे? म्हणून काळजी वाटते रे. आणि कोणकोण जाणार आहात तुम्ही? फक्त मित्र आहेत की मैत्रिणीपण?
निशांत म्हणाला, ‘आई, बाबा, मी एकवीस वर्षांचा आहे. आता कायद्यानंसुद्धा मान्य केलंय की मी सज्ञान आहे. इतकं तरी मला ठरवू द्या आणि तुम्हाला नाही कळणार हे, तुम्हाला माहिती तरी आहे का लोक आपल्या आयडॉलसाठी काय काय करतात ते? त्याच्यासारखी हेअरस्टाइल करतात, त्याचे टॅटू काढून घेतात, त्याचे फोटो असलेले टी शर्ट्स वापरतात. तो जे डाएट फॉलो करतो, जे व्यायाम करतो, तेच करतात. माझं कित्येक वर्षांपासूनचं स्वप्न आहे बिबरला प्रत्यक्षात बघायचं. मग त्यासाठी कितीही पैसे गेले तरी चालतील..’
म्युझिकच्या एका प्रोग्रॅमविषयीच्या मतांमधे, उत्साहामध्ये दोन पिढय़ांत एवढी तफावत? काय जादू असते या कॉन्सर्टची? कोटय़वधी रुपयांची उलाढाल होण्याइतकं काय खास असतं या म्युझिशियन्सकडे? एवढय़ाा हजारोंच्या संख्येनं फॅन्स का गर्दी करतात तिथे? पीअर प्रेशरमुळे का? की हीरो वर्शिप? स्ट्रेस बस्टर? की बोअरडमवर उतारा?
या सगळ्यांचाच तसा थोडाथोडा हातभार असतो म्हणा.. तिथलं वातावरण हा एक युनिक एक्सपिअिरन्स असतो. ती गर्दी, तो फसफसता उत्साह, ते चमचमणारे लाइट्स, थिरकणारी पावलं आणि चारी दिशांत दुमदुमणारं म्युझिक या सगळ्याची नशा चढली नाही तरच नवल. कितीही वेळा ती गाणी ऐकलेली किंवा पाहिलेली असली तरी ती लाइव्ह ऐकण्याची मजाच काही और. एखादं नाटक नुसतं वाचणं आणि त्याच नाटकाचा पॉवरफुल परफॉर्मन्स बघणं यात कसा जमीन-अस्मानाचा फरक असतो ना? बघताना आपण त्याचा सर्व सेन्सेस वापरून स्वाद घेऊ शकतो. त्यात दिग्दर्शकाची करामतही भर टाकते. तसंच असतं या कॉन्सर्ट्सचं. समोर परफॉर्म करणारा आर्टिस्ट जरी कुठे तरी दूर दिसत असला तरी त्याच्याबरोबर एक नातं जोडलं जात असतं. फक्त स्वत: गायक किंवा त्याचं म्युझिक किंवा साऊंड क्वालिटी किंवा किती गर्दी आहे यातली कुठलीही एकच गोष्ट महत्त्वाची नसते. या सगळ्याचा तो एक एकत्रित परिणाम असतो. म्हणूनच तो एक परिपूर्ण अनुभव बनतो. आणि हो, या सगळ्याचं फोटोसकट डिटेल्ड डॉक्युमेंटेशन सोशल मीडियावर टाकायचं असतं, ताबडतोब. तेही शक्य झालं तर लाइव्ह.
निशांतची आई म्हणाली त्याप्रमाणे या लाइव्ह कॉन्सर्ट्स आणि ड्रग्ज यांचं बऱ्याचदा साटंलोटं असतं. खरं तर तो सगळा माहौलच असा असतो की, सगळी बंधनं झुगारून फक्त एन्जॉय करणं यावर सगळी शक्ती एकवटली जाते. भावना इतक्या तीव्र असतात की काही वेळा त्या अनावर होतात. शरीरमनावर चढलेली नशा होश उडवते.
निशांत म्हणाला, ‘आई ड्रग्जविषयी मीसुद्धा ऐकलंय. त्यामुळे मी जरा सावध राहीनच. आमच्याबरोबर निधी आणि समीरापण येणारेत. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांवर लक्ष ठेवायचं ठरवलंय. तू अजिबात काळजी करू नकोस. आणि बाबा, खरं सांगू का हे भीमसेन जोशींच्या गाण्याची रेकॉर्ड ऐकणं आणि सवाई गंधर्व महोत्सवाला हजेरी लावणं यातल्या फरकासारखं आहे. हा फायनल युक्तिवाद मात्र बाबांना मनापासून पटला आणि निशांतची रजाही मंजूर झाली. आपण हा लेख वाचू तोपर्यंत निशांतचा तो लाइफटाइम एक्सपिरियन्स घेऊन झालाही असेल!
viva@expressindia.com