असुरक्षितता, घाई, धावपळ, स्पर्धा आणि तणाव.. यातून सुटका नाही का? हे सगळं नसेल तर आयुष्यात मजा काय? यातली खुमारी तर राहिली पाहिजे पण तोलही जायला नको. करता येईल असं? स्ट्रेस मॅनेजमेंटच्या टिप्स देणाऱ्या गोष्टी दर आठवडय़ाला..

ऑफिस जवळ असूनदेखील कितीही ठरवलं तरी नीरजाला रोज निघताना घाई होते. कामात नीट लक्ष लागत नाही आणि इतर बरंच काही.. या घाईवर तोडगा काय? गेल्या आठवडय़ात नीरजाची ही गोष्ट सांगत होते. ‘‘माझ्या घाईवर उपाय सांगणार आहेस म्हणजे टाइम मॅनेजमेंटविषयीच बोलणार आहेस नं?’’ रोज ऑफिसला पोचायला उशीर होत असल्यानं नीरजा अगदी जेरीला आलेली होती.  लोकांचे निरनिराळे उपाय ऐकून वैतागली होती आणि त्यामुळेच काही ऐकून घ्यायच्या मन:स्थितीत नव्हती. ‘‘माहितेय मला आणि तेच जमत नाहीये.  एकदा ते जमलं की झालं. ती कशी करायची याची थिअरी पाठ आहे मला.  सांगू?.. दिवसातले एकूण चोवीस तास, त्यातून झोपेच्या, जेवणाच्या वेळा वजा करायच्या. उरलेला वेळ काम, प्रवास, टाइमपास, अभ्यास, वाचन यामध्ये डिव्हाइड करायचा. यातून आपल्याला हे कळतं की, आपल्याजवळ भरपूर वेळ आहे. ही झाली पहिली पायरी. दुसरी पायरी म्हणजे या वेळेचं प्लॅनिंग करायचं, टाइमटेबल बनवायचं आणि तिसरी पायरी म्हणजे ते प्रत्यक्षात आणायचं. तुला सांगू.. यातल्या पहिल्या दोन पायऱ्यांपर्यंत कितीकदा पोचलेय मी; पण ते प्रत्यक्षात आणणं काही जमत नाही मला. यापेक्षा वेगळं काही सांगणार असशील तर सांग.’’ नीरजानं मला चॅलेंजच दिलं.

‘‘तुझं म्हणणं शंभर टक्के मान्य. हे प्रत्यक्षात आणण्याचं काम महत्त्वाचं आणि तेच होत नाही. मग आजचं आपलं डिस्कशन आपण फक्त तू ऑफिसला वेळेवर पोचणं- इथपर्यंतच मर्यादित ठेवू, चालेल?’’

नीरजाचं म्हणणं खरं आहे. आपण मारे प्लॅन्स करतो, पण जेव्हा कृती करायची वेळ येते तेव्हा खरी गोची होते. मग टाइम मॅनेजमेंटचा इतका उदोउदो करतात, तो का? ती फक्त तात्पुरती मलमपट्टी असते का? आपण काही तरी करतोय असा खोटा दिलासा देणारी? ही जी प्लॅनिंग आणि कृती यातली गॅप आहे ती कशानं भरून निघते? असा विचार करू या की, एखादी गोष्ट करावी असं जेव्हा मनापासून वाटत नसेल तर काय होतं? नाइलाज म्हणून, उरकून टाकायचं म्हणून केलेली कामं कधी वेळेवर होतात का? क्वचित काही वेळा असं दामटून केलेलं काम होईलही, वेळेशी झटापट करून काही काळापुरतं धकवून नेताही येईल; पण तसं नेहमी नाही घडत. म्हणूनच असं वाटतं की, आपण एखादं काम का करतोय याच्या गाभ्यापर्यंत जायला हवं. आपल्या आत डोकावून पाहायला हवं, थोडं इंट्रोस्पेक्शन, थोडं मेडिटेशन करायला हवं. हे इंट्रोस्पेक्शन ही काही फार बोअरिंग, म्हातारपणी करायची गोष्ट नव्हे आणि मेडिटेशन म्हणजे तरी काय? आपला आपल्याशी संवादच ना? एक्सपर्ट्स म्हणतात की, हातातलं कुठलंही काम एकचित्तानं, मनापासून, तल्लीनपणे करणं म्हणजे मेडिटेशनच. त्यासाठी गुहेत ध्यान धरून बसायला नको. मग ते काम समोरच्या टेबलावरची धूळ झटकायचं असो की ऑफिसला जायची तयारी करणं असो. काम करण्यामागचा आपला हेतू, त्याचं महत्त्व, त्यातून मिळणारे फायदे लक्षात आले तर नक्कीच ते काम करायला गती येईल.

काम मनापासून करण्याचा वेळेवर पोचण्याशी काय संबंध हे थोडं स्पष्ट व्हावं म्हणून नीरजाच्या ऑफिसला वेळेवर पोचण्याच्या संदर्भात पाहू या.  नीरजासाठी अ‍ॅड एजन्सीचं तिचं ऑफिस ही एक रूटीन, कंटाळवाणी गोष्ट झालीये. जरी मुळात क्रिएटिव्ह कामाची आवड असली तरी त्याबरोबर येणाऱ्या कटकटी, अडथळे आणि क्लेरिकल वर्क याविषयी तिनं कधीच फारसा विचार केलेला नव्हता. आता तिला त्यांचा बागुलबुवा जास्त वाटायला लागला होता.  हे अडथळे आठवून ती डिस्करेज व्हायची. ऑफिसमध्ये जाणं हे आनंददायी न होता एक जुलमाचं काम झालं होतं. कामातला क्रिएटिव्ह आनंद कुठे तरी हरवलाच, सगळा फोकस या फापटपसाऱ्यावर गेला. कितीही प्लॅन केलं तरी जमेचना काही.

नीरजा नंतर म्हणाली, ‘‘आपलं हे सगळं बोलणं झाल्यावर माझ्या लक्षात आलं की, खरंच मी अक्षरश: पाय ओढत ऑफिसला पोचायचे. सकाळी उठताना मनात विचार यायचा, बाप रे, आता ऑफिस! रविवार संपत आला की सोमवारच्या नुसत्या आठवणीनंही अंगावर काटा यायचा. माझं आवडतं काम आणि त्यातली मज्जा विसरूनच गेले होते मी. एक प्रकारच्या रटाळ रूटीनमध्ये अडकले होते. मला टाइम मॅनेजमेंट करायला लागलीच, त्यापासून सुटका नाही; पण माझ्या कामातला आनंद परत मिळवायचा प्रयत्न केला मी.  कामातले अडथळे, ऑफिसमधल्या अनावश्यक कटकटी यांना जरा बायपास करून आवडीच्या गोष्टींचा आस्वाद घ्यायला लागले. संध्याकाळी न कंटाळता जिमला जायला लागले. आपोआपच माझा अ‍ॅटिटय़ूड बदलला. ऑफिसला जाताना उत्साह वाटायला लागला आणि मी ओढाताण न होता सुरळीतपणे पोचायला लागले. आता अचानक त्यातल्या किती तरी नवनवीन शक्यता दिसायला लागल्यात मला. काम तेच, पण एक नवा अँगल मिळाल्यासारखा वाटतोय त्याकडे बघण्याचा.’’ ‘नॉट जस्ट अबाऊट टाइम मॅनेजमेंट, इट्स अबाऊट युवर अ‍ॅटिटय़ूड!’

 

डॉ. वैशाली देशमुख

viva @expressindia.com