कमलेश मयेकर डकार, सेनेगल

एरवी आपण सहसा गेलो नसतो, अशा आफ्रिका खंडातील काही देशांत मी ऑइल फिल्डमध्ये असल्याने जवळपास पाच र्वष कामानिमित्त राहायला मिळालं. सध्या मी भारतात आहे. या देशांपैकी सेनेगलमध्ये आफ्रिकन आणि अरेबिक लोकांची संख्या अधिक असून युरोपियन लोकांची संख्याही लक्षणीय आहे. हा आखीवरेखीव देश टिपिकल आफ्रिकन देश आहे, असं जाणवत नाही. सेनेगलची राजधानी डकारमध्ये मी राहात होतो. कंपनीतर्फे जात असल्याने राहाण्यात फारशी काही अडीअडचणी येत नाही. सेनेगल आणि शेजारच्या मॉरितानियामध्ये मी दीड वर्ष येऊनजाऊन होतो.

सेनेगल हा पर्यटनप्रधान देश आहे. तिथला समुद्रकिनारा खडकाळ आहे. आपल्यासारखा वाळूचा नाही. एकूणच युरोपीय संस्कृतीची छाप तिथे दिसून येते. युरोपियन लोकांसारखी जीवनशैली जगायला तिथल्या लोकांना आवडतं. मग त्यांची पार्टी असो किंवा म्युझिक असो. इतर आफ्रिकन देशांशी तुलना केल्यास हा देश थोडा सुटसुटीत, स्टेबल आणि सोबर वाटतो. उपजीविकेचं मुख्य साधन हे पर्यटनच असून येत्या काळात ऑइल आणि गॅस इंडस्ट्रीमुळे भरभराट होण्याची शक्यता वाढीस लागली आहे. लोकांना नव्या संधी मिळण्याची आणि त्यावर त्यांचं अर्थकारण बदलण्याची शक्यता आहे. हा देश राहण्यासाठी सुरक्षित आहे. भारतीय लोकांचे छोटय़ा स्तरावर रेस्तराँ वगैरे उद्योग आहेत. भारतीयांची तिसरी पिढी इथे नांदते आहे. पाकिस्तानी वंशाचे लोकही तिथे राहतात. ऑफिसमधल्या पाकिस्तानी सहकाऱ्यांशी कधीकधी गप्पांच्या ओघात दोन्हीकडची सामाजिक परिस्थिती, सांस्कृतिक चालीरीतींविषयी चर्चा होते. उदाहरणार्थ ‘बजरंगी भाईजान’ प्रसिद्ध झाल्यावर एकानं सांगितलं की, आम्हाला तो फार आवडला. त्यात दाखवलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडल्यास खूप चांगलं होईल, असं बऱ्याच लोकांचं मत होतं.

सेनेगलमधल्या लोकांना भारतातील संस्कृती, बॉलीवूड, अर्थकारण, जीवनशैली, धर्म, वेळ घालवण्यासाठीची साधनं, उपजीविकेची साधनं, भारत-पाकिस्तानचे संबंध अशा अनेक मुद्दय़ांबद्दल कुतूहल वाटतं, त्यामुळे ते सतत त्याबद्दल विचारतात. तिथल्या पिंक लेकच्या पाण्यावर हलकीशी गुलाबी रंगाची छटा दिसते. सेनेगल एअरपोर्टच्या बाहेर आफ्रिकन रेनेसाँ मॉन्यूमेंट उभारण्यात आलं आहे. अनेक प्रकारची हॉटेल्स इथे असल्याने गैरसोय होत नाही. ट्रॅफिकचा थोडासा प्रश्न असला तरी रस्ते खूपच छान, स्वच्छ असून टॅक्सी वगैरे नीट मिळते. भारतीय रेस्तराँही बऱ्यापैकी आहेत. युरोपियन पद्धतीचं फूड हमखास मिळतं. स्थानिकांना चिकन वगैरे आवडतं, मात्र त्यांना आपले पदार्थ तिखट लागतात. एकदा आम्ही केलेली पाणीपुरी काही जणांनी आवडीने खाल्ली होती. आपल्या पदार्थाची चव चाखायला त्यांना आवडते आणि कमी तिखट केल्यास ते आवडीने खातात. नातेसंबंधातही इथे मोकळेपणा असून लिव्ह इन रिलेशन कॉमन आहे. कुटुंबसंस्था काही प्रमाणात आहेही आणि नाहीही.

इथले लोक मिळूनमिसळून राहणारे आहेत. आपण थोडा आदर दिलेला त्यांना आवडतो. गोड बोलून काम करून घेतल्यास त्यांच्याकडून नक्कीच मदत मिळते. ते पुष्कळ सुसंस्कृत आहेत. एक नक्की की, बाकीच्या आफ्रिकन देशांप्रमाणे आला दिवस ढकलला, ही तिथली मानसिकता नाही. ते काही तरी करून दाखवतील अशी आशा वाटते. तिथे फ्रेंच भाषा बोलली जाते आणि मला संवाद साधण्यापुरतं फ्रेंच येत असल्याने माझं अडलं नाही. शिवाय त्यांना मोजकं इंग्लिशही येतं. अजूनही इथे बराच विकास व्हायला वाव आहे. वैद्यकीय सुविधा महाग आहेत. हे आफ्रिकी देश पूर्णपणे स्वावलंबी झालेले नाहीत. फुटबॉल हा खेळ प्रचंड आवडीने खेळला जातो आणि लहानथोर सगळे फुटबॉल मॅच एन्जॉय करतात. डकारची तर टुरिस्ट प्लेस हीच ओळख आहे. हे विकसनशील आणि व्यवस्थित शहर असून तिथल्या गरिबीचं चित्र चटकन अंगावर येणारं नाही. इथे काही छोटे आयलंड असून एक दिवसाची पिकनिक होते. तेव्हा मात्र काही क्षण युरोपमध्येच राहिल्याचा भास होतो.

मॉरितानिया या सेनेगलच्या बाजूच्या देशात पूर्ण वाळवंट आहे. अत्यंत दुर्लक्षित आणि गरीब असा देश आहे. लोकसंख्या जेमतेम ४० लाख असेल. राजधानी नॉक्शोत् आहे. तिथलं एअरपोर्ट एकदम साधंसं आहे. बाहेर पडल्यावर तिथे वेगळ्याच पोशाखातले लोक दिसायला लागले. नंतर गाडीत बसल्यावर ड्रायव्हरकडून कळलं की, तो त्यांचा पारंपरिक पोशाख होता. हा पोशाख ते आवर्जून घालतात. त्यांचं उपजीविकेचं साधन मासेमारी असून समुद्राचं पाणी अतिशय नितळ आहे. इथेही ऑइल इंडस्ट्री मूळ धरू लागेल, असं वाटतं आहे. या मुस्लीम देशावर अरेबिक प्रभाव जास्ती दिसतो. नमाजाची वेळ कटाक्षाने पाळली जाते. लक्षणीय गोष्ट म्हणजे इथे पुरुष चालकांपेक्षा महिला चालकांची संख्या अधिक आहे. आपले पदार्थ मिळत नसल्याने अरेबिक पद्धतीचे पदार्थच खावे लागतात.

अंगोलासह काही आफ्रिकन देशांमध्ये मजूर बायका पाठीला बाळ बांधून कामाला येतात. त्या मुलांना शांत ठेवण्यासाठी नाइलाजाने अफू-गांजा खाऊ  घालतात. त्यामुळे दुर्दैवाने ती मुलंही पुढे त्याच चक्रात अडकतात. अंगोलात प्रचंड गरिबी असून फारसा विकास झालेला नाही. ख्रिश्चनांचा प्रभाव दिसत असून त्यांना युरोपीय संस्कृतीचं भयंकर आकर्षण वाटतं. काही भारतीय रेस्तराँ असली तरी युरोपियन खाद्यसंस्कृतीचाच प्रभाव अधिक दिसतो. ते आपण फारसं खाऊ  शकत नाही. वैद्यकीय सुविधाही फारशा प्रगत नाहीत. एक निरीक्षण असं की, चीनचा या आफ्रिकन देशांवर खूप प्रभाव पडताना दिसतो आहे. रस्ते किंवा हॉस्पिटल बांधून देण्याचं काम चीन करत आहे. त्यांचे हातपाय तिथे पसरत आहेत. काही देशांत भारतीय सरकारतर्फे विकासकामं होत आहेत. अंगोलात इंग्रजीचा वापर खूप कमी होतो. अंगोलाची राजधानी लुआंडा हे जगातील सर्वात महागडं शहर अशी ख्याती आहे. तिथे काहीही निर्माण होत नाही, सगळं आयात करावं लागत असल्याने तिथे प्रचंड महागाई आहे.

मी अंगोलामध्ये राहात असताना भारतात निर्भयाचं प्रकरण घडलं होतं. निर्भयासारखी दुर्दैवी घटना पार आफ्रिकेतील लोकांपर्यंतही पोहोचली होती आणि त्याबद्दल अनेकदा जाब विचारले गेले होते.. अंगोला, कांगो, घाना वगैरे या मध्य आफ्रिकेतील देशांत यादवी युद्धाचे परिणाम खोलवर झालेले दिसतात. कांगोसारख्या देशात घरटी किमान एखादी व्यक्ती त्या वेळच्या गोळीबाराला बळी पडली होती. आता ते त्यातून बाहेर आले आहेत. अंगोलातील लोकांना थोडं छानछौकीचं आकर्षण आहे. पैसे उडवावेसे वाटतात, कमावण्यापेक्षा. पैसे साठवणं ही वृत्ती नाहीच. मात्र त्यांना आदरानं वागवलं तर तेही आपल्याला तसंच वागवतात. एकदा मी ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलो होतो. त्याने माझ्याकडे काही पैसे मागितले. मी पैसे त्याच्या सीटवर ठेवले. त्याने आक्षेप घेत पैसे असे ठेवणं ही अपमानास्पद गोष्ट आहे, असं सांगितलं. मग मी पैसे त्याच्या हातात दिले आणि दिलगिरी व्यक्त केली. एक किस्सा अमेरिकन माणूस आणि त्याच्या ड्रायव्हरचा. अमेरिकन माणूस ड्रायव्हिंगबद्दल सतत तक्रार करत होता. त्याने ड्रायव्हरला शिवीही दिली. शेवटी त्या ड्रायव्हरने चिडून गाडी भर रस्त्यात सोडली आणि तो निघून गेला. त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो. मात्र काही वेळा या लोकांना थोडा दिखावाही हवा असतो. प्रसंगी घर नसेल, पण एखादी गाडी किंवा महाग मोबाइल मिरवायचा असतो. थोडा सुस्त स्वभाव आहे. ऑइल फिल्डमध्ये शिरकाव झालेल्यांनी बऱ्यापैकी पैसे कमावले, मात्र ते साठवले नाहीत; उडवले. काम जास्ती करायला नको, पण पगार द्यायला थोडासा उशीर झाल्यास लगेच संपावर जातात. काही भारतीय लघुउद्योगांसाठी भारतीय मुलांना तिथे काम देतात, पण त्यांची बऱ्यापैकी पिळवणूक व फसवणूक केली जाते. माणुसकीने वागवलं जात नाही. काही देशांनी आफ्रिकन देशांचं खूप शोषण केलं आहे. त्यांना आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडू द्यायचं नाही, अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केली गेली असावी..

डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोची राजधानी किन्शासा आहे. हा प्रचंड गरीब देश आहे. इथे रस्त्यावर कुत्रे कुठेच दिसले नाहीत. चौकशी केल्यावर कळलं की, ते कुत्रे मारून खातात. तिथे धड रस्तेही नाहीत. गुजराती मुस्लिमांची वस्ती असून ते छोटेछोटे उद्योग करतात. लोक स्वभावाने गरीब आहेत. मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मला फ्रेंच येत नव्हतं; पण त्यांनी मला खूपच समजून घेतलं, समजावून सांगितलं. येत नव्हतं ते शिकवलं. मदत केली. युरोपीयन वसाहतवाद्यांनी विस्कटून ठेवलेले हे देश आताआता कुठे थोडेसे सावरायला लागले आहेत. यातले बरेचसे देश निसर्गसंपन्न असले तरी पण त्या साधनसंपत्तीचा योग्य तो उपयोग करून देशाचा सर्वागीण विकास करणारे नेतृत्व त्यांना लाभलेलं नाही. मात्र आताशा काही देशांमध्ये प्रगतीची झुळूक यायला लागली आहे..

viva@expressindia.com