आजकालच्या तरुणाईला नेहमीच काही तरी वेगळं करण्याची सवय असते. मग ती शॉपिंग असो किंवा जेवण. वेगवेगळे मसाले वापरून, वेगवेगळे जिन्नस वापरून ताटातल्या पदार्थात आणि त्या पदार्थाच्या चवीत काही तरी वेगळेपण उतरवायचं असतं. हेच वेगळेपण येत्या दिवाळीच्या फराळात देखील उतरवण्यासाठी शेफ विष्णू मनोहर यांनी खास व्हिवा वाचकांसाठी फराळाच्या भन्नाट पाककृती दिल्या आहेत.

पनीर शंकरपाळे

साहित्य : पनीर ३०० ग्रॅम, साखर २०० ग्रॅम, वेलची पावडर १ चमचा, मीठ चिमूटभर, केशर पाव चमचा, दूध पाव वाटी.

कृती : पनीरचे छोटे चौकोनी तुकडे तयार करा. २ वाटय़ा तुकडे असतील तर दीड वाटी साखर पॅनमध्ये घेऊन ओली होईस्तोवर पाणी घाला. गरम करून साखर वितळल्यावर त्यात चिमूटभर मीठ, स्वादानुसार वेलची पावडर किंवा केशर घालून त्यात पनीरचे तुकडे घालून मिश्रण ढवळत-ढवळत घट्ट करा. मधे-मधे गॅस कमी-जास्त करत राहा. काही वेळाने मिश्रण कोरडं व्हायला लागेल त्या वेळी गॅस बंद करा व पनीरचे तुकडे तुपाचा हात लावलेल्या प्लेटमध्ये पसरवून ठेवा. कोरडे झाल्यावर खायला द्या.

दलिअप्पा

साहित्य : भिजलेल्या तांदळाची पेस्ट १ वाटी, गुळाचा पाक १ वाटी, बदामाचे काप २ चमचे, तेल तळायला पाव वाटी, दूध पाव वाटी, मीठ चिमूटभर.

कृती : तांदूळ ३ ते ४ तास भिजवून डोशाच्या पिठाइतपत वाटताना त्यात दूध, चिमूटभर मीठ घाला. नंतर हे मिश्रण एका पायिपग बॅगमध्ये भरून तव्यावर मिश्रणाने जाळीदार डिझाईन असलेले गोल डोसे तयार करा. नॉनस्टिक पॅन असेल तर तेल लावण्याची गरज नाही. तव्यावरच त्याची त्रिकोणी घडी करून त्याला बदामी रंगावर डीप फ्राय करा. नंतर गुळाच्या घट्ट पाकात बुडवून बाहेर काढून वरून बदामाचे काप घालून खायला द्या.

पनीरचा चिवडा

साहित्य : पनीर ३०० ग्रॅम, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, बडीशेप १ चमचा, जिरे १ चमचा, आमचूर पावडर अर्धा चमचा, हळद पाव चमचा, तिखट अर्धा चमचा, हिंग पाव चमचा, साखर अर्धा चमचा, मीठ पाव चमचा, बदामाचे काप ४ चमचे, तळलेला कांदा पाव वाटी.

कृती : सर्वप्रथम पनीर जाड छिद्राच्या किसणीने शक्यतो लांब-लांब किसून घ्या. त्याला थोडा मिठाच्या पाण्याचा हात लावा. नंतर थोडे कॉर्नस्टार्चमध्ये घोळवून मंद आचेवर डीप फ्राय करा. तोपर्यंत तिखट, हळद, जिरे, िहग, आमचूर पावडर, साखर, बडीशेप यांची मिक्सरमध्ये पूड बनवून घ्या. नंतर तळलेल्या पनीरवर घालून एकत्र करा. बारीक बदामाचे काप, तळलेला कांदा घालून सव्‍‌र्ह करा.

जिल मोगरी

साहित्य : मदा १ वाटी, बेसन १ चमचा, आरारोट १ चमचा, दही १ चमचा, साखर २ वाटय़ा, बदाम-पिस्त्याचे काप ४ चमचे.

कृती : मदा, बेसन, आरारोट, दही एकत्र करून कोमट पाण्याने भिजवा. हे मिश्रण ७ ते ८ तास भिजत ठेवून फरमेंट करा. मिश्रण थोडे घट्टच ठेवावे. नंतर मुंगपकोडय़ासारखे हाताने छोटे-छोटे गोळे तयार करून मंद आचेवर कडक होईस्तोवर तळून घ्या. नंतर साखरेच्या पाकात घालून बाहेर काढा. वरून बदाम-पिस्त्याचे काप घालून सव्‍‌र्ह करा.

कॉर्न चकली विथ चीज सॉस

साहित्य : जाडसर दळलेले मक्याचे पीठ २ वाटय़ा, कॉर्नस्टार्च पाव वाटी, मीठ अर्धा चमचा, बटर ४ चमचे.

कृती : मक्याच्या पिठात कॉर्नस्टार्च, मीठ, २ चमचे तेल घालून गरम पाण्याच्या साहाय्याने मिश्रण चांगले भिजवून मळून घ्या. त्यानंतर मक्याच्या पिठाच्या सरळ रेषेत चकल्या पाडा. मंद आचेवर तळून घ्या. तळल्यानंतर चीज सॉसबरोबर खायला द्या.

चीज सॉस : २ क्यूब चीज, १ कप दूध, मिक्स हर्ब्स अर्धा चमचा, चिली फ्लेक्स अर्धा चमचा.

कृती : सर्व जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करा किंवा सर्व जिन्नस एकत्र करून फ्रायपॅनवर घट्ट होईस्तोवर गरम करा.

प्रकार दुसरा गोडाचा : १ वाटी मिल्क पावडरमध्ये पाव वाटी दूध, १ चमचा केसर सिरप घालून एकत्र मिसळा. साधारण सॉससारखे घट्ट व्हायला हवे. सव्‍‌र्ह करतेवेळी या सॉसबरोबर चकली खायला द्या.

संकलन : मितेश जोशी