प्रशांत ननावरे – viva@expressindia.com

मुंबईला एकेकाळी मक्केला जायचं भारतातील प्रवेशद्वार म्हटलं जायचं. संपूर्ण भारतातून हजयात्री मुंबईत येत असत. क्रॉफर्ड मार्केट परिसरातील चार मजली मोहम्मद हाजी साबू सिद्दिकी मुसाफिरखाना येथे सर्व जण उतरत. १९९० च्या दशकात ‘हजहाऊ स’ सुरू व्हायच्या आधी मुसाफिरखाना हजयात्रींसाठीच नव्हे तर त्यांना सोडायला आणि घ्यायला येणाऱ्यांसाठीही हक्काचं ठिकाण होतं. या सर्व हजयात्रींना मुसाफिरखानासोबतच मुंबईत आपली वाटणारी आणखीन एक जागा होती. कारण सकाळच्या न्याहरीपासून ते रात्रीच्या जेवणासाठी याच जागेची वाट धरली जात असे. ती जागा म्हणजे रेडिओ रेस्टॉरंट. मुंबईच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेल्या या जागेचा आता लोकांना फारसा परिचय नाही. पण तब्बल ऐंशी वर्षे जुन्या या रेस्टॉरंटची भव्यता एकदातरी प्रत्येकाने अनुभवायलाच हवी.

क्रॉफर्ड मार्केटच्या मागील बाजूस असलेल्या मुसाफीरखाना रोडवर एक भव्य वास्तू दिसते. एकोणिसाव्या शतकातील बोहरा पद्धतीच्या स्थापत्यशैलीत बांधण्यात आलेली ही इमारत आहे. इमारतीच्या भल्यामोठय़ा प्रवेशद्वारावर मध्यभागी बाजूने कलाकुसर केलेली मोठी खिडकी आहे. या खिडकीच्या मध्यभागी गोलाकार आणि दरवाजाच्या मध्ये मार्बलमध्ये या जागेचा मूळ गुजराती मालक अकबरली मुल्ला रसूलजी धांग्रावाला याचं नाव मोठय़ा अक्षरात कोरण्यात आलंय. दरवाजातून आत प्रवेश करण्याआधीच बाहेरून तुम्हाला या जागेची भव्यता चकित करते. उत्सुकतेपोटी तुम्ही आत शिरता. आत शिरताच दोन्ही बाजूंना काही गाळे आणि त्यावर माडय़ा आहेत. तिथे पूर्वी कामगार राहत असत. पुन्हा एकदा समोर एक भलं मोठ्ठ चौकोनी आकाराचं प्रवेशद्वार तुमच्या स्वागतासाठी हजर असतं. त्याचे दरवाजे आता भिंतीमध्येच गाडले गेले आहेत. पण वर असणारे दरवाजा सरकवणारे लोखंडी रूळ आजही लक्ष वेधून घेतात. आतमध्ये गेल्यावर मंद प्रकाश आणि कळकट्ट झालेली जागा हे रेस्टॉरंट असल्याचं तुमच्या लक्षात येतं. या जागेची बांधणी अकबरली मुल्ला रसूलजी धांग्रावाला यांनी केली. त्या वेळेस या जागेचा उपयोग धान्याचं गोदाम म्हणून केला जात असे. रेडिओ रेस्टॉरंटला मोठाले दरवाजे असण्यामागचं कारण म्हणजे तेव्हा मोठमोठाले धान्याचे ट्रक आतमध्ये येत असत आणि माल चढवला-उतरवला जात असे.

१९९० पर्यंत अनेक इराणी पदार्थ येथे मिळत असत. तेव्हा कोळशाच्या शेगडीवर सर्व पदार्थ तयार केले जात. त्यानंतर लाकडाची शेगडी आली. सकाळी पाच वाजता भटारखान्यात गेलेले आचारी अकरा वाजता सर्व मेन्यू तयार करून बाहेर पडत असत. इथली दम बिर्याणी आजही प्रसिद्ध आहे. कारण गेल्या कित्येक वर्षांत ती बनवण्याची पद्धत आणि त्यासाठी वापरले जाणारे जिन्नस बदललेले नाहीत. बकऱ्याचा पायाही त्याच पंक्तीतला. आदल्या दिवशी रात्री मंद आचेवर बकऱ्याचा पाया शिजवायला ठेवला जात असे आणि दुसऱ्या दिवशी तो सव्‍‌र्ह केला जात असे. मटण कबाब आणि लंबा पाव हा आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी भारतीय बर्गरसारखा होता. त्यासाठीचे विशिष्ट आकाराचे पाव मोहम्मद अली रोडवरील बेकरीतून येत असत. शिवाय बाजूलाच असलेल्या रेडिओ बेकरीतूनही ताजे पाव आणि इतर बेकरी पदार्थाची आयात केली जात असे. रेडिओ रेस्टॉरंट हे मुंबईतील कदाचित शेवटचं रेस्टॉरंट असेल जिथे बकऱ्याचा गुर्दा हा प्रकार सकाळच्या न्याहरीमध्ये खायला मिळतो. काळानुसार रेडिओच्या मेन्यूमध्ये चांगलाच बदल झाला असून मोगलाइसोबतच पंजाबी आणि चायनीज पदार्थाचाही त्यात समावेश झालेला आहे. मुर्ग तालिबान ही काजूच्या ग्रेव्हीमध्ये तयार केलेली करी, चिकन फ्राइड राइस आणि चिकन लॉलीपॉप यांच्यापासून तयार झालेल्या इंडिया-पाकिस्तान या डिशला आता सर्वाधिक मागणी आहे.

क्रॉफर्ड मार्केट आणि मुसाफीरखान्याचा परिसर हा फार पूर्वीपासूनच गँगस्टर्ससाठी ओळखला जातो. जाबीरभाई सांगतात, त्या काळी सर्व स्तरांतील, क्षेत्रातील आणि व्यवसायातील माणसांची ऊठबस येथे असे. परंतु कुणीही रेस्टॉरंटचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर केला नाही. येथे येणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांनीही सामान्य माणसांना कधीच त्रास दिला नाही. आजूबाजूच्या परिसरातील मच्छी मार्केट, मनीष मार्केट, क्रॉफर्ड मार्केट येथे काम करणारी मंडळी, रेडिओ टॉकीजचा प्रेक्षक आणि या परिसरात खरेदीसाठी येणारी मंडळी सर्व जण आवर्जून रेस्टॉरंटमध्ये येत असत. काही खाल्लं नाही तरी निदान चहाचा घोट तरी नक्की घेऊन जात.

जाबीरभाई आजही बेंटवूडच्याच खुर्चीवर बसतात आणि त्याचं गल्ल्याचं टेबलही लाकडी आहे. त्या टेबलावर लाकडी बॉक्समध्ये काही पितळेची पाच, दहा, पन्नास, शंभराची टोकन दिसतात. पदार्थ पार्सल घेऊन जाताना ती टोकन सोबत नेली जात आणि पदार्थ पोहोचवल्यानंतर ग्राहकांकडून टोकनच्या किमतीएवढे पैसे घेतले जात. आजही ती नाणी आहेत पण जर्मन आणि प्लास्टिकची.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेस्टॉरंट आजही सकाळी सहा वाजता सुरू होतं आणि रात्री १२ वाजता बंद होतं. पण पूर्वी जसा हा बरकतवाला धंदा होता तसा आता राहिलेला नाही, अशी खंत जाबीरभाई व्यक्त करतात. कारण आता नाक्यानाक्यावर हॉटेलं उघडली आहेत. न्यायालयात प्रकरण असल्यामुळे रेडिओ रेस्टॉरंट किती काळ तग धरेल कुणास ठाऊक. त्यामुळे मुंबईचं एकेकाळचं हे भव्य वैभव एकदातरी जरूर पाहायला हवं.