अमेय खोत,बर्जुमन, दुबई

दुबईत फिरताना आपण मुंबईबाहेर आहोत, हे फक्त तीन गोष्टी पाहून जाणवतं. त्या गोष्टी म्हणजे गगनचुंबी इमारती, स्वच्छता आणि नियमांचं काटेकोरपणं केलं जाणारं पालन. तुम्ही शहरी भागात फिरा किंवा बाजारात फिरा, त्या त्या ठिकाणी दुकानं किंवा हॉटेल्स चालू-बंद होण्याच्या वेळा या काटेकोरपणे पाळल्या जातात.

युनाईटेड अरब अमिरातीमधील एक देश म्हणजे दुबई. त्यामुळे दुबईतील संस्कृती प्रामुख्याने इस्लाम आणि पारंपरिक अरब संस्कृतीभोवतीच गुंफली गेली आहे. त्यांच्या वास्तूकला, संगीत, पोशाख, खाद्यपदार्थ आणि जीवनशैलीवर इस्लामिक व अरब संस्कृतीचा प्रभाव आहे. पण दुबईत झालेल्या उद्योग क्षेत्रातील प्रगतीमुळे जगभरातून माणसं इकडे येतात आणि वास्तव्य करतात. त्यामुळे विविध देशांच्या सांस्कृतिक छटा इथे एकत्र झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. दुबईमध्ये ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या भारतीयांची असल्या कारणाने आपले सण आणि संस्कृतीचं जतन दुबईमध्ये चांगल्या प्रकारे झाले आहे.

वर्षभरापूर्वी मी भारतात परतलो आहे. माझं वास्तव्य दुबईमध्ये बर्जुमनला होतं. मी जिथे राहत होतो तिथे आजूबाजूला भारतीय आणि इतर आशियाई देशातील रहिवासी असल्यामुळे प्रामुख्याने हिंदी भाषेचाच वापर होत होता. तिकडे फिरताना आपण मुंबईबाहेर आहोत, हे फक्त तीन गोष्टी पाहून जाणवतं. त्या गोष्टी म्हणजे गगनचुंबी इमारती, स्वच्छता आणि नियमांचं काटेकोरपणं केलं जाणारं पालन. तुम्ही शहरी भागात फिरा किंवा बाजारात फिरा, त्या त्या ठिकाणी दुकानं किंवा हॉटेल्स चालू-बंद होण्याच्या वेळा या काटेकोरपणे पाळल्या जातात.

दुबईचं वैशिष्टय़ं म्हणजे प्रशस्त मॉल्स आणि उंचच उंच इमारती. जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाणारी बुर्ज खलिफा ही इमारत सध्या दुबईच्या पर्यटनाचं केंद्र बनली आहे. तसंच जगातील सर्वात मोठय़ा मॉलमध्ये गणले जाणारे दुबई मॉल आणि एमिरेट्स मॉल. एमिरेटेस् मॉलमध्ये जवळपास शंभर रेस्तरांॅ, ऐंशीपेक्षा जास्त लक्झुरिअस स्टोअर्स, थिएटर्स, आर्ट सेंटर्स आहेत. दुबईसारख्या उष्ण देशातही बर्फाच्या स्केटिंगचा आस्वाद लुटता यावा म्हणून बनवलेलं सर्वात मोठं इनडोइर आईस स्केटिंगही याच मॉलमध्ये आहे. याशिवाय, डेझर्ट सफारी, फेरारी वर्ल्ड, पाल्म जुमेरिच, मरीना, दुबई क्रीक, म्युझीअम, दुबई गोल्ड सूक म्हणजे प्रशस्त बाजार, जुमरिच बीच, अँटलांटिस आणि बुर्ज अल अरब हीदेखील दुबईतील पर्यटनाची आश्चर्य ठरली आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सुट्टीच्या दिवशी बीचवर किंवा मॉलमध्ये तरुणांचा अक्षरश: मेळावा भरतो. सगळे आपापल्या परीने सुट्टीचा आस्वाद घेत असतात. तिथले तरुण सुट्टीत बाहेर जाणं, मजामस्ती करणं याला प्राधान्य देतात. मजामस्तीबरोबरच ते स्वत:च्या तब्येतीचीही तितकीच काळजी घेतात. मॉर्निग वॉकला जाणं, जॉगिंगला जाणं आणि वेळ मिळेल तसं जिमला जाणं या गोष्टी ते नियमित करतात. संध्याकाळी थकून घरी आल्यावर आपल्या मित्रमैत्रिणीं बरोबर फिरायला जाणं आणि ऑफिसच्या कामामुळं आलेला थकवा दूर करणं हा त्यांच्या नित्य दिनक्रमाचा भाग बनला आहे.

दुबईमध्ये जगभरातून माणसं येतात. त्यामुळे दुबईमध्ये सगळ्या देशांमधले विविध पदार्थ खायला मिळतात. मुंबईचा फेमस वडापावही तिथे मिळतो आणि चाटही मिळतात. तसंच बर्गरही मिळतो. शॉरमाही मिळतो. शॉरमा हा दुबईमधल्या स्ट्रीट फूडमध्ये गणला जातो. मुंबईत जसा वडापाव प्रसिद्ध आहे, तसाच दुबईत शॉरमा  प्रसिद्ध आहे. सध्या हा शॉरमा आपल्याकडेही मिळू लागला आहे. तिथे हमुस हा एक प्रकार खूप प्रसिद्ध आहे. हमुस हा कुठला खाद्यपदार्थ नसून तो चटणीचा एक प्रकार आहे.

दुबईतली फक्त तरुणाईच नाही तर सगळ्या वयोगटांतील स्त्री-पुरुष सांस्कृतिक कार्यक्रमात मोठय़ा उत्साहाने आणि मोठय़ा संख्येने भाग घेतात. १५ ऑगस्ट असो किंवा २६ जानेवारी ध्वजारोहणाच्या उत्साहाला तिथे परदेशात असूनही बांध घातला जात नाही. सणावाराला मंदिरात जाणं, एकमेकांना भेटून शुभेच्छा देणं, एखाद्या सणाचा खास पदार्थ असेल तर तो बनवणं आणि त्याचा आस्वाद मित्रमैत्रिणींसोबत तसंच कुटुंबासोबत मनमुराद लुटला जातो. तो जोश आणि तो उत्साह पाहून आपल्याला जाणवतही नाही की आपण भारताबाहेर आहोत.

तिथे शिक्षणालाही खूप महत्त्व दिलं गेलं आहे. भारतात सीबीएससी, एसएससी बोर्ड आहेत. तसंच दुबईमध्ये ‘केएचडीए’ (नॉलेज अँड ह्य़ुमन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी) आहे. त्याची स्थापना २००६मध्ये झाली. दुबईमध्ये आपल्याला सरकारी तसंच खाजगी शाळांमध्ये शिक्षण घेता येतं. सरकारी शाळांमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी शिक्षण हे मोफत दिलं जातं. त्यांची मुख्य भाषा ही अरबी आहे आणि त्याच्या खालोखाल इंग्रजी शिकवलं जातं. त्यात ब्रिटिश, इंडियन आणि अमेरिकन अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळांचाही समावेश आहे. ‘युएई’च्या शिक्षण मंडळानुसार वयाच्या पाचव्या वर्षांपासून प्रायमरी शिक्षण हे बंधनकारक आहे. सेकंडरी एज्युकेशनमध्ये मुले आपल्या आवडीनुसार शिक्षण घेऊन आपलं करिअर त्याच क्षेत्रात करतात.

दुबईमधील तरुण आपलं करिअर आपल्या आवडत्या क्षेत्रात घडवायला मेहनत घेतात. पण ही धावपळ करत असताना आपल्या कुटुंबालाही ते तितकाच वेळ देतात. जागतिकीकरणामुळे दुबईमध्ये करिअर करण्यासाठी खूप मार्ग मोकळे झाले आहेत. दुबईत आठवडय़ाची सुट्टी ही शुक्रवार-शनिवार असते. प्रामुख्याने इस्लाम आणि अरब या दोन्ही संस्कृती हा तिथला पाया असल्याने शुक्रवारी जुम्मा म्हणजेच मोठी प्रार्थना असते. म्हणून सुट्टी शनिवार-रविवार बदलून शुक्रवार-शनिवार अशी करण्यात आली आहे. आधीच सांगितलं तसं की तिथे भारतीयांची संख्या जास्त आहे तेही एकाच एक क्षेत्रात नाही. हॉटेल, आयटी-इंजिनीअरिंग अशा सगळ्याच क्षेत्रात तिथे भारतीय काम करताना दिसतात. आणि तिथले कामासाठीचे नियम हे सगळ्यांसाठी सारखेच आहेत. तेथील लोक कामापुरतंच एकमेकांशी बोलतात. भारताविषयी त्यांना फार उत्सुकता आहे किंवा ते चौकशी वगैरे करताना दिसत नाहीत. त्यांचं बोलणंही तसं जुजबीच असतं. कामानिमित्त मिटिंगच्या वेळी तिथल्या लोकांशी बोलताना आम्हाला संथ लयीत बोलावं लागे कारण आपण भरभर बोललेलं त्यांना कळत नाही. सुरुवातीला त्यांचा अरबी पेहराव बघून थोडं बिचकायलाही व्हायचं. मात्र सवयीने त्या गोष्टी नेहमीच्या होऊन जातात. तिथलं हवामानही वेगळंच असल्याने त्याचाही अनुभव आपल्याला येतो. एकदा हवामानाचा चार दिवसांतला लहरीपणा फारच लक्षात राहिला होता. एक दिवस कडक ऊन पडलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रचंड पाऊ स पडला होता, रात्री थंडी पुन्हा ऊन मग पाऊस. आणि चौथ्या दिवशी तर वाळूचं वादळच आलं होतं. त्यावेळी तर दहा फुटांवरची गाडीही धड दिसत नव्हती..

आपण दुबईबद्दल अशा बऱ्याच गोष्टी ऐकतो, पुढे कधी स्वत: अनुभवतो तेव्हा आपसूकच भारताबरोबर त्या देशाची तुलना केली जाते. त्यांचे नियम मग ते वाहतुकीचे असोत किंवा समाजात वावरतानाचे असो किंवा परिसरात फिरतानाचे असोत ते पाळलेच जातात. तिकडची स्वच्छता, समृद्धी यात आपण कुठेतरी मागे आहोत, हे जाणवतं. संस्कृती आणि परंपरेच्या बाबतीत तुलना करायची झाली तर दुबई आणि भारत हे दोन्ही देश विविधतेने नटलेले आहेत. त्यांच्यात तुलना न करणंच योग्य ठरेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

viva@expressindia.com