|| मितेश जोशी
अभिजात संगीताच्या साधकांना कलाप्रस्तुतीसाठी मंच उपलब्ध होत नाही त्याचप्रमाणे पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये होतात तसे शास्त्रोक्त संगीताचे उत्सव लहान गावात, खेडय़ात दुर्गम भागात होताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा भागांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड जोपासणं अवघड होत चाललंय. या विषयी केवळ खंत करत न बसता युवा पिढीतील प्रतिभावान व आश्वासक गायक डॉ अतींद्र सरवडीकर यांनी पुढाकार घेऊन ‘लिसनर्स कॉर्नर’ हा प्रकल्प सुरु केला आहे.
‘लिसनर्स कॉर्नर’मध्ये ज्येष्ठ कलाकारांबरोबरच उभरत्या कलाकारांना कलासादरीकरणाची संधी देण्यात येते व त्यानंतर त्यांना त्यांचा कलाविचार व कलाप्रवास याबाबत सांगण्यासाठीही वेळ राखून ठेवला जातो. यावेळी श्रोतेही उस्फूर्तपणे आपल्या शंका व प्रश्न उपस्थित करतात. यामधून श्रोत्यांची संगीत विषयक आवड व समज वाढीस लागते. या मासिक संगीत शृंखलेचे आतापर्यंत १२ एपिसोड्स गेल्या वर्षभरात मुंबईत सादर झाले असून त्यांना श्रोत्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या ८५ व्या जन्मवर्षांचे निमित्त साधून ही अनोखी मैफल शृंखला त्यांना अर्पण करण्यात आली होती.
या वर्षीपासून ‘लिसनर्स कॉर्नर महाराष्ट्र दौरा’ या विशेष प्रकल्पाचं नियोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत मुंबईत होणाऱ्या या छोटेखानी संगीत बैठकी, या वर्षीपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा संकल्प केला गेला आहे. याद्वारे केवळ महाराष्ट्रातील कलाकारांनाच संधी मिळणार नाहीये तर राज्याच्या कानाकोपऱ्यात अभिजात रागसंगीत ऐकणारा जाणकार श्रोता घडविण्याच्या महत्त्वाच्या कार्यालाही हातभार लागणार आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भाग, आदिवासी भाग, नक्षलग्रस्त भाग तसंच सांगीतिकदृष्टय़ा कमी विकसित भागातही अशा शास्त्रोक्त संगीताचा प्रसार करणाऱ्या बैठकी आयोजित करता याव्यात यासाठी डॉ. अतींद्र यांच्या तरुण होतकरू चमुंचे प्रयत्न सुरू आहेत. या महाराष्ट्र दौऱ्याची पहिली बैठक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली इथे पार पडली. डॉ. अतींद्र म्हणतात, दौऱ्यातील हा पहिलाच कार्यक्रम असल्याने मनात थोडी शंका होती की शास्त्रोक्त संगीताच्या या बैठकीला कसा प्रतिसाद मिळेल? पण कार्यक्रम खूप रंगला. अपेक्षेपेक्षा जास्त श्रोते ऐकायला आले.दुसरी बैठक रायगड जिल्ह्यतील नेरळ येथे पार पडली तर तिसरी बैठक अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्या जवळच्या घुगल वडगाव या अगदीच छोटय़ाश्या गावात पार पडली.
शास्त्रीय संगीताची प्रस्तुती छोटय़ा घरगुती मैफलीमध्ये ऐकणे अधिक आनंद देणारे व उद्बोधक असते, कारण यामध्ये श्रोत्यांना कलाकाराला जवळून ऐकता येते तसेच कलाकाराला आपल्या सादरीकरणाला मिळणारी दाद अधिक चांगली अनुभवता येते. सध्याच्या काळात मात्र अशा घरगुती छोटेखानी मैफिली दुर्मीळ होत चाललेल्या दिसून येत आहेत. संगीताचे महोत्सव आणि इव्हेंट्स होत आहेत, पण अशा कार्यक्रमांमध्ये प्रस्थापित व त्याच त्या कलाकारांना संधी मिळताना अनेकदा दिसते. ‘लिसनर्स कॉर्नर’च्या बैठकींमधून हे सगळे उद्देश सफल होताना दिसत आहेत. या बैठकींच्या आयोजनामध्ये प्रामुख्याने युवा वर्गाचा समावेश असणं हे एक महत्वाचं वैशिष्टय़ मानावं लागेल. शास्त्रोक्त संगीताची आवड असणारे जवळपास आठ ते दहा युवक या कार्यक्रमांच्या आयोजनात तन-मनाने सहभागी होत असतात हेही विशेष म्हणावे लागेल. यातील कुणी आय.टी. इंजिनीयर आहेत, कुणी प्राध्यापक आहेत, कुणी सीएचा अभ्यास करत आहेत तर कुणी आयआयटी सारख्या नामांकित संस्थेत शिकत आहेत. हे सगळे ‘लिसनर्स कॉर्नर’साठी आवर्जून वेळ काढतात, एकत्र येतात. कुठल्याही मदतीशिवाय स्वत:च एकत्रित होऊन गावोगावी कार्यक्रम आयोजित करून अभिजात संगीताचा असा आनंद वाटणं, श्रोत्यांना-कलाकारांना संधी उपलब्ध करून देणं खूप वेगळं आणि विशेष आहे. आपल्या अभिजात भारतीय रागदारी संगीताची परंपरा नव्या पिढीने खऱ्या अर्थाने स्वत:च्या खांद्यावर घेतली आहे, असं म्हणावं लागेल. फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडियावर या ‘लिसनर्स कॉर्नर’ची चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमांना अधिक यशस्वी करण्यासाठी तसेच आपल्या शहरात आयोजित करण्यासाठी प्रायोजक, कलाकार, रसिक, स्थानिक संस्था यांनी संपर्क करावा, असं आवाहनही ‘लिसनर्स कॉर्नर’च्या वतीने करण्यात आलं आहे.
viva@expressindia.com