आपल्याकडे गौरी-गणपतीसाठी बनवल्या जाणाऱ्या पदार्थामध्येही चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचंड वैविध्य आढळून येतं, मात्र आपल्याला त्या पदार्थाची फारशी माहिती नसल्याने केवळ उकडीच्या मोदकांवर ताव मारून आपण आनंदी होतो. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अशा खास पारंपरिक पदार्थाची ही ओळख..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदक

गणपतीचा म्हणजे मोदक आलेच. त्यामुळे कोणत्याही शुभकार्याची सुरुवात जशी गणपतीच्या पूजेने होते तशीच गणपतीच्या खाऊची ओळखही मोदकापासूनच होते. तांदळाच्या पिठाची उकड घेऊ न त्याची कणिक मळून त्याच्या हातावर गोलाकार पाऱ्या करून त्यामध्ये भरलेलं ओल्या नारळाचं गोड सारण म्हणजे मोदक. गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांत घराघरांमध्ये असे मोदक बनवले जातातच. पण मराठवाडा व विदर्भात मात्र सुक्या खोबऱ्याच्या सारणाचे तळलेले मोदक बनवले जातात. सुकं खोबरं व गुळाच्या जोडीला काजू, बदाम, केशर, जायफळ, वेलची, बेदाणे, चारोळी याची मस्त चव या मोदकामध्ये आपल्याला चाखायला मिळते. गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीला मात्र काही ठिकाणी वेगळे मोदक बनवण्याची पद्धत आहे. जसं पश्चिम महाराष्ट्रात ऋषीपंचमीच्या दिवशी ओल्या नारळाचे तळलेले मोदक बनवण्याची पद्धत आहे. यामागचं कारण असं की गणपतीचं वाहन उंदीर, त्याची शरीरयष्टी नाजूक व लहान असते. त्याला गणपतीचा पंचपक्वान्नाचा नैवेद्य काही पचणारा नाही म्हणून उंदरासाठी हे तळलेले मोदक बनवून त्याचा नैवेद्य दाखवला जातो व उंदीर बीज साजरी केली जाते. ब्राह्मणांच्या काही पोटज्ञातींमध्ये ऋषीपंचमीच्या दिवशी खव्यारव्याचे मोदकदेखील बनवले जातात.

अननस शिरा व पायसम

गणेशोत्सवामध्ये दाक्षिणात्य लोकांना उकडीचे मोदक वळता येत नाहीत, म्हणून नैवेद्याच्या ताटामध्ये अननसाचा शिरा हा गोड पदार्थ म्हणून बनवला जातो. तसेच त्यांच्या पारंपरिक खाद्यसंस्कृतीमधील पायासम (खीर) हा पदार्थदेखील या वेळी बनवला जातो. श्रीगणेशाचे दर्शन घ्यायला आलेल्या भक्तांच्या हातावर काळे तीळ, ओलं खोबरं, गूळ व नारळाचं पाणी यांचा काला करून तयार होणारा पदार्थ प्रसाद म्हणून देण्याची परंपरा त्यांच्याकडे पाहायला मिळते.

गौरींच्या नैवेद्यातील भाज्या- महाराष्ट्रात गौराईच्या पूजनाची आणि तिच्या होणाऱ्या लाडकौतुकाची पद्धत पावलापावलावर बदलत जाते. मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात तर ती घरागणिक बदलते. महाराष्ट्रात काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्यात माठ व भेंडीची मिक्स भाजी बनवली जाते, काही ठिकाणी अंबाडीची भाजी, तर काही ठिकाणी १६ भाज्यांची मिक्स अथवा १६ वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात. त्याचबरोबर १६ चटण्या व १६ कोशिंबिरीदेखील बनवल्या जातात.

गौरीच्या नैवेद्यातील तळण- नैवेद्याच्या ताटातील चमचमीत भाग म्हणजे ‘तळण’. यामध्ये अळूवडीला अग्रमान दिला जातो. त्याचबरोबर कोथिंबिर वडी, पालक वडी, ओल्या डाळीचे वडे, उडीदाचे साधे वडे, उडीदाचे काळे तीळ घालून केलेले वडे, आंबवडे, बटाटा भजी, गिलके हे तळलेले पदार्थ आढळतात. पश्चिम महाराष्ट्रात नैवेद्याच्या ताटात सात प्रकारचे तळलेले पदार्थ केले जातात. शिवाय, तिथे अळू हे केवळ पितृपक्षात घरी शिजवले जात असल्याने त्यांच्या नैवेद्याच्या ताटात आंबवडे हा वेगळा पदार्थ बनवला जातो.

दिवाळीचा फराळ

नाशिक, औरंगाबाद, मराठवाडा या भागांत गौरींना महालक्ष्मी म्हटले जाते. जेष्ठा व कनिष्ठा अशा दोन उभ्या महालक्ष्मीची पूजा या भागांत केली जाते. तिथे या नैवेद्याचा थाट हा दिवाळीच्या फराळासारखा असतो. त्यामुळे गौरींच्या नैवेद्यात शंकरपाळे, चकली, अनारसे, बेसनाचे लाडू, रव्याचे लाडू, मुगाचे लाडू, कडबोळी, करंजी, दोन प्रकारचा चिवडा असा दिवाळीसारखा तिखट गोड फराळ बनवला जातो.

पातोडय़ा

श्रावण-भाद्रपदामध्ये हळदीची पानं विपुल प्रमाणात आढळतात. कुडाळ व तिथून खाली कोकण किनारपट्टीवर तसेच गोव्यात पातोडय़ा हा पारंपरिक पदार्थ गणपतीत बनवला जातो. अगदी मोदकासारखी समान उकड व सारण तयार करून हळदीच्या पानाला सर्वप्रथम तूप लावून त्याच्यावर उकड थापून घ्यावी व नंतर तयार गोड सारण घालून पान दुमडून मोदकपात्रात ह्य़ा पातोडय़ा उकडून घ्याव्यात. काही वेळाने या पातोडय़ांना हळदीच्या पानासारखाच सुगंध येतो.

निनाव

गणपतीच्या पाठोपाठ तीन दिवसांसाठी माहेरपणाला गौरी येतात. गणपतीपेक्षा गौरींच्याच खाद्यपदार्थाचा थाटमाट काही और असतो. चांद्रसेनीय कायस्थ प्रभू ब्राह्मणांमध्ये गौरीच्या नैवेद्यामध्ये निनाव हा पदार्थ हमखास असतोच. निनाव या शब्दाचा अर्थ ‘ज्याला नाव नाही’ असा तो निनाव. सीकेपींची खासियत म्हणून हा पदार्थ सर्वश्रुत आहे. कणिक, बेसन पीठ व नारळाच्या दुधापासून बनवला जाणारा हा पदार्थ चवीला कमी गोड असतो. हा पदार्थ देशस्थ ब्राम्हणांमध्ये देखील बनवला जातो.

ऋषीची भाजी

गणेश चतुर्थीचा दुसरा दिवस भाद्रपद शुक्ल पंचमी म्हणजे ऋषी पंचमी. या दिवशी करण्यात येणारी मिक्स भाजी किंवा मिसळीची भाजी म्हणजेच ऋषीची भाजी होय.

पण ही आपली नेहमीची मिक्स भाजी नाही. या भाजीची काही वेगळी वैशिष्टय़े आहेत. या भाज्या पिकवण्यासाठी बैलाचे कष्ट  (आणि आजच्या युगात यंत्राचे) नकोत. म्हणून फक्त आपोआप उगवलेल्या किंवा अंगणातल्या भाज्या वापरण्याची परंपरा आहे. या भाजीत फळभाज्या, पालेभाज्या आणि कंदमुळे अशा प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात. यात तेल-तूप, मिरची पूड आणि कुठल्याही प्रकारचे मसाले वापरले जात नाहीत. तिखटपणा येण्यासाठी फक्त हिरव्या मिरच्या वापरल्या जातात. कमी उष्मांक असलेली ही भाजी अत्यंत पौष्टिक आणि चवदार आहे. याचं कारण म्हणजे सेंद्रिय, हंगामी आणि ताज्या भाज्यांचा केलेला वापर व तेल आणि मसाल्यांचा अभाव. ऋषी पंचमीच्या दिवशी खाल्ला जाणारा भात आणि भाकरी यासाठी जे तांदूळ मिळतात तेसुद्धा बैलाचे कष्ट न घेता पिकवलेले असतात. त्या तांदळाला ‘पायनु’ असं म्हणतात. ऋषी पंचमीचे व्रत-उपवास हे आपल्या सप्तर्षीचे स्मरण आणि आदर व्यक्त करण्यासाठी केले जाते. वशिष्ठ ऋषींची पत्नी देवी अरुंधतीचीही या दिवशी पूजा केली जाते. ऋषीमुनी अत्यंत साधे जीवन जगत असत. रानात मिळणारी फळं, भाज्या आणि कंद हेच त्यांच्या आहारात असे. ऋषी पंचमीच्या या जेवणातून एक प्रकारे ऋषींच्या सात्विक आहाराची आणि त्यांच्या जीवनशैलीची झलक अनुभवायला मिळते.

काकडीचे सांदण

पावसाळ्याच्या दिवसांत मोठय़ा हिरव्या आणि पांढऱ्या सालीच्या दुधीभोपळ्याच्या आकाराच्या काकडय़ा भरपूर प्रमाणात व स्वस्त मिळतात. या काकडीला ‘बालम काकडी’ असेही म्हणतात. याच काकडीपासून एक चविष्ट गोड पदार्थ देशस्थ ब्राह्मणांकडे गौरींना बनवला जातो ज्याला काकडीचे सांदण असे म्हणतात. किसलेल्या काकडीत मावेल इतका तांदळाचा रवा घालून तो भिजवावा. त्यात किसलेला गूळ घालून मिश्रण कालवावे. मिश्रण पातळ झालेले दिसले की अर्धा तास हे मिश्रण तसेच ठेवावे. त्यातील रवा मुरेल व मिश्रण सरसरीत दिसेल. नंतर त्यात खवलेले ओले खोबरे आणि थोडी वेलची पूड घालावी. आता एका डब्याला तुपाचा हात लावून त्यात हे मिश्रण भरून कुकरमध्ये ठेवून २ शिटय़ा होईपर्यंत वाफवावे. डब्यातील मिश्रण थंड झाल्यावर वडय़ा कापाव्या. नंतर त्यावर थोडेसे तूप घालावे.

मांसाहाराची परंपरा

आगरी कोळी बांधवांमध्ये गौरींच्या नैवेद्याला शाकाहारी नैवेद्याच्या साथीला मांसाहारी पदार्थाचाही नैवेद्य दाखवला जातो. चिंबोरी व तांदळाची भाकरी हा पदार्थ गौरी पूजनेला त्यांच्याकडे हमखास बनवला जातो व तो देवीच्या पुढय़ात एका टोपलीखाली झाकून ठेवला जातो. त्याचप्रमाणे सीकेपींकडे मटण वडे, भाकरी व पापलेटचा नैवेद्य दाखवला जातो.

मणगणं

मणगणं हा गोव्यामधील पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ गोव्यात गणेशोत्सवात हमखास केला जातो. थोडीशी पुरणासारखी चव असल्याने आणि गुळाचा वापर केल्यामुळे हा पदार्थ खमंग लागतो.

यासाठीचं साहित्य : ३ तास भिजवलेली १ वाटी चणा डाळ, १ टेबलस्पून भिजवलेला साबुदाणा, पाऊण वाटी किसलेला गूळ, १५-१६ काजूचे तुकडे, जायफळ-वेलची पूड, २ वाटय़ा नारळाचं दूध.

कृती : चणा डाळ आणि साबुदाणा एकत्र करून, चणा डाळ अगदी मऊ  शिजेपर्यंत शिजवून घ्या. शिजवताना वर जो फेस येतो तो वेळोवेळी काढून टाका. डाळ शिजली की डाळ गरम असतानाच त्यात गूळ घालून विरघळून घ्या. वेलची-जायफळ पूड घाला. थंड होऊ  द्या. १ वाटी ओल्या नारळाचा चव दोन वाटय़ा पाणी घालून मिक्सरला खूप वेळ फिरवा. चांगलं दूध निघायला हवं. नंतर हे दूध गाळणीतून गाळून घ्या. थंड झालेल्या चणाडाळीत हे दूध घाला. त्यात काजूचे तुकडे घाला. जर नारळाचं दूध फुटू नये असं वाटत असेल तर गरम करताना आधी अर्धा कप साधं दूध घाला. मग नारळाचं दूध घाला. गणेशोत्सवात श्रीगणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या हातावर हा पारंपरिक खाद्यपदार्थ प्रसाद म्हणून दिला जातो.

  • सायली राजाध्यक्ष, फूडब्लॉगर

 

ऋषीची भाजी कशी कराल?

साहित्य : अळूची पाने, एक लाल भोपळा चिरलेला, अर्धा कप माठ, अर्धा कप कुरडूस (रानातली पालेभाजी), अर्धा कप सुरण (ऐच्छिक), अर्धा कप भेंडी (ऐच्छिक), अर्धा कप श्रावण घेवडा, अर्धा कप गवार, अर्धा कप पडवळ, अर्धा कप शिराळे, अर्धा कप घोसाळे, चार हिरव्या मिरच्या, चिंचेचा कोळ, चवीनुसार खवललेले ओले खोबरे, खडे मीठ- चवीनुसार.

कृती : अळू, कुरडूस आणि माठ स्वच्छ धुऊन बारीक चिरा. अळूच्या देठांना चिंचेचा कोळ चोळून ठेवा, नंतर धुऊन टाका. लाल भोपळ्याची सालं काढून त्यांचे छोटे तुकडे करा. सुरणाची सालं काढून त्याचे अगदी छोटे तुकडे करून त्याला चिंचेचा कोळ चोळून ठेवा. शिराळ्याची सालं काढून त्यांचे तुकडे करा. भेंडी आणि घोसाळे चिरून घ्या. पडवळाचेही आतल्या बिया काढून तुकडे करा. गवार व घेवडा शिरा काढून मोडून घ्या. सर्व भाज्या धुऊन घ्या. मिरच्यांचे तुकडे करा. एका मोठय़ा जाड बुडाच्या पातेल्यात सर्व चिरलेल्या भाज्या, मिरच्या आणि मीठ असं सर्व एकत्र करा. पातेल्यावर स्टीलचे ताट ठेवून पाणी ठेवा. मध्यम ते मंद आचेवर भाजी शिजवा. भाजीत जास्तीचे पाणी टाकू नका. शिजताना भाजीला पाणी सुटते. त्यातच भाजी शिजते. वरून पाणी टाकले तर भाजी बेचव लागते. भाजी मधूनमधून ढवळत राहा. पण जोरजोराने ढवळू नका नाहीतर भाजीचा लगदा होईल. शिजायला कठीण असणाऱ्या भाज्या बोटाने दाबून बघा. त्या शिजल्या की भाजी तयार. आवडीप्रमाणे चिंचेचा कोळ आणि ओले खोबरे घालून एक वाफ काढा.

viva@expressindia.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi ganpati festival traditional foods modak ganpati festival
First published on: 25-08-2017 at 00:31 IST