‘प्लस’ फॅशन

प्लस साइजचे कपडे ही आपल्याकडच्या बाजारपेठेची गरज होती आणि आजही आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देत फॅशनच्या फुटपट्टीत या प्लस साइजला बसवण्याचं काम रॉड्रिक्सने सुरू केलं.

प्लस साइजचे खरे पर्व सुरू झाले जेव्हा डिझाइनर वेन्डेल रॉडिर्र्क्सने ऑल – द प्लस साइज स्टोअरतर्फे प्लस साइजच्या मॉडेल्सद्वारे रॅम्पवर वॉक केला तेव्हा.. कारण आजवर कमनीय बांधाया संकल्पनेत अडकलेल्या मानसिकतेने त्यापलीकडे मोजमाप असलेल्या बांध्याचे स्त्री-पुरुष जास्त आहेत या वास्तवाकडे डोळेझाकच केली गेली.

‘प्लस साइज’चे खरे पर्व सुरू झाले जेव्हा डिझाइनर वेण्डेल रॉडिर्र्क्सने ‘ऑल – द प्लस साइज स्टोअर’ तर्फे ‘प्लस साइज’च्या मॉडेल्सद्वारे रॅम्पवर वॉक केला तेव्हा.. कारण आजवर ‘कमनीय बांधा’ या संकल्पनेत अडकलेल्या मानसिकतेने त्यापलीकडे मोजमाप असलेल्या बांध्याचे स्त्री-पुरुष जास्त आहेत या वास्तवाकडे डोळेझाकच केले होते. मात्र, प्लस साइजचे कपडे ही आपल्याकडच्या बाजारपेठेची गरज होती आणि आजही आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देत फॅशनच्या फुटपट्टीत या प्लस साइजला बसवण्याचं काम रॉड्रिक्सने सुरू केलं. हळूहळू आता प्लस साइज कलेक्शन बाजारात येऊ लागलं आहे. ऑनलाइन अ‍ॅप्सनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि आता तर टीव्हीवर जाहिरातीही सुरू झाल्या असल्याने अधिकीची ही फॅशन मुख्य प्रवाहात प्रवेश करती झाली आहे, पण..

‘प्लस साइज’च्या फॅशनविश्व विस्तारण्याच्या मार्गात हा ‘पण’ अजूनही अडकला आहे, कारण ‘प्लस साइज’चे कपडे आज बाजारात उपलब्ध होऊ लागले असले तरी अजून ट्रेण्डी फॅशन कपडे तितकेसे पाहायला मिळत नाहीत. पूर्वी प्लस साइज कपडे असं काही विशेष नव्हतं. आपल्याकडे ‘एक्सएस’(एक्स्ट्रा स्मॉल), ‘एस’(स्मॉल), ‘एम’(मीडियम), ‘एल’(लार्ज) आणि ‘एक्सएल’(एक्स्ट्रा लार्ज) या मोजमापांच्या लेबलमध्ये कपडे मिळत होते, आजही मिळतात. याशिवाय, नंतर ‘एक्सएक्सएल’(डबल एक्स्ट्रा लार्ज) आणि ‘एक्सएक्सएक्सएल’ (ट्रिपल एक्स्ट्रा लार्ज) या मापांतही टी-शर्ट, टॉप्स आणि ड्रेसेस उपलब्ध झाले. मात्र अजूनही मॉल किंवा दुकानांमधून एखादा ट्रेण्डी, मस्त डिझाइनचा ड्रेस, टॉप आपल्याला दिसलाच तर तो फक्त आधीच्या स्मॉल ते लार्ज तेही विशेषत: स्मॉल-मीडियम याच अंतरात उपलब्ध असतो. ‘आपके साइज का नही है.. ’ हे टिपिकल उत्तर कानावर पडतं. डेनिम, वनपीस, ब्लाऊ ज, गाऊन, स्कर्ट, हॅरम, ट्रॉऊ झर, कॅपरीस् या डेलीवेअरपासून हळूहळू चांगले ट्रेण्ड आता कुठे प्लस साइजमध्ये येऊ लागले आहेत, मात्र वेडिंग, पार्टीवेअर, ऑफिसवेअर असे ओकेजनल वेअर म्हणून ‘प्लस साइज’चे ड्रेस ट्रेण्डमध्ये येताना फार दिसत नाहीत. समर, ऑटम, विंटर, स्प्रिंग या सीझनला येणाऱ्या रंग व फॅब्रिकच्या ट्रेण्डचे कपडे प्लस साइजमध्ये पाहायला मिळण्याचं प्रमाण अजूनही कमीच आहे. असे कपडे खास शिवूनच घ्यावे लागतात आणि मग त्या पद्धतीचं कापड शोधण्यापासून ते त्या पद्धतीने शिवणाऱ्यापर्यंत पोहोचण्याची मारामार करावीच लागते.

थोडं मागे गेलं तर २०१६ साली वेण्डेल रॉड्रिक्सने ‘इंडियन वुमन साइज चार्ट’ आणला. त्यात परदेशात वापरलेल्या प्रत्येक आऊटफिटसाठी ‘कॉमन साइज चार्ट’ आणला गेला. अमेरिका, लंडन, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान येथे तिकडच्या डिझाइनर्सनी खास बस्ट, वेस्ट, हिपसाठी प्लस साइज चार्ट आणला होता ज्यात कोणत्याही ओकेजनसाठी कपडे हवे असतील तर ते हाच चार्ट प्रमाण मानून शिवले जातात. उंची, कमर, वजन या तिन्हीच्या मोजमापातून मिळालेले हे स्टायलिश कपडे मार्केटमध्ये उपलब्ध झाले असले तरी प्लस साइजचा विचार करताना ० एक्स, १एक्स, २एक्स, ३एक्स, ४एक्स, ५एक्स, ६एक्स, ७एक्स, ८एक्स असे मेजरमेंट घ्यावे लागते, ज्यात ओव्हरसाइज गार्मेटचा विचार केला जातो. त्यातही फक्त काही प्रकारचे कपडे किंवा ड्रेसेस पाहायला मिळतात. या साइजमधील वेडिंग किंवा एथनिक वेअर फार कमी उपलब्ध असतात.

डिझाइनर वेण्डेल रॉड्रिक्सने यामागचे कारण स्पष्ट करताना फॅशन इंडस्ट्रीत सगळ्याच साइजचे कपडे सहज उपलब्ध होणारे असावेत, असे मत व्यक्त केले. प्लस साइजच्या कपडय़ांसाठी जे रंग वापरले जातात त्यामुळे आकारात होणारे बदल आणि कपडय़ांच्या पद्धतीने दिसणारा एकसारखेपणा यामुळे डिझायनिंग करताना खूप आव्हान असते. त्यात वैविध्य आणण्यात ते कमी पडतात त्यामुळे मग ‘प्लस साइज’चे फॅशनेबल कपडे सहजी मिळत नाही पण ते गरजेचे आहे, असे रॉड्रिक्स यांनी सांगितले.

स्टायलिस्ट मधू चौधरी यांच्या मते टीव्ही मालिकांमुळे प्लस साइजची फॅशन येते आहे पण या कपडय़ांच्या फिटिंगबद्दल समस्या असतात. त्यामुळे असे कपडे एक तर शिवून घ्यावे लागतात किंवा त्यावर एक अजून स्टिचिंग करणं किंवा त्याप्रमाणे रेडीमेड जे कपडे मिळतात त्यावर साइजनुसार प्रयोग करावे लागतात. मालिकांमध्येही कलाकारांच्या बाबतीत अशा समस्या येतात. मालिकांमध्ये अनेकदा आपण प्लस साइज मॉडेल किंवा कलाकार लग्नसमारंभात किंवा अन्य प्रसंगांमध्ये डिझायनर कपडे वापरताना दिसतात तेव्हा हे प्लस साइजचे कपडे कसे व कुठे शिवले, हा प्रश्न सर्वसामान्य मुलामुलींना पडतो. मालिकांसाठी ते त्यापुरते उपलब्ध केले जातात मात्र हेच ट्रेण्ड म्हणून मार्के टमध्ये शोधले तर मिळणार नाहीत ते बऱ्याचदा शिवूनच घेतले जातात, असे चौधरी यांनी सांगितले.

‘जी. यू. सी’ या मल्टिस्टोअरच्या फॅशन उद्योजिका झेलम गोपाल दळवी यांच्या मते ‘प्लस साइज’ फॅशनमध्ये फार कमी पर्याय उपलब्ध असतात. खासकरून ओकेजन वेअरसाठी खूप कमी ट्रेण्ड्स असतात. कपडय़ांच्या मेजरमेंटमध्ये खूप तफावत असते कारण वेगवेगळ्या साइजचे तेवढे कपडे रोज बनवले जात नाहीत. प्रत्यक्ष व्यक्तीचे माप घेऊनच कपडे बनवले जातात. डिझाइनर्सही तसेच करतात, कारण एक तर प्लस साइजचे कपडे शिवण्यासाठी खूप कापड लागते हे एक कारण आहे. शिवाय डिझाइनचे कपडे असतील तर ते त्यांच्या मापांचे गणित बसवावे लागते त्यामुळे डिझाइनर्स कधीच प्लस साइजचे रेडीमेड कपडे शिवत नाहीत. सामूहिक ट्रेण्डचे कपडे शिवण्यापेक्षा वैयक्तिक मेजरमेंट घेऊन ड्रेस तयार करण्यावर डिझाइनर्स भर देत असल्याने प्लस साइजचे ड्रेस ट्रेण्डमध्ये पाहायला मिळत नाहीत.

‘ऑल’ या प्लस साइज स्टोअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेत्तल कॉटक म्हणतात, सध्याची फॅशन ही प्लस साइजमध्येही यायला हवी, याच उद्देशाने ‘ऑल’ स्टोअर काढले आहे. इथे ट्रेण्डनुसार प्लस साइज बॉडीटाइपचे कपडे त्यांना फिट बसतील अशाच पद्धतीने आणले जातात. विंटर कलेक्शनमध्ये ‘लॅक्मे फॅशन वीक’च्या साहाय्याने ‘ऑल’ या ब्रॅण्डने कॉमन ट्रेण्ड्स प्लस साइजसाठी आणले आहेत. त्यात मेन्सवेअरमध्ये प्लॅकेट्स, बण्डिंज, टय़ूनिक, ट्विल कॉटनचे कपडे ओकेजन वेअरसाठी देण्यात आले आहेत. तर वुमनवेअरमध्ये टय़ुनिक, एसिमेट्रिक गाऊन्स, स्विंग ड्रेस, केप्स, काफतान ट्रेण्डमध्ये दिले आहेत. जे कोणत्याही ओकेजनसाठी उपयुक्त ठरतील. कारण यात प्लस साइजचे सर्व मेजरमेंट्स कॉमन आहेत, त्यामुळे ते सहज ट्रेण्डमध्ये येऊ  शकतात.

विंटर, समर ट्रेण्ड वगळता सर्वात जास्त मारामार ही एथनिक वेअरमध्ये होते. २८-३६ इंचाची भारतीय स्त्रियांची कमर असते. कोणत्याही ब्रायडल वेअरला खास प्लस साइजच्या ट्रेण्डमध्ये बसवता येत नाही. प्लस साइजचे ब्रायडल आणि ओकेजनल वेअरसाठी असलेले ट्रेण्डी कपडे यात मोठी तफावत पाहायला मिळते. त्यानुसार किमतीही जास्त असतात कारण बाजारात प्लस साइजचे ट्रेण्ड आलेच तर मागणी वाढल्यामुळे किंमत जास्त असते. मग जर ते ब्रायडल किंवा झगमग कापडाचा ड्रेस असेल तर नॉर्मल साइजपेक्षा प्लस साइजच्या कपडय़ांचे भाव जास्त असतात.

प्लस साइजची दुकानेही मुंबईत फार कमी आहेत त्यामुळे प्लस साइजचे कपडे खरेदी करणे खूप कठीण होते. वास्तविकपणे दुकानांमधून कोणते कपडे ट्रेण्डमध्ये आहेत याची कल्पना आपल्याला येते. मात्र सध्या ‘ऑल’ व ‘एक्समेक्स’ या दोन दुकानांशिवाय अजून मुंबई किंवा मुंबईबाहेर कोणतीच प्लस साइज कपडय़ांची दुकाने नाहीत. म्हणून सध्या प्लस साइजचे ट्रेण्ड कसे व कुठे फॉलो करायचे, याबद्दल गोंधळ आहे. त्यासाठी काही टिप्स ब्लॉगर देत असतात. त्यातही अनारकली, लेहेंगा, चोळी यातले पर्याय अ‍ॅमेझानवर पाहायला मिळतात. परदेशात असे अनेक ब्रॅण्ड्स आहेत, जे प्लस साइजचे बरेच ओकेजनल वेअर ट्रेण्डमध्ये ठेवून दुकानांत व वेबसाइटवर उपलब्ध करतात. मग परदेशात गेल्यावर तिथून खरेदी होत असली तरी ती खिशाला परवडणारी नसते. त्यातल्या त्यात पर्याय म्हणून काही ऑनलाइन शॉपिंग साइट्सनी ओकेजनल वेअर कपडय़ांसाठी ‘प्लस साइज चार्ट’ उपलब्ध करून दिले आहेत. ब्रायडल, ओकेजन वेअरसाठी व ड्रेसेससाठीचे साइज चार्ट प्रत्येक ऑनलाइन शॉपवर उपलब्ध आहे, जेणेकरून ट्रेण्डी फॅशन करताना साइजचे अडथळे येत नाहीत. सध्या मॉलमध्ये प्लस साइज कपडय़ांचे आऊटलेट्स अवतरले आहेत. टीव्हीवर जाहिरातीही सुरू झाल्या आहेत, त्यामुळे लवकरच अधिकीच्या साइजसाठीची फॅशन ही इतर सर्वसामान्य साइजच्या कपडय़ांप्रमाणेच नेहमीची होईल, अशी आशा आहे.

viva@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Plus size model fashion walk all plus size store

ताज्या बातम्या